विठ्ठलाचे निरूपण

विठ्ठलाच्या भक्तीरंगाचा साक्षात्कार
वसंत नुकतीच पंढरीची वारी करून आला होता.दरवेळी त्याच्या चेहऱ्यावर ध्येयपूर्ती साध्य झाल्याचे भाव असायचे पण यावेळी मात्र त्याच्या चेहऱ्यावरील आनंदाचे वलय अधिकच निखरलेले भासत होते.

“ वसू,आज तुझा चेहरा अधिकच खुललेला दिसत आहे.विठ्ठल भेटला की काय तुला वारीमध्ये?”
आईने खोडसाळपणे त्याला विचारले.

“ हो आई.मला खरंच यावेळी विठ्ठलाने दर्शन दिले.” वसंत

“ह, ह, ह.. माझ्या बोलण्याला दुजोरा देत मस्करी करू नकोस.” संगीता(आई)

“ अगं आई,मी माझ्या निर्वाह विठ्ठलाचे याची देही याची डोळा दर्शन घेतले आणि माझे लोचन भरून पावले.खरं सांगतो आई मी,तुझी शपथ!”

“ असं असेल तर माझ्या विठ्ठलाचे याची देही याची डोळा साक्षात्कार केलेले एखादे निरूपण सांग.मग आम्ही तुझे बोलणे खरे मानू.”सुहासराव (वसंतचे बाबा)
गंमतीत म्हणाले.सुहासराव विठ्ठलाच्या अभंगांचे गाढे अभ्यासक होते.

“ निरूपण म्हणजे?”वसंत

“निरूपण म्हणजे एखादा अभंग किंवा एखाद्या श्लोकाचा अर्थ समजण्यासाठी श्रोत्यांना कथा किंवा वर्णनासम प्रमाण देऊन अगदी सहज भाषेत विवेचनातुन अर्थबोध करून देणे.”सुहासराव

“ अहो बाबा,मी तरुण असूनही वारी करणे योग्य की अयोग्य या भ्रमात होतो पण मला दरवेळी माझा निर्णय कसा योग्य आहे हे ध्यानात येते.मी आपल्यापुढे तुमच्याच ओठांवरील विठ्ठलाच्या अभंगाचे निरूपण सादर करतो.”वसंत

वसंतचे बाबा आश्चर्यचकित झाले.

“कवी सुधांशु यांनी लिहिलेल्या, दशरथ पुजारी यांचे संगीत आणि सुमन कल्याणपूर यांच्या गोड आवाजातील खालील अभंग मी तुमच्याकडून खूप वेळा ऐकलेला आहे बाबा.म्हणून तो मला अगदी मुखोद्गत आहे,

देव माझा विठू सावळा,
माळ त्याची माझिया गळा ।।

विठु राहे पंढरपुरी, वैकुंठच हे भूवरी ।
भीमेच्या काठी डुले, भक्तीचा मळा ।।

साजिरे रूप सुंदर, कटी झळके पीतांबर ।
कंठात तुळशीचे हार, कस्तुरी-टिळा ।।

भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो ।
रंगुन जाई भक्तांचा पाहुनी लळा ।।


या अभंगाची गोडी फार मधुर आहे. विठ्ठलाच्या साजि-या गोजि-या रूपाबरोबरच पंढरपूरला जमलेल्या भक्तांच्या मेळाव्याचे वर्णनही या अभंगात दिसून येते.विठोबा हा जणू भक्तांचा जवळचा सखा असल्यागत त्यांच्यात रंगतो, त्यांच्यासोबत डोलतो, नाचतो, बागडतो असे यात म्हंटले आहे.

हा तर झाला शब्दशः अर्थ!परंतु बाबा,मला विठ्ठलाचे सावळे रूप ज्यांनी आम्हाला वारी सफल व्हावी म्हणून सर्वतोपरी सहकार्य केले त्या प्रत्येक माणसांत दिसले.मग तो आम्हाला चहा पाजणारा चहावाला असो,आमच्यासोबत अहोरात्र असणारी डॉक्टर ची टीम असो किंवा विठ्ठलाचे वारकरी म्हणून आम्हाला अन्नदान करणारा अन्नदाता असो.” वसंत

“ कसे काय?”सुहासराव

“ या प्रत्येक सेवेकरीमध्ये जो भक्तीरसाचा प्रेमळ,निर्मळ,निरपेक्ष असा पवित्र भाव होता ना,तो पदोपदी मला माझ्या विठ्ठलाची आठवण करून देत होता,त्याचे तेजस्वी रूप दर्शवत होता.”वसंत

“आणखी काय दिसले रे दादा तुला?”
इतका वेळ आपल्या दादाचे बोलणे गुपचुप ऐकणारी मुक्ता कुतूहलाने आश्चर्यचकित चेहरा करून हळूच बोलली.

“ मुक्ता,मी आज माझा विठ्ठल पहिला.अगदी अनंत रूपांमध्ये!कधी आमच्यासोबत आमचा सखा बनून रिंगणात एकमेकांचे हात धरून उभे राहताना,कधी आमच्या सोबत वेळापूरपासून पंढरपूरपर्यंतचा शेवटचा टप्पा धावताना,कधी फडावर कीर्तन प्रवचन करताना..”वसंत

“ अय्या दादा खरंच!”मुक्ता

“ हो.( चेहऱ्यावर उल्हासपुर्ण भाव आणत, देवघरातील विठ्ठलाच्या मूर्तीकडे बघून प्रणाम करत)पालखीमध्ये,दिंडीमध्ये,चित्रदालनात आणि अजून बऱ्याच ठिकाणी..”वसंत

" वसंता,अगदी खरंखूरं निरूपण सांगितलं बाळा तू या अभांगाचं!"सुहासराव

"जर इतक्या ठिकाणी दादाला विठ्ठल भेटला तर मग पंढरपूरला जायची काय गरज?" मुक्ता निरागसपणे प्रश्नार्थक नजरेने म्हणाली.

" बाळा,आपल्या विठ्ठलाला खऱ्या अर्थाने नमन करून चिंतले की ते कोणाच्याही रुपात आपल्याला दिसतात, प्रकट होतात.वारीमध्ये वसंत खऱ्या अर्थाने विठ्ठलाशी एकरूप झाला,त्यांच्या भक्तीत तन मन धनाने तल्लीन झाला म्हणून त्याला विठ्ठल दिसले.वाह! वसंता,एखाद्या भक्ताला याहून परम सुख अजून काय असू शकेल?"सुहासराव

" खरं आहे बाबा तुमचं! या वारीने मला भक्ती,एकोपा, सामंजस्य, जबाबदारी,सेवा म्हणजे काय ते शिकवले अन् त्यामुळेच मला माझे विठ्ठल दिसले."वसंत

म्हणूनच
“बोला पुंडलिक वरदे श्री हरी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय!!”
घरातील सर्वांनी जयघोष केला.

आपल्या नावाचा जयघोष तसेच सुंदर निरूपण ऐकून वसंताच्या देवघरातील विठ्ठलाची मूर्ती मात्र सतेज हास्य लेवून जणू आपल्या भक्तांकडे प्रेमाने पाहत होती.

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे