रिकामी खुर्ची..
©अनुप्रिया
©अनुप्रिया
रिकामी जागा भरावी का
भरलेल्या जागेचं रिकामेपण..
आपणच शोधत रहायचं
आपल्या मधलं शहाणपण
@ प्रतिभा चौगुले
भरलेल्या जागेचं रिकामेपण..
आपणच शोधत रहायचं
आपल्या मधलं शहाणपण
@ प्रतिभा चौगुले
त्यादिवशी प्रतिभाताईंची चारोळी वाचली आणि फार गलबलून आलं. जणू सारं काही ढवळून निघालं. खरंच तिच्या जाण्याने रिकामी झालेली जागा भरता येईल? मला प्रश्न पडला.
असं म्हणतात, माणूस येताना एकटाच येतो आणि जातोही एकटाच. ज्याचा त्याचा एकट्याचा प्रवास.. येणारा प्रत्येकजण जाणार हे निश्चित हे जरी खरी असलं तरी आयुष्यात रिकाम्या झालेल्या काही जागा कधीच भरता येत नाहीत. गावी गेल्यावर ‘गुणाची गं माझी पोर’ असं म्हणत माईने (आजी) मायेने माझ्या गालावरून हात फिरवून घेतलेल्या अलाबाला, मीठमोहरीने काढलेली दृष्ट, तिने खास माझ्यासाठी बनवलेला गोडाचा शिरा, लहानपणी संध्याकाळी खेळून उशिरा आल्यामुळे आईने पाठीत धपाटा दिल्यावर तिचं प्रेमाने कुशीत घेणं काहीही विसरता येत नाही. २०१९ साली ती गेली आणि तिच्या जाण्याने गावी जाण्याची ओढही कमी झाली.
२०२३ साल हे माझ्या आयुष्यातलं सर्वांत दुर्दैवी वर्ष.. माझे पप्पा, माझी आई माझ्या आयुष्यातलं सोनेरी पान गळून पडलं. “पप्पा, किती टीव्ही सिरीयल पाहता? दिवसभर बसून कंटाळा येत नाही का तुम्हाला? थोडं बाहेर फिरायला जा, आपल्या शरीराची हालचाल झाली पाहिजे नं? कसं होणार पप्पा?” मीच माझ्या पप्पांना विचारलेले प्रश्न, त्यांची रिकामी खुर्ची मला खिजवते. खूप रडवते. आता कोणाला रागवू? या.. बसा इथे.. तुम्हाला हवा तितका वेळ तुमच्या आवडत्या सिरीयल्स पहा.. मी अजिबात रागवणार नाही. पण तुम्ही या ना पप्पा.. तुमची ती करारी नजर आठवली नं आजही चुकीचं काही करताना पाऊल अडखळतं.. भीतीने जीवाचा थरकाप होतो. तुम्ही लावलेली शिस्त, तुमच्यातलं हळवेपण, तुमच्याकडूनच माझ्यात आलेला प्रामाणिकपणा आजही तसाच जपून ठेवलाय.. तुम्ही पाहताय ना? किमान मला रागावण्यासाठी तरी या ना पप्पा..
“आई किती काम करशील? तू दमत कशी नाहीस? एक काम झालं की लगेच दुसरं काम हजर.. नको नं गं.. जरा दम खा.. विश्रांती घे.. ये बस इथे.. ” असं म्हणत तिला खुर्चीत बसवून तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपण्यातली मज्जाच वेगळी होती. तिच्या हाताने केसांना तेल लावून घेण्यात, डोकं मान चेपून घेण्याचं सुखच निराळं होतं. आता त्या सुखाला, मायेने पाठीवरून गोंजारणाऱ्या हातांना, आईच्या कुशीत शिरून रडण्याला मी फार फार मीस करतेय.
“गो बाय माजे.. किती चिडतेस! डोक्यावर बर्फ ठेव.. मुलीच्या जातीला इतका राग बरा नाही गं..’ तिचा आवाज आजही कानात घुमत राहतो. माझ्या हसण्यात रुसण्यात, माझ्या दिसण्यात, असण्यात माझ्या यशात, माझ्या अपयशात माझी आई कायम माझ्यातच होती. ‘दादा विनाकरण रागावला तुझ्यावर आई.. तूच लाडावून ठेवलंयस त्याला’ असं म्हटल्यावर ती हसून म्हणायची, “जाऊ दे गं.. आपलंच बाळ आहे नं? आपल्या बाळाचं बोलणं थोडीच इतकं मनावर घ्यायचं असतं? दुसऱ्या टेन्शनमध्ये असेल म्हणून रागावला असेल. आपणच समजून घ्यायचं. तुला आता नाही कळणार.. तू आई झालीस तेंव्हा समजेल तुला.” ते आईपण समजावून सांगण्यासाठी तरी ये ना आई!!
रिकाम्या झालेल्या त्या खुर्च्या मला त्यांच्या नसण्याची जाणीव करून देतात. आईने दिलेले संस्काराचे पदर जपताना प्रचंड दमछाक होतेय. माझ्या आयुष्यातली त्यांची उणीव कधीच भरून निघणार नाही. कधीच नाही..
©अनुप्रिया
©अनुप्रिया