Login

रीती ओंजळ भाग 1

एका त्यागाची प्रेम कथा.
"किती प्रेम करतेस गं माझ्यावर? "
शिव ने तेजल च्या डोळ्यात बघत विचारले.
"प्रेम असं मोजून सांगता येतं का रे? ते अमर्याद असतं." तेजल
उत्तरली. कितीतरी वेळापासून हे दोन प्रेमी जीव तळ्याच्या काठावर बसून भविष्याचे स्वप्न रंगवत होते.


माणिक ज्वेलर्स च्या मालकाची, म्हणजेच सिद्धेश पटवर्धनांची एकुलती एक मुलगी म्हणजे तेजल. ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला होती. शिवांश त्यांच्याकडे काम करणाऱ्या मुनीमांचा म्हणजे गिरीश रावांचा मुलगा. तीन मुलींच्या पाठीवर झालेला. एम ए चा प्रथम वर्षामध्ये शिकत होता. त्याला प्राध्यापक व्हायचं होतं. संत साहित्याचा अभ्यास करायचा होता.
बीए च्या द्वितीय वर्षाला शिकत असताना त्याची आणि तेजल ची ओळख झाली. त्या दिवशी शिव चा मित्र दीपकच्या बहिणीचा वाढदिवस होता. त्या पार्टीमध्ये तेजल सुद्धा आली होती. शिवने तेजल ला पाहिलं आणि तो तिच्या प्रेमातच पडला. तेजललाही शिव बघूनच आवडला होता. दोघेही एकाच कॉलेजमध्ये आहेत म्हटल्यावर पुढे भेटीगाठी होत राहिल्या. मराठी साहित्य हा दोघांचाही आवडता विषय. तासंतास ती दोघं चर्चा करत बसत.
"शिव तुझ्या घरी कोण कोण असतं रे? "
तेजल ने उत्सुकतेने विचारलं.
"आई बाबा आणि मी. तीन मोठ्या बहिणी आहेत त्यांचे लग्न झालेत."
" तुझ्या घरी कोण कोण असतं? "
"मी आणि बाबाच. माझी आई मला जन्म देताच देवा घरी गेली. बाबांना आमच्या दोघांमध्ये सावत्र हा शब्द नको होता म्हणून त्याने दुसरे लग्न करायला नकार दिला. तेव्हापासून माझी आई आणि बाबा दोन्ही भूमिका त्याने पार पाडल्या. "
"तू तुझ्या बाबांना अरे तुरे करतेस? "
"हो. बाबांनी लहानपणापासून तसेच शिकवलं. तो माझा बाबा कमी आणि मित्र जास्त आहे."
"काय करतात ग तुझे बाबा?"
"अरे, माणिक ज्वेलर्स नाव ऐकलेस ना. ते आमचं शॉप आहे बरं का?"
हे ऐकून शिव शांत झाला. आपले बाबा तिच्या वडिलांकडे नोकर म्हणून काम करतात ही गोष्ट सांगावी की नाही या संभ्रमात पडला.
आणि शेवटी त्याने ही गोष्ट सांगायची टाळली.
बघता बघता दोन वर्ष झाली.पण दोघांनीही एकमेकांना प्रेमाची कबुली दिली नव्हती. त्यांचे एकमेकांवरील प्रेम सगळ्या कॉलेजला दिसत होतं पण तरीही त्यांनी एकमेकांना ते सांगितलं नव्हतं.
बीए चा रिझल्ट लागला आणि 97% घेऊन शिव विद्यापीठातून प्रथम आला.
त्यादिवशी तो तेजल ला घेऊन सिंहगडावर गेला. सिंहगडाच्या पायथ्याशी शिवने तेजल ला प्रेमाची कबुली दिली. क्षणाचा विलंब न लावता लगेच शिवला होकार देऊन टाकला. त्यादिवशी वाऱ्याचे पंख लावून दोघेही फिरत होते. संध्याकाळी निवांत सूर्यास्त पहात बसल्यावर शिवने तेजल ला विचारले,
"तेजल तुझे बाबा माझ्यासारख्या सामान्य मुलाशी तुझं लग्न लावून देतील का? "
"माझ्या बाबाला कर्तबगार जावई हवा आहे, श्रीमंत नव्हे." तेजल ने नेहमीप्रमाणे हसत उत्तर दिलं.
आणि शिवच्या मनावरील बोज थोड्या प्रमाणात का होईना उतरला.
तेजल बीए च्या शेवटच्या वर्षाला होती. तर शिवने मराठी विषयामध्ये एम ए करायचं ठरवलं. प्रेमाची कबुली दिल्यापासून दोघांसाठीही ते सोनेरी दिवस होते. कॉलेजच्या पाठीमागे असलेल्या तळ्याकाठी बसून दोघेही तासंतास गप्पा मारायचे.
भविष्याची स्वप्न रंगवायचे.
लवकरच दिवाळीच्या सुट्ट्या लागणार होत्या. दहा पंधरा दिवस भेटता येणार नाही म्हणून दोघांनी लॉंग ड्राईव्ह ला जायचं ठरवलं. सगळीकडे छान धुकं पसरलं होतं. झेंडूच्या फुलांचा पाठवा रस्त्याच्या दुतर्फा होता. शिवने गाडी लोणावळ्याकडे वळवली. छान गाणं गुणगुणत दोघेही आनंद घेत होते. एका ठिकाणी आईस्क्रीम खाऊन दोघेही परत यायला निघाले. बेधुंद वातावरणात एका वळणावर अचानक शिव ची गाडी स्लिप झाली आणि दोघेही खाली पडले. दगडावर डोके आपटल्याने तेजलच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. गाडी हळू असल्यामुळे आणि बऱ्यापैकी बॅलन्स साधल्यामुळे शिवला थोडाफार खरचटलं होतं. तेजलच्या डोक्याला मार लागल्यामुळे तो खूप घाबरला. त्याने पटकन तिला उचलून घेतलं. रस्त्यावर येऊन तो गाड्यांना थांबवू लागला. कशीबशी एक गाडी थांबली. त्यात टाकून शिव तिला हॉस्पिटलला घेऊन गेला. जखम जास्त खोल नव्हती त्यामुळे डॉक्टरांनी दोन टाके टाकून पट्टी बांधून दिली. तेजलच्या डोक्यातून येणारे रक्त बघून शिव खूप घाबरला होता. पण डॉक्टरांनी ती ठीक आहे असं सांगितल्यावर त्याच्या जीवात जीव आला. डॉक्टर जाताच तेजलला मिठी मारून त्याने स्वतःच्या अश्रूंना वाट करून दिली. तेजलला हसायलाच आलं.
"अरे वेड्या मी ठीक आहे. असं रडतोयस जसं काय मला काही झालंय."
"गप्प बस!" शिव तिच्यावर जोरात ओरडला. "तुला जर काही झालं तर मी जगू नाही शकणार." असं म्हणून त्याने तेजल ला पुन्हा मिठी मारली आणि तिच्याही मनाचा बांध फुटला.
काय असेल शिवतेजा च्या प्रेमाचं भविष्य? बघूया पुढच्या भागात.

🎭 Series Post

View all