Login

रियुनिअन ( भाग ५ )

ही कथा आहे आयुष्यातील पन्नास वर्षे पूर्ण झालेल्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींची.


रियुनिअन ( भाग ५ )

दुसरा दिवस उजाडला तोच वाईट बातमी घेऊन. ग्रुपमधल्या विलास महाडिकचे हार्ट फेल होऊन अकस्मात निधन झाले होते. विलास सारखा निर्व्यसनी माणूस इतक्या तडकाफडकी जावा याचेचं सगळ्यांना आश्चर्य वाटत होते. अलीकडेच तृप्तीच्या लेकीच्या लग्नात सहभागी होऊन त्याने ग्रुपमध्ये धमाल उडवून दिली होती. विलास अगदी शाळेत असल्यापासूनचं एकदम दिलखुलास होता. इतरांच्या मदतीला तत्परतेने धावून जाणारा, स्वभावाने प्रेमळ असल्याने मित्रपरिवारांत तो आवडता होता.

तातडीने निलेश आणि ग्रुपमधील वीस मित्र विलासच्या घरी पोहचले. विलासने आणि त्याच्या बायकोने दोन वर्षांपूर्वी देहदानाचा फॉर्म भरून ठेवला होता. त्याच्या इच्छेनुसार त्याचे देहदान करण्यात आले.

विलासच्या बायकोच्या डोळ्यांतले अश्रू थांबतचं नव्हते. घराचा आधारस्तंभ निखळून पडला होता. विलासचा मोठा लेक नुकताच नोकरीला लागला होता तर धाकटा लेक इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला होता.

विलासचे ऑफिसमधील काही कर्मचारी विलासच्या परोपकारी वृत्तीमुळे जळत असत. विलासचे नाव बदनाम करण्यासाठी ऑफिसमधील काही लोकांनी विलासचे ऑफिसमधील एका विधवा स्त्रीबरोबर नाव जोडले होते. कित्येक दिवस हे पारायण चालू होते. नेमके त्या दिवशी विलासच्या कानावर ह्या गोष्टी आल्या. विलासने केवळ एक माणुसकी म्हणून ऋतुजाला तिच्या नवऱ्याच्या जागी नोकरी मिळवून देण्यासाठी मदत केली होती आणि पुढे त्या दोघांची चांगली मैत्री झाली होती. त्या दोघांची निखळ मैत्रीचं लोकांना खटकत होती आणि त्याचा विनाकारण गौप्यस्फोट झाला होता.

विलासला स्वतःवरच्या आरोपापेक्षा त्या पवित्र स्त्रीवर आलेल्या गलिच्छ आरोपामुळे जास्त मानसिक खच्चीकरण झाले आणि परिणामी त्याच्या मनावर आघात होऊन त्याचे हार्ट फेल झाले. त्या स्त्रीची झालेली नाहक बदनामी त्याला सहन झाली नव्हती. ऑफिसमधील त्याचे काही हितचिंतक मित्र त्याच्या घरी आले तेव्हा त्यांच्याकडून ही बातमी समजली होती.

विलासच्या बायकोला त्याचा प्रॉव्हिडंट फंड वगैरे सारं काही मिळणार होते. ऑफिसमधील काही मित्र फंडाचे पैसे लौकर मिळवून देण्याचा प्रयत्न करणार होते. शाळेच्या ग्रुपमधील दहा - बारा लोकांनी निर्णय घेतला तो म्हणजे विलासच्या धाकट्या लेकाच्या शिक्षणाचा खर्च ते उचलणार होते कारण विलासची पत्नी एक गृहिणी होती आणि मोठा लेक तर नुकताचं जॉबला लागला होता. ह्यावेळेला नातेवाईक मंडळी काही कामाची नसतात. विलासने सगळ्यांसाठी पुष्कळ केलं पण त्याच्या जेव्हा त्याच्या बायकोला आधाराची खरी गरज भासली तेव्हा त्याच्या बायकोच्या मागे कोणीही खंबीरपणे उभे राहिले नाही.

निलेशने ग्रुपमध्ये तूर्तास तरी रियुनिअनची चर्चा करू नये असे सांगितले. निलेशने विलासच्या पत्नीला काही मदत करण्यासाठी ग्रुपमधल्या सदस्यांना पैसे जमा करण्याचे सुचविले. प्रत्येकाने आपल्या कुवतीनुसार पैसे जमवले. तब्बल पन्नास हजार रुपये जमले होते. ते पैसे घेऊन पुन्हा संध्याकाळी निलेश, संतोष, संदीप, महेश हे मित्र विलासच्या घरी गेले. निलेशने ते पैसे विलासच्या पत्नीला देऊ केले. विलासची पत्नी गहिवरली.

निलेश विलासच्या पत्नीला पैसे हातात देत बोलला, " वहिनी ! जे काही झालं ते खूपचं वाईट झालं. विलास अतिशय चांगला माणूस होता. त्याच्या अशा अकस्मात निधनाने आम्हा सर्वांना अतिशय दुःख झाले आहे. तुमच्या घरातला कर्ता पुरुष गेला. त्याची कसर कोणीचं भरून काढू शकत नाही पण वहिनी तुम्हा सर्वांना तुमचे आयुष्य विलासशिवाय पुढे न्यावेचं लागेल. विलासचे फंडाचे पैसे कधी मिळतील तेव्हा मिळतील. हे पैसे तुमच्या कामी येतील हीच भावना आहे. त्यामुळे कुठलाही मनात किंतु न ठेवता ह्या पैशांचा स्वीकार करा."

विलासची पत्नी निलेशला म्हणाली, " निलेश भाऊजी ! माझा नवरा स्वभावाने प्रेमळ, मदतीला तत्पर, स्त्रियांचा सन्मान करणारा, हळव्या मनाचा, अत्यंत लाघवी असा होता. ऑफिसमधील छोट्यातली छोटी गोष्ट ते मला सांगत असत. त्यांनी ऋतुजाबरोबरच्या निखळ मैत्रीबद्दल देखील मला सांगितले होते. मला काही त्यात वावगे वाटले नाही कारण माझ्या नवऱ्यावर माझा पूर्ण विश्वास होता.
ज्या लोकांनी त्या दोघांबद्दल गलिच्छ आरोप पसरवले त्याने त्यांनी काय मिळवले हो ? माझ्या नवऱ्याचा ह्यात नाहक जीव गेला. ती लोकं माझा नवरा परत आणून देऊ शकतील ? दोघांच्या नावाची जी बदनामी केली तर पुन्हा त्या ऋतुजाला मानमरताब मिळवून देतील ?
ऋतुजा मला दुपारी भेटून गेली. फक्त इतकंच बोलली की, " वहिनी जग खूप घाणेरडे आहे. विलास सरांसारखा माणूस क्वचितचं असतो. त्यांच्यामागे तुम्हाला मुलांसाठी जगायचे आहे. आता खंबीर होऊन मुलांच्या भविष्याचा विचार करा. आता मुलांचे वडील देखील तुम्हीच आहात आणि कृपा करून तुमचं स्त्रीधन उतरवू नका. एका स्त्रीला तिच्या नवऱ्याच्या पाठी समाजाच्या कुठल्या कुठल्या नजरा झेलायला लागतात हे मला चांगलंच माहिती आहे."
मला सांगा भाऊजी, आपला समाज अजून इतका मागासलेला का ? एका स्त्री आणि पुरुषाची निखळ मैत्री नसू शकते ? स्त्री आणि पुरुष एकमेकांशी बोलले तरी त्यांचे लफडे आहे म्हणून गावभर दवंडी पिटवायची यात काय मिळतं लोकांना असं वागून ?" विलासची बायको अगतिकपणे बोलत होती.

" हो वहिनी, तुम्ही बरोबर बोलत आहात. आपल्या समाजाची मानसिकता अजूनही मागासलेली आहे. कधी हा समाज सुधारणार देव जाणे. वहिनी, स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या. काही मदत लागली तर हक्काने आम्हाला सांगा. मी तुमच्या दोन्ही मुलांना माझा नंबर देऊन ठेवला आहे. आम्ही मित्र - मैत्रिणी येऊन जाऊ अधेमधे." विलासच्या बायकोचा आणि मुलांचा निरोप घेऊन निलेश आणि त्याचे मित्र निघाले.

ग्रुपमध्ये विलासचीचं चर्चा सुरू होती. दुसऱ्या दिवशी ग्रुपमधल्या मैत्रिणी विलासच्या घरी त्याच्या बायकोला भेटायला जाणार होत्या.

दुसऱ्या दिवशी ग्रुपमधल्या मैत्रिणी विलासच्या बायकोला भेटायला गेल्या. थोडं जुजबी बोलून, थोडा वेळ विलासच्या घरी बसून त्या पुन्हा आपल्या घरी जाण्यास निघाल्या. त्याच संध्याकाळी निलेश आपल्या बायकोला घेऊन विलासच्या घरी गेला. स्वातीला देखील विलासच्या बायकोला भेटायचे होते. ग्रुपमधील रोज कोणी ना कोणी विलासच्या बायकोला भेटायला जात होते.

विलास त्याचे कुठलेही मरणोत्तर कार्य करायचे नाही असे वारंवार त्याच्या बायकोला सांगत असे त्यामुळे त्याचे कुठलेही मरणोत्तर कार्य केले जाणार नव्हते.

जवळपास पंधरा - वीस दिवस झाले विलासला जाऊन पण ग्रुपमध्ये कोणीही रियुनिअनचे नाव काढले नव्हते.

काही दिवसांनी भाग्यश्रीने तिच्या लेकाचे लग्न दोन दिवसांनी चर्चमध्ये आहे असा मेसेज केला. त्यानंतर पंधरा दिवसांनी भाग्यश्री तिच्या कुटुंबासकट भारतात येणार होती. तिला तिच्या लेकाचे लग्न आपल्या हिंदू पद्धतीने मुंबईत देखील करायचे होते. त्यासाठी तिला भारतात येऊन लग्नाची खरेदी, आमंत्रणे याची तयारी करायची होती. केवळ भाग्यश्रीचं नव्हे तर तिच्या सुनेला आणि सुनेच्या आईवडिलांना देखील हिंदू रीतिरिवाजाने लग्न करायचे होते. लेकाच्या लग्नाच्या निमित्ताने भाग्यश्री भारतात कितीतरी वर्षांनी येणार होती.

दोन दिवसांनी भाग्यश्रीने चर्चमध्ये पार पडलेल्या लेकाच्या लग्नाचे फोटो ग्रुपवर टाकले. अमेरिकेत स्थायिक असलेल्या आहना आणि सुनीता त्या लग्नाला उपस्थित होत्या. भाग्यश्रीची सून स्टेला फारचं सुंदर दिसत होती. आता त्या सगळ्या लोकांना भारतात येण्याचे वेध लागले होते. प्रतिकने लेकाच्या लग्नासाठी चार दिवसांकरिता कर्जतला डेस्टिनेशन वेडिंगसाठी फार्म हाऊस अमेरिकेतूनचं बुक करून ठेवला होता. उत्साही मित्रमंडळींनी भाग्यश्री आणि प्रतिकला मदत करण्याची तयारीही दर्शवली.

दरम्यान विलासच्या पत्नीशी कोणी ना कोणी जातीने कॉन्टॅक्ट करत असल्याने विलासच्या कुटुंबाला कोणी एकटे पडून दिले नव्हते.

पंधरा दिवसांनी भाग्यश्री आणि तिचे कुटुंब भारतात आले. भारतात आल्या आल्या दोन दिवसांनी भाग्यश्री आणि प्रतिकने विलासच्या बायकोची भेट घेतली. प्रतिकने विलासच्या धाकट्या लेकाच्या हातावर पाच हजारांची रक्कम ठेवली. विलासचे कुटुंब ते पैसे घेण्यास नकार देत होते पण प्रतिकने सांगितले की, ह्याचा शिक्षणासाठी उपयोग कर म्हणून सरतेशेवटी विलासच्या धाकट्या लेकाने ते पैसे घेतले.

भाग्यश्री आता लग्नाच्या तयारीला जुंपली. स्वतःसाठी, सुनेसाठी आणि सुनेच्या आईसाठी, सासर - माहेरीकडील स्त्रियांसाठी तिने नऊवारी पैठणी विकत घेतल्या. पैठणीवर घालण्यासाठी मोत्यांचे दागिने विकत घेतले. भाग्यश्रीच्या लेकाचे लग्न आठ दिवसांवर येऊन ठेपले होते.

भाग्यश्रीने लेकाच्या लग्नाच्या पत्रिकेचा व्हिडीओ ग्रुपमध्ये पोस्ट केला आणि सगळ्यांना आग्रहाचे निमंत्रण दिले.

आता ग्रुपमध्ये भाग्यश्री आणि प्रतिकच्या लेकाच्या लग्नाची उत्सुकता निर्माण झाली होती. मुळात सगळ्यांना आकर्षण होते ते भाग्यश्रीच्या फॉरेनर सुनेचे. त्यामुळे ग्रुपमधील बरीच मंडळी उत्साहाने लग्नाला जाणार होते.

क्रमशः

सौ. नेहा उजाळे
ठाणे

पुढच्या भागात पाहूया भाग्यश्रीच्या लेकाचा लग्नसोहळा.

🎭 Series Post

View all