ऋणानुबंध भाग 1

This story of anjali and pratap.

ऋणानुबंध (भाग १)

"प्रताप, ये नाश्ता करून घे. मग घाई घाईत निघून जाशील तसाच. पोहे केलेत तुला आवडतात तसे " असं बोलत वाफाळते पोहे आणि गरमागरम चहा बाहेर घेऊन आलेल्या अंजलीला प्रतापची गाडी गेट मधुन बाहेर जाताना दिसली. आजकाल हे असंच होत होतं. प्रताप त्याच्या कामाच्या व्यापात इतका गुंतला होता की घर-संसार यातलं त्याचं लक्ष कमी कमी होतंय अस अंजलीला जाणवत होतं. तसा तिचा सगळा वेळ शंतनु मध्ये जात होता. शंतनुच खेळणं, बागडण, त्याने केलेला पसारा आवरणं, त्याचे विविध हट्ट आणि लाड पुरवणं.. विचारांच्या तंद्रीत असताना शंतनूच्या रडण्याच्या आवाजाने ती भानावर आली. आज मीनल घरी नव्हती. मीनल म्हणजे शंतनु ला सांभाळायला असलेली मुलगी. तसा या मीनालचा फार जीव शंतनुवर आणि त्यालाही तिचा फार लळा. अंजली पटकन उठली आणि शंतनूला शांत करून तिने स्वयंपाकाची तयारी सुरू केली.....!!!

इकडे खरंतर अंजली स्वयंपाकाची तयारी करायला लागलेली पण मगासचा विचार तिच्या डोक्यातुन जायचं नाव घेत नव्हता. आणि विचार येतातच आगंतुकासारखे... नको त्या वेळी डोकवायला... मनात वादळासारखे घोंघावायला....डोक्याचा पार भुगा करायला....????!

विचारांच्या फेऱ्यात तिला आठवले ते कॉलेजचे सोनेरी दिवस... तसे प्रत्येकाच्याच कॉलेजचे दिवस हे मोरपंखीच असतात; फक्त परीक्षेचे दिवस वगळता ☺☺☺

१२वी नंतर ताईच्या म्हणण्यापायी तिने बी.कॉम ला ऍडमिशन घेतली. अंजली तशी साधी.. कुणातही चटकन न मिसळणारी... मित्र/मैत्रीण स्वतःच्या आवडीने निवडणारी.. तिचं एक म्हणणं असायचं.. मित्र/मैत्रीण असावेत म्हणुन मैत्री नाही करायची.. तर ती निभवायची म्हणुन करायची..!!! असाच तिचा कॉलेजचा प्रवास सुरु झाला. आणि या विरुद्ध प्रताप.. येता जाता कुणालाही ओळख देणारा आणि कुणाशीही ओळख करुन घेणारा. तासनतास गप्पा मारणारा आणि अवखळपणे कॉलेज मध्ये भ्रमण करणारा.

कॉलेज समोरच्या चहाच्या टपरीवर प्रताप त्याच्या मित्रांसोबत लेक्चर्स नंतर बसलेला असायचा. योगायोगाने अंजलीचा घरी जाताना ही टपरी समोरुनच जायची. सुरवातीला नजरा नजरेच्या खेळात काही दिवस गेले. का कोण जाणे.. पण अंजलीला प्रताप पाहताक्षणीच आवडलेला.. गोरापान ,उंच ,रुबाबदार आणि खूप बोलका..! बोलका कसला.. बडबड्या..!! पण अजुन एक खास गोष्ट होती प्रताप मध्ये ती फक्त अंजलीने टिपलेली... त्याचे बोलके आणि पाणीदार डोळे..!! टपरीसमोरून अंजली जात असताना तेच खूप बोलायचे प्रतापपेक्षा.

ही रोजची नजरानजर हळूहळू ओळखीत परिवर्तित झाली.. अर्थात ओळख प्रतापनेच केली.. नोट्स मागायच्या म्हणुन. त्यावेळी अंजली ला आकाश ठेंगणं झालेलं..???? हळू हळू ओळख मैत्रीत परिवर्तित झाली. मग अंजली, तिच्या २-४ मैत्रिणी आणि प्रतापची गँग.. काहीवेळा लेक्चर्स नंतर काहीवेळा लेक्चर्स बुडवुन.. रोज अड्डा टपरीवर जमु लागला. एकत्र फिरणं.. शॉपिंग.. सिनेमा.. डिनर.. मस्त कॉलेज लाइफ सुरु होतं. मितभाषी अंजली ही आता खुलली होती.. तो असर त्या मित्रांचा होता की प्रतापवरच्या प्रेमाचा..?? हे मात्र तिला उमगत नव्हतं. एकदिवस टपरीवर चहाची वाट बघत असताना प्रताप चोरट्या नजरेने गप्पा मारणाऱ्या अंजली कडे पाहत होता.. ते चहावल्या राजु ने बरोब्बर टिपलं.. अर्थात कितीतरी प्रेमीयुगुलांचा तो साक्षीदार होता.. त्याने हळुच प्रताप ला विचारलं.. काय..?? छान दिसतेय ना..?? आणि प्रताप ही नकळत बोलुन गेला.. छे...!!! सुंदर..!!! त्यानंतर प्रतापला ही जाणवु लागलेलं.. त्याला अंजली आवडतेय.. तिचा सहवास हवाहवासा वाटतोय.. प्रतापच्या मनात हलकेच प्रेमाचा अंकुर उमलू लागलेला..!!! आणि इकडे अंजली..??? ती तर आधीच प्रतापच्या प्रेमात होती.. ओळखीनंतर.. मैत्रीनंतर.. तिचं प्रेम अधिकच गहीरं होत गेलेलं..!!!

दिवस असेच सरत होते.. बघता बघता पहिलं सेमिस्टर, परीक्षा, सुट्या सर्व संपुन दुसरं सेमिस्टर ही सुरु झालेलं. या सुट्टयांच्या काळात कॉलेज सर्वात जास्त कुणी मिस केलं असेल तर ते अंजली आणि प्रताप ने. कॉलेज हेच त्यांचं भेटण्याचं ठिकाण आणि निम्मित होतं. बघता बघता कॉलेजचे डेज ही आले.. साडी डे ला अंजली ने प्रताप ने शॉपिंगच्या वेळी चॉईस केलेली साडी नेसली तेव्हा प्रताप अक्षरशः घायाळ झाला.

आता प्रतापने ठरवलंच.. आपल्या मनातलं अंजलीला विचारायचंच.. आणि एक दिवस अकाऊंटच्या लेक्चरला एक कागदाचा तुकडा हळुच अंजलीच्या हातात आला.. त्यावर लिहिलं होतं -"माझ्या आयुष्याचं Profit and Loss Account Balance करायला मला कायमची साथ देशील का??" अंजली मनातुन बावरली.. लाल झाली.. लाजली..! पण वरून मात्र कळून न कळल्या सारखा करत ती निरागसपणे हसली. त्या हास्यानेच प्रतापला त्याचं उत्तर मिळालं. हळुवार बहरलेली मैत्री गुलाबी प्रेमात बदलली...!!!

दिवसांमागून दिवस सरले. आणि सरणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक प्रताप आणि अंजलीच प्रेम बहरत गेलं. दोघेही एकमेकांत पुर्णपणे गुंतलेले होते. पुढे बी.कॉम. झाल्यावर प्रतापने सी.ए. केलं. स्वतःची फर्म ही सुरु केली. आणि इकडे अंजलीने तिची आवड जोपासण्याचा निर्णय घेतला. अर्थात त्याला प्रतापनेच पाठबळ दिलेलं. अंजली लहानपणापासुन कथ्थक शिकत होती. मात्र ताईच्या आग्रहासाठी तिने बी.कॉम. पुर्ण केलं. पण दरम्यान प्रतापने तिला तिची आवड जोपासण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि त्याचा परिणाम म्हणुनच अंजली आता कथ्थक विशारद झाली होती.

कॉलेजला असताना सेटल झाल्यावर लग्न करण्याचा घेतलेला निर्णय आता त्यांनी अंमलात आणला. दोघांच्या घरुनही विरोध नाही झाला. शांत, मितभाषी, सालस आणि तितकीच गोड अंजली प्रतापच्या आई-बाबांनाही पसंद पडली. आता त्यांच्या गुलाबी प्रेमाचं मधुर लग्नात रूपांतर झालं...!!

लग्नानंतर हनिमून.. प्रतापचं जीवापाड प्रेम करणं.. प्रतापच्या मिठीत बेधुंद होणं..... नवा संसार.... नवी माणसं... आणि दोन वर्षानी शंतनु चा झालेला जन्म... अंजली हे सर्व सुख अनुभवत होती. सगळंच कसं छान, मस्त चाललं होतं.

पण... पण असं म्हणतात.. नियतीच्या ताटात वेगळंच वाढुन ठेवलेलं असतं. आणि ते आपल्याला अनभिज्ञ असतं. आजकाल प्रताप बदलला होता. अंजली वर जीवापाड प्रेम करणारा प्रताप आता तिची नजर टाळत होता. छोट्यातली छोटी गोष्ट अंजलीशी बोलणारा प्रताप तिच्यापासून काहीतरी लपवत होता. (क्रमशः)

✍️ प्रियांका सामंत