Login

रेवती...छबीची ईरसाल बबी भाग १

It is the story of how revati, a newly wed, handles the chaos that ensuse for no reason at her in laws' house!
©®संगीता अनंत थोरात
भाग:-१
रेवती...छबीची ईरसाल बबी

छम छम छम...छमछमछमछमछम...छम छम छम, आवाज काही केल्या थांबत नव्हता. सलग येतच होता. घाबरुन अर्धवट झोपेत असलेल्या जयंतने डोक्यावरुन पांघरुन घट्ट ओढून घेत डोक्याखाली दाबले. पाया खाली सुद्धा पांघरुनाच टोक दाबून धरतं...पाय पोटाशी अन् दोन्ही कानात बोटे खुपसून तो "जय जलाल तू ...आयी बला को टाल तू..." चा सारखा जप तोंडाने करु लागला. अर्थात त्याचा "जप" कुणालाही ऐकायला जाणार नाही, याची तो खबरदारी घेत होता. हे सर्व केल्यावर त्याला सुरक्षित वाटू लागले. पहाटे पहाटे त्याचा डोळा लागला.

"अहो उठाना जयंत भाऊजी...आज जायचे नाही का काॅलेजला?" रेवतीने जरा मोठ्यांनेच आवाज दिला तसे खडबडून तो उठला. आळोखे पिळोखे दिल्यावर त्याने रेवतीला खुणेनेच जायचे आहे...म्हणून सांगितले, 'कोण जाणे साठवलेली लाळ तिच्यासमोरच बाहेर पडली तर...कदाचित हाच विचार असावा त्याच्या मनातं' रेवती वहिनी वरवर हसूनं मनातं बडबडत आपल्या कामाला लागली.
'बापरे काय तो आवाज होता. धडकीच भरली होती मनात. वहिनी म्हणत होती ते बरोबर होतं. पण माझ्या सारखा मीच, कुठे तर भीतीने अंथरुणाला खिळलो होतो. पण सू सू करायला मात्र हिंमतीने गेलोच गड्या...म्हणजे मी भीतीवर...विजय मिळवला? अरे व्वा, ब्रावोऽऽ' जयंत आपल्याच कर्तुत्वावर बेहद खुश झाला. स्वतःची पाठ थोपटल्यावर उठून उभा झाला आणि चमकलाच....इकडे तिकडे बघत त्याने कानोसा घेतला. कुणाला दिसायच्या आधी पळतच तो बाथरुम मध्ये घुसला. तिथल्या कपाटात एकदा त्याने अंडरगारमेंट आहेत का ते चेक केले...हाऽऽ वाचलो बुवा, मग गाणे गुणगुणत त्याने आंघोळ उरकली.

अजून कसा हा बाहेर आला नाही, म्हणून रेवती पुन्हा जयंतच्या रुम मध्ये डोकावली. बाथरुम मधून शाॅवरचा सोबत गुणगुणण्याचा आवाज येत होता. 'अरे वा, गडी डायरेक्ट आंघोळीला...चल याचा बेड आवरते...नाहीतर,' ती पुढचे मनातले वाक्य सुद्धा बोलली नाही आणि बेड नीट करायला लागली. 'अरे....हे काय?' हात झटकत ती जरा मागे सरकली आणि डोक्यात प्रकाश पडून ती मोठ्यांने हसू लागली. पण लगेच भानावर येत, ती गालातल्या गालात खुदू खुदू हसली....असलं हसू फक्त ज्यांना 'काहीतरी गवसल्याचा' आनंद होतो तेव्हाच येतं....
ती आल्यापावली परत गेली. बेड नीट न करताच. फ्रेश होऊन जयंत बाहेर आला. बेडवर मोबाईल शोधू लागला आणि त्याच्या हाताला ओली बेडशीट लागली...त्याला समजले....जे समजायचे होते ते...!

"रेवती वहिनी, मी बेडवरची गादी टेरेसवर वाळत घातली आहे. त्यावर जरा पाणी सांडलय आणि बेडशीट वगैरे वाॅशिंग मशीन मध्ये घातलीत. सुरु केली मी मशीन, फक्त तुम्ही उन्हात कपडे वाळत घाला..." जयंत नाश्ता करता करता म्हणाला. "अहो भाऊजी का बरं तुम्ही केलतं मी आहे नां घरातं उगाच आता आई मला रागावतील बघा..." जरा लटक्या रागाने रेवती म्हणाली. "आईला कसं माहित होईल? मी तर सांगणार नाहीये. तुम्ही सांगाल का?" जयंत हसत म्हणाला. "नाही, मी का सांगणार, ते काम तुमचं आहे..." ती टोला लगावत म्हणाली. 'आ बैल मुझे मार कोण करणार बाबा, खबरी तर तूच आहेस ना?' आपले हसू लपवत ती किचनमध्ये गेली.

"अगं रेवती, मला पण पटकन दे काही खायला की जाऊ तसाच?" चेहर्‍यावर बारा वाजलेल्या रेवतीच्या नवर्‍याने अतुलने तिला त्रासिकपणे विचारले. त्याच्या डोक्यावर जणू कुणी मनामनाचे ओझे ठेवले होते...अश्या अर्विभावात त्याने आवाज दिला होता.
"आले आले...साॅरी हां पराठा कडक हवा ना तुम्हाला, म्हणून जरा वेळ लागला..." रेवती घाईने खरपूस भाजलेला मिक्स भाजीचा पराठा सोबत चटखदार हिरवी चटणी ताटात घेऊन आली. त्याच्यासमोर डायनिंग टेबलवर ताट व पाण्याचा ग्लास तिने ठेवला. जरा हसून त्याच्याकडे बघितले. त्याने एक भिरभिरती नजर तिच्यावर टाकली आणि चेहर्‍यावर अनास्था दाखवत नाश्ता करु लागला. 'हे त्याच्या मारी...एवढी कृपा केलीस महाराजाऽऽ भिरभिरती का होईना, नजर तर टाकलीस...' तिने किचनमध्ये गाळलेला घाम सार्थकी लागल्या सारखे तिला वाटले. "हाऽऽ काय तिखट बनवलीस चटणीऽऽ किती वेळा तुला आईने सांगितले आहे, जरा मिरची कमी वापरत जा म्हणून...लोकांनी काय नाश्ता तुला मागूच नये का...?आई कडून शिकून घे जरा...दे जरा तो साखरआंबा...हाऽऽ"  तो पुन्हा सूर खेचत डोक्याला झटका देत बोलला पण त्याने खाणे थांबवले नव्हते. 'अय्याऽ हे तर सासूबाईंचे शब्द आहेत.  शेवटी दोन्ही पो..रऽऽ सासूबाईंवर गेलीतं. अब तेरी बारी भाईसाऽऽ' त्याच्या ताटात साखर आंबा वाढतं चेहर्‍यावरच हसू तसूभर सुद्धा कमी न करता ती तेथेच उभी राहून त्याच्याकडे बघू लागली. ''चहा कधी आणणारेस की बाहेर पिऊ?" तिच्याकडे न बघता तो म्हणाला. रेवतीच्या ओठांवरचे हास्य आता जरा 'फाकले' होते म्हणजे ओठांचा अँगल आता काना पर्यंत पोहोचला होता फक्त त्यातून आवाज येत नव्हता. अँगल तसाच ठेवत तिने चहा बनवला त्याच्या पुढ्यात आणून ठेवला. गटागटा चहा पिऊन त्याने कप तसाच ठेवून तो उठला बॅग हातात घेतं, "आता माझी गाडीची चावी कोण देणारऽऽ की तसाच...." त्याचे वाक्य पूर्ण व्हायच्या आतचं त्याच्या डोळ्यां समोर तिने चावी धरली. हास्य अजूनही चेहर्‍यावर तसच होतं..."हे जरा अती होतय हां कमी कर जरा हास्याचा अँगल...काॅमेडी करत नाहीये मी इथे..." चावी झटक्याने तिच्या हातातून घेत तो बाहेर गेला.

बाहेर जयंत उभा होता. तो ही काॅलेजमध्ये जाण्याच्या तयारीत होता.
"दादा थोडे पैसे दे. आई म्हणाली होती. दादाकडून घे म्हणून. सहल जाणार आहे. तर पैसे आजच भरायचे आहेत...."
"अरे मग वहिनीला माग पैसे, ती देईल. किती हवेत?"
"पाच हजार हवेत. पण आई म्हणाली होती वहिनीला नको सांगूस. दादाकडूनच मागून घे..."
"असं म्हणाली आई? ठिक आहे देतो मीच पैसे. चल एटीएम पर्यंत तिथून तू काॅलेजला जा..."
दोघेही आपआपल्या गाडीने घरा बाहेर पडलेत.

'मला मागितले असते तर काय बिघडल असतं सासूबाईंच? यांच ना मला काहीच कळत नाही. कुठला कमीपणा वाटतो यांना काय माहित. तुमच्याच मुलाने बेडरुम मधल्या कपाटात ठेवले आहेत ना पैसे? ते फक्त मी दिले असते. मी का नाही म्हणाले असते का त्याला? आणि माझा नवरा बघा कसा गाईचा गोर्‍हाच जणू....लोकं बायकोचा बैल बनतात आणि हा बघा...बबेऽ बबेऽ ये गं तुझ्या रुपात...!'

आज बबीने तर ठरवलेच. आता नवर्‍यालाही इंगा दाखवायचाच...किती दिवस असं मान डोलावून सगळ सहन करायचं. सासू आणि दीर आलाय जरा खाली पण हा मारेऽऽ फनफन करतोय...

लग्न होऊन सासरी आलेल्या रेवतीला सासूने नेहमीच कमी लेखले. तसे बघितले तर रेवती आईवडीलांची एकूलती एक लेक लाडाकोडात वाढलेली. उच्च शिक्षण घेतलेली. लग्नाच्या बाजारात उभे राहण्या आधी आईने तिला जरा तंबी दिली. 'घरकाम, स्वयंपाक आता शिकून घे...' तसे तिला जुजबी ज्ञान होतेच. स्वतःपुरते ती करु शकत होती. घरी आई, आज्जी असल्यामुळे तिने काम करायलाच हवे...असे नव्हते. पण रेवतीने आईचे ऐकले. ती सांगेल तसे ती किचन मध्ये वावरु लागली. दिवाळी फराळ, इतरही पदार्थ ती लवकरच खुप छान टेस्टी बनवू लागली. आई आज्जीला तर खुप आनंद झाला. त्या अधिकच तिचे कौतुक करु लागल्या. लवकरच रेवतीला अतुलचे स्थळ आले. सर्व सहमतीने लग्नं जुळून रेवती सासरी आली. लग्नातल्या बारीक सारीक राहून गेलेल्या गोष्टी पकडून रेवतीची सासू तिला टोमणे मारु लागली. नातेवाईकां समोर तिच्या माहेरच्यांना काही बाही म्हणू लागली. चवदार जरी पदार्थ बनवले तरी सुद्धा ती आमच्याकडे असे बनवत नाही किंवा तुमच्याकडे असे बनवतात....म्हणून टोचून बोलू लागली. हळूहळू रेवतीला या सर्व गोष्टींचा राग यायला लागला. एकदा तिने नवर्‍याकडे सासूची तक्रार केली पण त्याने तिलाच फटकारले. आईला मी चूप करु शकत नाही. तिला जे बोलायचे ते बोलू दे, माझे कान भरु नकोस...त्याच्या या शब्दांमुळे तर ती फार दुखी झाली. तसेच विचार केल्यावर नवर्‍याचा राग सुद्धा येऊ लागला. 'म्हणजे माझी इथे काहीच किंमत नाहीये? मला आयुष्य असच काढावं लागेल काय? सासू म्हणेल उठ तर उठायचे, बस म्हंटले की बसायचे. माहेरची निंदा ऐकायची, हेच माझे जीवन असेल..' तिचं डोकं विचार करुन करुन दुखायला लागले. 'नाही, यातून मार्ग काढायला हवा. मी नाही राहू शकणार अशा वातावरणात. मी जाते आईकडे, मी माझ्याच घरी बरी...' तिने जणु या लग्नाचा शेवट करायचे ठरवूनच टाकले.

ती कुणालाही न सांगता एकाच शहरातल्या आपल्या माहेरी गेली. तिला असे अचानक आलेले बघून आई बाबा आज्जी अचंबित झालीत. "अगं कशी काय आलीस? जावई कुठाय? काय झाले? कशी आलीस?" आईने हबकून तिला विचारले.

"अगं बसू देते की नाही दोन मिनिट शांत.  एवढे काय तुम्ही सगळे घाबरलात. चेहरे बघा जरा तुमचे....माझच घर आहे ना हे? अचानक आले म्हणून एवढे काय हबकून जायचे?" त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव बघून जरा रागानेच रेवती बोलली. 'बबेऽ हे माझच घर ना? बाहेरुन आले की आई माझा किती लाड करायची आधी. आतातर मी सासरहून आले आहे...तर यांची ही प्रतिक्रिया...' ती मनातल्या मनात विचार करत होती. तिला कळेचना तिचे काय चुकले ते...

"अरे बाळा तसे काही नाही. ये ये तुझच घर आहे हे...तू कधीही येऊ शकतेस बाळा..." वडीलांनी तिला जवळ घेत म्हंटले. डोळ्यांनी इशारा करत त्यांनी आई आज्जीला शांत बसायला सांगितले. तिला चहा पाणी दिल्यावर आईने फ्रेश व्हायला सांगितले. ती तिच्या रुम मध्ये गेली. "अहो, जरा अतुलरावांना फोन लावा बरं...बोला त्यांच्या सोबत...."

आई रेवतीच्या पाठोपाठ तिच्या रुम मध्ये गेली. बाबा अतुलशी बोलले. अतुल तर आॅफीस मध्ये होता. ती घरातून निघून गेली आहे हे कुणाच्याही आता पर्यंत लक्षात आले नव्हते. मग बाबांनी रेवती माहेरी आल्याचे सांगितले तसे तो म्हणाला, "ठिक आहे तिकडे आली तर, तसेही लग्न झाल्यापासून तिकडे आलीच नव्हती ना ती..."
"मग असे करा, रात्री इकडेच जेवायला या...म्हणजे सोबतच तुम्हाला परत जाता येईल!" बाबांच ऐकून अतुलने येतो म्हणून सांगितले.

इकडे आज्जी आईने तिला गाठले. "तू घरच्यांना सांगून आलीस का?"
"हे बघा,  तुम्ही माझी उलट तपासणी घेतल्या सारखे का बोलताय? मी आल्याचे आवडले नाही तुम्हाला, हो ना? म्हणजे मी तुमच्यासाठी खरेच परकी झाले?" तिला आता रडू आवरेना. मग आज्जीने तिला कवेत घेतले. तिच्या पाठीवरुन प्रेमाने हात फिरवत तिला रडू दिले.

"घे रडून....झालं का रडूनं बोल काय झाले? सगळ सगळ सांग पटकन.." आज्जीचा हात पकडत तिने घरात मिळत असलेल्या वागणूकी बद्धल सगळ सगळ सांगीतलं मग म्हणाली. "मला आता त्या घरात राहायचे नाही. सासू तर टोमणे मारतेच पण काही चुकल्यास त्यांच्या सोबत नवराही बोलू लागतो. दीर शनिवारी रविवारी येतो पण सतत कागाळ्या करतो. बाकीच्यांचे काही नाही. पण, अतुलने तरी माझी बाजू घ्यायला हवी नां?"
"हो रे बाळा, ज्याच्या सोबत लग्न केलेस त्याने तर तुझी काळजी घ्यायलाच हवी. मला तर छान मुलगा वाटला होता. किती नम्रपणे बोलायचा संस्कारी वाटला होता अतुल..." आज्जी म्हणाली.
"हो आज्जी, तसा तो चांगलाच आहे गं त्याला किनई कुठल्याही गोष्टीच काहीच वाटत नाही. म्हणजे कुठे फिरायला म्हंटल की लगेच हो म्हणणार तेच आईला सांगितल्यावर जर आईने नाही म्हंटले तर, मग मात्र त्याचे विचार बदलतात...मला याच गोष्टीचा राग येतो. याला का स्वतःचं मत नाहीये का..."
"अच्छा असं आहे तर...बाकी चांगला आहे नां...प्रेमबीम करतो की नाही...की ते पण आईची परवानगी असल्यावरच...." आज्जी हसत म्हणाली. "आज्जी काही तरीच काय..तसा चांगलाच आहे गं..." तिच्या चेहर्‍यावरचे हास्य आज्जीला काही तरी सांगून गेले.
क्रमशः
११/०८/२४
०००
रेवती सासरी न सांगता माहेरी आली. आता पुढे काय होणार? वाचा पुढील भाग...

🎭 Series Post

View all