प्रजासत्ताक दिन विशेष अलक
१. अण्णांना सकाळी उठल्या बरोबर गरम चहा सोबतच त्या दिवशीच वर्तमानपत्रही वाचण्याची सवय होती. आण्णा आपल्या सुनेला मोठ्या अभिमानाने वर्तमानपत्रातली ठळक अक्षरातील बातमी वाचून दाखवत होते, या बातमीत \"शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पराक्रमाचा पोवाडा\" एकाच वेळी दहा हजार तरुणांनी म्हटला होता .पण तेवढ्यात अण्णांची नजर बाजूच्याच मथळ्यावर गेली, ज्यात आपल्या देशात दर मिनिटाला 30 महिलांच्या विनयभंगाची बातमी छापून आली होती.
२. मीनुला ऐतिहासिक स्त्रियांप्रमाणे वेशभूषा करून, सेल्फी काढण्याचा नाद होता. जानेवारी महिन्यात तिने सावित्रीबाई फुले आणि जिजामातेच्या जयंतीला त्यांच्यासारखाच पेहराव करून सेल्फी काढून घेतला होता आणि समाज माध्यमांवर ठेवला होता. दुपारी मिनू जेव्हा मैत्रिणीशी फोनवर लाईक आणि कमेंट बद्दल बोलत होती तेव्हा, मीनुची आई रागवतांना तीला म्हणाली \"तुला जर दिवसभर ब्युटी, फॅशन, लाईक, कमेंट बद्दलच बोलायचं असते तर आदर्श स्त्रियांची वेशभूषा करून समाज माध्यमांवर फोटो कशाला टाकतेस\"?
३.छोट्या गोटू च्या शहरात अगदी क्षुल्लक कारणावरून जातीय दंगल उसळल्याने शाळेला सुट्टी होती, आणि त्याची ताई त्याला नागरिक शास्त्रातला सर्वधर्मसमभावाचा अर्थ समजून सांगत होती.
४. गावाच्या चावडीवर बसून अल्पभूधारक शेतकरी राम भाऊ, श्याम भाऊ ला आपली कैफियत सांगताना म्हणाले, \"कृषी अधिकारी साहेब ए.सी. गाडी फिरतात आणि पिक विमा योजनेचे पैसे मंजूर करण्यासाठी पाचशे - हजाराची रुपयांची लाच मागतात\".
५. एक महिला वकील आपल्या पत्रकार मैत्रिणीला वैतागून सांगत होती की , \"आपण कितीही बेटी बचाव बेटी पढाव चा गजर केला ना तरी , बलात्काराच्या गुन्ह्यात किती जणांना शिक्षा झाली हा संशोधनाचा विषय आहे ,आणि त्यात तो गुन्हेगार जर बडे बाप का बेटा असेल तर साधा एफ.आय.आर.ही पोलीस लवकर लिहीत नाहीत\".
६. आज दुपारी माझी मुलगी भूगोलाच्या पुस्तकातली \"हरितक्रांती, श्वेतक्रांती\" विषयी धडा वाचत होती आणि मला विचारत होती की ,\"आई भारत जर कृषिप्रधान देश आहे तर आपल्या देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या का वाढत आहेत? त्यावेळी या प्रश्नाचं माझ्याकडे कुठलेच उत्तर नव्हतं.
७. महामारी च्या काळातील प्राथमिक शिक्षणाचा प्रसार आणि विद्यार्थ्यांची गळती यावर विद्यापिठात शिक्षण शास्त्र विषयात संशोधन करणाऱ्या संशोधक विद्यार्थिनीने खालील निष्कर्ष काढला- प्राथमिक शाळेतील शिक्षक जरी मोबाईल आणि आभासी पद्धतीने शाळा भरवत असतील तरीही महामारीच्या काळात वीट भट्टी, ऊस तोडणी आणि हॉटेलात कपबशा विसळणारे बालमजूर लक्षणीयरीत्या वाढले आहेत.
फोटो - साभार गुगल
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा