शीर्षक : रोमा (भाग २)
जलदकथा स्पर्धा (नोव्हेंबर 2025)
कानामागून आली आणि तिखट झाली....
जलदकथा स्पर्धा (नोव्हेंबर 2025)
कानामागून आली आणि तिखट झाली....
मीराबाई लागलीच बोलू लागल्या..... "त्या मशीनवाल्या बाईचं एवढं काय ते कौतुक....."
"आई तिचं नाव रोमा आहे.... R O M A .... 'रोबोटीक ऑपरेशनल मल्टिटास्किंग असिस्टंट'..... मशीनवाली बाई नव्हे....."
आज दसऱ्याच्या निमित्ताने सकाळी लवकर उठून सिद्धार्थ आणि दशरथरावांनी त्यांची घरकामासाठी आणलेली रोबोट,रोमा हिचं औक्षण आणि पूजन केलेलं.... शेवटी काहीही झालं तरी ते एक यंत्रच..... आणि त्यामुळेच मीराबाई आणि आदीतीचं डोकं थाऱ्यावर नव्हतं....
तर त्याचं झालं असं, की सन 2058 मध्ये मीराबाई आणि आदिती यांना घरकामात मदत आणि आराम म्हणून सिद्धार्थने, तो स्वतः काम करत असलेल्या रोबोटिक्स व्हेंचरमधून घरगुती कामांसाठी वापरला जाणारा रोबोट ,रोमा,हिला घरी आणलं.... अलीकडे स्मार्ट फूड प्रोसेसर,डिश वॉशर,स्मार्ट स्वीपर,आणि रुम्बासुद्धा अगदी सर्वांच्याच घरी दिसू लागलेला..... या सर्वांचे एकत्रीकरण असलेला ,आणि सगळीच कामं करणारा रोबोट,हा संपूर्ण सोसायटीमध्ये यांच्याच घरी पहिल्यांदा आला होता.....
रोमा आली तेव्हा या दोघी बऱ्याच आनंदात आणि उत्साहात होत्या..... कारण रोमा ही बरंच विकसित तंत्रज्ञान वापरून तयार केलेली,आणि कृत्रिम बुद्धिमत्ता असलेली रोबोट होती.... तिच्यात बऱ्याच गोष्टी आधीपासूनच फीड केलेल्या होत्या,आणि नंतरही नवीन गोष्टी शिकण्यासाठी तिला कुठल्या शिकवणीची किंवा प्रोग्रामिंग ची गरज लागणार नव्हती..... आता आराम मिळणार,चविष्ट आणि सोबतच हेल्दी जेवण मिळणार, स्वतःसाठी वेळ काढता येणार,आणि बोनस म्हणजे सोसायटीच्या कोणत्याच घरात एवढा अद्ययावत आणि स्मार्ट रोबोट नाहीये,त्यामुळे आपल्या रोमाचं कौतुक सांगून भाव मारता येणार म्हणून दोघी खुश होत्या..... पहिल्याच दिवशी मीराबाईंनी रोमाकडून मऊ लुसलुशीत पोळ्या करून घेतल्या,तर अदितीने टेस्टिंग साठी पायाला नेलपॉलिश लावायचा हुकूम दिला.... आणि काय आश्चर्य!!!!! मीराबाई पोळ्या पाहून तर आदिती नखांना लावलेल्या नेलपॉलिशची फिनिशिंग पाहून,दोघी अगदी हवेत तरंगत होत्या...
पण शेवटी माणूस म्हंटलं,की एक वेळ अशी येते,की आरामचासुद्धा कंटाळा येऊ लागतो.... आणि म्हणूनच मीराबाई मध्येमध्ये स्वयंपाकासाठी जात,पण स्वयंपाक अगोदरच तयार असे..... अशातच दोन महिन्यांपूर्वी रोमाला चार्जिंग वर लावलेली असताना त्यांनी नजर चुकवून बेसनाचे लाडू तयार केले.... दुसऱ्या दिवशी कौतुकाने लेकाला भरवताच, त्याच्या तोंडून कौतुकाचे शब्द बाहेर पडायच्या ऐवजी, "काय हे आई....? किती गोड केलेत लाडू...... तुला पूर्वीसारखं आता जमत नाही..... रोमाला सांगायचं ना.... ती करतेच की नेहमी,आणि तिचे परफेक्ट असतात.... कशाला उगाच वेळ वाया घालवून उपद्व्याप करत बसलीस.....!!!" असं वाक्य बाहेर पडलं, आणि मनातल्या मनात त्यांना रोमाचा हेवा वाटू लागला.....
'बराच आहेस की!लहानपणी चोरून डब्यातून लाडू पळवायचास, तेव्हा बरे गोड नाही लागले तुला.... आणि आता रोमाचं कौतुक सांगतोस.... तेव्हा तर माझ्याच हातचं आवडत होतं ना.... त्यावेळी कुठं होती ही नटमोगरी....?' असं निक्षून सिध्दार्थला विचारावं असं मीराबाईंना वाटलं.... पण त्या गप्प होत्या..... एखादे वेळी संध्याकाळचा चहा, पुस्तक वाचणाऱ्या दशरथरावांसमोर त्यांनी ठेवावा, आणि वर न पाहताच त्यांनी म्हणावं, "काय रोमा....? आज लवकर चहा..... थँक यू बरं का....!" म्हणजे मीराबाईंना अस्वस्थ वाटे..... 'इतकी वर्षं मी वेळच्या वेळी चहा देऊन साधं कौतुक नाही,आणि ह्या नटवीला थँक यू....?' म्हणत त्या स्वतःशीच नाक मुरडत..... पण असं हळूहळू मीराबाईंची,रोमावरच्या रागाची सुरुवात झाली....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा