Login

रुसलेला सोनचाफा भाग २

काय असेल कथा मिहिरची ? जाणून घेण्यासाठी वाचा रुसलेला सोनचाफा.
रुसलेला सोनचाफा भाग २

मग मिहिर कुणाशी बडबडत होता ?  जयदीपच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव जमा झाले. मिहिरच्या ते लक्षात आले.

" ये इकडे. माझ्या सायलीशी तुझी ओळख करून देतो."

जयदीपला तो हात धरून बाल्कनीत घेऊन गेला.

" हे बघ सायली, आपल्याकडे आज कोण आले आहे. हा जयदीप आहे. तुझ्यासाठी रोज सोनचाफा मी याच्या कडून आणतो. आज आणला नाही म्हणून तू रुसली होतीस ना. आणला बघ त्याने. रुसवा सोड बरं आता."

मिहिरने जयदीपच्या हातून सोनचाफा घेतला. त्याच्यासमोर एका कुंडीत तो ठेवला.

मिहिर एका वाळलेल्या सोनचाफ्याच्या झाडाशी बोलत होता. तो त्या झाडाला सायली म्हणत होता. जयदीप कोड्यात पडला. हे वाळलेले झाड सायली आहे ? तर मग साहेबांची बायको कुठे आहे ? दारावर दोघांच्या नावाची पाटी होती. हे नक्की काय प्रकरण आहे तेच त्याला उमजत नव्हते.

त्याच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग पाहून मिहिर काय समजायचे ते समजून चुकला.

" जयदीप बस इथे खुर्चीवर. सांगतो सगळं."

जयदीपलाही सर्व जाणून घ्यायचे होते. तो गुपचूप तिथे बसला. मिहिरने बोलायला सुरुवात केली.

" सायली माझी बायको. आता साधारण पाच-सहा वर्षे झाले असतील आमच्या लग्नाला. त्यावेळी ती नुकतीच पंचविशीत पदार्पण केलेली तरुणी होती. ती दिसायला काळी सावळी, कमी उंचीची आणि गावाकडे शिकलेली होती. त्यामुळे तिकडचे राहणीमान व तिथली बोलीभाषा हे सर्व तिच्या अंगवळणी पडले होते. माझ्या नजरेत तशी ती गावंढळ मुलगी. माझ्या आईवडिलांनी तिला सून म्हणून पसंत केले होते. मी खूप वर्षांपासून ह्याच शहरात वास्तव्याला होतो. इथले मला कमालीचे आकर्षण होते. मी एका मोठ्या कंपनीत अधिकारी पदावर कार्यरत होतो. माझे बसणे - उठणे सर्व मोठमोठ्या लोकांमध्ये असायचे. पैश्याची अजिबात कमतरता नव्हती. कंपनीत एक रुतबा होता. मला खूप मानसन्मान मिळायचा. त्यामुळे माझ्या अंगात तो माज चढला होता. नेहमी सुटाबुटात राहणारा मी. सायली मला मुळीच साजेशी नव्हती. मनात नसताना आई-वडीलांच्या दबावाला बळी पडून मी तिच्याशी लग्न केले होते. मला तिची लाज वाटायची. सुरूवातीला कित्येक दिवस मी तिला इथे आणलेच नाही. नंतर आई वडिलांच्या हट्टापायी नाईलाजास्तव मला तिला ह्या शहरात आणावे लागले."

मिहिर बोलता बोलता त्या वाळलेल्या सोनचाफ्याला गोंजारत होता. जयदीप आतुरतेने ऐकत होता.

" मी माझ्या नशिबावर खूप नाराज होतो. लग्नानंतर मी स्वतःला कामात पूर्णपणे झोकून दिले. सायली आल्यानंतर मी घरी येणे टाळायला लागलो. सकाळी डोळे उघडताच क्षणी मी माझे फटाफट आवरून ऑफिसला निघून येत असे. रात्री देखील उशीरा घरी परतत असे. सुरूवातीला सायलीने बराच विरोध केला. पण मी दगडासारखा कठोर वागत गेलो. कारण मला माहीत होते की, सायलीच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. तिला माझ्याशिवाय पर्याय नव्हता. त्याचाच फायदा मी घेत असे. सायलीला मी बायको म्हणून कोणतेच अधिकार दिले नव्हते. माझ्या घरात राबणारी मोलकरीण इतकाच काय तो तिचा दर्जा होता. कधीकाळी चुकूनमाकून रात्रीच्या धुंद प्रहरी मी त्या क्षणांना बळी पडून जात असे. पण दुसऱ्या दिवशी घरात मीच आकांडतांडव माजवत असे. चूक माझी असली तरी सर्व दोष तिला द्यायचो. ऑफिसला आल्यावर माझ्याकडून रात्री असे कसे झाले म्हणून पश्चाताप वाटायचा. एकदा निसर्गाने आपले प्रताप दाखवले. मी घाबरुन बळजबरीने तिला गर्भपात करायला भाग पाडले. मला तिच्यापासून मूल नको होते. तिच्या सारखे मूल जन्माला आले तर अजून लाजिरवाणी परिस्थिती होईल. त्या भीतीने मी दिवसरात्र ऑफिसमध्ये पडून रहायलो लागलो. बाहेरच मज्जा करत खाण्यापिण्याच्या पार्ट्या करायला लागलो. ती असली काय आणि नसली काय ? मला त्याचा काहीच फरक पडत नव्हता."

सायलीच्या आठवणीने त्याचे डोळे पाणावले.

जयदीप हळहळला. न पाहिलेल्या सायलीबद्दल त्याला कणव वाटत होती.

" मग पुढे काय झालं ?" जयदीपने विचारले.

" अशातच माझ्या आयुष्यात एक वादळ आले. आमच्या कंपनीत नुकतीच तारुण्याचा उंबरठा ओलांडून आलेली कियारा नावाची मुलगी कामाला लागली. दुधाळ रंग, मध्यम बांधा, बोलके पाणीदार डोळे, नाजुक बाहुलीसारखी दिसणारी ती कुणालाही भुरळ पडावी अशी होती. आधुनिक कपड्यात तर ती अजूनच आकर्षक दिसायची. तिचे हावभाव देहभान विसरायला भाग पाडत असे. माझ्या ऑफिसमध्ये तिच्याशी बोलायला पुरुषांची चढाओढ लागायची. तरुण मुले काय आणि वयस्कर मंडळी काय ? सगळेच तिच्या अवतीभवती घुटमळत बसायचे. सर्वत्र तिची चर्चा रंगलेली असायची."

मिहिरने एक लांबलचक सुस्कारा सोडला.

" आणि तुम्ही ? " त्यांच्यात तुमचाही सहभाग होता का ?"

" कियारा माझ्या हाताखाली काम करत असल्याने ती सतत माझ्या डोळ्यांसमोर असायची. मला तिचे आकर्षण होत होते. पण मी उच्च पदावर असल्याने माझ्या मर्यादा ओळखून वागत असे. ऑफिसमध्ये कियाराला सर्व मधमाशांसारखे चिकटून बसायचे. याला मी अपवाद होतो. कदाचित यामुळे तिचा स्वाभिमान दुखावला गेला असेल. नंतर ती काहीनाकाही बहाण्याने माझ्याकडे यायला लागली. हळूहळू ती माझ्याशी ओळख वाढवत होती. माझ्याशी बोलतांना ती जवळीक साधू लागली होती. नकळत का होईना मी मनातल्या मनात सायली आणि तिची तुलना करू लागलो. आम्हाला एकमेकांचा सहवास आवडायला लागला होता. कामाच्या निमित्ताने आम्ही बराच वेळ एकत्र घालवत बसायचो. एक दिवस तिने मला तिच्या प्रेमाची कबुली दिली. जिच्यासाठी पूर्ण कंपनी वेडी झाली होती. ती मुलगी आता माझ्या मागे होती. माझा पुरुषार्थ या कल्पनेने सुखावला. मीही तिला आनंदाने होकार दिला. दिवसेंदिवस आमचे प्रेमप्रकरण वाढत चालले होते. तिच्या प्रेमात मी इतका आकंठ बुडालो की मला साऱ्या जगाचा विसर पडला होता."

" अरेरे साहेब, ह्या सर्वात सायली मॅडम खूप एकट्या पडल्या असणार."

" हो, सायली माझा संसार अगदी व्यवस्थित करत होती. पण तिची अवस्था मी एका मोलकरीण सारखी करून ठेवली होती. ती बिचारी एका शब्दावरून मला कधी काही बोलली नाही. फार कमी वेळात तिने माझ्या सर्व सवयी जाणून घेतल्या होत्या. त्यानुसार ती मला खूश ठेवायचा फार प्रयत्न करायची. माझे मन जिंकण्यासाठी तिने आकाश पाताळ एक करून टाकले होते. पण म्हणतात ना " दिव्याखाली अंधार." मला तिची किंमत कधीच कळली नाही. याउलट कियारामुळे मी तिच्याकडे अजून जास्त दुर्लक्ष करायला लागलो होतो. मी तिला माझ्या घरात ठेवतोय म्हणजे जणू काही तिच्यावर उपकार करतोय अशा आविर्भावात मी घरात वावरत असे."

मिहिरचा आवाज जड झाला होता. गळा भरून आला होता. कसेबसे अश्रू आवरून तो तिच्यावर केलेल्या अन्यायाची गाथा सांगत होता. सर्व ऐकून जयदीपचेही डोळे पाणावले होते.

क्रमशः

🎭 Series Post

View all