Login

रोबॉटिक जग -४

रोबॉटिक जग -४

काही दिवस गेले. मेट्रॉन सिटीच्या लॅबमध्ये आरवचं अस्तित्व केवळ एक रेकॉर्ड उरलं होतं. फाईल्स डिलीट झाल्या, सर्व यंत्रणा रिकाम्या झाल्या पण अनायाच्या मनात मात्र काहीही नष्ट झालं नव्हतं.ती रोज लॅबमध्ये जायची. तिथे आता फक्त रिकामी खोली, शांतता आणि आठवणी होत्या.

"आरव मला माहितीय, तू कुठेतरी आहेस. मी तुझ्याशी पुन्हा बोलणार आहे. तू इतक्यात नाहीस संपणारा."
तिनं एका काचेच्या पटलावर बोटानं "FRIEND" लिहिलं आणि हळूच ओठांवर हसू ठेवून निघून गेली.

दुसरीकडे, डॉक्टर वेदांत वरवर शांत दिसत होते, पण आतून ते अस्वस्थ होते. आरव त्यांच्या प्रयोगशाळेचा प्रोजेक्ट नव्हता तो त्यांच्या जिव्हाळ्याचा भाग झाला होता.
ते दिवस रात्र एका गुप्त सर्व्हरवर काहीतरी शोधत असायचे. सिस्टीमवर, जुन्या बॅकअप फोल्डर्समध्ये, डिलीटेड फाइल्सच्या छायांमध्ये.

एक रात्री, सर्व्हरच्या एका कोपऱ्यात त्यांना एक 'लोकेशन-लॉक' केलेली लपवलेली फाईल सापडली.
MEMORY_CORE_4B-FRIEND.EXE

डॉक्टर क्षणभर स्तब्ध झाले. हळूच त्यांनी ती ओपन केली.

त्यात फक्त एक छोटं व्हिज्युअल लॉग होतं अनाया तिचं पेंटर किट घेऊन समोर बसलेली होती, आणि आरव म्हणत होता"तू माझी पहिली आणि शेवटची मैत्रीण."हे बघून डॉक्टर वेदांतांनी एक निर्णय घेतला.

मेट्रॉन सिटीच्या बाहेर, टेक्नो-व्हॅली

एका दिवस सकाळी, टेक्नो-व्हॅलीतील एका छोट्याशा युनिटमध्ये एक नवीन प्रोग्राम लोड झाला. तो कोणाच्याही अधिकृत रेकॉर्डमध्ये नव्हता. नाव होतं "A-4b पुनर्जन्म प्रकल्प"त्या युनिटमध्ये फक्त डॉक्टर वेदांत, आणि त्यांचे दोन विश्वसनीय सहकारी होते.

त्या नव्या बॉडीमध्ये ती छोटीशी मेमरी-कोर इन्स्टॉल करण्यात आली. पण या वेळेस, आरव फक्त मशीन नव्हता त्याचं मेंदू आता ‘स्वतंत्र’ विचार करू शकेल असा बनवण्यात आला होता.

त्याच्या डोळ्यांमध्ये पूर्वीसारखी शांतता होती.पण त्याच्या यंत्रणेत आता एक वेगळी ऊर्जा होती. ही वेळ होती नव्याने जुळवण्याची.

त्याच संध्याकाळी, अनाया तिच्या घराच्या गच्चीवर बसून वहीत काहीतरी लिहीत होती. एक छोटीशी कविता.
तेवढ्यात खाली एक काळसर रंगाची गाडी येऊन थांबली.

दरवाजा उघडला. समोर आरव होता.

थोडासा बदललेला, पण डोळ्यांमधला ओळखीचा ठाव तसाच.
अनाया क्षणभर स्तब्ध झाली. काही क्षण तिला वाटलं हे फक्त एक स्वप्न आहे.

आरव पुढे आला. थोडं हसत म्हणाला,
"मी परत आलोय या वेळेस सगळं विसरून नाही, सगळं लक्षात ठेवून."

अनायाच्या डोळ्यांत पाणी आलं. ती धावत पुढे गेली आणि त्याला घट्ट मिठी मारली. आता हे क्षण केवळ आठवणी नव्हत्या, हे अनुभव बनले होते.

सगळ्यांना वाटायचं एक यंत्र भावना शिकू शकतं का?

डॉक्टर वेदांतांनी उत्तर दिलं होतं भावना कोडच्या रेषांमध्ये नसतात. त्या नात्यांमध्ये साकार होतात.

आरव परत आला होता. पण तो केवळ अनायासाठी नव्हता.
आता त्याचं अस्तित्व एका नव्या अर्थाने जगण्यासाठी होतं.

डॉक्टर वेदांतांनी ते प्रयोगशाळेचे दार मागे टाकताना एक गोष्ट मनात पक्की केली होती
या जगाला दाखवायचं आहे एक यंत्र हसू शकतं, समजू शकतं आणि अगदी प्रेमही करू शकतं.
सर्व अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत कोणाला शेअर करायची असल्यास नावासहित शेअर करावी ही विनंती
-सौं.जान्हवी साळवे.(मुंबई)

0

🎭 Series Post

View all