ऋणानुबंध भाग 2

This story is about anjali and pratap

ऋणानुबंध (भाग-२)

प्रतापच असं बदलणं अंजलीसाठी खूपच धक्कादायक होतं. तिने ठरवलं, आज बोलायचं प्रतापशी. त्याच्या मनात काय चाललंय हे जाणून घ्यायचं. इतका बिनधास्तपणे जगणारा माणुस अचानक असा आपल्याच कोशात का गेला??

रात्री लवकर आवरुन ती बेडरुममध्ये आली पण प्रताप नेहमीप्रमाणे आधीच झोपला होता. त्याचाच विचार करून अंजली झोपी गेली. पण १५-२० मिनिटांनी तिला जाग आली ती शंतनुच्या रडण्याच्या आवाजाने. त्याला झोपवण्याचा खूप प्रयत्न केला तिने, पण शंतनु दिवसा झोपायचा आणि रात्री खेळत राहायचा. आपल्या इवल्या डोळ्यांनी बघून हसायचा..???? त्याचे डोळेही खुप मोहक होते निळे-निळे..! अंजलीला नेहमी वाटे शंतनूचे डोळे असे वेगळे कसे??? तो दिसायचा पण अगदी वेगळाच. कुरळ जावळ... सावळा वर्ण.. निळे डोळे.. बसक पिटुकलं नाक.. गोबरे गाल.. आणि उजव्या गालावर एक तीळ...!! तो जरासुद्धा अंजली प्रतापच्या वळणावर गेला नव्हता. विचार करतानाच अंजलीचा डोळा लागला.

पहाटे जाग आली ती ट्रेनच्या आवाजाने. आज रविवार असल्याने प्रताप घरीच होता... अंजलीने मनाशी निश्चय केला होता की आज प्रतापशी बोलायचंच.

गरम गरम थालीपीठ आणि लोणी प्रतापच्या समोर ठेवत ती त्याच्या बाजूला बसली. आज प्रताप fresh and cool वाटत होता. त्याने त्याची आवडीची गझल लावली होती. अंजलीकडे पाहून तो मंद हसला.. कधीकधी अंजलीला वाटायचं कामाचा ताण असेल पण कधीकधी तिला वाटे तो कसली तरी अढी मनात घेऊन वावरतोय आणि त्याचाच त्याला त्रास होतोय.

तिने पायात खूप दिवसांपासून रुतलेला काटा अलगद काढावा तसा विषयाला हळुवारपणे हात घातला.

"प्रताप ,कसं झालय थालिपीठ ?".. अंजली

"मस्तच ...!" ..प्रताप

थोडावेळ परत शांततेत गेला.

"आज आपण बाहेर जाऊया का गं संध्याकाळी?" ... प्रताप

प्रतापच्या प्रश्नाने अंजली सुखावली. त्याला होकार देत ती म्हणाली "आज सूर्य कुणीकडे उगवला प्रताप ??"

प्रताप परत एकदा तिच्याकडे बघुन तसाच मंद हसला...

अंजलीने थेट विषयाला सुरवात केली.. "प्रताप,काय झालंय?? गेले काही दिवस.. किंबहुना काही महिने तू शांत का असा?? स्वतःच्याच कोशात का जगतोस..?? असा नव्हतास कधीच तु प्रताप.. स्वच्छंदपणे जगणारा तुझ्यातला माणूस हरवलाय.. खूप काही बोलायचंय तुला पण बोलत नाहीस तु. असा आतल्या आत कुढत नको राहुस.. तुझे डोळे रोज बोलतात काहीतरी.. मला असह्य झालंय हे तुझं वागणं." एका श्वासात अंजली बोलुन गेली..!!

प्रताप एकटक अंजलीकडे पाहत राहिला आणि नंतर खुप प्रयत्नांनी रोखलेला हुंदका त्याला अनावर झाला आणि त्याचा बांध फुटला. ओक्साबोक्शी रडणाऱ्या प्रतापला पाहून अंजली हादरली. तो असा व्यक्त होईल असं नव्हत वाटलं तिला. उगाच बोललो आपण अस वाटलं तिला पण तीच दुसरं मन सांगत होत बर केलंस बोललीस ते, निदान त्याचं मन तरी हलक झालं. त्याच्या मनावरचा ताण तरी हलका झाला. प्रतापने अंजलीच्या नजरेला नजर दिली...

"अंजु".. कापऱ्या आवाजात त्याने हाक मारली.

कितीतरी दिवसांनी तिचे कान निवले होते ती हाक ऐकून. डोळ्यातून ओघळणारे पाणी टिपत तिने प्रतापकडे पाहिलं.. डोळ्यात तेच प्रेम..तोच बेधुंदपणा..आज डोकावत होता.

प्रताप धीर करून बोलू लागला..

"अंजली,मी खुप काही लपवलय हे खरं आहे पण ते फक्त तुझ्या प्रेमासाठी.. तु शंतनूच्या जन्माआधीचे दिवस आठव. तुझी प्रेग्नन्सी खूपच कॉम्प्लिकेटेड होती. पण बाळाच्या चाहुलीने मन हरखलं होत तुझं.. मी पण आनंदात होतो. खूप छान चाललं होतं आपलं... पण आठव्याच महिन्यात तू जिन्यावरून पडलीस आणि......"

"का आठवण काढतोस त्या दिवसांची..?? आता छान झालंय ना सगळं..."

"मला बोलू देत अंजु. त्यानंतर तू २ दिवस बेशुध्द होतीस.. आपलं बाळ गेलेलं अंजु. पण तुला वाचवण्यासाठी धडपड चालु होती.

मी फार सैरभैर झालेलो. डॉ. कारखानीसांचे सगळे प्रयत्न चालू होते. त्याचं मते तुझ्या जिवावरचा धोका टाळला होता. पण जिन्यावरून पडल्यामुळे तुला परत बाळंतपण पेललं नसत. आणि आपलं बाळ गेलं हे कळल्यावर तुला मानसिक धक्का बसु शकतो. मी फार अगतिक आणि हतबल झालो होतो. काहीच मार्ग दिसत नव्हता. पण या जगात देव आहे याची प्रचिती त्या दिवशी मला आली... मिनलच्या रुपाने जणू आपलं सुख आपल्या समोर उभ होत...!! डॉ कारखानीसानी माझी तिची भेट घडवून दिली.


मिनल एक कुमारी माता होती...आईवडिलांनी घराची दारं बंद केलेली.. तिचा भूतकाळ जाणून घ्यायला मला वेळ नव्हता आणि मुळात मला गरज नव्हती. तिला तिच्या मुलाला आई बाबा हवे होते आणि मला तुझ्या कुशीत द्यायला "आपलं" बाळ. मी बाळासाठी तिच्याकडे हात पसरले आणि बाळाच्या भवितव्याचा विचार करून मिनल बाळाला तुझ्या कुशीत ठेऊन निघून गेली... एक अनुबंध निर्माण करून.. आणि शंतनु आपला झाला.

तेव्हापासून मी सतत त्या दडपणाखाली जगतोय. तुला सगळं सांगायचं होत पण कस सांगु?? तुला आनंदात बघत होतो. शंतनुशी खेळताना बागडताना पाहत होतो. हे सारं सत्य पेलणं तुला जमलं नाही तर..?? या विचाराने त्रस्त होतो मी." एका दमात आपलं मन मोकळं करुन प्रताप शांत झाला

पण इकडे अंजली पुरती गोंधळली होती. तिला नेमकं काय झालंय ते कळत नव्हतं. तिच्यावर एका नव्या सत्याचा आघात झाला होता. आणि अचानक एक प्रश्न विजेसारखा तिच्यासमोर लखळखला

"मग मीनल परत का आलीय?" ... अंजली

दाराआडून सगळं ऐकणारी मिनल पुढे आली..

"ताई, शंतनुला तुमच्याकडे सोपवून गेले पण मन मात्र तळमळत होतं.. त्याला पाहावं वाटत होतं... त्याचा सहवास मिळावा म्हणुन जीव तीळ तीळ तुटत होता. म्हणुन मग साहेबांची परवानगी घेऊन मी त्याला सांभाळायला म्हणुन आले. खुप सुखात आहे तो. शंतनु फक्त तुमचाच आहे. मी त्याच्यावर कुठलाही हक्क नाही सांगत. मी निघते आता.

"एवढे दिवस माझं हे सत्य तुम्हाला माहीत नव्हतं आणि ते सत्य तुम्हाला कळताना मी तिथे असावं हा साहेबांचा आग्रह म्हणुन मी थांबलेले. साहेबांचं खुप प्रेम आहे ताई तुमच्यावर.. बायकोसाठी दुसऱ्यासमोर हात पसरणारा नवरा क्वचितच कुणाच्या नशिबी असतो. शंतनुला सांभाळा."

आणि परत एकदा मिनल गेली शंतनुला अंजली कडे सोपवून...!!!

एका अनुबंधाच जन्मोजन्मीच्या ऋणानुबंधामध्ये रूपांतर करून...!!!!!!!!

प्रतापच्या चेहऱ्यावर तेच मंद हसु.. अंजलीचे साश्रुपूर्ण नयन... मिनलचे आनंदाश्रु... हे सगळं शंतनू त्याच्या निळ्या निळ्या डोळ्यांनी न्याहाळत होता.. खट्याळपणे पायाचा अंगठा तोंडात घालून हसत होता आपल्याच धुंदीत..!! तिकडे सिडी प्लेयर वर गझल चालुच होती.. "हाथ छूटे तो भी रिश्ते नही छोडा करते......" (समाप्त)