गाण्यावरून कथा -
हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता - भाग १
सायलीची नजर त्याला शोधत होती. तिने पूर्ण बसभर नजर टाकली पण तिला तो कुठेच दिसला नाही. तिच्या मनाला हुरहुर लागून राहिली. कारण फक्त सकाळी बस मध्येच तो दिसत होता नंतर पूर्ण दिवसभर काही त्याची छबी ती पाहू शकत नव्हती. सायली ज्या सोसायटीत राहत होती तिच्या घरासमोरच नेने काकू राहत होत्या. त्यांच्या घरी एक तरुण राहायला आला होता. बरेच दिवस ती त्याला तिकडे बघत होती. सोसायटीची एक स्टेशन पर्यंत जाणारी बस होती. सायली रोज ऑफिसला जाताना स्टेशन पर्यंत त्याच बसने जात होती. तो तरुण पण तिच्याच बसमध्ये असायचा. रोज नजरानजर व्हायची. सायलीला तो आवडू लागला होता. त्या तरुणाला पण ती आवडत होती. सायली दिसायला देखणी होती. मध्यम उंची, कमनीय बांधा, लांब सरळ केस, पिंगट डोळे. कोणालाही बघता क्षणीच आवडेल अशी होती सायली. तो तरुण पण पावणेसहा फूट उंची,गव्हाळ वर्ण, कुरळे केस आणि कोरलेली दाढी असा खूपच रूबाबदार दिसायचा.
एक दिवस सायली बसमधून उतरल्यावर तो तिच्या मागे चालत असताना त्याने तिला 'शुकशुक' केले. सायलीने वळून बघितल्यावर तो हलकासा हसला. सायलीने पण त्याला हसून प्रत्युत्तर दिलं. तो तिला म्हणाला,
" मी तुम्हाला रोज समोरच्या घरात बघतो. तुमचं नाव काय." सायली म्हणाली,
"माझं नाव सायली. मी पण बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला बघते. तुम्ही त्यांच्याकडे राहायला आला आहात का?"
"हो ते माझं मामाचं घर आहे. मी आता इथे नोकरीला लागलोय म्हणून त्यांच्याकडे रहातोय. माझं नाव अजय आहे." त्याने विचारलं,
"तुम्ही कुठे नोकरी करता?"
" मी चर्चगेटला एका राष्ट्रीयकृत बँकेत नोकरीला आहे. आणि तुम्ही?"
"मी वरळीला जातो. मी आर्किटेक्ट आहे. माझी ट्रेन येतेय मी निघतो आता." दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला.
अजय कधीपासून तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत होता पण आज योग जुळून आला. इकडे सायली पण तो बोलल्यामुळे मनातून खूप खुश झाली. दोघेही दुसऱ्या दिवसाची वाट बघत होते. सायली आज लवकरच तयार झाली. तिने विचार केला की बस स्टॉपवर जाऊन थांबूया. ती बस स्टॉपवर पोहोचली आणि पाहते तर काय तिच्या आधीच अजय तिथे हजर होता. त्या दिवसानंतर दोघांमध्ये खूप गप्पा होऊ लागल्या, दोघांची खूप छान मैत्री झाली. सकाळी बसमध्ये भेटून त्यांचे समाधान होत नव्हतं. म्हणून त्यांनी ठरवलं की दर शनिवारी आपण बाहेर कुठेतरी भेटायचं. सायलीला अजयची कल्पना खूप आवडली.
पहिल्या शनिवारी ते नरिमन पॉईंटला गेले. समुद्राच्या लाटा बघत एकमेकांशी बोलताना अजय तिला म्हणाला,
"सायली नोकरी लागून किती वर्ष झाली?"
"झाली की चार वर्ष."
"मग तुझ्या घरचे आता तुझ्या लग्नाचं बघत असतील."
"हो बघतात ना. अजय तुझ्या घरी कोण कोण असतं? आणि तुझं घर कुठे आहे?"
"अगं मी नगरला राहतो आणि माझ्या घरी माझी आई, बाबा आणि एक लहान बहिण आहे. सायली मला तू खूप आवडतेस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. माझ्याशी लग्न करशील का?"
अजय इतक्या लवकर लग्नाचं बोलल्यामुळे सायलीला त्याचा खूप विश्वास वाटू लागला. तिने तिच्या प्रेमाची ग्वाही त्याला दिली. दोघे दर शनिवारी भेटू लागले. सायलीला आता जळी स्थळी काष्ठी पाषाणी अजय दिसू लागला होता. साधारण एक वर्षभर दोघे फिरत होते. एक दिवस सकाळी तो बसला आलाच नाही. तिने त्याला कॉल केला पण त्याचा फोन स्विच ऑफ येत होता. तिच्या मनाला हुरहुर लागून राहिली होती की अजयला काय झालं असेल. संपूर्ण दिवस ती त्याच्याच विचारात हरवली होती. संध्याकाळी घरी आल्यावर तिने समोरील घराचा कानोसा घेऊन बघायचा प्रयत्न केला. पण तिला त्याची काही चाहूल लागली नाही.
त्यानंतर अजून चार-पाच दिवस अजय आला नाही. ती त्याला फोन करून थकली होती. त्याने तिला फोन करण्याचा प्रयत्नही केला नाही. शेवटी न राहवून ती एक दिवस समोरच्या घरी गेली. अजयची आणि तिची ओळख झाली आहे हे नेने काकूंना माहिती होतं. त्यांनी तिला घरात घेतलं आणि विचारलं,
"काय ग तू समोरच्या घरातली सायली ना?"
" हो. अजय कुठे दिसत नाही. बसला पण नसतो हल्ली. कुठे गेलाय का तो! त्याचे पुस्तक होतं माझ्याकडे ते मला द्यायचं होतं म्हणून विचारते "
"अगं पाच सहा दिवसापूर्वीच अजय तिथे कंपनीच्या जवळच मित्र रहातो त्याच्या घरी राहायला गेला आहे. मित्र सुद्धा एकटाच असतो म्हणून तो तिथे गेला. तिथून त्याला जाणं येणं सोयीचं होतं."
"हो का अच्छा हरकत नाही. तो भेटल्यावर त्याला पुस्तक देईन. तुम्हाला त्या मित्राचा पत्ता माहिती आहे का?"काकू म्हणाल्या,
"नाही ग त्याने काय सांगितलं नाही मला."
सायलीने पुन्हा अनेक वेळा त्याला फोन करायचा प्रयत्न केला परंतु त्याचा फोन स्विच ऑफ येत होता. सायलीला काहीतरी चुकतंय ह्याची जाणीव होऊ लागली. तिला त्याच्या ऑफिसचा पत्ता माहित होता. एक दिवस ती तिथे रजा घेऊन गेली. तिथे चौकशी केल्यावर तिला कळलं की त्याने ही नोकरी सोडून तो इथून निघून गेला. आता सायलीची खात्री झाली की अजय आपल्याशी खोटं बोलला. त्यांने आपल्याशी फक्त टाईमपास केला आणि म्हणूनच सुरुवातीलाच तो लग्नाबद्दल बोलला. सायलीने विचार केला तो जर इथे मुंबईत असेल तर आपल्याला कधीतरी भेटेलच. तेव्हा त्याला चांगलेच खडसावून विचारायचं.
(सायलीला अजय भेटतो की नाही. ती पुढे काय करते हे पाहूया पुढच्या भागात)
क्रमशः
©️®️ सीमा गंगाधरे
