रिटर्न गिफ्ट!
भाग - २
भाग - २
मनात माजलेली खळबळ थांबेना म्हणून थोडावेळ निजायला म्हणून तिने बेडवर अंग टाकले आणि त्याच वेळी तिचे लक्ष सकाळी अमेयने दिलेल्या ग्रीटिंगकडे गेले.
‘..अक्षर तुझी असली तरी मम्मासाठी लिहिलंय ना.’ ती सकाळी च त्याला म्हणाली होती आणि तिला आठवलं असेच तर काहीसे तिच्यासाठीही कुणी म्हटलं होतं, थोडाश्या वेगळ्या अंदाजात.
‘माझे अक्षर नीट वाचता येत नसले, तरी भावना मात्र तुला नक्कीच कळतील, हे मला ठाऊक आहे. म्हणून तर हा लेख लेखप्रपंच..’
अगदी हेच. हेच लिहिले होते तिने. तिची आई वैजयंती. तिच्या सोळाव्या वाढदिवसाला दिलेल्या भेटवस्तू पैकी ही मोलाची भेट.
डोळे पुसून श्राव्या उठली आणि तिने एक कपाटातून एक जुनी फाईल काढली. अनेक आठवणी, तिचे शाळा, कॉलेजातील सर्टिफिकेट्स आणि पेपरची जुनी कात्रण.. असा कितीतरी ऐवज त्या फाईलमध्ये जपून ठेवला होता आणि तिथेच शेवटच्या पानावर तळाशी एक पाकीट होते. तिने ते पाकीट छातीशी लावले आणि मग अगदी हळूवारपणे त्यातील ते दोनपानी पत्र बाहेर काढले.
‘प्रिय श्राव्या..’
पत्राच्या सुरुवातीलाच आईचे सुवाच्च अक्षरं बघून तिला अगदी गलबलून आले. तिचा आणि वैजयंतीचा वाढदिवस योगायोगाने एकाच दिवशी असायचा. त्यामुळे आईची ती विशेष लाडाची होती त्यातल्या त्यात एकुलती एक म्हणून आणखीनच लाडोबा झालेली. लहान असताना आई तिला स्वतःचे बर्थडे गिफ्ट म्हणून मिरवायची. देवाने माझ्या वाढदिवसाला खास भेट दिलीय हे आवर्जून तिच्या वाढदिवशी ऐकवायची.
कित्येकजण दोघींना कार्बन कॉपी म्हणायचे तेव्हा वैजयंतीचा ऊर समाधानाने भरून यायचा मात्र जसजशी श्राव्या मोठी होऊ लागली, तिला लोकांचे बोलणे आवडेनासे झाले.
“आई, मी तुझ्यापेक्षा वेगळी आहे ना गं? मग आपण सारख्या दिसतो असं कोणी म्हटलेलं मला नाही आवडत. मी तुझ्यापेक्षा थोडी उंच आहे, माझ रंगही जास्त उजळ आहे मग तरी लोकं असं का म्हणतात?”
सोळाव्यात पदार्पण करत असलेल्या तिने काहीसे चिडून विचारले होते आणि तेव्हाच तिच्यासाठी काही लिहावे असे वैजयंतीला वाटून गेले होते.
‘प्रिय श्राव्या,
आजच्या या टेक्नोसावी युगात तुला मी हे पत्र लिहितेय म्हणून हसू नकोस हं. असे पत्र लिहिणारी आमची पिढी बहुदा शेवटची पिढी असावी. तेही लहान असताना लिहिलेली पत्र. आता मोबाईल नि व्हाट्सअपच्या जमान्यात कोण पत्र लिहीत बसेल? पण मी लिहितेय खरी. मुद्दामच. माझे अक्षर वाचताना कधी तुला नीट कळले नाही तरी भावना मात्र नक्की कळतील ही खात्री आहे. पत्रातून भावना डायरेक्ट हृदयापर्यंत पोहचतात असं म्हणतात. तुला हे आत्ता उमागणार नाही पण मोठी झालीस की नक्की उमगेल.
तुला सांगू? जेव्हा कुणी तुला माझं प्रतिबिंब म्हणतं ना तेव्हा मूठभर मांस चढतं माझ्या अंगात. वाटतं खरंच मी तुझ्याइतकी देखणी असेल का? आणि माझं मलाच हसू येतं. पण तुझ्या आवडीनिवडी, बोलण्याची पद्धत, तुझा स्वभाव बघता मलाही खात्री पटू लागते की तू माझीच प्रतिकृती आहेस. आजवर या साऱ्याचा फार आनंद वाटायचा; पण आता वाटतंय नको, तू माझी प्रतिकृती म्हणून नाही तर स्वतःच एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून जग, तशी घड.
मी फार वेंधळी आहे गं. तू सोर्टेड हो. मी लगेच इमोशनल होऊन जाते आणि कुठला निर्णय देखील तसाच घेते. तू मात्र प्रॅक्टिकली जगायला शिक. इमोशनल माणूस प्रचंड दुखावतो गं आणि तू दुखावलेलं मला नाही बघवणार. खूप मोठी हो, उंच उंच उड. तुझ्यावर मी कधीच कुठल्याच अपेक्षा नाही लादणार. तुझ्या स्वप्नांना भरारी घ्यायला शिकवताना दिशा नाही दाखवणार. कारण तू मला तुझं स्वतंत्र व्यक्तिमत्व घडवल्याच बघायचं आहे..’
आणखी बरंच काही त्या पत्रात लिहिले होते. सोळाव्या वाढदिवसाला भेटवस्तू म्हणून लाल रंगाच्या सॅटिनच्या रिबीनीने बांधलेले ते पत्राचे पाकीट जेव्हा तिला तिच्या उशाशी दिसले तेव्हा खरं तर तिला हसूच आले होते. वाटलं होतं हे सर्व लिहिण्यापेक्षा बोलून दाखवलेलंही चाललं असतं.
“माझं रिटर्न गिफ्ट?” सकाळी तिच्या गालावर पापी देत वैजयंतीने तिच्यासमोर हात केला तेव्हा हसून तिने तिच्या गालाची पापी घेतली.
“तू लिहिलेस तसं बनण्याचा प्रयत्न करेन म्हणजे पुन्हा कुणी मला तुझी झेरॉक्स कॉपी म्हणणार नाहीत.” असं म्हणून तिने वैजयंतीच्या हातात हात ठेवला.
आज ते सगळं आठवून श्राव्याचे डोळे पाणावले होते. आईने दिलेली ती अनमोल भेटवस्तू शेवटची ठरेल असे तिने कधी स्वप्नात देखील विचार केला नव्हता. महिन्याभरात कसल्याश्या आजाराने अचानकपणे वैजयंतीची एक्झिट झाली. लाडाने वाढलेली श्राव्या तिच्याशिवाय नुसती सैरभैर झाली. बाबा सोबतीला होते म्हणून कशीबशी सावरली ती; पण मनातून खचली होती. तरी जिद्दीने समोर जात राहिली.
आयुष्य पुढे चालू लागले होते. ती कॉलेजला पोहचली. सगळीकडे स्वतःचा ठसा उमटवू लागली आणि अश्यात तिला तो भेटला.. राघव.. राघवेंद्र!
ऑफिसमध्ये तिचा प्रोजेक्ट पार्टनर असणारा तो लाईफ पार्टनर म्हणून आयुष्यात केव्हा आला कळलेच नाही. त्याच्या सोबतची प्रत्येक सकाळ आणि रात्र आनंदात जाऊ लागली. सुख म्हणजे आणखी काय असे वाटत असताना मात्र दुधात मिठाचा खडा पडावा असे घडू लागले.
तिची हुशारी, तिला मिळणारे प्रमोशन बघून कलीग म्हणून साथ देणारा राघव नवरा म्हणून तिच्या पासून दूर जाऊ लागला.
“श्राव्या मला घटस्फोट हवा आहे.” एक दिवस थंडपणे बोलत त्याने घटस्फोटाची कागदे तिच्या हातात ठेवली.
“राघव..”
“तुझे हे यश मला नाही झेपत गं. कायम मी कमी असल्याची भावना मनात डोकावते. माझं तुझ्यावर प्रेम आहे; पण मला तुझ्यासोबत नाही राहता येणार.” तो त्याच्या निर्णयावर ठाम होता.
“राघव, अमेय तीन वर्षांचा आहे रे फक्त. मला आणि त्याला सोडून जायचं तुझ्या मनात तरी कसं आलं?” ती रडायला लागली होती.
“श्राव्या, तू खंबीर आहेस. तुला प्रॅक्टिकली वागता येतं. तूच विचार कर ना. उद्या अमु मोठा होईल आणि त्याच्या समोर आपले वाद होतील तर त्याच्या मनावर काय परिणाम होईल?”
“आणि त्याचा डॅडा सोबत नाही याचा काय परिणाम होईल याचा कधी विचार केलंस तू?”
“त्या परिणामापेक्षा हा परिणाम वाईट नसेल गं. तू त्याला नीट सांभाळशील, माझी कमी भासू देणार नाहीस याची खात्री आहे मला.
“राघव, तुझं कुठे अफेअर तर नाही ना? तिने भीतभीत मनातील शंका विचारले.
तिच्या मनातील शंका खरी असेल का? वाचा पुढील अंतिम भागात.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा