Login

रियुनिअन ( भाग ६ )

ही कथा आहे आयुष्याची पन्नास वर्षे उलटून गेलेल्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींची.


रियुनिअन ( भाग सहा )

प्रतिकने चार दिवसांसाठी फार्म हाऊस बुक केले असल्याने सगळं वऱ्हाड सकाळी कर्जतला जाऊन पोहचले. भाग्यश्रीने ग्रुपमध्ये सर्वांना लग्नाच्या दिवशीचेचं आमंत्रण दिले होते कारण त्या फार्म हाऊसवर इतक्या सगळ्यांची सोय झाली नसती. आधीच भाग्यश्री आणि प्रतिकचे मिळून तिथे शंभर नातेवाईक उपस्थित होते. स्टेलाचे नातेवाईक त्यांच्या अमेरिकेतील लग्नात उपस्थित राहिले होते. एकट्या निलेशला चारही दिवसांचे खास आमंत्रण दिले असल्याने निलेश त्याच्या बायकोला स्वातीला घेऊन फार्म हाऊसवर पोहचला होता.

त्या फार्म हाऊसवर वऱ्हाडी मंडळींची सोय फारचं उत्कृष्ट करण्यात आली होती. सकाळी तिथे गेल्यागेल्या पाहुण्यांना गरमागरम पोहे, उपमा आणि इडली - चटणी - सांबारचा नाश्ता दिला गेला. नाश्ता झाल्यावर सगळ्यांना चहा - कॉफी दिली. संध्याकाळी मेहंदीचा कार्यक्रम होता. त्यामुळे सगळी मंडळी आराम करण्यास आपापल्या रूममध्ये गेली.

दुपारच्या जेवणात छोले - भटूरे, मसालेभात, बुंदी रायता, जिलेबी असा मेनू होता.

साधारण चार वाजता सगळ्यांनी स्वतःचे आवरायला घेतले. स्टेलाने सुंदर लाल रंगाचा अनारकली ड्रेस घातला होता तर भाग्यश्रीच्या लेकाने अंशने लाल रंगाचा सदरा आणि पांढऱ्या रंगाचा पायजमा घातला होता.

स्टेलाच्या तसेच इतर स्त्रियांच्या हातावर सुंदर मेहंदी काढण्यात आली. एक कासार बोलावून सवाष्णींना चुडा देखील भरण्यात आला होता. स्टेलाच्या गोऱ्या हातात हिरवा चुडा खूपचं सुंदर दिसत होता. स्टेलाची मॉम देखील उत्साहाने सगळ्या कार्यात सहभागी होत होती. मेहंदीचा कार्यक्रम संपल्यावर सगळ्यांनी थोडा डान्स केला.

रात्रीच्या जेवणात अगदी हलके जेवण द्यायला सांगितल्यामुळे डाळ - खिचडी, कढी, पापड, लोणचे असा बेत होता. आता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी संगीतचा कार्यक्रम होता त्यासाठी सगळ्यांनी खूप छान छान डान्स बसवले होते.

सकाळी नाश्ता, जेवण झाल्यावर पुन्हा वऱ्हाडी मंडळींनी दुपारी आराम केला आणि रात्री संगीतच्या कार्यक्रमासाठी सगळे तयार झाले. स्टेलाने निळ्या रंगाचा गाऊन घातला होता आणि अंशने निळ्या रंगाची शेरवानी घातली होती. पहिला डान्स होता अर्थातच उत्सवमूर्तींचा. दोघांनी \" होल्ड मी नाऊ, टच मी नाऊ, आय डोन्ट वॉन्ट टू लिव्ह विथआऊट यू, नथिंग्ज गॉन अ चेंज माय लव्ह फॉर यू \" ह्या गाण्यावर सुंदर बॉलडान्स केला. अंशने डान्स करताना स्टेलाला उचलून एक गिरकी घेतली आणि लगेचच तिला खाली उतरवून तिच्या पायाशी गुढ्यावर बसून त्याने तिच्या बोटात हिऱ्याचे कोंदण असलेली अंगठी सरकवली. दोघांची केमिस्ट्री पाहून उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा आपोआपच ओल्या झाल्या. नंतर लगेचचं \" मेहंदी लगाके रखना, डोली सजाके रखना \" ह्या बॉलिवूड गाण्यावर दोघे थिरकले.

धमाल उडवली ती चार व्हायांनी. \" ले जायेंगें ले जायेंगें, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगें \" ह्या गाण्यावर त्या चौघांनी असा भन्नाट डान्स केला की उपस्थितांचे हसून हसून पोट दुखू लागले होते. भाग्यश्रीच्या धाकट्या लेकीने अंतराने \" गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण \" ह्या गाण्यावर डान्स करून बहार उडवून दिली होती. भाग्यश्री तसेच प्रतिकचे नातेवाईक देखील मागे राहिले नव्हते त्यांनी देखील बहारदार डान्स केले. नंतर एक तास डीजे लावला त्यावर सगळ्यांनीच ताल धरला.

भाग्यश्री आणि प्रतिकचे व्याही फॉरेनर असल्याने संगीतच्या कार्यक्रमात ड्रिंक्स, व्हेज - नॉनव्हेज जेवण देखील ठेवण्यात आले होते तरीदेखील अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने संगीतचा बहारदार कार्यक्रम उरकला.

आता तिसऱ्या दिवशी संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम होता. सगळ्यांनी हळद उत्स्फूर्तपणे खेळली. हळदीसाठी व्हेज, नॉनव्हेज जेवण ठेवले होते. आता चौथ्या दिवशीचा उद्याचा सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम होता तो म्हणजे लग्नाचे विधी. सकाळी साडेदहाचा मुहूर्त असल्याने रात्री सगळे लौकर झोपी गेले.

सकाळी साडेसात पासून लग्नाचे विधी सुरू झाले. स्टेलाने गर्द हिरवी नऊवारी पैठणी साडी नेसली होती. त्यावर पारंपरिक मोत्यांचे दागिने, नथ यांनी स्टेलाचे सौंदर्य जास्तचं खुलले होते. अंशने हिरव्या रंगाचा कुर्ता आणि मोती कलरची धोती नेसली होती. भाग्यश्री तसेच स्टेलाच्या मॉमने देखील पैठणी नऊवारी साड्या नेसल्या होत्या.

\" नवरीच्या मामाने नवरीला स्टेजवर आणा \" असा गुरुजींकडून पुकारा झाल्यावर भाग्यश्रीने धावत जाऊन निलेशला स्टेलाला स्टेजवर घेऊन जाण्याची विनंती केली. निलेशने हौसेने स्टेलाला स्टेजवर नेले. मंगलाष्टके पार पडली. भाग्यश्रीने तन्वीच्या लग्नसोहळ्यातील विचार फॉलो केलेले असल्याने त्या लोकांनी देखील तांदळाच्या अक्षता न वापरता गुलाबांच्या पाकळ्या मंगलाष्टकांसाठी वापरल्या. स्टेलाच्या गळ्यात अंशने मंगळसूत्र घातले त्यावर सगळ्यांनी जल्लोषात टाळ्या वाजवल्या.

शाळेच्या ग्रुपमधून जवळपास शंभर लोकांनी लग्नासाठी हजेरी लावली होती. विलासच्या बायकोला देखील ग्रुपमधल्या मैत्रिणी घेऊन आल्या होत्या. भाग्यश्रीने विलासच्या बायकोला आग्रहाचे आमंत्रण दिलेलेचं होते. लग्नाच्या निमित्ताने का होईना विलासच्या बायकोला त्याच त्याच आठवणीतून बाहेर काढावे हा भाग्यश्रीचा हेतू होता. सगळ्यांची मिळून अहेरासाठी चाळीस हजारांची रक्कम जमली होती. त्यातील एकट्या निलेशने दहा हजारांचा वेगळा अहेर केला होता.

जेवणासाठी पंगत बसवली गेली आणि मराठमोळ्या पद्धतीचे सुग्रास जेवण ठेवण्यात आले होते. पुरणपोळी, बासुंदी, पुरी, बटाट्याची भाजी, अळूवडी, उकडीचे मोदक हे सगळे पदार्थ खास स्टेलाच्या आवडीचे ठेवले होते. स्टेला आणि अंश पंगतीत सगळ्यांना आग्रहाने वाढत होते. सगळ्यांना भाग्यश्रीच्या सुनेचे फारचं कौतुक वाटत होते. सगळ्यांशी ती मराठीत बोलत होती. सगळ्यांना हात जोडून नमस्कार करत होती. भाग्यश्रीला आई आणि प्रतिकला बाबा अशा हाका मारत होती.

सगळ्यांनी स्टेलाला उखाणा घ्यायला लावला. स्टेलाने उखाणा घेतला, " मी आहे अंशची फॉरेनर नवरी, भारतीय संस्कृती आहे लय भारी.\" सगळ्यांनी स्टेलाच्या उखाण्यावर टाळ्या वाजवल्या. भाग्यश्रीने स्टेलाला विचारले की कोणी तुला हा उखाणा सांगितला तर तिने अंतराकडे बोट दाखवले. भाग्यश्री खूप खुश झाली की, आपली मुले परदेशात राहून आपली संस्कृती जपत आहेत.

आता साहजिकचं अंशची उखाणा घेण्याची पाळी आली. " स्टेलाला आवडते भारतीय संस्कृती, म्हणूनचं तिची आणि माझी जुळली प्रीती.\" अर्थात हा देखील उखाणा अंतरानेचं सांगितला होता.

अंश आणि स्टेलाच्या लग्नाचा दिमाखदार सोहळा सुंदररित्या पार पडला होता. समस्त पाहुण्या मंडळींना भाग्यश्री आणि प्रतिकने लक्ष्मीचे चांदीचे कॉईन भेट म्हणून दिले.

सर्व मित्रमंडळींनी भाग्यश्रीकडे स्टेलाचे आणि तिच्या आईवडिलांचे कौतुक केले. सगळे म्हणाले, " हे लोकं फॉरेनर असून आपल्यामध्ये किती छान मिसळले. सगळे लग्नाचे विधी करताना खूप हौसेने सहभागी झाले होते त्यामुळे वाटलेचं नाही की तुझे व्याही फॉरेनर आहेत."

त्यावर भाग्यश्री म्हणाली की, " खूपचं छान आहे स्टेला आणि तिचे आईवडील. मी अंश आणि स्टेलाची मैत्री पाहिली, त्यांचं फुलत जाणारं प्रेम पाहिलं. स्टेलाने अंश आणि आम्हाला पारखलं. माझ्याकडून तिने आणि तिच्या आईवडिलांने देखील भारतीय संस्कृती, भारतीय खाद्यसंस्कृती जाणून घेतली. स्टेला मराठी भाषा शिकली. आता ती उत्तम मराठी बोलते. तिच्या आवडीचे जे पदार्थ आता जेवणात होते ना ते देखील करायला ती शिकली आहे. स्टेलाच्या आईवडिलांनी अंश आणि स्टेलावर विश्वास दाखवला आणि त्यांचे आठ वर्षांचे प्रेम सफल झाले."

सगळ्यांनी भाग्यश्री, प्रतिक, अंतरा, नवदाम्पत्यांचा आणि स्टेलाच्या आईवडिलांचा निरोप घेतला आणि एक एक करत सगळे आपल्या घराकडे जायला निघाले.

आज ग्रुपमध्ये अंश आणि स्टेलाच्या लग्नाचेचं कौतुक चालले होते. ग्रुपमध्ये एकावर एक असे लग्नाचे फोटो टाकत राहिल्यामुळे सगळ्यांच्या मोबाईलची गॅलरी फुल्ल झाली होती. जे लग्नाला जाऊ शकले नाही त्यांना त्या सोहळ्याचे फोटो पाहून हळहळ वाटली. निलेशने तर चारही दिवसांचे फोटो ग्रुपमध्ये पोस्ट केले.

भाग्यश्रीचा रात्री ग्रुपवर मेसेज आला

" माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझ्या लेकाच्या लग्नाला आपण उपस्थित राहिलात आणि आमच्या आनंदात सहभागी झाल्याबद्दल मी आपणा सर्वांची आभारी आहे. अंश आणि स्टेलाला आपला ग्रुप खूप आवडला. त्यांनी सुद्धा तुम्हा सगळ्यांना थँक्स सांगितले आहे. जितकं वाटलं होतं त्यापेक्षा जास्त सुंदर माझ्या लेकाचा लग्नसोहळा पार पडला. आम्ही सगळे भारावून गेलो आहोत. निलेश आणि स्वाती आमच्या कार्यक्रमात घरातील सदस्यांप्रमाणे मिसळले आणि त्या दोघांनी आम्हाला खूप मदत केली. आलेल्या पाहुणेमंडळींना काही कमी पडू दिले नाही. प्रत्येकाकडे जातीने लक्ष देत होते. आता आम्ही अमेरिकेला पुन्हा निघून जाऊ पण तुम्हा मित्रमंडळींच्या प्रेमाची आठवण कायम आमच्यासोबत असेल. पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे मनःपूर्वक आभार मानते."

भाग्यश्रीच्या मेसेजने पुन्हा तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. भाग्यश्री तिच्या कुटुंबासकट दुसऱ्या दिवशी प्रतिकच्या गावी जाणार होती. गाव कसं असतं हे स्टेला आणि तिच्या आईवडिलांना पहायचे होते. तरी गावात बऱ्यापैकी सुविधा आल्याने ते खेडेगाव राहिले नव्हते आणि अगदीचं शहरीकरणही झाले नव्हते. प्रत्येक घरात गॅसची सुविधा असूनही अजूनही तिथे चुलीवरील स्वयंपाकचं होत असल्याने स्टेला आणि तिच्या आईवडिलांना त्याचे जास्त आकर्षण होते.

ग्रुपमध्ये दोन लग्नकार्य छान पार पडली होती. दोन्ही लग्नकार्यात बरेच जण भेटले होते तरी सगळ्यांमध्ये अजूनही रियुनिअनची उत्सुकता कायम होती. ग्रुपमध्ये आता पुन्हा रियुनिअनची चर्चा सुरू झाली. निलेशला मनासारखा स्पॉट सापडत नव्हता. मनासारखा स्पॉट सापडल्यावरचं तो सगळ्यांशी बोलणार होता.