Login

नातं...तुझं नि माझं ( भाग 1 ) ( नातीगोती )

About Husband And Wife


नातं...तुझं नि माझं (भाग 1 )
( नातीगोती )


" प्राजू, एक ग्लास पाणी दे गं.."
"प्राजू, माझे औषध आणून दे गं.."
"प्राजू, हे करं ..प्राजू ते करं.."

घरात आजी,आजोबा, आई,बाबा, ताई व दादा या सर्वांची ही नेहमीची वाक्ये.
सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत प्राजूची त्यांना गरज पडायचीचं.घरातील प्रत्येकाला माहित होते की, आपली प्राजू कधी कोणाला नाही म्हणत नाही, कोणाचे मन दुखवत नाही. प्रत्येकाचे काम करायला नेहमी तयार असते. त्यामुळे सर्वांना तिची नेहमी मदत म्हणजे गरज भासायचीचं! तिला काहीतरी काम सांगण्याची सर्वांना सवयचं झाली होती. आणि तीही कंटाळा न करता सर्वांची कामे आनंदाने करायची.
तसं पाहिलं तर , प्राजू ही घरात सर्वांत लहान. आईबाबांची सर्वात लहान मुलगी,बहीणभावांमधील शेंडेफळ ! सर्वांकडून लाड पुरवून घेण्याचा,हट्ट पूर्ण करण्याचा हक्क तिचा होता. पण ती लहान असूनही खूप समंजस होती. नाते कसे जपावे? हे तिला चांगले समजत होते आणि जमतही होते. प्रत्येक नाते तिने छान जपले होते. तिला सर्वांबद्दल प्रेम होते. ती आपल्या बोलण्याने,आपल्या वागण्याने ,कोणाचे मन दुखवत नव्हती. तिला आपल्या सर्व नात्यांबद्दल आपुलकी होती. त्यामुळे सर्वांना मदत करत ती त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करीत होती. घरातील सर्वांना तिचा स्वभाव माहित होता आणि तो आवडतही होता. ते सर्वही तिचे लाड करायचे.तिला ते सर्व आनंद द्यायचे. ती घरात नसली तर कोणाला करमत नसायचे. सर्वांना जोडून ठेवणारी ती नात्यांमधील एक दुवाचं होती.

आईने प्राजूच्या ताईला काही काम सांगितले तर ती कधी ते काम करायचीही आणि कधी
"तुझ्या लाडक्या लेकीला सांग ना.."
असे गंमतीने उत्तर देवून काम करण्याचे टाळायचेही.

चांगल्या लोकांचे चांगल्या वागण्याचे अनेक फायदे असतात. पण कधी तोटेही असतात. इतर लोक त्यांच्या चांगुलपणाचा काही वेळेस जास्त गैरफायदाही घेत असतात.

प्राजू जशी तिच्या घरातील सर्वांच्या गळ्यातील ताईत होती. तशीच मावशी, मामा,काका,काकू, आत्या व त्यांची मुले या सर्वांनाही ती आवडायची.सुट्टीत ती आजोळी जायची,खूप मजा करायची.ते सर्वही तिच्या येण्याची वाट पाहयचे आणि ती गेल्यानंतर त्यांना करमायचेही नाही.
सर्व नात्यांचा तिला लळा होता.

घरात आजीआजोबा, आईबाबा मुलांवर चांगलेच संस्कार करत असतात. चांगले बोलावे,चांगले वागावे हे शिकवत असतात. पण त्याच बरोबर घरात मोठे कसे वागतात हे ही लहान मुले पाहत असतात आणि शिकत असतात. त्यामुळे फक्त मुलांना चांगले संस्कार शिकवून चालत नाही तर मोठ्यांनीही ते आचरणात आणले पाहिजे. तरचं मुलांवर चांगले संस्कार घडत असतात.

घरात मोठे एकमेकांशी कसे वागतात,आपल्या नातेवाईकांशी कसे संबंध ठेवतात हे सर्व लहान मुले पाहत असतात आणि मगं तेही तसेचं वागत असतात.
प्रांजलच्या घरात चांगलेच संस्कार होते. प्रत्येक नाते आपुलकीने जपले जायचे. अडीअडचणीला एकमेकांना मदत करणारे, सुखदुःखाचे क्षण वाटून घेणारे,सणावाराला एकत्र येणारे ,मजा करणारे,एकमेकांवर प्रेम व विश्वास असणारे असे नात्यांचे रूप प्रांजल लहानपणापासून पाहत आलेली होती आणि अनुभवत होती. या सर्व नात्यांमध्ये रमायला तिला खूप आवडत होते. हे सर्व नाते म्हणजे प्रांजलसाठी जणू एक छोटेसे विश्वचं होते!