Login

रियुनिअन ( भाग १ )

ही कथा आहे आयुष्याच्या पन्नासाव्या वर्षी भेटलेल्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींची


रियुनिअन ( भाग १ )


ही एक काल्पनिक कथा आहे. या कथेमध्ये आयुष्याची पन्नास वर्षे उलटून गेलेल्या शाळेच्या मित्रमैत्रिणींचा व्हाट्सएप ग्रुप तयार केला गेला आहे. त्या ग्रुपचा रियुनिअनचा कार्यक्रम करायचा आहे. ह्या कथेत केवळ रियुनिअन दाखवले जाणार नाही तर काही व्यक्तिरेखांचे आयुष्य, त्यांचे विचार, नवीन पिढीचा आधुनिक वैचारिक दृष्टिकोन तसेच सामाजिक विषय मी मांडणार आहे. ही प्रेरणादायी कथा तुम्हाला नक्कीचं आवडेल.

" अरे निल्या, मला शुभांगी आणि राजश्रीचा नंबर मिळाला. अरे त्या रे राजश्री कुबल आणि शुभांगी पाटील. त्या नाही का स्कॉलर मुली. खूप भाव खायच्या. मुलांशी तर अजिबात बोलायच्या नाहीत आणि हुशार मुलींशीचं बोलायच्या." संतोष उत्साहाने बोलत होता.

संतोषचे बोलणे मध्येचं तोडत निलेशने विचारले, " त्या शुभांगी आणि राजश्रीचा नंबर तुला कसा मिळाला रे ?"

" अरे तेचं तर तुला सांगत होतो. ती आपल्या वर्गातली शुभांगी माहिती आहे ना ? ती मला काल भेटली दादर स्टेशनला. ती शुभांगी पण किती आखडू होती ना ? काल एकदम माझ्यासमोर आली. मी तिला बघून विचार करत होतो की, ही खूप ओळखीची वाटते आहे तर तिनेचं मला स्वतःहून विचारले की, तू संतोष राणे ना ? आणि चक्क माझ्याशी पंधरा मिनिटे तरी बोलली असेल.
आपल्याला वाटलेलं की, ह्या स्कॉलर मुली त्यांच्या आयुष्यात खूप पुढे गेल्या असतील. डॉक्टर, इंजिनिअर झाल्या असतील पण शुभांगी बँकेत नोकरी करते आणि राजश्री जिने शाळेत पहिला नंबर कधीचं चुकवला नव्हता ती चक्क नोकरी देखील करत नाही. गृहिणीपद सांभाळते. मी शुभांगीला आपल्या शाळेच्या व्हाट्सएप ग्रुपबद्दल सांगितले तर शुभांगीने दिला तिचा स्वतःचा आणि राजश्रीचा नंबर. नंतर राजश्रीला मी फोन करून विचारले की, आम्ही लोकं असा असा शाळेचा ग्रुप बनवतो आहोत तर तुला त्या ग्रुपमध्ये ऍड केले तर चालेल ना ? तर ती लगेच हो म्हणाली. मी तुला त्या दोघींचा नंबर पाठवतो त्यांना ऍड कर ग्रुपमध्ये."

" आयला ! कमालचं आहे. त्या भावखाऊ मुली तुझ्याशी बोलल्या म्हणजे आश्चर्यचं आहे. हो रे मला पण वाटलेलं की, ह्या मुली पुढे जाऊन खूप शिकतील. ते जाऊदे, शाळेतल्या मित्रांचा कॉन्टॅक्ट लगेच मिळतो आहे ह्या सोशल मीडियामुळे पण मुलींना शोधायचे म्हणजे अवघडचं. एकतर त्यांचे लग्नानंतर नाव पण बदललेले असते. ठीक आहे बघूया. तरी मला आतापर्यंत नव्वद जणांचे कॉन्टॅक्ट नंबर मिळाले आहेत. मी आता ग्रुप तयार करतो. अजून कोणी कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतील तर मिळत जातील इतरांचे फोन नंबर." निलेश म्हणाला.

निलेशने शाळेतल्या मित्र - मैत्रिणींचा ग्रुप तयार केला. ग्रुपचं नाव ठेवलं \" टिळक विद्यामंदिर १९६८ - १९८०\"

जसा ग्रुप तयार झाला तसा ग्रुपमधील मित्र - मैत्रिणींमध्ये एक वेगळाचं जोश आला. आपल्या ओळखीचं, आपलं खास कोणी ह्या ग्रुपमध्ये दिसते आहे का ते जो तो पाहू लागला. शाळेशी नाळ तुटल्यावर डायरेक्ट २०१६ ला म्हणजे तब्बल छत्तीस वर्षांनी हे मित्रमैत्रिणी एकमेकांच्या संपर्कात आले होते. ते सुद्धा निलेश कर्वे या उत्साही व्यक्तीमुळे. शाळा सोडताना तेव्हा कोणाकडेही लँडलाईन फोन नव्हते. मोबाईल तर जन्मालाचं आला नव्हता. निलेशने किती लोकांना शोधून शोधून ग्रुप बनवला होता आणि त्याला साथ लाभली होती संतोष राणे आणि संदीप सोनवणे यांची. त्या दोघांनी देखील आपल्या संपर्कात असलेल्या लोकांचे फोन नंबर निलेशला फॉरवर्ड केले.

२०१६ ला सगळ्यांनी पन्नाशी पार केली होती पण इतक्या वर्षांनी आपल्या व्हाट्सएपच्या ग्रुपमध्ये आपल्या मित्रमैत्रिणींना पाहून सगळेच्या सगळे पंचवीशीतले वाटू लागले. शाळेतल्या मुली ग्रुपवर चिवचिवू लागल्या. तरी अजून खूप मुलींचे कॉन्टॅक्ट नंबर मिळाले नव्हते. आता ग्रुपमध्ये ज्या मुली ऍड झाल्या होत्या त्यांच्यामुळे अजून दहा मुलींचे नंबर ऍड झाले आणि ग्रुपमधल्या मुलांमुळे वीस मुलांचे नंबर ऍड झाले. आता ग्रुप मधल्या लोकांची संख्या १२० वर पोहचली.

रोजच्या रोज न चुकता गुड मॉर्निंग, गुड नाईटचे असंख्य मेसेजेस ग्रुपवर पडू लागले. सगळ्यांची गॅलरी फुल्ल होऊन जायची पण करणार काय सगळ्यांच्याचं उत्साहाला उधाण आले होते.

रोज ग्रुपवर शाळेतल्या आठवणी निघायच्या. आता एकमेकांना भेटण्याचे वेध सगळ्यांना लागले होते. ऍडमिन निलेशचे म्हणणे होते की, आपल्या ग्रुपमधील सदस्यांची संख्या दीडशे ते दोनशे झाल्यावर आपण रियुनिअन करूया. त्यामुळे सगळे मित्रमैत्रिणी सध्या फक्त चॅट आणि मेसेजेसमध्ये आपली दुधाची तहान ताकावर भागवत होते.

" तुम्हा लोकांना ते गणिताचे सावंत सर आठवतात का ? आपण किती त्रास द्यायचो ना त्यांना." सरोज चिवचिवली.

" हो, आम्ही ते वर्गात यायच्या आधी \" गोंदया आला रे \" अशी आरोळी ठोकायचो." विवेक बोलला.

" हो, ते वाक्य चाफेकर बंधूंच्या जीवनावरील पिक्चरमधले. २२ जून १८९७. ते खूपचं फेमस झालं होतं ना तेव्हा \" गोंदया आला रे.\" अजूनही हसू येतं आठवलं की. आणि ते त्यातलं गाणं \" सीताबाईला चाफेकळीला पहिलं न्हाण आलं.\" त्या गाण्याचा अर्थ कळत पण नव्हता तेव्हा." ह्या वाक्यापुढे सरोजने भरपूर हसण्याच्या स्माईली टाकल्या.

" अग ! आम्हा मुलांना पण त्या गाण्याचा अर्थ माहीत नव्हता तरी ते गाणं आम्ही मोठमोठ्यांदा घरात, बिल्डिंगच्या कॉमन गॅलरीत बोलत असू तर तेव्हा आमच्या घरातली मोठी लोकं आम्हाला हे गाणं गाऊ नका म्हणून ओरडायची. तेव्हा आम्हाला वाटायचं ही मोठी माणसे आम्हाला का ओरडतात ? नंतर जेव्हा त्या गाण्याचा अर्थ समजला तेव्हा खुप हसू आले होते." विवेक बोलला.

" हो रे ! तेव्हा आपले आईवडील आपल्याशी आताच्या मुलांबरोबर आपण जसे बोलतो तसे फ्री बोलत नव्हते ना ? किती बावळट होतो रे आपण. तुला माहिती आहे विवेक ? तेव्हा मुलगा आणि मुलगी एकमेकांशी बोलले तरी असं वाटायचं की ह्याचं काहीतरी चालू आहे. किती तो वेडेपणा होता ? आणि आपली मुलं बघ ना त्यांचे मित्रमैत्रिणी एकमेकांना मिठ्या मारतात, एकमेकांच्या खांद्यावर हात - डोके ठेवतात, तासनतास बोलत राहतात. त्यांना या गोष्टींचं अवडंबर वाटत नाही." सरोज बोलली.

सरोज आणि विवेकच्या ह्या चॅटिंगवर मग एकामागोमाग एक असे ग्रुपवर चॅट पडू लागले. शुभांगी, राजश्री, मेधा, रेखा, राखी, योगिता, सीमा, उज्वला, अंजली, स्मिता, स्वाती, ललिता, प्रिया, वैदेही, शिल्पा, भावना, वंदना, दीपाली, रुपाली, वीणा, राधा, दीप्ती, ज्योती, तृप्ती, माधुरी, निलेश, मनोज, सुहास, उमेश, महेश, राजेश, सुनील, संदीप, प्रसाद, स्वप्नील, चैतन्य, पंकज, सचिन, सुबोध, प्रकाश, जीवन अशा अनेकांनी मग त्या दोघांच्या चॅटच्या विषयावर चर्चा केली. जणू काही जुन्या आठवणींना उजाळाचं मिळाला होता. त्यात भरीस भर म्हणून नवीन पिढीची मते मांडली गेली. मग नवीन पिढीकडून आपण काय शिकलो त्याची चर्चा झाली.

आता मित्रांसोबत कुठलेही विषय बोलायला मुली लाजत नव्हत्या कारण त्या परिपक्व स्त्रिया झाल्या होत्या. अगदी रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत \" गोंदया आला रे \" हा एकचं विषय जास्त चघळला गेला.

शेवटी ऍडमिन निलेश म्हणाला, " पोरांनो ! आता झोपा लौकर. नाहीतर खरोखरचं गोंदया येईल हो. आणि बीपी, शुगरच्या गोळ्या कोणाला लागल्या असतील त्यांनी आठवणीने गोळ्या घ्या. नाहीतर उत्साहात तुमच्याकडून कुठल्या गोळ्या घेतल्या गेल्या नसतील. एक आठवण करून देतो शेवटी ऍडमिन म्हणून मला तुम्हा सर्वांची काळजी घ्यावीचं लागेल."

" आईशपथ ! बरं झालं निलेश आठवण करून दिलीस. ह्या चॅटिंगच्या नावाखाली मी बीपीची गोळी घ्यायला विसरले होते बघ." तृप्ती म्हणाली.

" ए तृप्ती, लगेच गोळी घे नाहीतर तुझ्या नवऱ्याचा पण बीपी वाढेल." सुहास चेष्टेने म्हणाला.

" नवऱ्याचा बीपी वाढायला नवरा जिवंत हवा ना ? गेल्या वर्षी हार्ट अटॅक येऊन गेला तो."

तृप्तीच्या वाक्यावर सुहास तिला लगेच सॉरी बोलला. लगेच तृप्तीच्या काळजीपोटी ग्रुपवर धडाधड मेसेज आले. सगळेजण तृप्तीसाठी हळहळले. काहीजणींनी ताबडतोब तृप्तीला फोन देखील केले.

तृप्तीने ग्रुपवर मेसेज टाकला.

" फ्रेंड्स ! मी आता आपल्या ह्या ग्रुपमुळे बरीच सावरले आहे. दिनेश गेल्यावर जीवनात खूप पोकळी निर्माण झाली होती. मुलं मुलांच्या व्यापात. काय करावे ते सुचत नव्हते. पण दोन महिन्यांपूर्वी आपला ग्रुप तयार झाला आणि मला एक संजीवनी मिळल्यासारखी वाटली. आपल्या ग्रुपमुळे माझा वेळ जाऊ लागला. मी आनंदी राहू लागले. मला जगण्यासाठी एक उमेद मिळाली. तुम्हा सर्वांचे त्याबद्दल खूप खूप आभार."

तृप्तीच्या मेसेजने सगळ्यांनी तृप्तीच्या वाक्यावर थम्पसअपचे आणि पुष्पगुच्छाचे ईमोजी टाकले. ज्याला त्याला तृप्तीबद्दल रुखरुख निर्माण झाली पण तृप्ती आपल्या ग्रुपमुळे सावरली असल्याने प्रत्येकाच्या मनात समाधान होते. ग्रुपमध्ये पुन्हा खंडीभर गुड नाईटचे मेसेज बरसले आणि सगळे झोपी गेले.