रूम नंबर १३ : भाग १

तूर्तास आदित्यने त्या रूम कडे लक्ष द्यायचे नाही हे स्वतः च्या मनाला बजावून ठेवले.
रूम नंबर १३: भाग १


आदित्य भिडे आज फारच खुश होता कारण त्याचे स्वप्न असलेल्या त्या नामांकित कॉलेज मध्ये कॉम्प्युटर सायन्स मध्ये पदवी घ्यायची नामी संधी त्याला मिळाली होती. जिथे प्रवेश घ्यायला विद्यार्थी अगदी जीवाचे रान करतात अशा नामांकित कॉलेज मध्ये त्याने स्वतःच्या गुणवत्तेने प्रवेश मिळवला होता. आज त्याच्या प्रवेशाची पुढील प्रक्रिया करण्यासाठी तो बाबांसोबत चालला होता.

तिथे पोहोचताच ते भव्य आणि सुंदर कॉलेज कॅम्पस पाहून आदित्य अगदी भारावून गेला. त्याने केलेल्या अपेक्षेपेक्षाही कॉलेज फार मोठे आणि सुंदर होते. ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण होत असताना सुद्धा त्याच्या मनातला सारा आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता. त्याच्या चेहऱ्यावरील आनंद बघून त्याच्या बाबांना सुद्धा समाधान वाटत होते. ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण झाली आणि निवास व्यवस्थेच्या दृष्टीने त्याला कॉलेज कॅम्पसमधीलच सूर्योदय वसतीगृह (हॉस्टेल) मिळाले.

कॉलेजच्या परिसराच्या परिघातच मुलामुलींसाठी अनेक वसतिगृहे होती. नव्याने ॲडमिशन झालेल्या मुलांना सूर्योदय वसतीगृह हमखास दिले जायचे.
हे वसतीगृह कॉलेज पासून थोडे लांब होते. नव्या मुलांना जुन्या मुलांकडून रॅगिंग चा त्रास होऊ नये हे लक्षात घेऊन थोडे वेगळ्या बाजूला हे होस्टेल होते.

आदित्य त्याच्या बाबांसोबत वसतीगृहात ॲडमिशन घेण्यासाठी दाखल झाला.
आदित्य सारखे अनेक नवीन मुलं सुद्धा तिथे ॲडमिशन घ्यायची प्रक्रिया पूर्ण करत होते. होस्टेलचे अधीक्षक श्री पाटील सर यांनी हसून आदित्य आणि त्याच्या बाबांचे स्वागत केले. पाटील सरांचे मोकळे बोलणे आणि हसरा चेहरा यामुळे आदित्य आणि त्याच्या बाबांच्या मनावरचे दडपण लगेच दूर झाले.

"हे वसतीगृह तीन मजली आहे.वसतीगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरच्या काही रूम्स शिल्लक आहेत." पाटील सरांनी सांगितले.
"खास तुम्हाला म्हणून सांगतो त्यापैकी रूम नंबर 13 ही वादग्रस्त असल्याने ती आणि तिच्या समोरची रूम नंबर 12 या दोन रूम सोडून इतर कोणतीही रूम आदित्यने निवडावी." असे त्यांनी बोलण्याच्या ओघात सांगितले.

लगेच त्यांनी वसतीगृहाचा शिपाई असलेल्या रघुला आवाज दिला आणि त्याच्या हातात पहिल्या मजल्यावरील रिकाम्या रूमच्या चाव्या दिल्या.

" रघु ,यांचे नवीन ॲडमिशन आहे.तिसऱ्या मजल्यावरच्या रूम्स यांना दाखव आणि त्यातली जी पसंत पडेल तिथे यांना शिफ्ट कर." पाटील सर

रघु च्या पाठोपाठ जिना चढत ते वरच्या मजल्यावर पोहोचले. त्या मजल्यावर असलेल्या १३ रूम पैकी आठ रूम आधीच भरलेल्या होत्या.

"हे बघा साहेब, यातल्या आठ पर्यंतच्या रूम तर आधीच भरलेल्या आहेत त्यामुळे रूम नंबर ९,१0 किंवा ११ यापैकी कोणतीही एक रूम तुम्ही घेऊ शकता." रघु.

रघु आणि त्याचे बाबा बोलत असताना आदित्य मात्र तिथून पुढे चालत चालत शेवटच्या रूम नंबर १३ जवळ पोहोचला. ही रूम त्या मजल्याच्या दुसऱ्या टोकाला असल्याने तिथून पण वरती आणि खाली यायला दुसरा जिना होता. बारा रूम सरळ सरळ एका रेषेत असताना ही रूम मात्र इमारतीचा तो भाग तिथून थोडा वक्राकार असल्याने मुळातच इतर रूम पेक्षा आपले वेगळेपण राखून होती. त्या रूमचे ते वेगळेपण आदित्यच्या अगदीच मनात ठसले.
"ही रूम का देत नसतील बरं?" नकळतच त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला.

इकडे आदित्य रूम नंबर १३ जवळ उभा दिसताच रघुचा फारच गोंधळ उडाला.
" अहो,इकडे परत बोलवा तुमच्या मुलाला. पाटील सरांनी ती रूम नाही घ्यायची हे सांगितलं नाही का तुम्हाला?" रघु आदित्यच्या वडिलांना बोलला.


"आदित्य, तिकडे काय करतोस बाळा? ये इकडे लवकर." म्हणत आदित्यच्या वडिलांनी त्याला बोलवून घेतले.

लागलीच तो तिथून रघु आणि त्याच्या बाबांकडे परत आला.
" अहो काका,ती रूम नंबर १३ एकदम भारी वाटली. मला मिळू शकते का ती?" आदित्य

" तुम्हाला सरांनी सांगितलं होतं ना, ती रूम वादग्रस्त आहे त्यामुळे ती रूम आम्ही कुणालाच देत नाही." रघु


"अहो काका, मग निदान १२ नंबरची तरी द्या." आदित्य

"अहो साहेब जरा समजवा ना आपल्या लेकाला, पाटील साहेब बोललेच असतील ना तुम्हाला ? कुणाचेही न ऐकता जर तुम्ही पुन्हा पुन्हा त्या रूम कडे गेले तर होणाऱ्या परिणामांना आम्ही जबाबदार असणार नाही हे मी आताच सांगून ठेवतो.
तेव्हा लेकाला कसं समजावून सांगायचं ते तुम्हीच बघा."

" तुम्ही काळजी करू नका, मी सांगतो त्याला नीट समजावून आणि ही रूम नंबर ११ बरी आहे. इथेच राहील आमचा आदित्य. हो ना रे बाळा." बाबा

बाबांचा दटावणीचा सूर आणि रघूचा एकदम सावध पवित्रा बघून आदित्य अखेर ११ नंबर च्या रूम मध्ये राहायला तयार झाला.

" पण ती रूम कां बरं नाही देत तुम्ही?" एवढे होऊनही आदित्य ने कुतूहलाने प्रश्न विचारला.

"अरे बाबा बऱ्याच मुलांना चित्र विचित्र अनुभव आल्याचे बोलले जाते त्या रूम मध्ये. भुताटकी सारखा प्रकार आहे म्हणतात तिथे. इतकेच नव्हे तर एकाने रूम नंबर १२ घेतली होती ,त्याच्या डोक्यावर परिणाम होऊन तर वेडात त्याने आत्महत्याच केली. ते प्रकरण निस्तरता निस्तरता नाकी नऊ आले आमच्या. तेव्हा पासून ती रूम आम्ही कुणालाच देत नाही. परत दुसरी गोष्ट म्हणजे या बाजूच्या जिन्याने जाणे येणे करायचे नाही.फार वाईट अनुभव येतात."

हे सगळं ऐकून घाबरून जाण्याऐवजी आदित्यचे मात्र कुतूहल जागृत झाले.

"हे बघ आदित्य, तू फार चौकस आहेस पण हा चौकसपणा बाजूला ठेवून तू आता फक्त आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं असं मला वाटते. याबाबतीत तुझ्याबद्दल काही कंप्लेंट आलेली मला चालणार नाही."बाबांनी आदित्यला सांगितले.

तूर्तास आदित्यने सुद्धा त्या रूम कडे फारसे लक्ष द्यायचे नाही हे स्वतःच्याच मनाला बजावून ठेवले.

नवीन कॉलेज ,नवीन मित्र आणि आवडीचा विषय सगळेच अगदी मनासारखे जुळून आल्याने आदित्य फार खुश होता.सरावाने त्याने स्वतः ला या नव्या वातावरणाशी फार छान जुळवून घेतले होते. सध्या त्याचे लक्ष त्याने पूर्णपणे अभ्यासावर केंद्रित केले होते. त्यामुळे इतर कोणत्याही गोष्टींचा विचार सुद्धा त्याच्या मनाला शिवला नव्हता.पण आज कां कोण जाणे त्याला थोडे अस्वस्थ वाटत होते

दुपारी पाटील सरांच्या केबिन मधे त्याच्या रुमच्या बाथरूम मधील गळणाऱ्या नळाबद्दल सांगायला गेला असता त्याला त्यांनी त्याबद्दल जाब विचारला .त्यांची एकंदरच वागण्या बोलण्याची पद्धत आदित्यला खटकली होती पण जाऊदे मलाच असे वाटलेे असेल असा विचार करत त्याने तो विषय तिथेच झटकला.कदाचित पाटील सरांचे असे वागणे त्याला अपेक्षित नव्हते. त्यांचे एक वेगळेच रूप त्याने आज पाहिले होते.


त्या दिवशी त्याने तो विषय तिथेच सोडून दिला तरी पण अलीकडे पाटील सरांच्या वागण्या बोलण्यात बरेचदा विसंगती असते असे वारंवार त्याच्या निदर्शनास येत होते. पाटील सरांचे बोलणे जरी वर वर मृदू असले तरी ते मुळात तसे नाही आहेत असे त्याला इतक्यात नेहमीच वाटायचे अन् त्या दोन रूम्स बद्दलचे कुतूहल पुन्हा त्याच्या मनात जागृत व्हायचे.



काय होईल पुढे? आदित्य त्या रुमचा विचार सोडून देईल की पुन्हा त्याचे कुतूहल जागृत होऊन तो रूमच्या मागे लागेल ?
बघुया कथेच्या पुढच्या भागात.

क्रमशः..

🎭 Series Post

View all