(फ्लॅशबॅक)
कल्पनाला कांताबाईने पैसे देऊन निरोप दिला. आपण या कचाट्यातून सुटलो असा तिचा समज झाला आणि ती हातात असलेले पैसे आणि अंगावर असलेले दागिने तेवढं घेऊन चालायला लागली. घरी परतायचं नव्हतं, सगळं गमावलं असलं तरी जीव शाबूत ठेवायची हिम्मत तिच्यात होती. कुठे जाणार काय करणार काहीही माहीत नव्हतं. आपल्या सोबत जे झालंय ते पचवतच तिने अर्धा दिवस फिरून घालवला. मनाने शेवटी पुढे ठाकलेलं आयुष्य स्वीकारलं पण शरीर आता त्याचे रंग दाखवू लागलं..पोटात भूक उसळली, विधी दाटून आले, तहान लागली..देवाने शरीराला तहान भुकेचे चोचले का दिले असावेत असं उगाच तिला वाटू लागलं. फिरत फिरत एका शांत सभ्य माणसांच्या सोसायटीत ती गेली. एका बिल्डिंग खाली असलेल्या आवारात एका बाकावर ती बसली. त्या बिल्डिंग च्या कंपाउंडला एक बोर्ड लावला होता, "घर भाड्याने देणे आहे, संपर्क करा खालील नंबर वर.."
कल्पना जवळच्या फोन बूथ वर गेली आणि तिने नंबर लावला..तो माणूस लगेच तिथे आला आणि त्याने खोली दाखवली.. पण घर भाड्याने देतांना बऱ्याच कायदेशीर गोष्टी पूर्ण कराव्या लागणार होत्या. कल्पनाची सगळी कागदपत्र तिच्या घरी..तिने घरमालकाकडे आर्जव केला..घरमालकालाही आपला भाडेकरू हा सुयोग्य हवा होता, त्याला कल्पनाचा विषय वेगळाच वाटला..शेवटी त्याने स्पष्टपणे सांगितलं की तुमची केस विचित्र दिसतेय, तुम्हाला घर देऊ शकत नाही..
कल्पना जवळच्या फोन बूथ वर गेली आणि तिने नंबर लावला..तो माणूस लगेच तिथे आला आणि त्याने खोली दाखवली.. पण घर भाड्याने देतांना बऱ्याच कायदेशीर गोष्टी पूर्ण कराव्या लागणार होत्या. कल्पनाची सगळी कागदपत्र तिच्या घरी..तिने घरमालकाकडे आर्जव केला..घरमालकालाही आपला भाडेकरू हा सुयोग्य हवा होता, त्याला कल्पनाचा विषय वेगळाच वाटला..शेवटी त्याने स्पष्टपणे सांगितलं की तुमची केस विचित्र दिसतेय, तुम्हाला घर देऊ शकत नाही..
संध्याकाळ झाली..कल्पनाने अनेक घरं शोधली पण सगळं व्यर्थ. शेवटी एका झोपडपट्टीकडे तिचं लक्ष गेलं. तिथे पत्र्यांच्या काही खोल्या होत्या..एका बाईने तिला पाहिलं आणि विचारपूस केली..
"हे पाय, तुला एक खोली मिळन..1500 रुपये भाडं द्यावं लागल..अन सोबत काम बी मिळन..करशील?"
कल्पनाला अजून काय हवं होतं, ती तयार झाली..त्या बाईने तिला झोपडपट्टीतल्या शेवटच्या खोलीकडे नेलं..खोली कसली, अडगळ होती सगळी. एक गंजलेला लोखंडी पलंग, त्यावर कापडही नव्हतं. आजूबाजूला सगळ्या भंगारातल्या वस्तू..खोलीला लागूनच मागून गटार होतं, त्याचा वास असह्य होत होता..असं वाटत होतं इथून पळून जावं..पण जाणार कुठे? त्या बाईने कल्पनाच्या जेवण्याची सोय केली आणि निघून आली. कल्पना दिवसभर चालून इतकी थकली होती की त्या रुतत असलेल्या कॉटवर ती लगेच झोपी गेली. दुसऱ्या दिवशी कालची ती बाई एकदम समोर आली, आता पुढ्यात काय वाढून ठेवलं असेल याचीच तिला चिंता पडली. त्या बाईने कल्पनाला तिच्या घरी यायला सांगितलं. कल्पना तिच्या घरी गेली, अंघोळ केली, चहा घेतला..कल्पनाने त्या बाईला विचारले,
"तुम्ही काहीतरी काम देणार होत्या, काय आहे ते? पगार किती आहे?"
"सांगते.. आधी अंगावरची ही साडी काढ आणि मी दिलेली साडी नेस.."
ती बाई कल्पनाला एक साडी देते, अत्यंत मळलेली आणि जागोजागी फाटलेली..
"ताई यापेक्षा अंगावरची साडी बरी आहे माझी.."
"सांगितलं तेवढं कर अन चल माझ्या मागे चुपचाप.."
त्या बाईनेही अंगावरची चांगली साडी उतरवून मळलेली साडी नेसली..झोपडपट्टीत असलेल्या शेजाऱ्याच्या पाच मुलांपैकी दोन लहान मुलं सोबत घेतली..एक मूल कल्पना कडे दिलं..आणि ती बाई कल्पनाला घेऊन रहदारीच्या रस्त्यावर गेली. कल्पनाला समजेना काय काम आहे ते..ती बाई म्हणाली, आता मी जे करते ते बघ आणि तसंच कर..
कल्पना रस्त्याच्या बाजूला उभी राहून बघू लागली, अंगातल्या साडीमुळे तिला खरं तर खुप लाज वाटत होती.
त्या बाईने मुलाला कडेवर घेतलं आणि सिग्नलवर चारचाकी गाड्यांशेजारी जाऊन खिडकीपाशी डोकावू लागली..
"माय पैसे दे गं.. चार दिवस काही खाल्लं नाही..लेकरासाठी तरी दे.."
कडेवरच्या त्या लहान मुलाने ढेकर दिली तसं त्या बाईने त्याला चूप राहायचा इशारा केला. काय करणार तो, सकाळी उठून दाबून खाऊ खाल्ला होता त्याने आणि रोजच्याप्रमाणे मावशी सोबत फिरायला आलेला..त्याला मजा वाटत असे..
त्यांचा हा अभिनय बघून खूप माणसं विरघळून जात आणि हातात पैसे टेकवत.
कल्पनाने हे पाहिलं आणि तिला चक्करच येऊ लागली.
"म्हणजे भीक मागायची आपण?"
तिने स्वतःलाच प्रश्न केला. त्या बाईने एव्हाना 500 रुपये जमा केलेले..आणि ते घेऊन ती कल्पना कडे आली..
"समजलं? जा आता.."
कल्पना सुन्न झाली, पाय जागीच थबकले..सिग्नलपाशी तिने पाहिलं... कॉलेजमधली तिची मैत्रीण तिला दिसली..कल्पनाने पटकन पदराने तोंड झाकलं..सिग्नल सुटला आणि माणसं सुसाट गाड्या पुढे घेऊ लागली. एका कार मध्ये तिला तिच्या नवऱ्याचा मित्र दिसला...वहिनी वहिनी म्हणून खूप चेष्टा मस्करी करायचा...तिने अजूनच आपलं तोंड लपवलं... काही वेळाने दुचाकीवरून एक जोडपं जाताना दिसलं..त्यातली बाई दुसरी तिसरी कुणी नसून तिचीच सख्खी बहीण..!!! तिला पाहून कल्पनाला अश्रू आवरत नव्हते, असं वाटत होतं की तिला थांबवावं आणि तिचा आसरा घ्यावा...पण तिला भूतकाळ आठवला.. याच बहिणीच्या नवऱ्याने हुंडा दिला नाही म्हणून तिच्या बहिणीला जबरदस्त मारहाण करून छळ केला होता..कितीदा तिला माहेरी हाकललं होतं, तेव्हा नवऱ्याच्या हातपाय पडून तिने त्याचा सहारा घेतला होता..आता जर माझं ओझं हिच्यावर आलं तर...तिचा संसार मोडेल, नाही...हे मी नाही होऊ देणार...
अत्यंत भयंकर असा अनुभव घेऊन ती त्या बाईची नजर चुकवून पसार झाली..तिच्याकडे असलेला मुलगा आधीच त्या बाईकडे सोपवला आणि ती तिथून सटकली...ती फक्त धावत होती..धावत होती... वेडं व्हायची वेळ आलेली तिच्यावर. अंगावर असे कपडे आणि त्यात असं वेड्यासारखं पळणं बघून लोकं खरोखर तिला वेडी बाई समजू लागलेले..
अश्या बिकट प्रसंगी कल्पनाला शांतीपेठेशिवाय दुसरा मार्ग दिसत नव्हता..अब्रू इथेही जाणार होती आणि तिथेही जाणारच आहे..मग निदान खाऊन पिऊन अब्रू गेलेली काय वाईट...तिथे किमान छत असेल, दोन वेळचं जेवण असेल...असही समाजात कुठे आणि कशासाठी इज्जत टिकवणार आपण? कुणासाठी स्वतःचं चारित्र्य स्वच्छ ठेवणार? मला ना संसार आहे ना आई वडील...मग कुणासाठी?? तिच्या मनाने पक्कं केलं आणि ती शांतीपेठेत परतली.. तिथून ती कशी पळून गेलेली हे तिला आठवलं.. तिला स्वतःवरच हसू येऊ लागलं..
"स्वतःची अब्रू विकणार नाही म्हणून इथून पळाले होते..पण कांताबाई बरोबर बोलल्या होत्या... समाजात असं एकट्या बाईने राहणं सोपं नाही...इथे आलेले तेव्हा माज होता मला..बाकीच्या बायकांकडे तुच्छतेने पाहत होते मी...पण अब्रू टिकवण्यासाठी बाहेर पडले आणि भिकेला लावलं गेलं मला...किमान या बायकांनी प्रेमाने चौकशी तरी केली...कसला आग्रहही केला नाही...आज त्याच बायका देवदूत वाटू लागल्याय मला..."
बाहेरचं जग जास्त कठीण होतं. जागोजागी भीक मागून आणि पदोपदी अब्रू वाचवत फिरण्यापेक्षा अब्रूचाच भर लोकांत लिलाव केला तर भय शिल्लकच राहणार नाही...अब्रू वाचवत फिरणाऱ्यांवर बलात्कार होतो, वेश्येवर कधी बलात्कार होत नाही..मग अब्रू वाचवायचा हाच एक मार्ग..!!! अब्रू चव्हाट्यावर आणायची..
कल्पना शांतीपेठेतील परतली.. कांताबाईंना सगळं सांगितलं आणि तेव्हापासून तीही एक सदस्य झाली शांतीपेठेतील..
अश्या कितीतरी कहाण्या होत्या तिथल्या प्रत्येक स्त्री च्या...सरळ सरळ वेश्या म्हणणं सोपं वाटतं पण प्रत्येकीवर एक कादंबरी लिहिता येईल इतकं काही घडून गेलेलं प्रत्येकीच्या आयुष्यात .!!!
अश्या कितीतरी कहाण्या होत्या तिथल्या प्रत्येक स्त्री च्या...सरळ सरळ वेश्या म्हणणं सोपं वाटतं पण प्रत्येकीवर एक कादंबरी लिहिता येईल इतकं काही घडून गेलेलं प्रत्येकीच्या आयुष्यात .!!!
****
सगळं जुनं आठवत असतानाच कल्पना तिथून बाहेर पडली आणि तिच्या घरी चालायला लागली..
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा