रूम नंबर १३ : भाग ४

"पण आदित्य नेमका इथे आलाच कसा?" हा प्रश्न मनात घेऊनच अखेर नेहा झोपून गेली.
रूम नंबर १३ :भाग ४


त्याने नेहाचे बारकाईने निरीक्षण करायला सुरुवात केली. तिच्या वागण्यात काहीतरी बदललेले जाणवत होते - ती अधिक शांत झाली होती, वर्गात कमी बोलत होती. एके दिवशी, आदित्यने तिला श्री पाटील यांच्याशी कुजबुजताना पाहिले, त्यांचे चेहरे चिंताग्रस्त दिसत होते.


त्याला कारणही तसेच होते. सध्या पोलीस विभागाने गृह मंत्र्यांच्या आदेशावरून अंमली पदार्थांच्या तस्करीवर विशेष लक्ष घालणे सुरू केले होते. त्यासाठी बऱ्याच ठिकाणी छापेमारी करणे सुरू झाले होते. बरेच ड्रग्ज रॅकेट यात उघडकीस आले होते. ह्या सगळ्या कारवाया म्हणजे श्री पाटील सरांसाठी एकप्रकारे धोक्याची घंटाच होती त्यामुळे त्यांची चिंताग्रस्तता अलीकडे वाढली होती.


आदित्य मात्र आता हे प्रकरण समूळ उखडून टाकण्याच्या प्रयत्नात होता. पाटील सर आणि नेहा यांच्या बोलण्यातून हे सगळं करतांना त्यात जीवाला किती धोके आहेत आणि श्री पाटील हे किती शातिर डोक्याचे आहेत याची कल्पना आदित्यला आली होती. त्यासोबतच नेहा इकडे कशी वळली? या प्रश्नाचा सुद्द्धा छडा त्याला लावायचा होता. मात्र त्यासाठी प्रत्येक गोष्ट अगदी सावध पणाने करावी लागेल, त्यामुळे काही दिवस नुसते वेट अँड वॉच ची भूमिका घेत सावधपणे तो सगळ्या गोष्टींचे निरीक्षण करत राहिला.

सर्वात आधी त्याने त्याच्या रूम नंबर ११ मधून म्हणजे त्याच्या खिडकीच्या बाल्कनीतून रूम नंबर १३ च्या खिडकी पर्यंत पोचवणारी स्लाबचीच एक चिंचोळी पट्टी त्याने शोधून काढली. जेणेकरून त्याला सहज या रूम मधून त्या रूम मध्ये वेळोवेळी जाता येईल. हा मार्ग सुद्धा अतिशय धोक्याचाच होता,अगदी थोडा जरी तोल गेला तरी कपाळमोक्षच! पण तरीही तो त्याला सुरक्षित वाटत होता कारण समोरच्या दारातून आत प्रवेश करणे किती धोकादायक आहे याची त्याला चांगलीच जाणीव झाली होती. त्यादिवशी तो कसाबसा तिथून निसटला होता नाहीतर दार बंद झाल्यानंतर तिथून बाहेर पडणे त्याच्यासाठी फार अवघड झाले असते. वाघाच्या गुहेत कधीकाळी फसलाच तर त्यातून सुटका होण्याचा तो एकमेव मार्ग होता. गुप्ततेसाठी लावलेल्या पडद्यांमुळे लॉक न केलेली खिडकी सुद्धा त्यात लपून जाणार होती.

हळू हळू त्या मार्गाने जाऊन त्याने तिथल्या सगळ्या गोष्टींचे फोटो काढून आणले.संगणकामधील काही फाईल्सचे, टेबल वरील मॅप्स आदीचे फोटो त्याने काढून घेतले पण काही फाईल्स मात्र ओपन होत नसल्याने पूर्ण माहिती त्याच्या हातात लागली नव्हती. त्या फाईल्स च्या पासवर्ड साठी नेहा वर नजर ठेवणे आता गरजेचे झाले होते. त्यातच ती त्याच्याच बॅच ची असल्याने ती तिकडे वळली कशी या त्याला सातत्याने पडणाऱ्या प्रश्नाचा पण शोध त्याला लावायचा होता. त्यामुळे त्याने पुढे सारे लक्ष नेहावरच केंद्रित केले.

नेहाबद्दल माहिती काढली असता त्याला कळले की नेहा अतिशय हुशार पण गरीब घरची मुलगी आहे. घरी फक्त ती आणि तिचे वडील असे दोघेच जण असतात. त्यातही नेहाचे वडील सातत्याने आजारी पडायचे त्यामुळे ते चालवत असलेली छोटी चहाची टपरी सुद्धा अधून मधून बरेचदा बंदच असते. त्यामुळे नेहा छोटे मोठे काम करत अर्थार्जन करून शिकते.

"एवढी गुणी मुलगी या रॅकेट मध्ये फसली कशी?" आदित्य पुन्हा विचार करू लागला.
कदाचित नेहाच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत पाटील सरांनी तिला इकडे ओढले असण्याची शक्यता होती.

पुन्हा काही पुरावे मिळतात का, हे बघायला आदित्य त्याच्या राजरस्त्याने म्हणजेच खिडकीतून रूम नंबर १३ कडे जाऊ लागला. खिडकिमधून तो आत प्रवेश करणार इतक्यात त्याला त्या रूम मधून बोलण्याचा आवाज ऐकू येऊ लागला अन् खिडकिखाली लपून त्याने कान देऊन रूमच्या आतील संभाषण ऐकण्याचा प्रयत्न केला.

" सर, मला थोडे पैसे हवे होते,बाबांची तब्येत पुन्हा बिघडली त्यांना डॉक्टर कडे न्यायचे आहे." आवाजावरून ती नेहा असल्याचे त्याला कळले.

" हे बघ मागच्याच आठवड्यात तू पैसे मागितले होते, आता पुन्हा मिळणार नाही.तुला कितीदा सांगितलं आहे की इथे माझ्या मागे मागे कुणाला संशय येईल असं भेटायला यायचं नाही म्हणून. अशाने संशय बळावेल सगळ्यांचा. फक्त मी सांगेन आणि काम असेल तेव्हाच यायचं तू." पाटील सरांचा आवाज होता तो.

" मी नाही येत सर इथे कामाशिवाय पण आज अडचण असल्याने यावे लागले. प्लीज सर, थोडे तरी पैसे द्या हो. एवढी जोखीम घेऊन तुमच्यासाठी काम करते मी, प्लीज अगदीच थोडे तरी द्या."


" सॉरी, मी स्वतः च्या मताने एक दमडीही तुला देऊ शकत नाही आणि माझ्याकडे सध्या पैसे नाहीत." पाटील सर बोलले.


नेहाच्या तिथून निघून जाण्याची चाहूल त्याला लागली. पाटील सर आत असताना आत जाण्यात काही अर्थच नव्हता त्यामुळे आदित्य आल्या रस्त्याने माघारी वळला.

नकळत अशा परिस्थितीत सुद्धा नेहा बद्दल त्याच्या मनात सहानुभूती निर्माण झाली. त्याने त्याचा मोर्चा आता नेहा कडे वळवायचे ठरवले.

त्याने आधीच माहिती काढून ठेवल्याने नेहा कुठे राहते हे त्याला माहीत होते.खिशात पैशाचे पाकीट घेऊन लगोलग तो नेहा कडे गेला.

नेहा अजूनही घरी आली नव्हती ,कदाचित पैसे जमवण्यासाठी ती इकडून तिकडे
खेटे घालत होती.

आदित्यने नेहाच्या घरी जाऊन पाहिले तर त्याल नेहाचें बाबा फार आजारी दिसले.

" काका, मी नेहाचा मित्र आहे आदित्य,ती कामात गुंतल्याने तिने मला तुम्हाला डॉक्टर कडे न्यायला सांगितले आहे." म्हणत आदित्य नेहाच्या वडिलांना डॉक्टर कडे घेऊन गेला.

औषध आणि उपचाराने त्यांना बरे वाटले.

रात्री जेव्हा निराश अवस्थेत नेहा घरी परतली, बाबांसाठी आपण काहीच करू शकलो नाही याचे शल्य तिला होते पण घरी येऊन बघते तर बाबांची अवस्था सकाळ पेक्षा आता एकदम बरी आहे आणि ते आता अतिशय फ्रेश आहेत हे तिला जाणवले.

" किती काळजी करशील बेटा माझी? तू नाही येऊ शकली तर तुझा मित्र आदित्यला पाठवलेस मला डॉक्टर कडे घेऊन जायला. मी बरा आहे ,जेऊन घे आणि झोप आता तू." बाबांचे बोलणे ऐकून नेहा अतिशय विचारात पडली.

पाटील सरांनी पैसे न देऊन तिचा विश्वास तोडला होता तर आदित्य जो तिचा फक्त वर्गमित्र होता तो काही ध्यानीमनी नसतांना तिच्या बाबांना दवाखान्यात घेऊन गेला होता." अपेक्षाभंग अन् आश्चर्य असे दोन्ही भाव ती एकाच वेळी अनुभवत होती.

"पण आदित्य इथे नेमका आलाच कसा?" हा प्रश्न मनात घेऊनच अखेर नेहा झोपून गेली.

नेहा पुढे काय करेल?


क्रमशः

🎭 Series Post

View all