Login

रेवती...छबीची ईरसाल बबी अंतिम भाग ३

It is the story of how Revati, a newly wed, handles the chaos thao ensues for no reason at her in laws' house!
रेवती अतुल सोबत सासरी परतली. पण आता ती काय करणार..? वाचा अंतिम भाग!

©®संगीता अनंत थोरात
भाग:-३
रेवती...छबीची ईरसाल बबी

"आई मी अशी चुक पुन्हा करणार नाही..माफ करा!" ती लगेच त्यांच्या पाया पडली. सासूबाईंनाही मग तिची कीव आली...

आता रेवती सासूच्या शब्दा बाहेर नव्हती. अतुलला काही सांगायच्या आधी ती सासूशी बोलून घ्यायची. त्यांच मत जाणून घ्यायची. सासूला काय हवं नको विचारायची. कधी हेअर स्टाईल करुन द्यायची किंवा कपड्यांच्या बाबतीत बोलायची. एकंदरीत त्यांची आवड लक्षात घेऊन घरात वावरायची. खरेतर तिला टिपीकल सून बनायचे होते. नोकरी करण्यात तिला अजिबात रस नव्हता. एके दिवशी तर, दुसर्‍या मुलींना बघून सासूबाईंनी तिला नोकरी करण्या संबंधी विचारले पण रेवतीने तिला घर संसारच सांभाळायला आवडेल...म्हणून सांगितले.

रेवतीच्या नणंदेचा जान्हवीचा मुलगा प्लेस्कूल मध्ये जायला लागला तसे तिला घरी पुर्णवेळ थांबणारी घरचीच व्यक्ती हवी होती. नाही म्हंटले तरी आठ दिवसातून एकदा तिला आॅफीसमध्ये जावे लागायचे. तिने आधी तिच्या सासुबाईंनाच येण्याचा आग्रह केला. पण, गुडघ्यांच्या त्रासामुळे त्यांनी यायला नकार दिला. मग तिने आपल्या आईला आपल्याकडे येण्याची गळ घातली. आता रेवतीच्या सासूबाईंना प्रश्नं पडला. 'मी तिकडे गेले तर, सून हातची निघून जायची...' सासरेबुवा बायकोला सोडून अतुलकडे रहायला तयार नाही. मग त्यांनी जयंतला बोलावले, "हे बघ आपल्या ताईला आमची गरज आहे. त्यामुळे तिकडे आम्हाला जावे लागेल. पण तू वहिनीवर लक्ष ठेवत जा...मला बित्तमबातमी देत जा आणि हो, तिच्या पुढे पुढे करायचे नाही. जरा माणसा सारख वागायचं. काय काम असतं तिला घरात, हात नाही लावायचा कामाला..." जयंतनेही मान डोलावली.

नेमकेच भाजी काय बनवायची विचारायला आलेल्या रेवतीच्या कानात ते शब्द पडलेत....'अरे लेका, हे तर खुपच झालं. पालथ्या घड्यावर पाणी...कितीही करा तरी....ओके...' तिचे डोळे आता लकाकत होते.

सासूसासरे गेल्यावर अर्ध्यारात्री अचानक तिने जोरजोरात जयंतच्या रुमचे दार वाजवले. तिला घाबरुन थरथर कापत असलेले बघून त्याने कारण विचारले. "अहो जयंत भाऊजी काय सांगू तुम्हाला, खरे वाटेल का मी सांगितलेले...." तिने घाम पुसत म्हंटले.
"वहिनी जरा बसा तुम्ही, काय झालं..?"
"अहो एवढ्यात मला घरात आवाज ऐकू येतात...कुणी तरी कुजबूजत असतं सारखं..."
"काय...कुठे, दादाला, आईला सांगितलतं का?" त्याने चमकून विचारले.
"नाही नां दादातर विश्वासच करत नाही अश्या बाबींवर, आई घाबरतील म्हणून त्यांनाही काही सांगितले नाही. मी एकटीच सहन करत होते...."
"पण वहिनी आपल्या घरात तर असं काही मी आधी कधीच ऐकले नाही आणि माझापण अश्या गोष्टींवर विश्वास नाहीये...तेव्हा तुम्ही घाबरु नका. मी आहे इथे, दादा उद्या येईलच परत...तेव्हा बोलू मग आपण...!" तिने मान डोलावली. तिच्या समाधाना साठी दोघेही हाॅल मध्येच बसले. थोड्या वेळात दोघेही पेंगायला लागले.

छमछमछमछम...च्या आवाजाने सोफ्यावर झोपलेल्या जयंतने डोळे उघडले. त्याने रेवती कुठे आहे ते बघितले. ती दिवाणवर गाढ झोपली होती. 'हा भास होता बहूतेक....घुंगरांचा आवाज होता की काय...' त्याने इकडे तिकडे बघितले. भास समजून पुन्हा झोपायचा त्याने प्रयत्न केला. छम छम छम छम...आवाजाने त्याने हालचाल न करता डोळे उघडले. 'आवाज बंद, म्हणजे हा भास नव्हता तर...अन् वहिनीतर गाढ झोपली. तिला कसा ऐकू येत नाहीये आवाज..? आता त्याला थोडी भीती वाटायला लागली. रात्री कधीतरी मग त्याला झोप आली.

पहाटेच डोअरबेल वाजली तसे रेवतीने दार उघडले. "अरे तू इथेच होती का...आणि जयू का झोपला हाॅल मध्ये...?" अतुल आत येत म्हणाला. "झोप नव्हती येत म्हणून आम्ही इथेच गप्पा केल्यात आणि टीव्ही बघताना कधीतरी डोळा लागला..." आळोखे पिळोखे देत जयंत उठला. "मी आता झोपतो जरा, वहिनी रात्री घाबरल्या होत्या. माझी झोपमोड केली त्यांनी. मग इथेच त्यांना कंपनी देत बसलो मग झोप लागली कधीतरी...काय वहिनी खोटं कशाला बोलता...!" तो हसतच बेडरुम मध्ये गेला. "हा काय म्हणाला? कशाला घाबरलीस तू..?" अतुलने तिच्याकडे बघत विचारले.
"अहो काही नाही...तो जरा भास झाला मला, काही कुजबुज ऐकू येत होती रात्री..." ती ओशाळत बोलली.
"तरीच आईने म्हंटले होते मला कैकदा, ही सारखी भूताचे पिक्चर बघते म्हणून....तू काय लहान नाहीयेस आता घाबरायला. आई गेल्या बरोबर भास व्हायला लागलेत बघ, कुठल्या जमान्यात राहतेस तू...ते आॅनलाईन राहण कमी कर आणि आता चहा बनवून देतेस की..."
"हो बाबा आणते चहा..." त्याला पुढे बोलू न देता ती चहा करायला गेली.

संध्याकाळी जयंत लवकर घरी आला. "वहिनी काही भास वगैरे ...झाला का पुन्हा?"
"नाही नां ते रात्री उशीरा होतात. दिवसा नाही. बाय द वे, तो भास नाहीये. परवा मी कुणाला तरी पळताना बघितले होते. तुमचे दादातर विश्वासच ठेवत नाही. आईंना पण सांगू शकत नाही. एक तुम्हीच मला वाटतं समजून घ्याल...उगाचच उद्या तुम्हाला नको काही धोका व्हायला..." तिने चेहर्‍यावर चिंतेचे भाव आणत म्हंटले.
"असं काही नसतं वहिनी...उगाचच चिंता करता तुम्ही!" एवढे बोलून तो बेडरुम मध्ये गेला.

'मला आठवतं मी लहान असताना आई म्हणायची लवकर झोप नाहीतर घुंगरुवालेबाबा येणार...म्हणजे घुंगरुवाला बाबा हाच आहे का? आई म्हणाली होती. घुंगरुचे आवाज येतात....लवकर झोप नाहीतर सोबत घेऊन जाईल...मला कैकदा घुंगरुचे आवाज यायचे सुद्धा, पण आई थोपटत मला झोपी घालायची....अस्स होतं तर, तोच आवाज वहिनीला येतोय आणि वहिनीला दिसतोय पण?' त्याने चेहर्‍यावर जमा झालेल्या घामाला रुमालाने पुसले...असेच एक दोन दिवस त्यालाही भास झालेत आणि काल रात्रीतर त्याला रुममध्येच कुणीतरी आल्यासारखे वाटून भीतीने त्याची गाळण उडाली....आठवून रेवती भानावर येत हसू लागली...!

घरी अभ्यास होत नाही म्हणून होस्टेलवर रहात असलेल्या जयंतला आईने स्पेशल घरी बोलावून घेतले होते. जोवर त्या नाहीयेत तोपर्यंत हा असणार...त्यांच्यात बदल झाला होता पण तरीही त्यांचं वरचढ दाखवण्यासाठी सगळ कारस्थान चालायचं. खरेतर याची काही गरज नव्हतीच...!

रेवतीने एकदा एका एक्झिबीशन मधून एक गेम घेतला होता. त्यात चारपाच वेगवेगळे पार्ट होते. त्यात छोटासा स्पीकर छोटी स्क्रीन असलेले गॅझेट, लेझर व रिमोट वगैरे होते. त्यात आपण बोललेलं रेकाॅर्ड सुद्धा व्हायचं. थोडा महागडा होता गेम, रेवती टाईमपास करायचा म्हणून अधून मधून तो गेम खेळायची. ती लग्नं झाल्यावर गेम सासरी घेऊन आली होती.  ती नेहमीच भूताच्या सीरीज, सिनेमे आवडीने बघायची. त्यावरुनच तिच्या डोक्यात जयंतला घाबरवायचा विचार आला. मग तिने हे गॅझेट उघडले. त्यात घुंगरांचे तिला हवे तसे आवाज रेकाॅर्ड केलेत. ठरवल्यानुसार तिने आधीच स्पीकर हाॅल मध्ये लपवून ठेवला आणि छोटस रिमोट स्वतःजवळ ठेवलं. त्याचाच वापर तिने जयंतच्या समोरच केला...शहाणीच भारी बबी, नंतरही त्याच्या बेडरुम बाहेर स्पीकर ठेऊन तिने हवा तसा आवाजाचा वापर केला..


रेवती, प्लानिंग फत्ते झाले म्हणून आनंदी होती. आता तिला नवरा अतुलला सरळ करायचे होते.
'बबेऽ लाग कामाला.....' मनाशी बडबडत रेवती म्हणाली.
बाहेरच्या बाहेर जयंतला पैसे देऊन अतुल आॅफीसला गेला. संध्याकाळी परत आल्यावर बघतो तर काय, मुख्यदार उघडच होतं. "काही अक्कल आहे की नाही. सताड दार उघड ठेवलय...काहीही होऊ शकतं. आजकाल किती वाईट घटना घडत आहेत. अगं रेवा किती बेफिकीर तू....आई सारख घर कुणीच सांभाळू शकत नाही. आईच हवी घरी. दार उघडं ठेवून काय करतेस आत..." तो सलग बडबडत घरात आला. बघतो तर त्याचा आवाज ऐकूनही रेवती किचनमध्ये गॅसवर काही बनवत होती. अगदी तल्लीनतेने....

"रेवतीऽ ऐकतेस की डाॅक्टरकडे चलायचं तुझे कान चेक करायला..." त्याने रागावून म्हंटले.
"अरे तुम्ही आलातं माझं लक्षच नव्हत. आज्जीने त्यांच्या आवडता कणकेचा शिरा करायला सांगितला मला, तेच लक्षपूर्वक करत होते. त्यांनी सांगितलेली रेसीपी चुकायला नको नां नाहीतर रागवायच्या मला. सासूबाई सांगायच्या आज्जी खुप कडक स्वभावाच्या आहेत ते. आज मला प्रचिती आली. तुम्ही फ्रेश होऊन या...आज्जींसोबत तुम्ही सुद्धा शिरा खा..छान गरम गरम...!" आपल्यातच मग्नं रेवती हसत म्हणाली.
"तुला कुठे मिळाली आजी? आणि कुणाची आजी?"
"अहो तुमची आज्जी, बाबांची आई...दुपारी खाली उतरल्या व म्हणाल्या, 'मी खुप दिवसांची उपाशी आहे. शिरा बनवं' तुम्हाला तर माहित आहे, मला कणकेचा शिरा बनवता येत नाही. मग आज्जीनेच रेसीपी सांगितली मला आणि मी तशीच बनवायचा प्रयत्न केलाय. आता खाऊन सांगा मला कशी टेस्ट आहे ते...या लवकर कपडे बदलून..." ती आपल्याच धुंदीत बोलली.

बेडरुम मध्ये जाऊ की घराबाहेर जाऊ...? द्विधा मनस्थितीत जड पावलांनी तो वळला. हाॅल मध्ये सरसर नजर फिरवली. भिंतीवरील फ्रेममधला आज्जीचा फोटो गायब होता. तो चरकलाच, 'हे काय झालं...ही म्हणते तसे, आज्जी खाली उतरली....म्हणजे फ्रेम मधून खाली उतरली...? अरे बापरेऽ कसं होऊ शकतं हॅट काहीतरीच...गंमत करत असेल मला घाबरवायला...थांब सांगतोच तिला आता, गंमत कशी असते ती...' तो फ्रेश होऊन बाहेर आला.

"रेवा आज्जीला शिरा खाल्ल्यावर चहा सुद्धा हवा. "
"तुम्हाला कुणी सांगितल?"
"आज्जीनेऽ बेडरुम मध्ये आली होती माझ्या मागे..." हसत तो म्हणाला.
"ओके पण....अच्छा, हो आज्जी काळा हवा ना चहा तुम्हाला? साखर नको. दूध नको...बरं बरं गुळाचा...बसा ना आज्जी हाॅल मध्ये, मी घेऊन येते शिरा आणि चहा सुद्धा...तोवर तुम्ही अतुल सोबत गप्पा करा...!" रेवतीने अतुलच्या मागे बघत संभाषण केले.

आता अतुल चरकला, 'मला तर कोणीच दिसत नाहीये अन् ही कुणा सोबत बोलतेय, मी हिची गंमत करत होतो...ही, माझी गंमत तर करत नाहीये नां...'
"आज कुठल्या मुड मध्ये आहेस तू? माझी टांग खेचायची असेल तर स्वप्नही बघू नकोस. दमून भागून घरी आलोय तुझ्या सारखा घरात बसून नव्हतो. मुडच माझा खराब करायचा असेल तर जातो बाहेर...."
त्याने तिच्याकडे रागाने बघत म्हंटले.

"अहो आज्जी आज्जी तुम्हाला माझी शपथ आहे. असं काही करु नका....थांबा ना प्लिज प्लिज थांबा नां..." ती आज्जीच्या मागे धावत बाहेर गेली अतुलचं बोलण न ऐकता....
अतुल पण तिच्या मागे बाहेर आला. ती अंगणातील कोपर्‍यात कुणाशी तरी बोलत होती हळू आवाजात.
'कुणी तर दिसत नाहीये...खरचं आज्जी आलीय...' त्याला काहीतरी चुकल्या सारखे वाटू लागले. तेवढ्यात शेजारच्या काकांनी त्याला बाहेर बघून आवाज दिला. ते इविनिंग वाॅकला निघाले होते. अतुल गेटजवळ गेला. दोघेही पाचसात मिनिट बोलले.

काकांशी बोलल्यावर अतुल आत आला. "रेवा खर खर बोल. मूद्दामहून नाटक करतेस ना हे..."
"कुठलं नाटक?"
"आज्जी आल्याचं..."
"मी कशाला नाटक करु? आफ्टर आॅल मी विज्ञानवादी आहे पण काही काही गोष्टी अनाकलनीय असतात त्या आपल्या हातात राहत नाहीत. अनुभवल्यावरच कळतं आणि तो अनुभव मी घेत आहे. माझ्या समोर तुझी आज्जी आली होती. इतक्या प्रेमळपणे त्या बोलल्या की, माझी मैत्री झाली त्यांच्याशी थोड्या वेळातच...खुपच गोड आहेत आज्जी. मात्र तुझ्यावर रुसल्यात आणि जाऊन बसल्यात पुन्हा तिकडे. बघूया कधी खाली येतील तेव्हा बोलेन मी त्यांच्याशी...!" ती पुन्हा किचन आवरु लागली.

अचंबित अतुल तिच्याकडे बघतच राहीला. खरेच, असं कसं होऊ शकतं....विचार करत तो हाॅल मध्ये आला. नकळत त्याचं लक्ष आज्जीच्या फ्रेम कडे गेलं...हे कसं झालं? डोळे चोळून त्याने पुन्हा फोटोकडे बघितले. आज्जी फ्रेममध्ये होती....जणू त्याच्याचकडे ती डोळे वटारुन बघत होती...अतुल घाबराघुबरा झाला. "अरे तुम्ही शिरा खाल्ला नाही अजून. चहापण थंड झालाय. तुम्ही शिरा खा जरा गरमच आहे. चहा मी गरम करुन आणते....आज्जी, तुम्हाला अतुलचा राग आलाय पण पहिल्यांदा घरात आल्यावर तुम्ही माझ्या हातचा शीरा खाल्लात चहा घेतलात...मला खुप खुप आनंद झालाय. देव करो आणि अतुलवरचा तुमचा राग लवकर निवळो..." मागून आलेली रेवती फोटोकडे बघत म्हणाली.

अतुलने ट्रे मध्ये बघितले, एक चहाचा कप रिकामा होता. एका प्लेटमधला शिरा संपवलेला होता....त्याला काही कळेचना, कसाबसा प्लेट मधला शिरा तो पोटात टाकत होता. जे बघतोय ते खर आहे....

अर्ध्यारात्री कुणाच्या तरी कुजबुजीने त्याला जाग आली. तीन वाजले होते. रेवती बेडरुम मध्ये नव्हती. तो कानोसा घेत बाहेर आला. रेवती आज्जीच्या फोटोची फ्रेम हातात धरुन उभी होती व काहीतरी हळू आवाजात बोलत होती....ही वेडी तर नाही झाली.... "रेवतीऽऽकुणाशी बोलतेस?"
त्याच्या आवाजाने रेवती दचकलीच. एक क्षण त्याच्याकडे बघितले तिने मग वळून घाईघाईने म्हणाली. "नाही नाही आज्जी तुम्ही काळजी करु नका आणि रागावू पण नका...तुमचाच नातू आहे नां, नाही नाही खुप छान वागतात माझ्याशी. काही बाहेरच टेंशन असलं तरच कधी तरी बोलतात असे...खुप प्रेमळ आहेत ते आज्जी...आज्जी अहो आज्जी..." ती आवाज देऊ लागली.

"रेवा, काय हे? माझी आज्जी मला कशी दिसत नाहीये. तू खरेच आज्जी सोबत बोलत होतीस? वेडी झालीस का..?चल उद्या आपण डाॅक्टरांकडे जावूयात..." तो काळजीने म्हणाला.
"यात घाबरण्या सारखे काही नाही मी ठणठणीत आहे. तुम्ही सारखे माझ्याशी तुसडेपणाने बोलता ते आज्जीने ऐकले, म्हणूनच त्या परत आल्यात. तुमच्यावर खुप रागवल्यात. बघा गेल्यात बाहेर त्या. फिरुन येते म्हणाल्या...." तिने हातातील फोटो नसलेली फ्रेम त्याला दाखवली.

आज्जी खरेच फ्रेम मध्ये नव्हती...."म्हणजे भूतऽ आले.."
"अहो, भूतबीत काही नाही. आज्जी आहेत आणि त्यांच्या येण्याने काहीच नुकसान होणार नाहीये. 'अतुल जर तुझ्याशी असाच वागला नां तर मी इथेच कायमची राहायला येईल म्हणाल्या...मी त्यांना तरी काल खुप समजावले होते. त्या म्हणाल्या होत्या इहलोकी जायच्या आधी त्यांना मनाच्या शांती साठी एक पूजा करायची आहे घरात...' पूजा आपण दोघांनीच करायची म्हणाल्यात..."

अश्या कुठल्याच गोष्टींवर विश्वास नसलेला अतुल, डोळ्यांनी जे बघितले...त्याने पार चक्रावून गेला. "हो हो करुयात पूजा..." नकळत त्याच्या मुखातून बाहेर पडले. "उद्याच करुयात. आज्जीला सांग मी बदलायचा प्रयत्नं करतो म्हणून...."
"हो, आज्जी फिरुन आल्यात की सांगते. तुम्ही जा झोपायला. अरे हो, जयंत भाऊजी आले नाहीत. फोनही केला नाही त्यांनी..."
"अगं तो मित्राकडे थांबणार आहे. महत्वाच्या असायनमेंट पूर्ण करायच्या आहेत म्हणाला. नंतर होस्टेलवर जाईल तो परत. घरी अभ्यास होत नाही म्हणाला....बरं मी झोपतो तू आज्जीसोबत बोलून, ये झोपायला." तो बेडरुममध्ये जात बोलला.
''आला मोठ्ठा आई जवळ कागाळ्या करणारा..." ती गालातल्या गालात हसली.

ट्रिंगट्रिंग "हॅलो मॅम, मिशन सक्सेसफुल झाले...डन डन...या छबीच्या इरसाल बबीने आपला जलवा दाखवला...!"
"हे बघ बबेऽ छान प्लानिंग होतं तुझं पण घरात सासूसासरे असणे दीर नणंद असणे एकंदरीत घर भरलेले असले की एकट्या व्यक्तीवर कुठलं प्रेशर येत नाही. सुख दुःख वाटून घेणार, बोलणारी काळजी करणारी अनुभवी व्यक्ती सुदैवाने आपल्याला लाभली आहेत तर त्यांना सांभाळून घ्यावे. पुढे माझ्या बबीच्या पोटी छोटे छोटे छकुले येणारच आहेत मग त्यांना आज्जी आजोबां शिवाय कोण चांगले सांभाळणार? काही दिवसाने सगळ्यांमध्ये एक बंध निर्माण कर बबेऽ मला माहित आहे बबी आईचं ऐकणार...हो नां?" पलिकडून आई बोलली.

"हे काय गं मम्मे, तू बघितलस नां माझ्याशी कसे वागत होते सगळे...मला पण सगळे हवे आहेत. ही झाली थोडी गंमत...त्यांना सरळ करण्यासाठी. पण पुढे माझं स्वप्नं आहे की, आपण सगळेच एकत्र राहूयात. तुम्हाला कोण आहे माझ्या शिवाय..."
"हे बघ बबेऽ माझं तरी ठिक आहे. पण आज्जी आणि बाबा काही यायचे नाही बघ, घर सोडून...पण तुला सांगते, तशी वेळ आलीच तर मग तू सुचवलेल्याच मार्गाने जावे लागेल. म्हणजे तूच आहेस मग आमचं करणारी....ते बघू पुढे, मला सांग तो फोटो कसा बदललास...."
"अगं, अतुल ऐकेल बघ नंतर निवांत सांगेन आता एवढेच सांगते. एक सेम तशीच कोरी फ्रेम आणून ठेवली होती. आणि मला मध्ये बदलायला वेळ मिळाला की....हाऽहाऽहाऽ"
पलिकडून आई सुद्धा हसण्यात सामील झाली.....!
अंतिम!
११/०८/२४
०००

🎭 Series Post

View all