Login

रेड लाईट 8

Marathi Story


कांताबाई शारदा येणार म्हणून खोली नीट करवून घेत होत्या आणि दुसरीकडे कल्पना तिची लेक येणार म्हणून हैराण होती. कांताबाईला कल्पनाची घालमेल समजत होती. कांताबाई कल्पनाला दुसऱ्या खोलीत एकांतात घेऊन गेल्या आणि तिला सांगितलं..

"कल्पना, झालं गेलं विसरून जा..शारदा तुझी मुलगी आहे..आईची माया मिळू दे तिला.."

"मग राजेशचं काय? त्याच्याशी लग्न केलंय मी..तो स्वीकारेल तिला मुलगी म्हणून? इथे कित्येक पुरुषांशी संबंध आलाय माझा, तिचा बाप कोण माहीत नाही.."

कांताबाईला कल्पनाच्या स्वार्थाचा राग आला,

"बाप कुणी का असेना पण तू आई आहेस ना तिची? तुला तिचं काही पडलं नाही, स्वतः लग्न करून मोकळी झालीस.."

"कांताबाई मानवर दगड ठेवलाय मी, लग्न हे माझं स्वप्न नव्हतं. आणि काय आयुष्य देऊ मी तिला?समाजात काय म्हणून मिरवू? राजेश तिला तिचा बाप म्हणवून घेणार नाही, मग लोकांना काय सांगू? शांतीपेठेतील हे पाप म्हणूनच लोकं बघतील ना तिच्याकडे? आजही आम्ही जिथे राहतो तिथली लोकं आम्हाला तुसड्याने वागवतात..राजेश ला मी आधार दिला आणि त्याने मला.. शारदा जे आयुष्य जगतेय त्यातच तिचं सुख आहे...मी तिला माझ्यासोबत ठेवलं तर अपमानाशिवाय आणि लोकांच्या घाणेरड्या नजरेशिवाय तिच्या पदरी काहीही येणार नाही.."

कांताबाईचा राग शांत झाला, कल्पनाचं म्हणणं तिला पटलं. आई असली तरी मुलीच्या पदरी आपण भोगलेलं दुःखं येऊ नये म्हणून तिला दूर करणं हे आईच करू शकते..पण,

"तुला काय माहीत शारदा कुठे आहे ते?"

"मुलगी आहे ती माझी...कुठे असते काय करते सगळी माहिती आहे मला..माझ्या ओळखीतली काही माणसं तिच्या आजूबाजूला असतात.."

______

बोली केल्याप्रमाणे संध्याकाळी शारदा आणि वरद कॅफे मध्ये जातात. वरदच्या चेहऱ्यावर असं काही तेज होतं की त्याच्याकडे पाहतच राहावंसं वाटे. शारदा बोलण्याच्या बहाण्याने त्याच्याकडे पाही, पण त्याच्यात इतकी हरवून जाई की बोलणंच विसरून जाई. वरदने बोलायला सुरुवात केली..

"तुझ्याबद्दल सांग थोडसं, गाव कुठलं, आईवडील कुठे राहतात, काय करतात..."

शारदाला ज्या प्रश्नांची भीती होती तेच आता समोर आले. तिला वाईट वाटलं, आपलं उत्तर साधारण मुलींसारखं का नाही? अमू अमुक शहरात आई वडील आहेत, आई गृहिणी आहे आणि वडील अमुक अमुक ठिकाणी कामाला आहेत वगैरे..तिचा भूतकाळ समोर येणं म्हणजे समाजाचा तुसडेपणा स्वीकारण्यासारखं होतं. आपली एक बाजू लपवणं आणि दुसरी बाजू समाजाला दाखवणं हेच ती आजपर्यंत करत आलेली. वरद उत्तराची वाट बघत असतानाच समोर कॉफी आली आणि उत्तर द्यायचं संकट तात्पुरतं टळलं. वरदने पुन्हा हे प्रश्न विचारू नये म्हणून शारदाने जाणूनबुजून विषय दुसरीकडे वळवला..

"तू सामाजिक संस्थेत काम करतोस असं म्हणाला होतास, काय काम असतं नेमकं?"

"आशाकिरण नावाची आमची सामाजिक संस्था आहे. तिथे आम्ही समाजातील निराधार, दिव्यांग लोकांना मदत करतो, त्यांच्यासाठी वर्गणी गोळा करतो आणि त्यांची व्यवस्था लावतो.."

"कौतुकास्पद आहे हे खरंच..पण मला एक प्रश्न पडलाय..आजची मुलं चांगली नोकरी, चांगलं पॅकेज याच्या मागे लागतात..पण तू मात्र सोशल वर्क करतोस...तुझ्या सेटलमेंटचं काय?"

"तसं पाहिलं तर मी कॅलिफोर्निया मधून पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय.. खूप ऑफर्स आल्या होत्या मला...पण बाबांचं म्हणणं होतं की मी वरद इंडस्ट्रीज सांभाळावी.."

"एक मिनिट, वरद इंडस्ट्री? म्हणजे स्टील manufacturing ची कंपनी?"

"हो...माझ्या वडीलांचीच.."

हे ऐकून शारदाला धक्काच बसला..वरद इंडस्ट्री म्हणजे बिझनेस मधलं प्रतिष्ठित नाव, करोडोंची उलाढाल..महागडे शेयर्स..इतक्या प्रसिद्ध उद्यगोपतीचा वारस इतका साधा?

"तू तर फार मोठा माणूस निघालास रे...तुझा ऑटोग्राफ घ्यावा लागेल.."

"हो ना, घे की लगेच.."

वरद चेष्टा करताना अजिबात थकायचा नाही..

"काहीही म्हण पण जगात अशी लोकं फार कमी असतात..ज्यांच्याकडे सगळं काही असूनही ते दुसऱ्यासाठी काहीतरी करतात.."

"माझ्याकडे सगळं काही आहे...देवाने सगळं दिलंय मला, म्हणजे पोटासाठी मला काहीही करायची गरज नाहीये...मग हीच चांगली संधी आहे ना समाजाच्या उपयोगी पडायची..."

"मानलं तुला...खरंच.."

असं म्हणत शारदा डोकं झुकवून दोन्ही हातांनी त्याला नमस्कार करते. वरदही छाती फुगवून तिला आशीर्वाद देण्याची acting करतो..

____

"शारदा येणार आहे म्हटली, तू येशील ना तिला भेटायला?"

"कोणत्या तोंडाने येऊ? आणि ती तरी माझं तोंड पाहिल का? जगातील मी अशी एकमेव आई आहे जी मुलीला दूर करून तिच्या सुखाची चिंता करतेय..आज तिला नाही कळणार हे, पण उद्या जेव्हा ती आई होईल तेव्हा समजेल तिला की मी तिला का दूर ठेवलं ते.."

कल्पनाला एकीकडे लेकीला पाहायला मिळणार म्हणून अत्यानंद झालेला पण दुसरीकडे तिच्या नजरेस आपण पडू शकत नाही याची खंतही वाटू लागली..इतक्यात स्वीटी तिथे धावत आली..

"कांताबाई, चला लवकर.. सविता चक्कर येऊन कोसळली आहे.."

कांताबाई घाबरतात, कल्पनाला घेऊन त्या तडक सविताकडे जातात..सविताचे डोळे पांढरे पडलेले असतात, ती हालचाल करत नसते..चार पाच बायका तिला उचलून पेठेबाहेर असलेल्या रस्त्याच्या बाजूला नेतात आणि एकेका गाडीकडे मदत मागू लागतात..त्या बायकांना पाहून कुणीही थांबत नव्हतं. रिक्षावाले, कारचालक, बसचालक मुद्दाम तिथून गती वाढवत...कुणी आपल्याला या बायकांसोबत पाहिलं तर? या भीतीने माणसं दुर्लक्ष करत..तिथूनच एक कारचालक जात होता, स्वीटीने त्याला ओळखलं..तिच्याकडे दर शनिवारी येणारा ती गिर्हाईक होता..तिने हात केला अन थांबायची विनंती केली... तो थांबला, बाजूच्या सीट वर त्याची बायको बसली होती. तिला दया आली..तिने नवऱ्याला त्या बायकांना गाडीत सोडून देण्याबद्दल विचारलं.. तसा तो म्हणाला..

"कुणाला मदत करायचं म्हणतेय तू? या बायकांना? शी...कुठून इथून गाडी घेतली असं झालं...अगं विकाऊ बायका आहेत या...चल इथून.."

असं म्हणत त्याने जोरात गाडी पुढे घेतली. स्वीटीचे डोळे संतापाने लाल झाले..

"ए भाड्या, विकाऊ कुणाला म्हणतोस? आम्ही विकाऊ असलो तरी विकत घेणारा सुद्धा तूच आहेस विसरला का...बायको समोर काय संत बनत होता रे भडव्या.."

स्वीटीचा संताप असह्य होता...शेवटी एका भल्या माणसाने गाडी थांबवली आणि सविताला सर्वजणी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या...

____

हॉस्पिटलमध्ये येईपर्यंत बराच उशीर झालेला, सविताने प्राण सोडले होते. तिची ही खबर ऐकताच सर्वजणी रडायला लागतात. रक्ताचं नसलं तरी एकमेकींच्या सोबतीने त्यांच्यात जिव्हाळ्याचं नातं तयार झालेलं.. त्याच एकमेकांची आई, बहीण आणि बाप होत्या...

कल्पना हे ऐकून सुन्न झाली..कांताबाई एका कोपऱ्यात जाऊन रडू लागल्या. सविता म्हणजे कल्पनाच्या बरोबरीची...कल्पना जेव्हा शांतीपेठेत पुन्हा आलेली तेव्हाच तिच्यासोबत सविताही नव्याने सामील झालेली...
0

🎭 Series Post

View all