Login

रोमा... (भाग ३)

कानामागून आली आणि तिखट झाली...!!!
शीर्षक : रोमा (भाग ३)
जलदकथा स्पर्धा (नोव्हेंबर 2025)
कानामागून आली आणि तिखट झाली....

असंच एकदा आदितीने नवीन प्रकारचं ऑम्लेट शिकून ते सिध्दार्थला उत्साहाने सकाळच्या नाश्त्याला वाढलं.... बऱ्याच दिवसात आपल्या हातचं काही खाल्लं नाही म्हणून सिद्धार्थ तयार केलेल्या डिशचं कौतुक नक्की करेल अशी आशा करून तिनं विचारलं..... "कसं झालंय...?"
"मला तुझा मूड ऑफ करायचा नाही,पण मीठ कमी झालंय, आणि थोडं अजून वाफवायला हवं होतं हे.... रोमाच्या इनबिल्ट प्रोग्राम मध्ये हे सगळं ऑटोफीड आहे.... ती वेळ सेट करून वाफवते, आणि मग ते परफेक्ट होतं...." सिद्धार्थ उत्तरला....
त्याचं हे उत्तर ऐकताच आदितीचा सगळा उत्साह धुळीला मिळाला.... पण तीसुद्धा राग गिळून गप्प बसली.....
परवा तर गंमत म्हणून सिद्धार्थने रोमाला टायनॉट बांधायला सांगितली,आणि हे पाहताच अदितीच्या पायाखालची जमीन सरकली.... धावत येऊन तिने गडबडीने रोमाला अगदी खऱ्या व्यक्तीसारखं ढकलून दिलं, आणि हे पाहून सिद्धार्थ खदाखदा हसू लागला....
"अगं वेडाबाई.... तुला काय वाटलं,ती खरंच दुसरी कुणी मुलगी आहे की काय....? अगं मी फक्त प्रँक करत होतो,तुला चिडवायला....." असं म्हणत सिध्दार्थने सफाई दिली,पण आदितीच्या मनात मात्र रोमाविषयी द्वेष येऊ लागला.... का कुणास ठाऊक पण तिला पाहून,'ही आपली जागा घेतेय की काय' अशी भावना तिच्या मनी येत असे..... कारण आजकाल घरातल्या पुरुषांना काम म्हंटलं की फक्त रोमा,रोमा आणि रोमाच आठवे....
मीराबाई आणि आदितीची झोप पार उडाली होती.... तसं पाहिलं तर सासू सुनेमध्ये कधी मतभेद नव्हते,पण 'रोमा आता नको' या निर्णयावर दोघींचं जोरदार मतैक्य झालं,आणि रोमाचा बंदोबस्त करण्याचा दोघींनी विचार केला..... आता रोमाला विकून टाकूया किंवा बंद करून ठेवून देऊ म्हणून दोघींनी आपापल्या नवऱ्यांकडे कुरबुर सुरु केली होती,पण त्यांना काही दाद मिळत नव्हती....
हे झालं दोघी सासू सुनेच्या बाबतीत.... पण रोमा मात्र दशरथराव आणि सिद्धार्थच्या गळ्यातला ताईत बनली होती.... घरातल्या व्यक्तीप्रमाणे ती घरभर वावरे..... रोज वेळेवर गोळ्या,पथ्य सांभाळून चवदार जेवण,तेही वेळेवरच,चहाची वेळ, जागच्या जागी मिळणाऱ्या वस्तू यांमुळे दशरथराव,तर रोज ऑफिसच्या घाईच्या वेळी हातात मिळणाऱ्या वस्तू, डब्यात रोज वेगवेगळे आरोग्यदायी पदार्थ, आणि मुख्य म्हणजे आई आणि बायकोला मिळणारा आराम,या गोष्टींमुळे सिद्धार्थ खुश होता..... भरपूर पैसे मोजून रोमाला विकत घेतल्याचा जराही पस्तावा सिद्धार्थला वाटत नव्हता....

0

🎭 Series Post

View all