" अहो आई, आशुची व्हॅन पाच मिनिटात खाली येईल.. तुम्ही उठलात कि नाही माहिती नव्हते.. म्हणून त्याला फक्त दूध गरम करून देणार होते.."
" हॅ.. म्हणे मी उठले ते माहित नव्हते.. कधीतरी पाच मिनिटे होतात इकडे तिकडे, म्हणून तू काय लगेच स्वयंपाकघरात जाशील का?"
" आई, तू राहू दे.. मी पटकन थंड दूध पिऊन जातो.. " छोटा आशुतोष समजूतदारपणे म्हणाला..
" अरे थांब, मी गरम करते," असे वासंतीताई म्हणेपर्यंत त्याने दूध घेतले.. ते थंड दूध आवडत नसताना डोळे मिटून एका मिनिटात पिऊन टाकले.. त्याला तसे दूध पिताना पाहून क्षिप्राला वाईट वाटत होते..
" आई, उद्यापासून मीच माझे दूध घेत जाईन.. चार दिवसांची तर गोष्ट आहे. आजी चालेल ना?"
" हो रे, तुझा हा समजूतदारपणा तुझ्या आईमध्ये असता तर?"
वासंतीताई स्वयंपाकघरात गेल्या.. क्षिप्रा आणि आशुतोष खाली उतरले.. समोरून व्हॅन येतच होती.. क्षिप्राने आशुच्या हातात पैसे ठेवले. "मधल्या सुट्टीत काहीतरी नक्की खा.."
आशुतोषने मान हलवली आणि तो व्हॅनमध्ये जाऊन बसला.. क्षिप्रा घरी आली..
भास्करराव आणि वासंतीताई यांचा एकुलता एक मुलगा अश्विन आणि त्याची बायको क्षिप्रा.. त्यांचा मुलगा आशुतोष हि आहेत या कथेतील पात्रे.. यांचे घर आहे बरेचसे कर्मठ.. पण ते त्यांच्या सोयीनुसार बदलणारे.. म्हणजे पाळी आली असेल तर देवपूजा होईपर्यंत क्षिप्राने स्वयंपाकघरात कशालाही स्पर्श करायचा नाही.. पण त्यानंतर केला तर चालेल.. घरात काही ठराविक दिवशी कांदालसूण वापरायचा नाही पण त्या दिवशी अश्विन पार्टी करून आला तरी चालेल.. त्यावर तिला हेही ऐकवले जाई कि आमच्या मूळ घरी तर याहीपेक्षा कडक नियम आहेत.. भास्करराव तर वेगळेच रसायन. निवृत्त झाल्यामुळे पूजेची जबाबदारी त्यांनी घेतली होती. पूजा चालू असताना जराही आवाज झालेला त्यांना चालायचा नाही.. पण त्यावेळेस जर त्यांच्या कोणाचा फोन आला कि ते पूजा सोडून त्या व्यक्तीशी बोलायचे.. कारण तयार असायचे. त्याचे फार महत्त्वाचे काम होते. बिचारी क्षिप्रा आधीच मृदू स्वभावाची. कोणाला उलटून बोलायची सवय नाही. त्यामुळे हे सगळे ऐकून घ्यायची. दोघांचेही ठरवून झालेले लग्न असले तरिही क्षिप्राच्या घरी मोकळे वातावरण होते.. हे सगळे विचित्र नियम तिने पाहिलेच नव्हते.. हे सगळे तिने आईला सांगितल्यावर आईचे म्हणणे, "हे बघ, काही लोकांचा स्वभाव असतो तसा.. थोडेसे समजून घे.." पण समजून घेणार कोणाला?
वासंतीताई घेतील का क्षिप्राला समजून? बघू पुढील भागात. तोपर्यंत कथेचा हा भाग कसा वाटला नक्कीच सांगा..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा