रूम नंबर १३ : भाग ५

आदित्यने सुटकेचा निःश्वास सोडला,त्याचं साहस अखेर फळाला आलं होतं. रूम नंबर १३ चं रहस्य अखेर उलगडलं होतं.
रूम नंबर १३ : भाग ५

दुसऱ्या दिवशी सकाळी नेहा कालचाच विचार डोक्यात घेऊन कॉलेजला गेली. तिची नजर आता आदित्यला शोधत होती. दुरूनच तिला आदित्य दिसला आणि तिने तिचा मोर्चा त्याच्याकडे वळवला.

"आदित्य, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं" नेहा

"अरे नेहा, बोल ना काय काम होतं?" आदित्य

"काल तू बाबांना दवाखान्यात घेऊन गेलास त्यासाठी पहिल्यांदा थँक्यू , पण मला एक प्रश्न पडलाय. तुला माझ्या बाबां बद्दल, त्यांच्या तब्येतीबद्दल कसं काय कळलं? आणि माझ्या घराचा पत्ता तुला नेमका कुणी सांगितला?" नेहा

"नेहा तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील जर माझ्या प्रश्नाचं खरं खरं उत्तर तू दिलंस तर." आदित्य

"मला कळलं नाही नेमकं तुला काय म्हणायचं आहे ते?" नेहा

"मला एक सांग तुझ्यासारखी इतकी हुशार मुलगी इतक्या वाईट गोष्टीच्या मागे कशी काय लागू शकते? जर तू हे तुझ्या बाबांसाठी करत असशील तर एकदा विचार कर की हे जर तुझ्या बाबांना समजलं तर त्यांना कसं वाटेल?" आदित्य

"आदित्य मला कळत नाहीये तू काय आणि कशाबद्दल बोलतो आहेस?"नेहा

"नेहा तुला सगळंच कळलेलं आहे, नेमकं प्रकरण काय आहे ते मला नीट सांग नाहीतर मी तुझ्या बाबांना जाऊन हे सगळं सांगेन." आदित्य

" प्लीज आदित्य असं करू नको, मी तुला सगळं कायते सांगते." नेहा

नेहाने आदित्यला सगळं प्रकरण थोडक्यात सांगितले. त्याचा अंदाज अगदी बरोबर होता. नेहाच्या परिस्थितीचा फायदा घेत आणि मुलींपर्यंत पोहोचण्यासाठी माध्यम म्हणून ते नेहाचा वापर करून घेत होते.

" एक गोष्ट मात्र मला नेहमीच जाणवत आहे, माझ्यापर्यंत पोहोचणारे माध्यम जरी पाटील सर असले तरी कुणीतरी मोठा व्यक्ती या सगळ्यांच्या मागे आहे. तो नेमका कोण? हे मात्र मला अजूनही कळलेलं नाही." नेहा

ही गोष्ट आदित्य साठी सुद्धा खूप नवीन होती. याचाच अर्थ त्याने विचार केला होता त्यापेक्षाही ते रॅकेट फार मोठे होते. आता हा नवीन व्यक्ती कोण हा शोध लावणे हे खूप मोठे टास्क त्याच्यापुढे होते.

" नेहा मी या प्रकरणाचा छडा लावायचं ठरवलं आहे मला यात तुझी मदत लागेल आणि ती तू करावी ही माझी इच्छा आहे." आदित्य

"आदित्य मला पण ह्या गोष्टी करायला आवडत नाही रे, पण माझा नाईलाज आहे आणि मी यासाठी मदत करते हे कळलं तर त्याचे काय परिणाम होतील याचा मी विचारच करू शकत नाही. खूप भयंकर आहेत ही सगळी माणसं." नेहा

"हे बघ नेहा, मागेपुढे जर तू यात पकडली गेलीस तरी पण त्यातून काही चांगलं निष्पन्न होणारच नाही आहे. तर मग निदान काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न तर करूया." आदित्य

आदित्यचं बोलणं नेहाला पटलं होतं.

"आदित्य माझ्या माहितीनुसार आज एक मोठी पार्टी डील साठी येणार आहे.ती डील नेमकी कॉलेजच्याच आवारात आहे आणि पाटील सर फोनवर बोलत होते त्यावरून ती मुख्य व्यक्ती आज त्यासाठी उपस्थित असणार आहे." नेहा

" नेहा ,मला वाटते इथले संगणकावरील काम तूच बघतेस."

" माझी खरी गरज त्यांना त्याच्याच साठी आहे." नेहा

" तू तिथे असलेली माहिती,त्यांचे अड्डे आदी सगळ्यांचे फोटो काढून मला मोबाईल वर पाठव.तू आजच्या मीटिंग डील चे अपडेट्स मला देत रहा. मी तसे पोलिसांना कळवतो." आदित्य.

आदित्यने आधीच पोलिसांना त्याच्या होस्टेल मध्ये सुरू असणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करी बद्दल माहिती दिली होती. याआधी त्याच्याजवळ असलेले फोटोच्या माध्यमातील पुरावे त्याने दाखवले होते. पोलीसांनी सुद्धा त्यांच्या पद्धतीने तपासाला सुरुवात केलीच होती.पण फक्त श्री. पाटील सरांना अटक करून प्रकरण संपणार नव्हते या मागचा खरा सूत्रधार समोर येणे गरजेचे होते.त्या अनुषंगाने आजच्या मीटिंग वर लक्ष केंद्रित करणे गरजेचे होते.

" हॅलो आदित्य,मीटिंग रूम नंबर १३ मध्येच आहे रात्री १० वाजता." नेहा

"अरे व्वा!हे फार छान झाले.मला तिथल्या सगळ्या खाणाखुणा माहीत आहेत. मी तिथे लपून बसेल आणि योग्य वेळ आली की पोलिसांना कळवेन." आदित्य

" हे फार धोकादायक आहे आदित्य,जर तू पकडला गेलास तर ते लोकं तुझे काय हाल करतील याचा मला विचारच करवत नाही." नेहा


" हे बघ नेहा,या सगळ्या गोष्टींचा छडा लावायचा असेल तर जोखीम ही पत्करावीच लागणार आहे आणि त्यासाठी मी माझ्या मनाची पूर्ण तयारी केली आहे. मी इन्स्पेक्टर जाधवांचा नंबर तुला देऊन ठेवतो. तुला अशी काही शक्यता वाटली तर तू त्यांना जरूर कॉल कर." आदित्य.


रात्री ठरल्याप्रमाणे आदित्य खिडकीच्या मार्गाने रूम नंबर १३ मध्ये जाऊन मोठ्या पडद्यामागे लपून बसला. वेळेच्या सुमारे पंधरा मिनिटे आधी श्री पाटील तिथे पोचले. बरोबर साडे दहाला समोरची पार्टी सुद्धा पोचली.

"बॉस कुठे आहेत तुमचे? बोलवा त्यांना." समोरचा माणूस बोलला

"सर येतीलच आता इतक्यात मी त्यांना फोन लावतो.इथे धोके फार आहेत ना त्यामुळे ते आधी आले नाहीत." म्हणत पाटीलांनी कॉल लावला.

बिल्डिंगच्या खालून नेहा सर्व घडामोडींवर लक्ष ठेऊन होती. नुकतेच तिने दोन जणांना रघुशी बोलतांना आणि त्यानी केलेल्या इशाऱ्यानंतर वर जातांना पाहिले होते. तिने लगेच ते इन्स्पेक्टर जाधवांना कळवले. जाधवांचे काही साथीदार अगदी साध्या वेशात तेथील घडामोडींवर लक्ष ठेऊन होते.

बस काही मिनिटेच झाले असतील तर नेहाला कॉलेज चे डीन त्या बिल्डिंग कडे येतांना दिसले.

" सर इकडे कसे? सरांना या घटनेची कुणकुण लागली की काय? पोलिसांनी तर यांना विश्वासात घेऊन या कारवाईत सामील केले नसेल ना ?" असे बरेच विचार नेहाच्या मनात तरळून गेले पण आपण फक्त वेट ऍण्ड वॉच एवढंच करायचं हे तिने मनोमन ठरवून टाकले.

इकडे आदित्यला बॉस येण्याआधीच्या अवधीत श्री पाटील आणि त्या दोन जणांचा फोटो घ्यायचा मोह आवरला नाही. काही वेळातच त्याने हातातल्या मोबाईलने त्यांचा फोटो घेण्यासाठी क्लिक केले ...

अन् हाय रे दैवा, मोबाईल चा फ्लॅश चमकला अन् सगळे सावध झाले.

सगळे आता आदित्यच्या दिशेने बघत होते. पाटील उठून तिथे आले आणि आदित्यला पाहून चापापलेच!

"तू खूप चौकस आहेस, आदित्य," श्री पाटील म्हणाले, "पण तू चुकीच्या गोष्टींमध्ये नाक खुपसलंस."

आदित्य शांतपणे म्हणाला, "मला वाटतं तुम्हीच चुकीच्या गोष्टी करत आहात, सर. आणि आता सगळं संपलं आहे."

"काही संपलेलं नाही, आता बॉस आले की तुझीच काही धडगत नाही." पाटील

हे सगळं सुरू असतांनाच अचानक कॉलेज डीन देशमुख सरांची तिथे एंट्री झाली.

" बरं झालं सर तुम्ही आलात. बघा तुमच्या नजरेआड या कॉलेज होस्टेल मध्ये काय सुरू आहे ते." आदित्य धावतच डीन सरांकडे गेला.


आदित्यचे बोलणे ऐकून श्री पाटील सर आणि डीन देशमुख सर जोरजोराने हसायला लागले.

" हो बेटा आदित्य हो, मी नक्कीच बंदोबस्त करीन पण पाटील सरांचा नाही तर तुझा मूर्खा. जास्तच स्मार्ट बनायला लागला होतास ना, थांब आता सगळा स्मार्टनेसच काढतो तुझा."

जे काही घडतं होतं त्यावर आदित्यचा स्वतः चा विश्वास बसत नव्हता. त्याचं डोकं पूर्णत: बधीर झालं होतं.

" सरर्र.. म्हणजे तुम्ही आहात या सगळ्याच्या मागे? "

"पाटील, रघुला बोलवा आणि याला सुद्धा वरच्या टेरेस वरून ढकलून द्या. सगळ्यांना कळलं पाहिजे रूम नंबर १३ शी पंगा घेणं किती धोकादायक आहे ते." देशमुख सर बोलले.

तेवढ्यात,भराभर पावलांचा आवाज आला
"पोलीस! कोणीही हालचाल करू नका! हवालदार, ताब्यात घ्या सगळ्यांना." इन्स्पेक्टर जाधव म्हणाले.

"अहो, मी डीन आहे इथला, मला काय ताब्यात घेताय."

साहेब आम्ही इथेच होतो,तुमच्या विरुद्धचे सर्व पुरावे आहेत आमच्याकडे, अरेस्ट वॉरंट पण आहे.आता बऱ्या बोलाने चला,जे काही सिद्ध करायचं ते कोर्टात करा."

पोलिसांनी सगळ्यांना ताब्यात घेतले.

नंतर, पोलीस अधिकारी आदित्यकडे आले. "तुझं धैर्य आणि बुद्धिमत्ता वाखाणण्याजोगी आहे," ते म्हणाले. "तू आणि त्या नेहाने एक मोठं ड्रग्ज रॅकेट उघडकीस आणलं. तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे."

आदित्यने सुटकेचा निःश्वास सोडला. त्याला जाणवलं की त्याचं साहस शेवटी फळाला आलं होतं. रूम नंबर १३ चं रहस्य शेवटी उलगडलं होतं, आणि न्यायाचा विजय झाला होता.

त्या रात्री, वसतिगृह शांत झालं. पण आता ती शांतता वेगळी होती - ती सुरक्षिततेची आणि न्यायाची शांतता होती. आदित्यने त्याच्या खिडकीतून बाहेर पाहिलं, त्याला जाणवलं की कधीकधी सत्य शोधण्यासाठी धोका पत्करावा लागतो, पण शेवटी ते नेहमीच योग्य असतं.

समाप्त.
© डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

🎭 Series Post

View all