Login

रोमँटिक कॉल

Short story about a romantic Call

" हॅलो.... डारलिंग कशी आहेस?"

"ओहो....क्या बात, आज माझी एवढी विचारपूस. कशी काय आठवण आली माझी? कित्ती दिवसांनी असा फोन केला रे. तू कसा आहेस?"

" ह्म्म..... मी काय कसा असणार?? तुझ्याविना हाल हाल होतात ग माझे. तू हल्ली भेटतेस कुठे मला...."

"आज भेटूया? ये ना आज, प्लीज राणी"

"हां, पुरे मस्का मारणं...."

"आज कशी येऊ, घरी काय सांगू? असं अचानक कशी मी बाहेर पडू?"

"अगं नेहमी सांगतेस तशीच मार की एखादी थाप, त्यात काय एवढं "

" नेहमी मलाच असं करावं लागतं. तुझ काय बाई बर आहे. तुला कोणाला स्पष्टीकरण द्यावं लागतं नाही, घरात खोटं बोलावं लागतं नाही, कोणाला भेटला? कुठे गेला? कोणी विचारणार नाही"

"माझ तसं नाही. मला घर सांभाळा, स्वयंपाक करा, आर्याचा अभ्यास घ्यायचा असतो. उद्या तर चाचणी परीक्षा आहे तिची. अस आज मला अचानक घरातून बाहेर नाही पडता येणार रे."

"घरात सासू सासरे, माझी लेक आणि नवरा, तो येईल संध्याकाळी. तो कसा आहे तुला तर माहितीच आहे. ऑफिसमधून घरी आल्यावर मी समोर दिसली पाहिजे. आला की लगेच गरम जेवणही तयार हवं"

"हे मला काही माहित नाही. ते सगळं, तुझं तू मॅनेज कर. आज तू मला भेटणार आहेस. दॅट्स इट! चल ठेवतो फोन. नेहमीच्या ठिकाणी, नेहमीच्या वेळेवर. बाय लव यू स्वीट हार्ट."

"लव्ह यू टू " प्रिया हळू कुजबुजत्या आवाजात बोलली. घरात कोणाला ऐकु जाणार नाही याची खात्री तिनं केली. असा रोमँटिक कॉल तिला महिन्यातून किमान दोन तीन वेळा तरी येत असे.

घराचं सगळं नेहमीप्रमाणे पद्धतशीर मॅनेज करून प्रिया घराबाहेर पडली. आजच कारण काय तर मैत्रीण आजारी आहे, तिला जाऊन भेटून येते असं सांगून प्रिया घराबाहेर पडली.

रात्री आठच्या सुमारास घरी परतली. रात्रीचा स्वयंपाक करूनच बाहेर गेली असल्याने आल्यावर हात-पाय, तोंड धूऊन कपडे बदलून आली. टेबलावर ताट वाटी मांडत होती, तोवर दारावरची बेल वाजली. अंकित ऑफिसमधून घरी आला. त्याची रोजची यायची वेळ हीच असे. तो फ्रेश होऊन आला आणि सगळी मंडळी एकत्र जेवायला बसली.

कोणाला काही कळले नाही, प्रियाने निःश्वास सोडला....

१५-२० दिवसांनी पुन्हा तिला त्याचा तसाच फोन आला..... अन् दरवेळेस प्रमाणेच ठरलेल्या वेळी, ठरलेल्या ठिकाणी जायला ती निघाली. घरातून बाहेर पडताना धाकधुक नेहमीच असते. कुठे जाणार, कधी येणार प्रश्न असतात. प्रिया बाहेर पडणार म्हटलं की सासूबाई आणि आर्या दोघींची प्रश्नावली सुरु होते. उत्तरं देऊन ती लगबगीने बाहेर पडली....

आज मात्र तिने ठरवलं होतं, बास काही झालं तरी त्याच्याशी स्पष्टच बोलायचं. असं लपून छपून भेटणं, घरी खोटं बोलणं त्यामुळे येणारी अपराधी भावना तिला टोचत होती. ती तिच्या विचारत गुंग असतानाच तो आला.....

"किती दिवस असं आपण लपून छपून भेटायचं! कोणाला कळलं तर काय? "

" अगं काय ग?  आज आल्या आल्याच प्रश्नांचा भडीमार....ते सगळं बोलू निवांत, आधी ये तरी माझ्या मिठीत"

त्याने तिला जवळ ओढले, आपल्या मिठीत घेतले, ती काही बोलणार तेवढ्यात त्याने आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले..... ती दोघे सारं भान, वेळ काळ, विसरून एकमेकात विलीन झाले.

तिलाही खरंतर हे सगळं आवडत होतं, त्याचं असं बोलावणं, तिच्यावर जिवापाड प्रेम करणं, तिचं भरभरून कौतुक करणं आणि फक्तं आणि फक्तं तिच्यासाठीच त्याचा वेळ देणं. ती कितीही नाकारत असली तरी त्याच्यासाठीची तिची ओढ, आकर्षण, प्रेम आजही इतक्या वर्षांनी तितकच तीव्र होतं.

"तूच ग.... फक्तं तूच.... माझी सखी, माझी प्रेयसी, माझ्यासाठी काहीही करणारी, मला हवं म्हणून माझ्यासाठी घरी खोटं बोलतेस, मला भेटायला येतेस. मला समजून घेतेस अन् हे मला तुझ्याकडून जे सर्वोच्च शरीरसुख इथे मिळत ना, खरं सांगू तसं मला घरी नाही मिळत. तिथे कधीकधी सतत दडपण असतं, आर्या मध्येच रात्री उठली तर? आई बाबा अचानक दार तर वाजवणार नाहीत ना?" अंकित प्रियाला समजावत होता आणि प्रिया फक्तं शांत त्याच्याकडे एक टक पहात ऐकत होती....

" हो, अंकित मला कळतंय, पण तरी असं घरी थाप मारुन येणं म्हणजे....मला अपराध्यासारख वाटतं रे. निव्वळ काही सुखाचे क्षण साजरे करण्यासाठी आपण असे....."

"प्रिया, अगं राणी तू असा का विचार करतेस. आपण काही कोणाला फसवत नाही आणि मॅडम आपण नवरा बायको आहोत लक्षात आहे ना? खरं सांगू, असा हा लपून छापून तुझ्याशी रोमान्स करताना काय मज्जा येते, काय सांगू तुला! तुला पण तर आवडतच की...."

"आणि काही दिवसांनी जेव्हा आपलं मोठं घर होईल, आर्या मोठी होईल, ती तिच्या स्वतंत्र खोलीत झोपेल तेव्हा आपल्या खोलीत आपण दोघेच राजा राणी ..."

"सध्या आपलं नशीब चांगलं, म्हणून तुझ्या दादाच्या या रिकाम्या फ्लॅटमध्ये आपल्याला भेटता येतं. १०-१५ दिवसांनी तरी असं निवांत भेटत जाऊ ग, तुझ्या सोबत हे सुखाचे क्षण मला वेचू देत..."

" हो हो, वेच तू सुखाचे क्षण, अरे माझ सगळं आयुष्य तुझ्यासाठीच आहे सख्या पण आत्ता आपण निघुय का?? बोलत बसलो तर उशीर होईल आणि घरी मला खोटं बोलणं कित्ती अवघड होत, माहित आहे तुला!"

" हो, चल तुला घराजवळ चौकात सोडतो आणि मी तिथेच थांबतो. तू घरी पोच, फ्रेश हो आणि ताट वाटी मांडत असशील तेव्हा मी येतो.... काय बरोबर ना?"

" अगदी बरोबर स्वीटहार्ट....चला आता...."

"लव्ह यू डारलिंग....

चल करतो परत काही दिवसांनी तुला रोमँटिक कॉल. मग ये तू मला भेटायला, घरी थाप मारुन...."


©तेजल मनिष ताम्हणे

0