रुसलेला सोनचाफा भाग १

ही कथा आहे वाट चुकलेल्या मिहिरची. नक्की काय घडले असेल त्याच्या आयुष्यात. जाणून घेण्यासाठी वाचा रुसलेला सोनचाफा.
रुसलेला सोनचाफा भाग १

सूर्य अस्ताला गेला होता. रोजच्या प्रमाणे सिग्नल जवळील फुलांच्या दुकानाजवळ मिहिरची रिक्षा येऊन थांबली. त्याने रिक्षातून हात दिला. त्याला पाहून जयदीप धावत रिक्षाजवळ आला. त्याच्या हातात मोगऱ्याचा गजरा होता.

" साहेब माफ करा. आज सोनचाफा नाहीये. हवा तर आजच्या दिवस मोगऱ्याचा गजरा घेऊन जा." जयदीप अपराधीपणे म्हणाला.

" नाव नको काढू त्या मोगऱ्याचे. मला सोनचाफाच हवा. तुला माहितीये ना, मला रोज सोनचाफा लागतो ते. तू आणून ठेवायला हवा होता. आता रुसून बसेल ती. तिची समजूत कशी घालू.?"

मिहिर तावातावाने म्हणाला.

" साहेब, गेले सहा महिने कधी खंड पडला नाही. बस आज झालेली चूक तेवढी माफ करा. उद्या नक्की देतो. मालकीणबाईंना समजावून सांगा तसे." जयदीपला फार वाईट वाटले.

" नाही ऐकणार ती. तुला तिचे रुसणे माहीत नाहीये. एकदा का ती रुसली, तर तिची समजूत काढणे कठीण होऊन बसते. जाऊ दे. बघतो मी काय करायचं ते."

मिहिरचे मन खट्टू झाले होते. डोळ्यात टचकन पाणी आले. जयदीपच्या नजरेतून ते सुटले नाही. मिहिर नाराज होऊन निघून गेला.

त्याची रिक्षा दिसेनाशी झाली. जयदीप आपल्या फुलांच्या दुकानात परतला.

त्याचे उतरलेले तोंड पाहून त्याची बायको संगीता म्हणाली," काय झाले ? साहेबांनी घेतला नाही का मोगरा ?"

त्याने नकारार्थी मान हलवली.

" साहेबांची बायको फार लाडाची आहे वाटतं. इतका हट्टीपणा काय कामाचा ? फुले ती फुलेच असतात. मोगरा काय आणि सोनचाफा काय ? त्यावरून नवऱ्याला वेठीस धरून ठेवणे बरोबर आहे का ?" संगीता जराशी रागातच म्हणाली.

तिला ते अजिबात आवडले नव्हते.

" एखाद्या दिवशी आवडीची फुले नाही मिळाली तर करावी थोडीशी तडजोड. आयुष्य असेच असते. थोडीफार तडजोड तर सर्वांनाच करावीच लागते." ती ओठात पुटपुटली.

" असेल त्यांचे काही. आपण त्यांच्या घरगुती गोष्टींमध्ये कशाला लक्ष घालायचे ? मी बघतो दुसऱ्या कुणाकडे सोनचाफा मिळतो का ते."

" अहो, जाऊ द्या ना. कशाला इतका खटाटोप करताय. उद्या मिळेल की सोनचाफा."

" नाही, आपले रोजचे गिऱ्हाईक आहे ते. त्यांना नाराज करून चालणार नाही. त्यांनी सहा महिन्यांचे पैसे आधीच देऊन ठेवले आहेत. आपण त्यांच्या विश्वासाला अजिबात तडा जाऊ द्यायचा नाही."

" आज नाही मिळाले तर उद्या दोन फुले देऊन टाकू. रोजच फुले मिळतील असे थोडी आहे. त्या बदल्यात दुसऱ्या दिवशी जास्त दिले तर काय बिघडले ?"

" आपण तशी बोली केली होती. म्हणून ते रोज आपल्याकडूनच घेतात ना. जाऊ दे तुला नाही कळणार ते. तू दुकान सांभाळ. मी आलोच."

असे म्हणून तो आजूबाजूच्या फुलांच्या दुकानात सोनचाफा कुठे मिळतो का म्हणून तपास करायला गेला. पण त्याला कुठेच मिळत नव्हता. सोनचाफा फक्त तोच त्याच्या दुकानात ठेवायचा. आजूबाजूच्या फुलविक्रेत्यांकडे तो मिळत नसे.

जयदीपला सारखा मिहिरचा रडवेला चेहरा आठवत होता. मिहिरला तो गेल्या वर्षभरापासून ओळखत होता. सुरूवातीला मिहिर कधीतरी अधूनमधून त्याच्याकडून मोगऱ्याचा गजरा न्यायचा. पण गेल्या चार-सहा महिन्यांपासून सोनचाफाच हवा म्हणून हट्ट धरायला लागला होता. त्यासाठी त्याने दुपटीने पैसे मोजले होते. त्यानंतर मोगऱ्याच्या गजऱ्याकडे तो ढुंकूनही पाहत नव्हता. सोनचाफा मात्र तो जीवापाड जपून न्यायचा. सहा महिन्यांपूर्वी मोगरा आवडणाऱ्या व्यक्तीला अचानक मोगऱ्याचा इतका तिरस्कार का वाटावा तेच जयदीपला कळत नव्हते.

जयदीप त्याच्याच विचारात आजूबाजूच्या फुलविक्रेत्यांकडे सोनचाफ्यासाठी फिरत होता. पण त्याच्या खेरीज सोनचाफा फारसे कुणी ठेवत नसे. कुणीतरी त्याला एका बंगल्यात सोनचाफ्याचे झाड असल्याची माहिती दिली. बरीच पायपीट केल्यानंतर त्याला मोठ्या मुश्किलीने एके ठिकाणी सोनचाफा दिसला. एका बंगल्याच्या आत ते झाड लावलेले होते. जयदीपने बरीच विनवणी करून त्यांच्याकडून ते दुप्पट मोबदला देऊन मागून घेतले. दुप्पट पैसे म्हटल्यावर तेव्हा कुठे ते तयार झाले होते. जयदीपच्या चेहऱ्यावर एखादे घबाड मिळाल्यासारखा आनंद पसरला.

एव्हाना बराच काळोख दाटून आला होता. ते फुल घेऊन तो तसाच मिहिरच्या घराकडे निघाला. मिहिर जिथे राहत होता, तो परिसर जयदीपला माहीत होता. तिथून पुढे चौकशी करत करत तो मिहिरच्या घराजवळ येऊन पोहचला.

बाहेरून चौकोनी डब्ब्यासारखे दिसणारे ते घर खूप शांत भासत होते. घरावर असलेल्या " मिहिर सायली कुंज " नावाच्या पाटीने त्याचे लक्ष वेधले. आपण योग्य ठिकाणी पोहोचलो, याचे त्याला हायसे वाटले.

" साहेब, मिहिर साहेब." जयदीप बाहेर उभा राहून आवाज द्यायला लागला.

पण आत कसलीच साळसूद नव्हती.

त्याने पुन्हा जोरात आवाज देऊन पाहिला. तरीही काहीच उत्तर मिळाले नाही. कदाचित त्याचा आवाज आतपर्यंत जात नसावा.

बाहेर असे कितीवेळ ताटकळत उभे राहणार, म्हणून तो दाराजवळ आला. तर ते दार फक्त लोटलेले होते. ते ढकलून तो आत शिरला.

साधारण तीन-चार खोल्यांचे ते घर होते. पुढच्या खोलीत त्याला कुणीच दिसले नाही.

पुन्हा त्याने आवाज देऊन पाहिला. पण आतून कुणी प्रतिसाद देत नव्हते.

मिहिरचा कानोसा घेत तो तसाच थोडा आतल्या खोलीत गेला. मिहिर त्याला मागच्या बाल्कनीत खुर्चीवर बसलेला दिसला. तो तिथे कुणाशी तरी बडबड करत होता.

" साहेब, मी केव्हाचा आवाज देतोय. तुमच्यासाठी सोनचाफा आणलाय." जयदीप त्याला उद्देशून हळूच म्हणाला.

" अरे हो का ? बरं झालं बाबा. केव्हाचा हिची समजूत काढतोय पण ऐकेल तर ना."

मिहिर झटकन जागेवरून उठला. जयदीपने थोडेसे वाकून पाहिले. पण तिथे त्याला कुणीच दिसले नाही. तो चक्रावला.

क्रमशः

🎭 Series Post

View all