Login

रिटर्न गिफ्ट. भाग -३(अंतिम भाग.)

कथा एका रिटर्न गिफ्टची
रिटर्न गिफ्ट.
भाग -३ (अंतिम भाग.)


“आणि त्याचा डॅडा सोबत नाही याचा काय परिणाम होईल याचा कधी विचार केलंस तू?”


“त्या परिणामापेक्षा हा परिणाम वाईट नसेल गं. तू त्याला नीट सांभाळशील, माझी कमी भासू देणार नाहीस याची खात्री आहे मला.


“राघव, तुझं कुठे अफेअर तर नाही ना? तिने भीतभीत मनातील शंका विचारले.


“श्राव्या, तुझ्याशिवाय मी दुसऱ्या मुलीचा कधी विचारही करू शकत नाही. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकणार पण तुझ्याबरोबरही नाही गं राहू शकत.”


“ठीक आहे. तू जर स्वतःच्या निर्णयावर ठाम असशील तर मग मीच इथून निघून जाते. तुझं घर, तुझं ऑफिस आणि तुझं आयुष्य..यापुढे मी कधीच त्यात नसेल.” त्याच्या हातातील कागदाकडे ढुंकूनही न पाहता स्वतःचे सामान घेऊन ती त्याच वेळी अमेयसह तिथून बाहेर पडली.


काही दिवस बाबाकडे राहिल्यावर ती भाड्याच्या नव्या घरात शिफ्ट झाली. नवे ऑफिस, नवे घर, अमेयला सांभाळून सारे करणे म्हणजे तारेवरची कसरतच होती. दिवसा त्याला डे केअरमध्ये ठेऊन ती कामाला जायची; पण रात्री क्षणभरही ती त्याला एकटं सोडत नव्हती आणि तरीही कित्येकदा डॅडा हवाय म्हणून त्याच्या डोळ्यात पाणी असायचे.


“आई, अमुची तगमग बघवत नाही गं. त्याला राघव हवा आहे पण मी काय करू? तो म्हणाला म्हणून मी तिथून निघून आले ना. प्रॅक्टिकली वागायचं म्हणून नव्हे तर त्यावेळी तो मला योग्य निर्णय वाटला म्हणून मी ते घर सोडले. बाबा कित्येक वेळा म्हणाले की ते राघवशी बोलतील पण मीच त्यांना नाही बोलू दिले. कुणाच्या सांगण्यावरून तो मला आयुष्यात नकोय गं.


आमचं घर, आमचं बाळ.. आम्ही दोघांनी मिळून सारं प्लॅन केलं होतं. तेव्हा त्याला माझी हुशारी खटकत नव्हती मग आताच का गं त्याला सहन झालं नाही. नवऱ्यापेक्षा बायकोच्या हाती जास्त पैसा आल्याने नवऱ्याचा इगो का दुखावतो? तू म्हणालीस तसे मी स्वप्न पाहिले, उंच उंच उडले पण अमुकडे पहिल्यावर वाटतं माझ्यामुळे त्याच्यावर अन्याय होतोय. काय करू मी? सगळं सोडून देऊन अमुसाठी राघवकडे परत जाऊ का? माझं मन प्रॅक्टिकल वागण्यापेक्षा इमोशनल वागण्याकडे का झुकतेय गं? लेकासाठी ही तडजोड करायला हवी का? नाहीतर आयुष्यभर त्याचा डॅडा त्याच्यापासून दुरावला ही सल मनात बोचत राहील गं आणि कुठेतरी मलाही तो हवाय गं.” तिचे अश्रू अनावर झाले.

‘टिंग टॉंगऽऽ’

आवंढा गिळून डोळे पुसत असताना डोअरबेलचा आवाज झाला तसे ती उठली बेडवरची फाईल तशीच घाईने कपाटात ठेवत तिने मुख्य दरवाजा उघडला.


“हॅपी बर्थडे बेटा.” दारात बाबा उभे होते.


“बाबा.” तिने आवेगाने त्यांना मिठी मारली.


“माझे बड्डे गिफ्ट?” आवेग ओसरल्यावर तिने लहानपणीसारखे त्यांच्यासमोर हात पसरले.बड्डे गिफ्ट आणलेय की; पण त्याआधी तुला डोळे मिटावे लागतील.” आत येत त्यांनी तिला हसून म्हटले.


“आता डोळे उघड बघू.” तिच्या हातात भेटवस्तू म्हणून एक ओळखीचा स्पर्श जाणवला.


“बाबा..”


“श्राव्या, या वाढदिवसाला भेट म्हणून मी राघवला तुझ्यासाठी घेऊन आलोय.” त्यांचे डोळे पाणावले होते.


“बाबा याच्याकडे जायचं नाही म्हणून मी तुम्हाला शपथ घातली होती ना?” हातातील राघवचा हात झिडकारण्याचा प्रयत्न करत ती म्हणाली.


“ते माझ्याकडे नव्हेत तर मीच त्यांच्याकडे गेलो होतो.” तिचा हात दाबून धरत राघव बोलू लागला.


“आय एम सॉरी श्राव्या. रिअली सॉरी. कुपमंडूक वृत्तीचा झालो होतो गं मी. पण या दोन वर्षात कळलंय की मी तुम्हा दोघांशिवाय नाही राहू शकत. मी तुम्हाला न्यायला आलोय.” त्याचे डोळे पाण्याने भरले होते.


“म्हणजे तुला वाटेल तेव्हा आम्ही तुझ्या आयुष्यात नको आणि वाटेल तेव्हा हवे म्हणायला हा काय खेळ वाटला का?” ती चांगलीच पेटली होती.


“श्राव्या एकदा त्याची बाजू समजून तर घे.या दोन वर्षात मेहनत करून त्याने उच्च पोजिशन गाठली;पण आता त?सारं काही सोडून तो तुझ्याकडे परत आलाय. त्याला तुझ्या हुशारीबद्दल कसलीच ईर्षा उरली नाहीये.”


“पण पुढे जाऊन होईल की.”


“नाही होणार. मी ठरवलंय की आता संपूर्ण आयुष्य मी अमेयसोबत घरी असणार, त्याला सांभाळणार. बाबा, मी आणि तो तिघेजण एकत्र मस्त्या करणार, दंगा करणार, घर आवरणार त्याच्यासाठी नवनव्या रेसिपीज बनवणार. एकंदरीत अमुचा लाडका डॅडा आणि एक आदर्श हाऊस हजबंड होऊन दाखवणार.” राघव.


“म्हणजे?”


“म्हणजे मी निर्णय घेतलाय श्राव्या की तू बाहेरची आघाडी सांभाळायची आणि मी घरची.”


“राघव..”


“आता नाही म्हणू नकोस ना. मनात असताना हा निर्णय अमलात आणायला मला दोन वर्ष लागली. तुला कसं सांगावं हे मला कळेना म्हणून शेवटी बाबांकडे गेलो तर त्यांनी मला तुझ्या बर्थडेला हे गिफ्ट द्यायचं सुचवलं. आवडलं ना तुला?”

तो भावनिक होत म्हणाला तसे ती रडतच त्याच्या मिठीत शिरली.


“ए, रडू नकोस ना. लवकर आवर आपल्याला जायचे आहे.”


“कुठे?” तिच्या ओठातून मुश्किलीने शब्द बाहेर पडले.


“आपल्या बछड्याला रिटर्न गिफ्ट द्यायला.” तो हसत म्हणाला तसे ती त्याला अधिक बिलगली.


“हॅपी बर्थडे वैजू.. मला माहितीये तुलाही आपल्या नातवाला मिळालेले रिटर्न गिफ्ट नक्की आवडले असेल हो ना?”

श्राव्या अमेयच्या रिटर्न गिफ्टसह त्याला आणायला गेली होती आणि इकडे बेडवर दिसलेले श्राव्यासाठी वैजयंतीने लिहिलेले पत्र वाचताना तिच्या अस्तित्वाची जाणीव झाल्यागत पत्रावर ओठ टेकवत बाबा बोलत होते.

-समाप्त.
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)