Login

रियुनिअन ( भाग ४ )

ही कथा आहे आयुष्याची पन्नास वर्षे उलटून गेलेल्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींची.
रियुनिअन ( भाग ४ )

" अहो ! ऐकलंत का ? हे उंदराचे पिल्लू बघा ना. भांड्यांच्या ट्रॉलीत शिरलं आहे. काढा ना त्याला बाहेर."
निलेशची बायको स्वाती निलेशच्या नावाने ओरडत होती. एवढं मोठ्यांदा बोलून देखील निलेश किचनमध्ये आला नाही म्हणून ती त्याच्याजवळ गेली असता निलेश त्याच्या विचारात गुंग होता. आज रविवार त्यामुळे निलेशला ऑफिसला सुट्टी होती. स्वाती नाश्ता बनवायला म्हणून किचनमध्ये गेली असता एक छोटंसं उंदराचे पिल्लू मजेत भांड्यांच्या ट्रॉलीमध्ये बसले होते.

" अहो ! काय ओ असं करता ? बघा ना उंदराचे पिल्लू शिरले आहे घरात. काढा ना त्याला बाहेर. किती ओरडते आहे मी मगासपासून. कसला विचार करत बसला आहात ?"

स्वाती आता बाजूला येऊन ओरडू लागली म्हणून निलेश विचारातून बाहेर आला. " अग काही नाही विशेष. आमच्या ग्रुपचं रियुनिअन कुठे करायचं हा विचार करत होतो. इतक्या सगळ्यांना घेऊन करायचे आहे. सगळी सोय व्यवस्थित झाली पाहिजे ना ?"

" ती सोय होईल पण पहिल्यांदा तो उंदीर काढा बाहेर." स्वाती वैतागून बोलली.

" बरं तो उंदीर पकडायचा पॅड आणला आहे ना तो दे. चिकटेल तो त्यावर लगेच आणि काय ग ? दोन महिन्यांत चार - पाच वेळा शिरले असतील ना उंदीर आपल्या घरात ? किती वेळा सांगितलं तुला की स्वयंपाक घरातली खिडकी लावत जा म्हणून. तिथूनचं येतात ना ते लोकं. ऐकत का नाहीस ?" निलेश म्हणाला.

" तुम्हाला काय जातंय बोलायला खिडकी लावून ठेवत जा म्हणून. एकतर किचनमध्ये प्रचंड गरम होतं, कोंडल्यासारखं होतं म्हणून जरावेळ उघडते मी खिडकी. तर लगेचं कसे येतात तेचं समजत नाही. जाऊदे आता मात्र ह्यापुढे मी खिडकी उघडणारचं नाही. तो उंदीर घरातून बाहेर गेल्याशिवाय मला काही चैन पडणार नाही." स्वाती म्हणाली.

" तू खिडकी बंद ठेवलीस तर समस्त उंदीर आपल्या खिडकीबाहेर उभे राहून गाणं म्हणतील, \" मेरी दुश्मन है ये, मेरी उलझन है ये, बडा तडपाती है, दिल तरसाती है ये खिडकी, ये खिडकी जो बंद रहती है.\" निलेश खट्याळपणाने बोलला.

" तुम्हाला मस्करी बरी सुचते आणि हल्ली तुम्ही खूपचं आनंदी दिसता बरं का ! जेव्हापासून तुमचा शाळेचा ग्रुप झाला आहे ना तेव्हापासून." स्वाती मिश्किलपणे बोलली. निलेशने त्यावर स्वातीला एक मंद स्माईल दिली.

" हा बघ चिकटला ह्या पॅडवर. त्याला लांब टाकून येतो." निलेश तो पॅड लांब टाकून आला.

स्वातीने गरमागरम पोह्यांची डिश निलेशला आणि स्वतःला घेतली. दोन्ही मुलं अजून काही उठली नव्हती त्यामुळे ते दोघेचं खाण्यास बसले. निलेश काहीतरी विचार करतचं होता म्हणून पुन्हा स्वातीने त्याबद्दल निलेशला विचारले असता निलेश म्हणाला, " अग ! शाळेत असताना मला एक विद्या रानडे म्हणून मुलगी खूप आवडायची. तिला मी आवडत होतो का ते माहीत नाही पण ती देखील माझ्याकडे चोरून चोरून पहायची. आम्ही आमचं प्रेम एकमेकांनी कधीचं व्यक्त केले नाही. आता ती कुठे असेल ? काय करत असेल ? काही देखील माहीत नाही. तिचा जर रियुनिअनपर्यंतच्या आत शोध लागला तर ती येऊ शकेल ना ?" निलेश स्वातीकडे मनातलं बोलला खरा पण त्याने घाबरतचं स्वातीकडे पाहिलं. स्वाती एकदम कूल् होती.

" इतकंच ना ? मग ग्रुपमधल्या तुमच्या मैत्रिणींना विचारा तिचा ठावठिकाणा कोणाला माहिती आहे का ?"

" हो विचारतो ती कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे का."


निलेशने पोहे खाऊन त्याचे व्हाट्सएप उघडले आणि ग्रुपमध्ये विचारले की विद्या रानडेशी कोणाचा काही कॉन्टॅक्ट आहे का ? "

त्यावर अर्चना म्हणाली की, " अरे हो रे ! विद्याचं लक्षातचं नाही आलं. लग्नानंतर तिच्या नवऱ्याच्या फिरतीच्या जॉबमुळे ती कोणाच्याचं कॉन्टॅक्ट मध्ये नाही. माहेरी ती माझ्या आईबाबांच्या बाजूच्याचं बिल्डिंगमध्ये राहायची. मागे दहा - बारा वर्षांपूर्वी तिचे आईवडील मला भेटले होते तेव्हा मला त्यांनी सांगितले की, विद्याच्या नवऱ्याची बदली कलकत्त्यात झाली असल्याने ती आता कलकत्त्यात राहते. त्यांनी तिचा नंबर पण मला दिला होता. मी तिच्याशी बोलले पण होते पण बरीच वर्षे झाल्याने तिचा नंबर पण माझ्याकडून गेला. तिचं आताचे नाव विद्या साठे आहे. बरं झालं तू तिची आठवण करून दिलीस. मी तिला फेसबुकवर शोधते आता."

निलेश अर्चनच्या मेसेजने खूप खुश झाला होता. त्याने खुशीत स्वातीला सांगितले असता स्वाती म्हणाली, " हो का ? मग फेसबुकवर आपण शोधुया तिला."

स्वाती इतकी कूल् होती म्हणून निलेशला थोडं आश्चर्यचं वाटलं होतं त्यामुळे त्याने तिला विचारलं, " स्वाती, तू इतकी कूल् कशी ? नवऱ्याला त्याची मैत्रीण शोधायला मदत करते आहेस. मला वाटलं होतं की तू माझ्यावर चिडशील, रागावशील म्हणून."

" अहो ! सरड्याची धाव कुंपणापर्यंत. तुम्ही कुठे जाणार जाऊन जाऊन. पुन्हा माझ्याचंकडे येणार ही खात्री आहे मला आणि जो तो आपल्या संसारात व्यस्त आहे. तुमची मैत्रीण पण तिच्या संसारात, मुलाबाळांत मग्न असेल. ह्या वयात कोण पुन्हा एकमेकांच्या प्रेमात पडणार आहे का ? अर्ध आयुष्य संपलं आपलं. आता ज्या जोड्या जुळवल्या आहेत देवाने त्यांच्यासोबत आपले आयुष्य संपणार. चला आपण तुमच्या मैत्रिणीला फेसबुकवर शोधुया."

निलेशने फेसबुक उघडलं आणि विद्या साठे नाव सर्च केले असता कितीतरी विद्या साठेच्या प्रोफाइल आल्या. नंतर विद्याचा नवरा आणि तिच्या मुलीसोबत फोटो दिसला. निलेशला पहिलं तर तिला ओळखू आले नाही कारण तिच्या चवळीच्या शेंगेचे रूपांतर मस्त भोपळ्यामध्ये झाले होते परंतु तिचा चेहरा अजूनही तसाच असल्याने आणि शाळेचे नाव तिने प्रोफाइल मध्ये नमूद केले असल्याने तिला शोधता आले.

तिचा फोटो बघून स्वाती म्हणाली, " अगबाई ! तुमची मैत्रीण तर माझ्यापेक्षाही गुटगुटीत वाटते आहे. एक काम करा तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून ठेवा म्हणजे ती कॉन्टॅक्टमध्ये येईल."

निलेश विद्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायला टाळाटाळ करू लागल्यावर त्याला स्वाती म्हणाली, " मेन विल बी मेन हां ! तेच जर तुमची मैत्रीण स्लिम ट्रिम दिसली असती तर लगेच फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली असती तिला. ते काही नाही तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवा. तिला जमत असेल तर ती देखील येईल रियुनिअनसाठी. आता काय राहिलं आहे आयुष्यात ? चार मित्रमंडळी कधीतरी भेटलो की वेगळा आनंद मिळतो." स्वाती हसत हसत बोलली.

" आयला ! स्वाती तू किती सॉलिड आहेस ग." निलेशने बोलता बोलता विद्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून ठेवली.

संध्याकाळी निलेशने त्याचे फेसबुक चेक केले असता त्याला दिसले की, विद्याने त्याची रिक्वेस्ट एक्सेप्ट केली होती आणि मेसेंजरवर मेसेज देखील पाठवले होते. निलेशने विद्यासोबत जरावेळ चॅटिंग केले. तिला रियुनिअनची कल्पना दिली. विद्याने लगेचंच निलेशला स्वतःचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि तिला ग्रुपमध्ये ऍड करायला सांगितले. निलेशने लगेच विद्याला ग्रुपमध्ये ऍड केले.

विद्या ग्रुपमध्ये ऍड झाल्यावर सगळ्यांनी तिचे स्वागत केले. विद्यालाही सगळ्या मैत्रिणी ग्रुपवर दिसल्याने तिला खूप आनंद झाला. आता सध्या तिच्या नवऱ्याची बदली नागपूरला झाली असल्याने तिचे वास्तव्य नागपूरला होते. सगळ्यांनी तिला विचारले तू तुझ्या नवऱ्याच्या बदलीमुळे कुठे कुठे राहिलीस ?

विद्या बोलली की, " ह्यांच्या नोकरीच्या बदलीमुळे गुजरात, बंगाल, मध्यप्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र ह्या राज्यात आमची भटकंती झाली. उत्तरप्रदेशच्या काही भागात पण आमचे वास्तव्य झाले. अजून फक्त काश्मीरचं बाकी राहिलं आहे तेवढं. बघू तिथे कधी योग येतो आहे जाण्याचा. आम्ही एकचं मुलगी होऊ दिल्यामुळे तिचे लग्न होऊन ती आता पुण्याला असते. तुम्ही रियुनिअनची तारीख ठरवली की मी आधी लेकीकडे राहीन मग येऊ शकेन आपल्या कार्यक्रमासाठी. "

विद्याच्या बोलण्याने मग तू मुलीच्या शाळेचं कसं काय केलंस ? तुला कुठले अनुभव आले ? तुला कसं जमलं सारखं फिरतीवर जायला ? अशा अनेक प्रश्नांचा तिच्यावर भडिमार झाला. विद्याने सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

निलेशने ग्रुपवर मेसेज टाकला.

" चला आता सगळे मिळून सगळ्यांना सोयीस्कर अशी रियुनिअनची तारीख, स्थळं, वेळ ठरवूया. व्यवस्थित बजेट आखून आपल्या रियुनिअनचा कार्यक्रम करूया. चला लागा कामाला. चांगले चांगले स्पॉट सांगा आपल्या रियुनिअनसाठी."

निलेशच्या मेसेजने ग्रुपमध्ये चैतन्य निर्माण झाले. सगळ्यांनी मग कुठल्या कुठल्या फार्म हाऊस, रिसॉर्ट यांची माहिती गूगलवर शोधून ग्रुपमध्ये टाकायला सुरुवात केली. कोणी त्यांचे स्वतःचे फार्म हाऊस सजेस्ट केले तर कोणी कोणाच्या ओळखीतले रिसॉर्ट, फार्म हाऊस सजेस्ट केले. कोणी शाळेच्या हॉलमध्ये कार्यक्रम करू असे सांगितले.

निलेशने मेसेज टाकला,

" आपल्याला दीडशे ते दोनशे लोकांची सोय करायची आहे त्यामुळे त्या स्पॉटची व्यवस्थित माहिती घेऊन मगचं ग्रुपवर टाका. सगळ्यांची जाण्या - येण्याची, खाण्या - पिण्याची, राहण्याची सोय कशी आहे ते पहिलं पहा. उगाच कोणाचीही हेळसांड व्हायला नको."


आम्ही सगळी चौकशी करून मग ग्रुपवर सांगतो असे ग्रुपवर मेसेजेस आले. निलेशने संतोष आणि संदीपवर चांगल्या रिसॉर्ट किंवा फार्म हाऊसची माहिती काढण्याची जबाबदारी सोपवली. तो स्वतः देखील दुसऱ्या दिवशीपासून माहिती गोळा करणार होता. सगळ्यांनीचं वयाची पन्नाशी पार केली असल्याने कुठेतरी शांत आणि निसर्गरम्य जागेचा त्याला शोध घ्यायचा होता.