Login

रिनोव्हेशन

Gosht don javanchi

गौतमी आणि विशाखा दोघी जावा- जावा अगदी सख्ख्या बहिणी सारख्या एकाच घरात राहत होत्या. कधी -कधी होणारे छोटे वाद -विवाद सोडले, तर दोघींचं एकमेकींच्या शिवाय पानही हलत नसे. दोघी एकमेकींशी नेहमीच चांगल्या वागत होत्या. तशीच त्यांची मुलेही वागत. त्यामुळे घरात शांतता होती, समाधान होते.

मध्यंतरी एका कार्यक्रमावेळी सासुबाईंकडून गौतमी समोर विशाखला बोलणे ऐकून घ्यावे लागले. त्यातून गैरसमज झाला आणि दोघींत मोठं भांडणं झालं. कोणीच माघार घ्यायला तयार होईना. सासुबाई मध्ये पडल्या पण, परिणामी गौतमी आणि विशाखा दोघी एकाच घरात वेगवेगळ्या राहू लागल्या.

आता दोघी एकमेकींचे तोंडही पाहात नव्हत्या. आधी घरात शांतता होती. पण आता काही ना काही धुसफूस चाले. त्यामुळे दोघींच्या नवऱ्यांनी आपापल्या बायकांना समजावून पाहिले, सासऱ्यांनी समजावले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही.
आता सासुबाई मात्र पुढे आल्या नाहीत, कारण हे सारे व्हायला कुठेतरी त्याच कारणीभूत होत्या. मग पुन्हा आता काही बोलायला जाऊन तिसरेच काही घडायला नको म्हणून सासऱ्यांनी त्यांना गप्पच राहायला सांगितले होते.

पण मध्येच गौतमी आणि विशाखाला एकमेकींच्या मुलांविषयी प्रेम दाटून येई. एकमेकींशी बोलायची इच्छा होई. पण इगो दुखावला असल्याने कोणी सीमारेषा ओलांडून पुढेही येईना.

इकडे गौतमी आणि विशाखाच्या अनुपस्थिती घरच्यांचा खूप विचार विनिमय झाला, 'या दोघींना एकत्र आणण्यासाठी काय करावे?'

मग गौतमी आणि विशाखाच्या सासऱ्यांनी घराचे रिनोव्हेशन करायला काढले. तसे घरही जुने झाले होतेच आणि त्या निमित्ताने दोघी जावा एकत्र येतील आणि पुन्हा पहिल्या सारखी शांतता घरात नांदेल म्हणून हा एक प्रयत्न होता.

आता घरातले सारे सामान दोन खोल्यात शिफ्ट केले गेले. एक खोली स्वयंपाकासाठी आणि दुसरी साऱ्यांना राहण्यासाठी. फार तर महिन्या दीड महिन्याचाच प्रश्न होता. नाईलाजाने का होईना गौतमी आणि विशाखा एकमेकींसोबत राहू लागल्या. दोघी मिळून स्वयंपाक करू लागल्या. पण मनात अजुनही धुसफूस होतीच.

एक दिवस सासुबाई म्हणाल्या "आपले स्वयंपाकघर तुम्हा दोघींच्या मर्जीप्रमाणे रिनोव्हेट करून घ्या. मी काही तिथे येत जात नाही, तुम्हाला हवं तसं सारं सजवून घ्या." तशी गौतमी आणि विशाखाची कळी खुलली आणि दोघी उत्साहाने कामाला लागल्या.
विशाखाने आपल्या आयडिया कामगारांना समजावल्या तर गौतमीने आपल्या. पण लवकरच कामगार वैतागले आणि 'एकमताने निर्णय घ्या' म्हणून अडून बसले.

तसे सासरे म्हणाले, "पूर्ण घरात स्वयंपाकघर एकच असेल, बाकी दोघी वेगवेगळ्या राहिलात तरी आमची हरकत नाही." 
मग पुन्हा नाक मुरडत नाईलाजाने दोघी एकत्र आल्या आणि स्वयंपाकघर कसे असावे याबाबत चर्चा करू लागल्या. भांडून, एकमेकींना समजावून घेत, छान कल्पना शोधून काढून अखेर स्वयंपाकघर कसे असावे हे ठरवण्यात दोघी यशस्वी झाल्या.

हळूहळू घर जसे रिनोव्हेट होत गेले, तसे गौतमी आणि विशाखाच्या स्वभावात बदल होत गेला. दोघी एकत्र आल्या. एकमेकींशी नीट वागू - बोलू लागल्या, पहिल्यापेक्षाही अधिक जवळ आल्या.
मनातला कडवटपणा जाऊन त्याची जागा मनमोकळ्या गप्पांनी घेतली आणि दोघींनी मिळून सारे घर कसे असावे याबाबत अनेक नवीन कल्पना शोधून काढल्या. त्यानुसार घर सजले.

दोन महिने पूर्ण झाले तसे घरचे काम संपले. समान -सुमान नीट लागल्यावर घरात छोटीशी पूजा पार पडली.

तसे सासरे म्हणाले, "आता तुम्ही वेगवेगळ्या राहू शकता. पण भांडण -तंटा अजिबात नको. घरात शांतता हवी. आमचे वय झाले आता. सहन होत नाहीत या गोष्टी आम्हाला."

तशा गौतमी आणि विशाखा एकसुरात म्हणाल्या, "आम्हाला वेगवेगळे नाही राहायचे बाबा. एकत्रच राहू आम्ही पहिल्याप्रमाणे."
हे ऐकून साऱ्यांनी समाधानाचा निःश्वास सोडला. मुलेही आनंदली.

पण सासरे गमतीने म्हणाले, "इतक्या वर्षात पहिल्यांदाच दोघींचे मोठे भांडण झाले त्यासाठी घराचे रिनोव्हेशन केले बरं.. आता इथून पुढे भांडलात तर, आपापल्या मनाचे रिनोव्हेशन आपल्या आपणच करायचे, काय?"

हे ऐकून सॉरी म्हणत हसत -हसत गौतमी आणि विशाखाने पुन्हा कधी वेगळे न राहण्याची शपथ घेत, एकमेकींना गच्च मिठी मारली.