Login

सुटका : भयकथा भाग ३

A Haunted Story Of A Couple
तिचा विश्वास बसेना . ती एका शवागारात होती. त्या शवांसारखंच तिला एक ट्रॉली वर झोपवलं होता. तिच्या पायाचे अंगठे एकमेकांना बांधलेले होते. तिनं निकराचा प्रयत्न करून ते अंगठे सोडवले. तसं करताना उजवा हात खूप दुखला तिचा. दुर्गंधी तर कमालीची येत होती. आजूबाजूला असलेल्या त्या भयानक दिसणाऱ्या सुजलेल्या सडायच्या अवस्थेत आलेल्या प्रेतांचाच तो दुर्गंध होता. तिला कळेना आपण इथे आलो कसे? आई कुठे आहे? अभी कुठे आहे? सगळं काय चाललंय? तिला जोराचा हुंदका फुटला. थोडा रडून शांत झाल्यावर तिला जरा बरं वाटलं. आणि ती त्या ट्रॉली वरून खाली उतरली. फरशीचा गार स्पर्श तिच्या अनवाणी पायांना शहारवून गेला. तिच्या अंगावर प्रेतावर घालायचा निळा गाऊन होता. सैलसर. गारठून गेलेले दोन्ही हात तिने त्या गाऊन च्या खिशात घातले आणि एकच कळ तिच्या मस्तकात गेली. उजव्या हाताचं मनगट सुजल्यासारखं आणि काळसर दिसत होतं. तिला आठवलं. घरी अंधारात हाच हात कुणीतरी धरला होता. मग अभीचं काय झालं असेल? त्या घाणेरड्या स्पर्शानं अभीलाही इजा केली असेल का? ह्या विचारानेच तिच्या पायाला बळ आलं आणि अंधारात इकडेतिकडे पाहिल्यावर तिला शवागाराचं दार दिसलं.

तिने दारापाशी जाऊन दार उघडायचा प्रयत्न केला. पण तो असफल ठरला. मग तिने ते दार जोरात ठोठावलं. खूप हाकाही मारल्या. काहीही उत्तर आलं नाही. ती वेड्यासारखी दार बडवत राहिली. भिरभिरी शवागाराच्या फरशीवर पाय आपटत राहिली. तेवढ्यात तिला कोणीतरी उचललं आणि परत ट्रॉलीवर ठेवलं. अंधार वाढत चालला होता, तिच्या अंगावर कोणीतरी बसलं होतं. ती ओरडायचा प्रयत्न करत होती. हात पाय झाडून अंगावरचं ओझं ढकलायचा प्रयत्न करत होती. तिचे इतके हाल का चालले आहेत, तिला काहीच कळत नव्हतं. कोण तिला त्रास देतंय? हे सगळं तिच्या आकलनापालिकडचं होतं. अती श्रमाने तिने प्रतिकार करणं थांबवलं. जे कोणी होतं ते अमानवीय होतं हे नक्की. तिचा प्रतिकार थांबल्यावर जे कोणी होतं, ते त्रास द्यायचं थांबलं.

इकडे घरी मात्र हलकल्लोळ उडाला होता. अर्धी रात्र झाली होती. सायलीच्या आईचे रडून रडून डोळे सुजले होते. अभी पोलीस स्टेशनला गेला होता. पावसाने सगळीकडे थैमान घातलं होतं. सगळीकडे पाणी पाणी झालं होतं.

अभी पोलिसांना घडलेल्या घटना सांगत होता. एक हवालदार सगळी घटना लिहून घेत होता. तेवढयात इन्स्पेक्टर काळे तिथे आले. त्यांची खरं तर रात्री 12 वाजताची ड्यूटी होती. पण पावसाने त्यांना यायला उशीरच झाला होता. येतानाच ते वैतागून आले होते. आणि इतक्या रात्री कोणीतरी कम्प्लेंट घेऊन आलंय म्हटल्यावर त्यांची अजूनच चिडचिड झाली. सिरीयस काही असेल तर एवढ्या भयानक पावसात पुन्हा बाहेर पडावं लागलं असतं. पण विचारणं भाग होतं. घरातून बोलता बोलता एक मुलगी गायब झाली हे कळल्यावर मात्र त्यांना आश्चर्य वाटलं होतं. बाकी जुजबी चौकशी करून त्यांनी अभीला सांगितलं की," थोडी वाट बघा. माणूस गायब झाल्यापासून चोवीस तास उलटल्याशिवाय आम्ही तक्रार घेऊ शकत नाही"

ते ऐकून घाबरलेला अभी अजूनच हतबल झाला. पण त्याला त्यांचं ऐकण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. तो सायलीच्या घरी आला. तिच्या आईची त्याने कशीबशी समजूत घातली. आणि स्वतःच्या घरी गेला. झोपायचा निष्फळ प्रयत्न करत होता.

इकडे सायली थंडीने बेजार झाली होती. उजव्या हाताचं मनगट खूपच दुखत होतं. मानेतून देखील कळा येत होत्या. थोडा वेळ गेल्यावर थोडी शक्ती परत आल्यावर ती धाडस करून पुन्हा उतरली. हळूहळू तिने दार गाठलं. आणि परत परत हाक मारायला लागली. " कोणी आहे का? मला प्लीज इथून बाहेर काढा. मला परत जायचं आहे. मला सोडवा कोणीतरी. मला सोडवा. प्लीज मला जाऊ द्या? कोण त्रास देतंय मला? का त्रास देतंय? "

उत्तरादाखल तिच्या कानाशी कोणीतरी खिदीखिदी हसलं. ते हसणं भेसूर होतं. भयानक होतं. रक्ताचं पाणी करणारं होतं . कोणाचा तरी श्वास तिच्या मानेवर आला. तिच्या अंगावर सरसरून काटा आला. मनाचा हिय्या करून ती मागे वळली. कोणीच नव्हतं. तिने परत दार उघडायचा प्रयत्न चालूच ठेवला. तेवढयात ते दार बाहेरूनच उघडलं. अचानक बाहेरचा उजेड आत आल्यावर तिचे डोळे दिपले. चार माणसं तिच्याकडेच पाहत होती. त्यांच्या नजरेत मूर्तीमंत भीती होती. जोरात आरडा ओरडा करत ती माणसं पळत सुटली. ती चटकन बाहेर आली. तिच्या लक्षात आले की ती शवागारातून बाहेर आली होती. जिवंत. स्वतःच्या पायावर चालत. आणि त्यामुळेच ती माणसे तिला बहुधा भूत समजत होती. त्याही परिस्थितीत तिला हसू आले. सुटकेच्या आनंदात इकडे तिकडे बघत असताना तिला शवागार असलेल्या कॉरिडॉर चे दार दिसले. ती माणसे त्याच दिशेला पळाली होती. सावकाश पावले टाकत ती त्या दारातून बाहेर आली आणि समोरच तिला बायकांचे प्रसाधन गृह दिसले. ती आत गेली. तोंडावर पाणी मारायचे म्हणून बेसिनपाशी आली आणि समोरच्या आरशात स्वतःचे प्रतिबिंब बघून जोरात ओरडून परत बेशुद्ध झाली
क्रमशः

सायली का बेशुद्ध झाली? काय दिसलं तिला आरशात? तिला तिथे तशा अवस्थेत कोणी आणलं? का आणलं? ह्या सगळ्याची उत्तरं उद्याच्या भागात
0

🎭 Series Post

View all