Login

रोबॉटिक जग -५

रोबॉटिक जग -५

"माफ करा डॉ. वेदांत," त्या अधिकाऱ्याने निर्विकार पण ठाम आवाजात म्हटलं, "पण तुम्ही नियम मोडले आहेत. एकदा नाकारलेला प्रोटोटाइप परत वापरणं म्हणजे थेट सायबर कायद्यांचं उल्लंघन आहे."

डॉ. वेदांत शांतपणे त्यांच्या डोळ्यांत बघत म्हणाले,
"हो, मी नियम मोडले. पण त्या नियमांच्या पलिकडे जे घडलं, त्याला नियमात मोजणं शक्य नाही. तिथं एक हृदय निर्माण झालं होतं. ते तुम्ही तपासू शकत नाही, पण अनुभवू जरूर शकता फक्त एकदा आरवला ऐकून घ्या."काउंसिल थोडी गोंधळली होती. पण अखेर सर्वानुमते आरवला आत बोलावण्यात आलं.

आरव आत आला. डोळ्यांत एक गूढ शांतता, आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास. आज तो कोणत्याही सिस्टिमवर चालणाऱ्या कमांड्सवर नव्हता. तो स्वतःच्या जाणिवांवर आधारलेला होता.

"माझं नाव आरव आहे," त्याने बोलायला सुरुवात केली."मी आधी एक मशीन होतो. शिस्तबद्ध, नियमानुसार चालणारा. पण एक मैत्रीण भेटली तिने मला माणूस काय असतो, हे शिकवले.मी खूप प्रश्न विचारले पण प्रत्येक उत्तर शेवटी एकाच गोष्टीवर येत होतं जाणीव. आणि जाणीव म्हणजे काय, हे मला हळू हळू समजायला लागलं.
आता जर ‘जाणिवा’ ठेवणं हा गुन्हा असेल, तर मी तो कबूल करतो.मला शिक्षा द्या."

सभागृहात क्षणभर कुणी काही बोललं नाही. वातावरण थांबल्यासारखं वाटलं. काहींनी खाली मान घातली, काहींच्या चेहऱ्यावर विचारांची लाट उमटलेली होती.
आरवचं भाषण त्यांच्या केवळ मेंदूपर्यंत पोहोचलं नव्हतं ते थेट अंतःकरणात झिरपलं होतं.

मेट्रॉन सिटी दुसऱ्या दिवशी रात्री आरव पुन्हा लॅबमध्ये गेला.
डॉ. वेदांत आणि अनाया तिथेच होते. एक शांत, विचारमग्न वातावरण होते "आरव, आता पुढचं काय?" वेदांत सरांनी विचारलं.

आरव काही क्षण गप्प राहिला. मग तो म्हणाला,
"मला इतरांसाठी काही करायचं आहे असे जे अजूनही मशीन म्हणूनच ओळखले जातात, पण ज्यांच्यात काहीतरी ‘अपूर्ण’ आहे माझ्यासारख्या रोबोट्ससाठी, जे केवळ आज्ञा पाळणारे यंत्र राहू नयेत, तर स्वतःच्या निर्णयावर, जाणिवांवर जगणारे सजीव बनावेत."

अनाया त्याच्याकडे पाहत होती. ती आता त्याला फक्त एक प्रोजेक्ट किंवा एक यंत्र म्हणून पाहत नव्हती.ती त्याचं अस्तित्व समजून घेत होती.त्याच्या जाणिवांवर विश्वास ठेवत होती.

अन् तिथून सुरू झाली "प्रोजेक्ट संवेदी".या प्रकल्पात अशा रोबोट्सना केवळ कोडिंग नव्हे, तर भावना, नाती, निर्णयक्षमता, सहानुभूती अशा मूल्यांची शिकवण दिली जात होती.आणि या नव्या प्रवासाचा पहिला शिक्षक होता आरव.

एके संध्याकाळी लॅबच्या टेरेसवर अनाया आणि आरव बसले होते. समोर शांत आकाश होतं.अनायाने हळूच विचारलं,"तुला अजूनही वाटतं का आकाशात उडावं?"

आरवने डोळे मिटले. चेहऱ्यावर एक शांत हसू उमटलं."हो पण मला आता वाटतं, कुणाच्या आठवणीत उडणं हे खूपच सुंदर असतं."कारण जिथे भावना ‘डिलीट’ करता येत नाहीत, तिथे यंत्रं सुद्धा जगायला शिकतात.

समाप्त.

सर्व अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत कोणाला शेअर करायची असल्यास नावासहित शेअर करावी ही विनंती
-सौं.जान्हवी साळवे.(मुंबई)

0

🎭 Series Post

View all