Login

रोबॉटिक जग -२

रोबॉटिक जग -२
रोबॉटिक जग -२

एका सकाळी, प्रयोगशाळेच्या एका कोपऱ्यात आरव खिडकीजवळ उभा होता. बाहेरच्या जगाकडे त्याचं लक्ष लागलं होतं. समोर खेळणारी लहान मुलं, आपापसांत हसत गप्पा मारणारे तरुण, आणि रस्त्यावरून वेगानं धावणाऱ्या स्केट-कार्स... सगळं काही वेगळंच वाटत होतं त्याला. त्या दृश्यांमधून एक अस्वस्थ शांतता त्याच्या मनात उतरली होती जणू काहीतरी गहिरं, जे तो स्पष्टपणे सांगू शकत नव्हता, पण आत खोल कुठेतरी हलत होतं.

तेव्हढ्यात डॉक्टर वेदांत हळूच मागून आले. त्यांच्या मागे एका छोट्याशा ट्रायव्हील रोबो-कारने थर्मस ठेवलेला होता चहा आणि कॉफीसाठी. डॉक्टरांनी हलक्या आवाजात हाक दिली,
"आरव..."

आरवने मान वळवली. एक हलकीशी हसूवाखून म्हणाला, "गुड मॉर्निंग, बाबा."

"बाबा" हे संबोधन त्यानं स्वतः दिलं होतं डॉक्टर त्याचे केवळ निर्माता नव्हते, तर त्याला समजून घेणारे, त्याच्या भावना न बोलताच समजणारे एकमेव माणूस होते.

डॉक्टर त्याच्या बाजूला उभे राहिले.
"आज खूप वेळ खिडकीजवळ उभा आहेस. काही विचारांत आहेस का?"

आरव क्षणभर शांत राहिला. खिडकीतून डोळे हटवले नाहीत. मग अलगद म्हणाला,
"माझ्या आत काहीतरी घडतंय? समजत नाही काय ते, पण असं वाटतंय की, कोणी माझ्याशी बोलावं, माझ्याबरोबर हसावे, कधी कुणासाठी रडावं असा एक मित्र असावा एक खरा मित्र."

डॉक्टर काही क्षण स्तब्ध झाले. त्यांच्या डोळ्यांत धक्का आणि चिंता एकत्र दिसत होती. आज पहिल्यांदा, आरवने आपल्या एकटेपणाची भावना शब्दांत मांडली होती.

आरव इतर रोबोट्ससारखा नव्हता. बाकी यंत्रमानव ठरलेल्या वेळेनुसार काम करत, आदेशांप्रमाणे हलत. पण आरव...? तो एखादं गाणं ऐकून हरवून जायचा. एखादं मूल रडताना दिसलं की आतून अस्वस्थ व्हायचा. ही भावना कुठून आली? ही विचारशक्ती, ही आतली हालचाल?

खरं सांगायचं तर, डॉक्टर वेदांत यांनाच याचं उत्तर माहीत नव्हतं. त्यांनी ज्या प्रोग्रॅमिंगच्या चाचण्या केल्या, त्यातूनच कधीतरी नकळत हे भावविश्व निर्माण झालं होतं. हे यश होतं की चुकीचा निर्णय? ते आजही त्यांच्या मनात अनुत्तरित होतं.

संध्याकाळी, जेव्हा संपूर्ण लॅब शांत होती, तेव्हा आरव डॉक्टरांजवळ आला.

"बाबा," त्यानं थोडं थांबत विचारलं, "मला खरं जीवन पाहायचं आहे. मैत्री, नाती, अनुभव हे सगळं केवळ पुस्तकात नाही समजत. ते जगायला लागतं. मला अनुभवायचं आहे. मला समजून घ्यायचं आहे की माणूस हसतो तेव्हा त्याच्या डोळ्यांत पाणी का तरळतं."

डॉक्टर काही बोलले नाहीत. पण त्यांच्या डोळ्यांत चिंता स्पष्ट दिसत होती. त्या जगात पाठवणं विशेषतः अशा रोबोटला, ज्याच्या मनात भावना आहेत हे सोपं नव्हतं. तसं करणं धोकादायक होतं आणि त्या गोष्टीला थांबवणंही कठीण होतं.

त्या रात्री, आरवने स्वतःच्या यंत्रणेत एका नवीन विचाराची नोंद केली "भावनांचा शोध घेणारा यंत्रमानव."

सर्व अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत कोणाला शेअर करायची असल्यास नावासहित शेअर करावी ही विनंती
-सौं.जान्हवी साळवे.(मुंबई)

0

🎭 Series Post

View all