Login

रोमा.... (भाग १)

कानामागून आली आणि तिखट झाली...!!!!
शीर्षक : रोमा (भाग १)
जलदकथा स्पर्धा (नोव्हेंबर 2025)
कानामागून आली आणि तिखट झाली....


"होssssss..... अजून करा लाड तिचे.....देवघरात नेऊन ठेवा तिला.... "
मीराबाई चरफडत बेडरूममध्ये शिरल्या.... पदराचा कोपरा कुस्करत पलंगाच्या कोपऱ्यावर जाऊन बसल्या..... दशरथरावांनी मीराबाईंची तडफड ओळखली.... पण कारण न समजल्याने ते काहीच बोलले नाहीत.....
इकडे त्यांची सून आदिती स्वतःच्या खोलीत येऊन चिडचिड करू लागली.... "हेच पाहायचं राहिलं होतं आता.... मी म्हणाले होते,हे प्रकरण घरात ठेवणं म्हणजे संकटाला थारा.... आणि नेमकं तेच झालं...."
"अगं हो हो.... असं झालंय तरी काय.... कशासाठी एवढी तगमग...." लागलीच अदितीच्या नवऱ्याने, सिद्धार्थने विचारलं....
"मलाच तोंड वर करून विचारता.....?" जळजळीत नजरेने सिद्धार्थकडे पाहत आदिती जवळजवळ किंचाळली.....
'हिचा पारा भलताच चढलेला दिसतोय.... उगाच उत्तराला उत्तर दिलं तर दिवाळीचे फटाके आत्ताच फुटतील....' असा मनाशी विचार करत सिद्धार्थ हळूच बाहेर सटकला.... बाहेर जाऊन पाहतो,तर दशरथराव आधीच हॉल मध्ये येऊन टॅब वर उगाच काहीतरी करत असल्याचा आव आणत होते.....
दसऱ्याच्या दिवशी दोघी सासू सुना रागाने पेटलेल्या असताना बिचारे घरातले पुरुष करणार तरी काय.... म्हणून दोघेही बाहेर येऊन कोचावर बसलेले....
दोघांनी एकमेकांना खुणेने काय झालं म्हणून विचारलं,आणि दोघांकडूनही,ओठ खालच्या दिशेने पसरवत,काहीच माहीत नसल्याच्या उत्तराची ग्वाही आली.....
काही वेळाने,अगदी योगायोग म्हणावा,असं एकाच वेळी दोघी सासूसुना बाहेर आल्या आणि एकमेकींना पाहून कोचावर बसलेल्या आपापल्या यजमानांकडे पाहत नाक मुरडून स्वयंपाकघरात गेल्या.....
पाहतात तर काय आश्चर्य..... स्वयंपाकघरात, टेबलावर बासुंदी,पुरी,जिरेभात,पनीर माखनवला,पापड आणि रायता तयार होता.....
दोघींनी पुन्हा एकमेकींकडे रागाचा कटाक्ष टाकत पाहिलं....
"आज तरी गप्प बसेल की नाही.... लोचट कुठली...." मीराबाई हळूच पुटपुटल्या.....
"नाहीतर काय..... सगळ्यात लुडबुड करायला पाहिजेच का...." आदीतीनेही उत्तराला उत्तर दिलं.....
"कानामागून आली आणि तिखट झाली मेली......!!!!" मीराबाईंनी डायलॉग मारला......
किचनच्या खिडकीतून सिद्धार्थ हे पाहत होता.... शेवटी न राहवून त्याने आत जाऊन,थोड्या चढ्या आवाजात दोघींना विचारलंच.....
"काय चाललंय घरात आज,हे मला कळेल का....? कशाचा एवढा राग आलाय तुम्हां दोघींना.... कळू तरी द्या...."
तशा दोघींनी किंचित माना खाली झुकवल्या.....
तरीही धारिष्ट्य दाखवत आदिती म्हणाली.... "आज दसरा आहे..."
"मग?"
" मग दसऱ्याला घरातल्या नोकरांची कुणी पूजा करतात का?...."
"अच्छा अच्छा.....ओके...... आलं माझ्या ध्यानात...... पण आदिती, ती नोकर नाहीये....." सिद्धार्थ ठासून म्हणाला....

0

🎭 Series Post

View all