Login

रोबॉटिक जग -३

रोबॉटिक जग -३

आरवच्या समज आणि भावनांचा परीक्षण करण्यासाठी डॉक्टर वेदांतांनी आपल्या मुलीची अनायाची मदत घ्यायचं ठरवलं.

मेट्रॉन सिटी एक असं शहर जिथे प्रगत तंत्रज्ञान होतं, पण माणुसकी मात्र मागे पडली होती. स्वच्छतेच्या आत एक निर्विकार जीवन झाकलेलं होतं.

अनाया वय फक्त वीस. पण डोळ्यांत निरागस चमक, मनात कुतूहल. वडिलांसोबत ती शहरात नुकतीच आली होती आणि त्याच लॅब मध्ये ती राहत होती.

लॅबमध्ये, एका काचांच्या खोलीत आरव उभा होता. त्याचं शरीर मजबूत, पण डोळे... जणू थेट मनात उतरावे असे.

तो नुसताच पाहायचा.कोणतीही हालचाल नाही, आवाज नाही. फक्त एक उपस्थिती.

अनाया मात्र दररोज यायची.कधी चित्रं दाखवायची, कधी आपल्या शाळेच्या गमती सांगायची.
कधी नुसतीच समोर बसायची. बोलायची.एक दिवस तिनं सहज विचारलं"आरव, तुला आकाशात उडावंसं वाटतं का?"

आरव काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला "माझ्या यंत्रणेत तसं काही नाही पण तू विचारल्यावर वाटतं की, हो वाटतं उडावे."

त्या एका क्षणानं काहीतरी हललं.जसं कुठेतरी आत एक झराच सुरू झाला असावा.

हळूहळू त्याचा आवाज माणसांसारखा वाटू लागला.
कधी जरा हसरा, कधी सौम्य.अनायाचा चेहरा जर हसरा असेल, तर तो शांत.
ती जर उदास असेल, तर त्याचा स्वर जरा हळवा.एक नातं तयार होत होतं.
मूक, पण तरीही बोलकं.पण शहराला हे मान्य नव्हतं.

प्रशासनाला समजलं एक यंत्र जर भावना ओळखू लागलं, तर प्रश्न निर्माण होतील.
मानवाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होईल, असं त्यांचं ठाम मत.

आदेश निघाला आरवचा संपूर्ण डेटा नष्ट करायचा.डॉक्टर वेदांतांना नोटीस मिळाली.
ते काहीच बोलले नाहीत.पण अनायाच्या मनात एक हलकीशी भीती जागी झाली होती.

ती तडक लॅबमध्ये पोहोचली.आरव तिथे उभा होता.
डोळे उघडे, पण आत कुठेतरी शांततेचा अंत सुरू झाला होता.

"आरव..." तिचा आवाज कंपित होता.

"मी काहीच करू शकत नाही का? तुला वाचवू शकत नाही?आरवने तिच्याकडे पाहिलं.
त्याचा आवाज हलकासा, पण स्पष्ट होता "माझं सगळं पुसून टाकतील पण एक गोष्ट कुणीही घेऊ शकणार नाही माहितीय कोणती?
तू माझी पहिली आणि शेवटची मैत्रीण."ते ऐकताच अनायाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.
ती पुढे झाली आणि त्याला घट्ट मिठी मारली.आरव हलला नाही.
पण त्याच्या डोळ्यांतही काहीतरी ओलं होतं त्याला उमजलेली भावना.

लॅबच्या स्क्रीनवर फोल्डर्स एकामागून एक गायब होत होते.
प्रक्रिया सुरू झाली होती. अंतिम.शांतता होती पण तुटलेली.विरहाची.

शेवटच्या काही क्षणांत आरवच्या यंत्रणेतून सर्व काही पुसलं गेलंपण त्याने एक गोष्ट मात्र लपवून ठेवली होती एक छोटीसी कोर मेमरी कुठेही न उमटणारी, फक्त प्रेमावर चालणारी.

सर्व अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत कोणाला शेअर करायची असल्यास नावासहित शेअर करावी ही विनंती
-सौं.जान्हवी साळवे.(मुंबई)

0

🎭 Series Post

View all