#बर्फाच्या_अस्तराखालची_ नदी
“कट्.... काट् .... कडाम” आवाज आला.. तशी त्याची इतका वेळ लागलेली तंद्री भंगली..
जोराचा वारा सुटलेला.. बराच वेळ विश्रांती घेऊन पुन्हा बर्फ पडायला लागला.. तशी इतका वेळ तग धरून असलेली ती वठलेल्या झाडाची वाळकी फांदी तुटून पडली!.. “ झाडापासून तुटून वेगळं होताना त्रास झाला असेल का तिला?.. म्हणूनच येत असेल का.. तिच्या आतला आवाज?”.. त्याच्या मनात असंबद्ध असे काहीसे विचार तरळले..
झाड मात्र अजूनही तसंच उभं होतं.. तितक्याच दिमाखात!.. गोठलेल्या नदीच्या काठाशी !.. गोठलेल्या नदीच्या साक्षीने!.. त्यांच्या आजूबाजूला पसरलेले गोल-गोल दगड.. आणि या सगळ्यांना झाकणारं एकसंध बर्फाचं आवरण!!... भुरभुरणाऱ्या बर्फाची काय ती हालचाल.. नाहीतर अगदीच स्थिर आणि स्तब्ध जग!..
अगदी अंगावर येणारं!.. "जानेवारी महिना म्हणजे मरण!.. आपल्या गावी यावेळी अगदी गुलाबी थंडी असते… आईच्या हातची गरम गरम भाकरी… त्यावर घरच्या लोण्याचा गोळा!... आणि भरलं वांगं!!" त्याच्या मनातल्या विचारांना पोटातून ओरडून कावळे जणू साथ देत होते… रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती.. एकीकडे गस्त घालता घालता मनात विचार चालू होते…
त्याने मनगटावर च्या घड्याळाकडे पाहिलं… शेवटचा अर्धा तास शिल्लक होता… आजची ड्यूटी ची वेळ त्याला फार आवडत असे.. आता जेवायला परत गेल्यावर त्याला घरी वेळेत फोन करून बोलता येणार होते…
त्याने डोळे मिटून एक मोठा श्वास घेतला आणि पुन्हा सतर्क होऊन गस्त घालू लागला…
आता त्याचे चहूबाजूला व्यवस्थित लक्ष होते…
पलीकडच्या पोस्टवरून शिट्टीचा आवाज आला त्या आवाजाला त्याने शिट्टी वाजवून प्रत्युत्तर दिले…त्याच्या शिट्टीच्या आवाजाला त्याच्या पुढच्या पोस्टवरून तसाच शिट्टी चा आवाज आला… आणि मग काही वेळ असेच आवाज येत राहिले…
" थंडीमध्ये घुसखोरी कमी होते म्हणतात… !" तो कुत्सितपणे हसत स्वतःशीच म्हणाला… इथे रोज काही ना काही चालू आहे!..." मनातल्या विचारांसोबत त्याच्या डोक्यात परवाच्या एन्काऊंटरच्या स्मृती जाग्या झाल्या!...
ते छोटंसं घर… रात्रीची वेळ… बऱ्याच दिवसापासून ज्यांना पकडण्यासाठी प्रयत्न चालू होते ते ' आतंकवादी ' घराच्या आत अडकून पडलेले… चार तास सापळा लाऊन बसले होते हे लोक… विनवण्या करत होते समर्पण करण्यासाठी… केलं असतं तर कदाचित जीव वाचला असता त्या आतंकवाद्यांचा!.... विशी - पंचविशीतल्या तरुणांना इतक्या जहरील्या विचारांचे आणि इतक्या क्रूर वृत्तीचे झालेले बघितले की आतून खूप वाईट वाटायचं त्याला… ते तरुण… त्यांचे निष्प्राण देह… सगळं आठवून गेलं…
"आर्मी मध्ये इतकं हळवं असून चालायचं नाही!"... त्याने पुन्हा एकदा मनाला समजावलं…
इतक्यात पुढची ड्युटी देण्यासाठी पुढचा सहकारी दाखल झाला…
पुढच्या सहकाऱ्याला त्याच्या ड्युटीचा रिपोर्ट देऊन तो परत जाण्यासाठी निघाला…
कँपकडे जाणारा रस्ता गावातून जात होता..
परवाच्या प्रकारानंतर गावातले वातावरण तसे तणावपूर्ण च होते..
एव्हाना चांगलाच अंधार पडलेला… घराघरांतून बुखारीचे वास येत होते… बर्फामुळे रस्ता झाकून गेला होता… टायर ला जाडसरशी धातूची स्किड चेन लावलेली जिप्सी हळू हळू निघाली होती…
इतक्यात अचानक ड्रायव्हर ने जोरात ब्रेक दाबला… जिप्सीत मागे बसलेले सगळेच एकमेकांच्या अंगावर आदळले…मिनिटभर गोंधळले आणि नकळत सतर्क झाले… नक्की काय झालं याचा अंदाज येईना…
अंधारातून चालत एक आकृती गाडीच्या शेजारून चालत मागच्या बाजूला आली… त्याच्या शेजारी बसलेल्या सहकार्याने जिप्सी च्या मागचे कव्हर थोडे वर उचलून पाहिले … समोर 19 - 20 वर्षाची एक मुलगी उभी होती… एकटीच!... त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिले… तिचे डोळे लालबुंद आणि पाण्याने भरलेले होते… थंडीमुळे बाकी चेहरा पांढरा फटक पडला होता… केस अस्ताव्यस्त!... त्याची नजर तिच्या पोटाकडे गेली… आणि त्याच वेळी एक हात पोटावर ठेऊन दुसऱ्या हाताने हातवारे करत ती बोलू लागली…
" उस दिन जिसको मारा ना… वो बाप था इसका… अब ये आयेगा… और बदला लेगा.. एक एक से बदला लेगा ये!!..." ती खूप आवेशाने बोलत होती… आणि बोलता बोलता जिप्सी भोवती फिरत होती…
रात्रीच्या त्या भयाण शांततेत तिचा आवाज खूप तीव्र वाटत होता…
एव्हाना तो आवाज ऐकून आजूबाजूच्या घरातून लोक बाहेर आले… त्यातल्या एक दोघी मोठ्या बायकांनी तिला दंडाला धरून शांत करायला बघितलं.. पण आता मात्र ती अगदी हंबरडा फोडून रडू लागली … तिच्या घरातले दोन वयाने मोठे पुरुष आले… त्यांनी हात जोडले आणि म्हणाले… " आप चलिए साब… जो परसो मारा गया वो शौहर था इसका!.. और मेरा बेटा!..." हे म्हणताना म्हातारबाबांच्या डोळ्यातही पाणी साठलं
होतं… त्यांना सावरत शेजारचे गृहस्थ म्हणाले.. " ये तो होना ही था!... रास्ता भटक गया था बेचारा… कितना ही समझाया हमने!... अब ये भी बेचारी क्या करे… नौवा महीना शुरू हुआ और…" त्यांना ही पुढे बोलवेना… " आप चलिए साब … हम संभाल लेंगे!" हे वाक्य ऐकल्यावर ड्रायव्हर ने यांत्रिकपणे जिप्सी चालू केली आणि कॅन्टोन्मेंटमध्ये येऊनच थांबला… पण तरीही त्याच्या मनात अजूनही तिचं बोलणं ऐकू येत होतं…
जेवायची इच्छा च होईना… कसेबसे पोटात अन्न ढकलून त्याने घरी फोन लावला… अगदी रिंग वाजेपर्यंत त्याला तिचे शब्द आठवत होते…
पलीकडून फोन उचलला गेला…पलीकडून "हॅलो " असा आवाज आला तसा भानावर येत तो म्हणाला.. " हॅलो!... किती वेळ लावलास फोन उचलायला!... काय जेवत बिवत होतीस काय?"
"नाई… जेवत न्हवते… पण आताशा भरभर चालयला जमत नाई हो… मी आनी आत्या देवाशी बसलो होतो… त्या तुमच्यासाठी देवाशी बसून रामरक्षा म्हनतात तेव्हा मी पण जाऊन बसते त्यांच्याशी… आजकाल म्हणजे सातवा लागल्यापासून मला असं रामरक्षा ऐकायला लई आवडतय!.." ती आनंदाने सांगत होती…
ते ऐकून त्याला पुन्हा रस्त्यावरच्या तिची आठवण झाली…
" ….. अहो… लक्ष कुटय तुमचं?... मी म्हनलं जेवलासा का?" बायकोच्या बोलण्याने तो पुन्हा भानावर आला…
" हो ग… जेवलो!.. तू सांग… आई बरिये ना गं?... गेल्या आठवड्यात सांगत होती तुझं ओटिभरण करनारे!... झाली का तयारी ?... "
" तयारी काय?… साड्या घेतल्यात काल… आता उद्या बायकांना बोलावनी करायची… पुढल्या शनवारी ताई येत्याल… रयवारी संध्याकाळचा कार्यक्रम!.. " ती सांगत असताना तो ही मनानी घरी जाऊन पोहोचला होता… कधी एकदा तिला डोळे भरून बघतोय असं झालं होतं…
तो मनातल्या मनात तिच्या या रुपाची कल्पना करत होता…
" सुमे.. पोटात बाळ लाथ मारतं का ग?” त्याने अचानक विचारलेल्या प्रश्नांने ती बावचळली… पण सावरून लाजून म्हणाली… " हो!... आनि एक गंमत सांगू… फोन वर तुमचा आवाज ऐकला की तर मारतच मारत!"
तो मनोमन खूप सुखावला!..
" बाळाला कळत असतं सगळं पोटात!..." ती म्हणाली… आणि त्यासरशी त्याच्या मनात पुन्हा एकदा कळ उठली!...
" उगाच कायतर बोलू नको… असं बाळाला काही कळत बिळत नसतं!... आणि तू पण अशी इतकी गुंतू नको त्यात… फौज्याचं पोरगं असनारे ते!... रडू बाई नकोय मला..!" तो भावनेच्या भरात बोलून गेला खरा पण नंतर त्याची त्यालाच चूक कळली…
कदाचित तोपर्यंत उशीर झाला होता…
तिला खूप वाईट वाटलं होतं… फोन कट झाला होता…
त्याने sorry चा मेसेज केला…
त्यावर reply आला… " फौज्याची मनं दगडाची असतात!.. "
त्याने फोन लावायाला पाहिला… पण तिने बंद करून ठेवला असावा…
तो थोडा दुखावला… पण तसाच खोलीच्या बाहेर पडला… त्याचे इतर सहकारी शेकोटी पेटवून बसले होते… आधी गप्पा… मग गाणी… प्रत्येक जण आपापल्या बाजूने रंग भरत होता…
दिवसभराचा शीण होताच…
दुसऱ्या दिवशी तो पुन्हा सज्ज होता… त्याच्या कामासाठी….
आणखी एक दोन दिवसात सुमीचा रुसवा गेला… तिकडे तिचं डोहाळजेवण झालं… ती तिच्या माहेरी गेली… फोनवर सगळी खुशाली कळत राहिली...
सगळं रूटीन पुन्हा पहिल्या सारखं सुरू झालं…
साधारण महिना उलटला… आता त्यालाही सुट्टीसाठी घरी जायचे वेध लागले होते…
तो दिवस जरा विचित्र च सुरू झाला…
दोन दिवस बर्फ पडतच होतं… आज मात्र कहर चालू होता… आता अगदी गुढग्यापर्यंत बर्फ जमा झालं… मनात उगाच कसलीशी हुरहूर लागून राहिली होती…
समोर डोंगरावर बर्फ वाढत च चाललं होतं…. नदी सकट शेजारच्या दगडांवरही बर्फ साठल …. झाड मात्र तसच उभं!!..
तो हे सगळं बघतच होता आणि तितक्यात समोरच्या डोंगरावरच्या बर्फाचा काही भाग बघता बघता खाली कोसळला… त्याखाली ढिगाऱ्यात 2 - 3 घरं दिसत होती...
अचानक खूप गोंधळ सुरू झाला…
तातडीने आदेश आले…. घरात अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढणं गरजेचं होतं… योग्य त्या सगळ्या सामग्री सोबत बाकी फौज ही हजर झाली होती.. ड्युटी संपली असूनही… तो त्या बचावकार्यात सहभागी झाला…
आधी मशीनच्या साहाय्याने बर्फ बाजूला काढला गेला… आत घरांची पडझड झालेलीच होती.. कसा बसा रस्ता तयार करत इतर सहकार्यांना बरोबर घेत तो एका घरात पोहोचला… भरभर हालचाली चालू होत्या… त्या घरातून तिसऱ्या माणसाला काढताना त्याला तान्ह्या बाळाच्या रडण्याचा आवाज आला… " हमारी बेटी और पोता…" घरातला माणूस म्हणाला…
"आप चिंता मत कीजिए…. हम सब को निकाल देंगे!" तो त्या माणसाला आश्वस्त करत म्हणाला…
अखेर… तो त्या रडणाऱ्या बाळाच्या आवाजाच्या दिशेने गेला…
बाळाला घट्ट कवटाळून एक बाई बसली होती… "आप बच्चे को दीजिये ".. तो म्हणाला आणि त्याने त्या बाईकडे बघितलं.. ही तर.. ती!.. हो!.. ती च!... त्याने पुन्हा एकदा चमकून तिच्याकडे पाहिलं.. तोच चेहरा… तीच नजर…. तो क्षणभर थबकला.. चरकला.. त्याने बाळाला घेण्यासाठी हात पुढे केला.. आणि तिनेही त्याच्याकडे पाहिलं..
त्यांची नजरा नजर झाली.. आणि तिने नजरेनेच त्याला बाळाला वाचवण्याची विनंती केली..
“ डरिये नही.. हम संभाल लेंगे” .. तो म्हणाला आणि तिने बाळाच्या कपाळावर हलकेच ओठ टेकवत बाळाला त्याच्या हाती सोपवल..
बऱ्याच मुश्किलीनंतर त्याने आई आणि बाळ दोघांना सुखरूप बाहेर काढलं..
बाहेर अॅम्ब्युलेन्स आणि डॉक्टरांची टीम तयार होती.. आता आई आणि बाळ दोघेही डॉक्टरांच्या ताब्यात होते.. डॉक्टर त्यांना तपासत होते.. काळजी मिटली होती.. तो बाकी लोकांना बाहेर काढणे.. मलबा काढणे अश्या कामात गुंतून गेला..
इतका वेळ तो ही लंगडत चालतोय हे जाणवल देखील नव्हतं त्याला!.. सहकाऱ्याने विचारलं.. तशी पायाला लागलेली रग जाणवली.. बुटांच्या आत काहीतरी ओलसर जाणवत होतं..
डॉक्टरांनी त्यालाही बोलावून घेतलं .. एके ठिकाणी बुटाच्या वर पॅंट फाटली होती.. तिथून रक्ताची धार लागली होती.. काम करताना कधीतरी कशाने तरी चांगलीच जखम झाली होती.. त्याने जखमेची मलम-पट्टी करून घेतली.. पण बूट घालता येणार नव्हता.. बाहेर मरणाची थंडी!.. त्याला लगेच खोलीवर परत जावे लागणार होते.. पुढचे काही दिवस सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार होती..
तो तसाच लंगडत परत निघाला.. आणि जाता जाता पुन्हा एकदा ती दिसली.. बाळाला घेऊन गाडीत बसलेली.. तिच्या शेजारी तिची आई असावी बहुदा.. दोघी ही श्रमलेल्या दिसत होत्या.. बाळाला आईकडे देत ती उठून त्याच्याजवळ आली..
त्याला म्हणाली.. “इसका बाप तो मर गया.. अगर आप ना होते तो शायद हम भी..” तिला पुढे बोलवेना.. डोळे भरलेले.. तिला तसं बघून त्याच्याही मनात कालवल .. पण तो काही बोलणार इतक्यात ती च हात जोडत म्हणाली.. “ आप को बस इतना कहना चाहती थी.. की जब ये बडा होगा तो इसे आप लोगोंन की कहानी सिखाऊगी!..” मग वर आकाशाकडे बघत म्हणाली.. “वो आप को खुशहाल रखे..” आणि बाळाच्या रडण्याचा आवाज आला.. तशी पटकन वळून निघूनही गेली!..
तो मात्र घशात अडकलेल्या आवंढया सकट चालत गाडीत येऊन बसला..
जखम भरून यायला थोडा वेळ लागला.. पण या विश्रांती मुळे बायकोशी मात्र मनसोक्त गप्पा झाल्या.. ती ही त्यामुळे खुश होती..
सगळं पुन्हा सुरळीत!
तो पुन्हा ड्युटीवर हजर!.. पुन्हा तोच डोंगर सावरून बसलेला.. पुन्हा तेच वाळलेल झाड.. आता तर आणखी काही फांद्या तुटून पडलेल्या!.. आणि तीच नदी!.. अजूनही गोठलेली!.. फक्त गेले काही दिवस ऊन पडत असल्यामुळे दगड गोटे पुन्हा उठून दिसत होते!..
तो नेहमीप्रमाणे गस्त घालत हे सगळं दृश्य बघत होता.. त्याला आजूबाजूच्या निसर्गातले सगळे बदल जाणवत होते.. त्याच्या मनात विचार आला.. “आता थंडी कमी होईल.. हळू हळू बर्फ वितळेल.. दगडांमधून गवत उगवेल.. झाडाला पानं येतील.. आणि नदी पुन्हा खळाळून वहायला लागेल!..
या एका विचारसरशी त्याच्या मनात त्याचा स्वतःचा, बायकोचा आणि तिचा असे तिघांचे चेहरे तरारून गेले.. “ थंडीत कितीही वरून गोठलेली दिसली.. तरी आत नदी जीवंत असते की.. थंडी वाढली.. जग गोठलं की नदी बर्फाच अस्तर पांघरते.. आणि प्रेमाची ऊब मिळाली की पुन्हा वाहू लागते!.. माणसाच पण असंच असतय !..” तो स्वतःशी मनात बोलत होता.. आणि त्याला त्या बर्फाच्या अस्तराखालच्या नदीचा प्रवाह जाणवत होता..
© आदिती भिडे.
कथेतील सर्वच घटना काल्पनिक नाहीत… आपल्याला कायमच फौजी म्हणजे कणखर आणि युद्ध करणारे असे वाटतात… पण खरं सांगायचं तर घरापासून लांब राहून अश्या छोट्या छोट्या लढाया ते रोजच लढत असतात… त्यामुळे त्यांची ही अवस्था त्या बर्फाच्या अस्तरा खालच्या नदिसारखी असते…. असं मला वाटतं!!!
मारवा टीमसाठी लिहिलेली ही कथा तुम्हाला कशी वाटतेय हे नक्की सांगा…
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा