Login

रीत की हव्यास भाग १

रीत की हव्यास भाग १
रीत की हव्यास

भाग १

"अहो साधना ताई, ऐकताय का ? हे जे तुम्ही संक्रांतीचं वाण पाठवलंय ना, ते बघून शेजारच्या कुलकर्णी काकू सुद्धा हसल्या !
अहो, आमच्या घराण्याची एक पत आहे, एक रीत आहे. अशा हलक्या प्रतीच्या साड्या आणि वाण पाठवून आमचं हसं का करताय ? "

पुण्यातील एका मध्यमवर्गीय वस्तीत राहणाऱ्या साधना ताईंच्या कानाला फोन घट्ट चिकटला होता. पलीकडून त्यांच्या विहिणीचा, म्हणजेच समिक्षाच्या सासूबाईंचा लता काकूंचा आवाज जणू बाणासारखा टोचत होता. साधना ताईंच्या डोळ्यांत पाणी आलं, पण त्यांनी स्वतःला सावरलं.

" लता ताई, तसं नाहीये गं ! यंदा समिक्षाच्या बाबांच्या ऑफिसमध्ये पगार वेळेवर झाला नाही आणि त्यात धाकट्या चिन्मयच्या कॉलेजची फी भरायची होती. तरीही आम्ही आमच्या परीने सगळ्यात चांगलं द्यायचा प्रयत्न केलाय." साधना ताई अतिशय काकुळतीला येऊन म्हणाल्या.

" ते काहीही असो साधना ताई ! जर मुलगी सुखात राहावी असं वाटत असेल, तर सासरच्या चाली रीती आणि आमचा मान-पान तुम्हाला जपावाच लागेल. पुढच्या वेळी असा हलगर्जीपणा चालणार नाही." असं म्हणून लता काकूंनी फोन कडाडून आपटला.

साधना ताई सुन्न होऊन खुर्चीत बसल्या. समिक्षाच्या लग्नाला दोन वर्ष झाली होती. समिक्षा दिसायला सुंदर, स्वभावाने समंजस आणि पदवीधर मुलगी. तिचे वडील बँकेत साधे क्लार्क. आपल्या तीन मुलांच्या शिक्षणासाठी आणि घर चालवण्यासाठी ते दिवसरात्र कष्ट करत होते. समिक्षा ही घरातली मोठी मुलगी, त्यामुळे तिचं लग्न मोठ्या थाटामाटात लावून दिलं होतं. पण तेव्हापासून सुरू झालेला हा रिती भातीचा सिलसिला थांबायला तयार नव्हता.

दुसरीकडे, समिक्षा हे सगळं आपल्या डोळ्यांनी बघत होती. तिने सासूबाईंना समजावण्याचा प्रयत्न केला,

" आई, माझ्या माहेरची परिस्थिती तुम्हाला माहित आहे. बाबा एकटे कमवणारे आहेत. प्रत्येक सणाला असं अवाढव्य वाण मागणं कितपत योग्य आहे ? "

लता काकू सोफ्यावर बसून आरामात सुपारी कातरत होत्या. त्यांनी समिक्षाकडे एक तुच्छ कटाक्ष टाकला आणि म्हणाल्या,

"अगं समिक्षा, तुला काय कळतंय त्यातलं ? हे आमचे खानदानी रिवाज आहेत. तुझ्या आई-वडिलांनी जर हे नियम पाळले नाहीत, तर उद्या समाजात आम्हाला विचारणार कोण ?
आणि तू आता या घरची सून आहेस, तेव्हा तुझं कर्तव्य आहे की तू सासरच्या बाजूने बोलावं, माहेरची ओढ आता कमी कर ! "

समिक्षाला खूप वाईट वाटलं. तिने आपला पती केतनशी बोलण्याचा प्रयत्न केला. केतन स्वभावाने चांगला होता, पण आईच्या विरोधात बोलायची त्याची हिंमत होत नसे. जेव्हा जेव्हा तो आईला काही सांगायला जाई, तेव्हा लता काकू घराची प्रतिष्ठा आणि मोठ्यांचा मान या नावाखाली त्याला गप्प करत असत.

" केतन, बघ ना, बाबांना कर्ज काढावं लागतंय या साड्या आणि दागिन्यांसाठी. आपण त्यांना सांगू शकत नाही का की आम्हाला हे काही नकोय ? " समिक्षा कळवळून म्हणाली.

केतनने तिचा हात हातात घेतला आणि हळूच म्हणाला,
" समिक्षा, मला समजतंय सगळं. पण आईचा स्वभाव तुला माहीत आहे. घरात उगाच कटकट नको म्हणून मी गप्प बसतो. तू काळजी नको करू, पुढच्या वेळी मी बघेन काहीतरी."

पण पुढची वेळ कधीच केतनच्या हातात नसे. काही दिवसातच समिक्षाच्या डोहाळे जेवणाचे वेध लागले. लता काकूंनी पुन्हा एकदा आपली यादी तयार केली.

" साधना ताई, बघा !  समिक्षाचं डोहाळे जेवण आहे. पहिल्या बाळंतपणाची रीत तर तुम्हाला माहीतच आहे. ओटी भरायला चांदीचं ताट, वाटी आणि बाळकृष्ण हवाच. शिवाय माझ्या नात्यातल्या पाच सुवासिनींना पैठणी साड्या द्याव्या लागतील. हे बघा, आमचा मान तुमच्या हातात आहे ! " लता काकूंनी फोनवर पुन्हा एकदा आपली मागणी स्पष्ट केली.

साधना ताईंना आता दरदरून घाम सुटला होता. चांदीचं ताट आणि पाच पैठणी साड्या! एवढा पैसा आणायचा कुठून ? त्यांनी समिक्षाच्या बाबांशी चर्चा केली. ते बिचारे फक्त दीर्घ श्वास सोडून म्हणाले,

" साधना, लेकीचं घर आहे. तिचं संसार सुखाचा व्हावा यासाठी मिठाचा खडा पडायला नको. मी पी एफ  मधून काही पैसे काढतो, पण समिक्षाच्या सासूबाईंना नाराज करू नकोस."

डोहाळे जेवणाचा कार्यक्रम झाला. साधना ताईंनी आपल्या ऐपती बाहेर जाऊन सगळं केलं. पण जाताना लता काकूंनी सगळ्यांसमोर टोमणा मारलाच,

" हं... केलंत खरं सगळं, पण त्या साड्यांचा रंग जरा उडालेला वाटतोय. असो, आता बाळ झाल्यावर मात्र कसर सोडू नका ! "

समिक्षाच्या डोळ्यातून पाणी आलं. तिला कळत होतं की तिची सासू रिती भातीच्या नावाखाली फक्त आपला हव्यास पूर्ण करत आहे. पण तिला हे माहीत नव्हतं की नियतीचा न्याय खूप वेगळा असतो.