ऋणको भाग ४ था.
मागील भागावरून पुढे---
वैभव ऑफीसमध्ये कामात मग्न होता. तेवढ्यात जयंतनी त्याला विचारलं “वैभव किती राह्यलय काम? लंच टाईम झाला आहे.” “बस झालंच पाच मिनिटात जाऊ.” तेवढ्यात वैभवचा फोन वाजला. ताईचा होता. वैभवनी फोन घेतला. “ ताई पोचलीस का? आता तुलाच फोन करणार होतो.” “अरे आता उतरतेच आहे ऑटोतून. अनघा समोर फोन करण्यापेक्षा आत्ता केला. आता तुझा लंचटाईम झाला असेल नं? जेऊन घे शांतपणे. संध्याकाळी तू घरी आल्यावर बोलू.” “ हो ठीक आहे. तू आहेस म्हणजे अनघा जेवेलच. मी घरी आल्यावर बोलू. ठेवतो.” वैभवनी फोन ठेवला तसाच जयंतनी विचारलं. “ आली नं ताई.” वैभवनी मान होकारार्थी मान डोलावली. वैभव टेबलावरचं आवरून डबा घेऊन उठला. जयंतही उठला. दोघं डबा घेऊन नेहमीच्या जागी जेवायला गेले.
जेवता-जेवता जयंत म्हणाला “ वैभव या सगळ्या उपचारांच्या दरम्यान तुझी ताई तुझ्याबरोबर आहे हे तुझं नशीब आहे. कारण अश्याप्रसंगीच आपल्या पाठीशी कोणीतरी आपलं माणूस हवं असतं.” “हो खरय तुझं बोलणं. आता आईचच बघ ती असं काही बोलेल आणि वागेल असं वाटलंच नव्हतं. अनघा नेहमी म्हणायची त्यांच्या वागण्यातून माझ्यावरचा राग दिसतो. मला मूल होत नाही हा माझा दोष आहे का? पण तेव्हा मला तिच्याच मनातील विचार आहेत असं वाटायचं. कारण माझ्यासमोर आई नेहमीच चांगली वागायची अनघाशी. आता मला अनघाचं बोलणं पटतय. आज आईनी तिच्या मनातील चीड व्यक्त केलीच. पण ती अनघानी ऐकली याचं मला दु:ख वाटतय.”
“असू दे आता फार विचार करू नकोस. काही लोकांचा स्वभाव असतो असा. सोडून द्यायचं. त्यातल्या त्यात एक जमेची बाजू म्हणजे तुझे बाबा तुझ्या बाजूनी आहेत आणि ताई सुद्धा.” “ हो तू म्हणतोस ते खरं आहे. जर माझ्या पाठीशी कोणीच नसतं तर माहित नाही कदाचित आम्ही दोघांनी कधीच हे उपचार घेतले नसते.” “ आता ताई घरी समजावेल अनघाला. तू शांत रहा. घरी गेल्यावर सामोरा-समोर बसून तिला सांग आणि पुढे काय करायचं हे ठरावा.चल आता. जेवण झालय. जेवणाची वेळ सुद्धा संपली आहे.” दोघंही आपापला डबा bagमध्ये ठेवून उठले.
अनघा ताईंची वाट बघत समोरच्या खोलीत बसली होती. थोड्याच वेळात बेल वाजली. अनघानी दार उघडलं. “ या ताई” हसून म्हणाली. ताई पण तिच्याकडे बघून हसली. अनघाचं हसणं ओढून-ताणून आणलेलं आहे हे ताईच्या लक्षात आलं. पण तिनी तसं दाखवलं नाही. ताई सोफ्यावर बसली.” अनघा हे घे डबा. तुझ्या आवडीची फणसाची भाजी आणली आहे. काल मी फणस घेतला तेव्हाच मनात आलं की फणस न देता भाजीच घेऊन यावी. तुला माझ्या हाताची आवडते नं.” अनाघानी तिच्या हातून डबा घेऊन टेबलावर ठेवला आणि सोफ्यावर येऊन बसली. अनघाची चाल नेहमीपेक्षा मरगळलेली आहे हे ताईच्या लक्षात आलं. एरवी याच फणसाच्या भाजीबद्दल किती आनंदानी बोलली असती. आज फक्त डबा टेबलावर ठेवला आणि शांत होती. ताईला हे बरं वाटलं नाही. अनघाला यातून बाहेर काढायला हवं असं तिला वाटत होतं पण कस? ते कळत नव्हतं एरवी सतत बोलणारी अनघा आज तोंडाला चिकटपट्टी लावून बसलेली होती.
शेवटी ताईच बोलली. “ अग आज मी तुमच्याकडे यायचं ठरवलं न तेव्हा आनंद म्हणाला आई तू आज एक दिवस रहा की मामाकडे. मामालाही बरं वाटेल.मी काय पडत्या फळाची आज्ञा स्वीकारून लगेच दोन कपडे घेतले आणि आले.”
ताई एवढं बोलतांना अनघाचा चेहरा न्याहाळत होती. आपण आलेलं आवडलं आहे की नाही हेच ती निरखत होती. एरवी ताईच्या या म्हणण्यावर उत्साहानी दहा वाक्य तरी बोलली असती. आज मात्र ती काहीच बोलली नाही. कुठल्यातरी विचारात गढलेली दिसत होती. बघत ताईकडेच होती पण तरीही तिचं लक्षं ताईकडे नव्हतंचं. तिचं हे वागणं बघून ताईला मनातून भडभडून आलं अनघाला दिसू नये म्हणून ताई पाणी पिण्याच्या निमित्तानी स्वयंपाकघरात गेली. एरवी तिनी ताईला उठूच दिलं नसतं. तीनच पटकन पाणी आणलं असतं. पण सगळंच विपरीत घडतंय. सहाजिक आहे आईचं बोलणं तिच्या वर्मी लागलं असेल म्हणून तिच्या वागण्यात हा नको असा बदला झालाय.
ताईला आपल्या आईचा रागच आला. तिनी अनघावर हा घाव घालतांना मला डोळ्यासमोर का नाही ठेवलं? माझ्यावर अशी वेळ आली असती तर... काय केलं असतं तिनं अनघाला बोलली तशीच मला बोलली असती. ताईनी स्वयंपाक घरातून बाहेरच्या खोलीत बघितलं तर अनघा अजूनही कुठेतरी बघत बसली होती. ताई पाणी आणायला स्वयंपाक घरात गेल्याचं सुद्धा तिला कळलं नव्हतं. ताईला वाटलं बरं झालं आपण आज आलो. आज तर राहूच पण उद्याही हिची अवस्था अशीच राहिली तर उद्याही राहू. वैभव कसा एकटा सांभाळेल. ऑफीसमध्ये सुद्धा त्याचं लक्षं लागणार नाही.
ताई समोरच्या खोलीत येऊन अनाघाजवळ बसली.तरी अनघाला कळलं नाही. “ अनघा अग तुम्ही त्यादिवशी डॉ. मेहतांकडे गेला होता नं? काय म्हणाले ते?” अनघाच्या कानावर सुद्धा ताईचा आवाज गेलेला दिसत नव्हता. ताईनी शेवटी तिला हलवून विचारलं “अनघा मी विचारलं काय म्हणाले डॉ. मेहता?” “ अं... त्यांनी काय उपचार करायला हवेत ते सांगितलं पण बघू.” “का बघू? तुम्हाला बाळ हवाय नं?” “ हो ताई. पण त्याला खर्च खूप येणार आहे. माझी बीजांड खराब झालेली आहेत असं डॉ. मेहता म्हणाले. त्यामुळे माझ्या बीजांडात बीज निर्मिती होत नाही. म्हणून माझ्या शरीरात दुस-या बाईचं बीजांड रोपण करावं लागेल.” एका दमात अनघानी डॉ. मेहता काय म्हणाले ते सांगितलं.पण सांगतांना मात्र तिच्या चेह-यावर ही गोष्ट अशक्य असल्याचा भाव होता. ताईला तिची खूप दया आली. आणि आपण काय करू शकतो यावर ती विचार करू लागली.
थोड्या वेळानी ताई म्हणाली “ चाल अनघा आपण जेऊन घेऊ.” “नको ताई मला भूक नाही. तुम्ही जेवा मी तुम्हाला वाढते.” “ए वेडाबाई एकटच जेवायचं असता तर माझ्या घरी नसते का जेवले.आज तुझ्या आवडीची भाजी मला तुझ्याबरोबर जेवताना खायची आहे. तेव्हा वाहिनीसाहेबा उठावं आपण” ताई मिष्किलपणे म्हणाली आणि अनाघाकडे बघून हसली. आत्ता इतक्या वेळानंतर अनघाच्या चेहे-यावर हसू आलं. ताईला खूपच आनंद झाला आणि आपण अर्धी लढाई जिंकली असं तिला वाटू लागलं
दोघी जेवायला उठल्या. अनाघानी टेबलावर दोघींसाठी पानं मांडली.घराची भाजी ताईनी आणलेली भाजी गरम करून टेबलावर ठेवलं.“ताई तुम्ही बसा मी भात वरण आणते.” ताईपण आज्ञाधारकपणे खुर्चीवर बसली. पानात सगळं वाढून घेतल्यावर जेवताना आता ताई अनघा काही बोलते का हे बघत होती. फणसाची भाजी खातांना आणि खाल्यावर अनघानी नेहमीसारखी दाद दिली नाही. कोणती भाजी आपण खातोय हे तरी तिला कळत होतं की नाही कुणास ठाऊक. तिच्या निर्विकार चेह-याकडे बघतांना ताईच्या घशात घास अडकत होता.
अनघा इतकी निर्विकारपणे जेवत होती की ताई ती बोलण्याची वाट बघते आहे हेही तिच्या गावी नव्हतं. मुक्या माणसाप्रमाणे तिचं वागणं चालू होतं तिला पुन्हा बोलकं कसं करावं याचाच ताई जेवताना विचार करत होती. अचानक अनघा बोलली “ताई ही बीजांड रोपणाची शस्त्र क्रिया करण्यासाठी कोणी स्वत:चं बीजांड देणारी स्त्री मिळाली तरच हे होऊ शकतं.या शस्त्रक्रियेला खर्चंपण खूप आहे. तो आम्हाला झेपायला हवा.” एवढं बोलून अनघाची नजर पुन्हा शुन्यात कुठेतरी हरवली.
ताईला तर अनघा बोलली यावरच विश्वास बसत नव्हता. पण तिच्या बोलण्यानी तिच्या मनावरचा ताण कळला. याला जबाबदार आपल्या आईचं बोलणं आहे हेही ताईला कळलं. सकाळी वैभवनी आई काय म्हणाली ते सांगितलंच होतं तेच बोलणं ताण होऊन अनघाला त्रास देतोय. आता यावर उपाय शोधायलाच हवा. यांचे मुलासाठी चाललेले उपचार आता थांबून उपयोग नाही. विचार करून ताईनी मनाशी काहीतरी ठरवलं. ठरवलेलं वैभव घरी आल्यावर मग बोलावं असा तिनी निर्णय घेतला.
टेबलावरचं ताईनीच आवरून ठेवलं. तिच्यासमोरचं ताट उचललं तरी अनघाला कळलं नाही. एरवी अनघा आपल्याला काही करू देत नाही. माहेरी आल्यात आराम करा असं म्हणते नेहमी. आज तीच कुठतरी हरवली आहे. आपल्याकडे कसं लक्ष असेल. डोळ्यांच्या कडा ताईनी हळूच पुसल्या. “अनघा तू झोप आता. खूप विचार करून तू दमली आहेस.” ताईनी असं म्हणताच अनघाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या. ते बघून ताईनी चटकन तिला जवळ घेऊन थोपटलं. “नको रडूस ग अनघा. सगळं चांगलच होणार आहे. फक्त थोडं धीरानी घ्यावं लागेल. कोण काय म्हणतं याकडे लक्षं नाही द्यायचं कळलं.” अनाघानी फक्त मान डोलावली. अनघा आपल्या खोलीत गेली तशी दुस-या खोलीत गेल्यावर ताईनी खोलीचं दर ओढून घेतलं. तिला वैभवला फोन करायचा होता. तिनी वैभवाला फोन लावला.
वैभव नी फोन उचलला. “वैभव अनघा खूपच अस्वस्थ आहे.आपल्याला तिला खूप सांभाळावं लागणार आहे. तिची सकारात्मकता वाढवायला हवी.नाहीतर ती या उपचाराला तयार होणार नाही.” “ तेच नं आईनी फोन करून घोळ घातला. त्यात मी फोन स्पीकरवर ठेवून चूक केली. पण ताई मला तरी कसा अंदाज येणार की आई असं काही बोलणार आहे.”
“बरोबर आहे तुझं. पण आता झालं गेलं गंगेला मिळालं. आता त्यावर तू फार विचार करायचा नाही तरच तू अनघाला या निराशेतून बाहेर काढू शकशील. आज हे नाही केलं तर मग तिची बाळाबद्दलची ओढच संपेल. असं झालं तर ती उपचार करून घेणार नाही.” “ नाही..नाही ताई असं नको व्हायला. मी स्वत:ला कणखर करतो.” “ शहाणा मुलगा. चल मी ठेवते. तू घरी आल्यावर आपण यावर बोलू.” “ हो” वैभवनी फोन ठेवला.
ताईसुद्धा विचारात पडली की अनघाला यातून बाहेर कसं काढावं हेच तिला कळत नव्हतं. एवढी बडबडी,समजूतदार सहनशील मुलगी तिला बाळ हवयं हा हट्ट आपल्याला पूर्ण करणं एवढं अवघड का आहे? आई का फक्त पैशांचा विचार करतेय. माहिती आहे या उपचार पद्धतीला खूप खर्च येणार आहे पण नंतर त्यामागून सुखही वैभव अनघाच्या आयुष्यात येणार आहे याचा आई का विचार करत नाही.
हा एवढ मोठं घर वैभवनी स्वत:च्या बळावर घेतलं. चाराचाकीसुद्धा घेतली.सोनंनाणं आहे. सगळं आहे आज या दोघांजवळ फक्त या घरात दुड-दुड्णारी पावलं नाहीत. बाळाच्या रडण्याचा,बोबडं बोलण्याचा आवाज नाही. आयुष्यभर अश्याच सुन्या घरात या दोघांनी रहायचं का? दुस-यांच्याच मुलांचे लाड करायचे का? माझ्या आनंद आणि निनादवरच त्यांनी आपलं ममत्व उधळायचं का? हा अन्याय आहे दोघांवर. मला त्यांना पाठिंबा दिलाच पाहिजे. त्यांच्या हक्काची माया तेवढ्याच हक्कानी घेणारं कुणीतरी त्यांच्या आयुष्यात आलचं पाहिजे.
विचारांनी तिचं डोकं दुखू लागलं आणि अनघाची अवस्था बघून मनातच रडू यायला लागलं. तोंडात पदराचा बोळा कोंबून ती हुंदके देऊ लागली.तिच्या डोळ्यातून सतत पाण्याच्या धारा लागल्या होत्या. एवढ्यात तिला अनघाची चाहूल लागली तशी तिनं पटकन डोळे पुसले. “ ताई चहा करू क? तुम्ही झोपला नाही?” दारात अनघा उभी होती. बर झालं ताईची दाराकडे पाठ होती.डोळ्यातील पाणी पुसत ताई बोलली “ हो कर नं. तुझ्या हातचा चहा मला नेहमीच आवडतो.” या वाक्यांनी अनघाच्या चेह-यावर जरा हसू आलं ते बघून ताईला बरं वाटलं. दोघी खोलीच्या बाहेर पडल्या.
------------------------------------------------------------------------------क्रमश: पुढचा भाग परवा वाचा.
लेखिका—मीनाक्षी वैद्य.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा