रुसलेला सोनचाफा भाग ३

काय असेल कथा रुसलेल्या सोनचाफ्याची ? जाणून घेण्यासाठी वाचा रुसलेला सोनचाफा.
रुसलेला सोनचाफा भाग ३

डोळ्यातले अश्रू परतवत जयदीपने मिहिरला विचारले.

" साहेब, तुमच्या भरवशावर त्या इथे आल्या होत्या. तुम्ही किती वाईट वागलात हो त्यांच्याशी ? सायली मॅडमला तुमचे प्रकरण माहीत होते का ?"

" नाही. तिला मी अंधारात ठेवले होते. कियारा आणि मी आमच्या नात्यात बरेच पुढे निघून गेलो होतो. मी तिला माझ्या सोबत सर्व ठिकाणी मिरवायला लागलो होतो. जणू काही ती माझी बायकोच आहे अशा पद्धतीने मी तिच्यासोबत राहत असे. तिचे सर्व हट्ट, लाड, हौसमौज तसेच आर्थिक अडचणी मी पूर्ण करत असल्याने तिची चंगळ होऊन बसली होती. फिरायला जाणे, पार्ट्या करणे, वरचेवर महागड्या भेटवस्तू देणे, एखाद्या आलिशान हॉटेलमध्ये दोन-तीन दिवस मुक्कामी राहणे असे प्रकार सर्रास व्हायला लागले होते. त्यामुळे तिला आकाश ठेंगणे वाटायला लागले होते. मी तिच्या मुठ्ठीत असल्यासारखे ती वागायला लागली होती. त्यामुळे ऑफीसमधे सर्वांशी उद्दामपणा करणे, उद्धटपणे वागणे, कामात दिरंगाई करणे असे सर्व प्रकार ती माझ्या जिवावर करायला लागली. असे वागताना मात्र ती हे सपशेल विसरली की, मी त्या कंपनीचा मालक नाहीये. त्यामुळे तिच्या आणि माझ्या बऱ्याच तक्रारी वरिष्ठांकडे जाऊन पोहोचल्या होत्या. पण त्या बेगडीपणात मी इतका बुडालो की सत्य माझ्यापासून कोसो दुर होते."

" साहेब, एक क्षण भाळण्याचा आणि बाकी सारे सांभाळण्याचे असे म्हणतात ते खोटे नाही."

" अगदी खरे आहे. तिचा हा अल्लडपणा एक दिवस मला चांगलाच भोवला. त्यामुळे मला कामावरून निलंबित करण्यात आले. आज अशी दुर्दशा झाली आहे की मी एका छोट्याशा कंपनीत कारकुनी काम करतो."

" अरे देवा, एका क्षणात सर्व होत्याचे नव्हते झाले. पुढे काय झाले ? ही सोनचाफ्याची काय कहाणी आहे ?"
जयदीपने उतावीळ होऊन विचारले.

" सायलीला शहराची सवय नव्हती. आसपास बोलायलाही कुणी नव्हते. त्यामुळे तिने कुठून तरी घरात हा सोनचाफा आणला होता. ती तासन् तास सोनचाफ्याशी गप्पा मारत असे. मला मात्र तिचे हे असले वागणे वेडसरपणा वाटायचा. आता बघ, ह्या घरात हा सोनचाफा आणि मी असे दोघेच उरलो. मी ही तिच्या आठवणीत तोच वेडेपणा करायला लागलो आहे."

मिहिरचे अश्रु त्या सोनचाफ्यावर पडले.

" साहेब, सोनचाफ्याचे प्रेम कळले. पण मोगऱ्याचा इतका तिरस्कार का ?"

" कियारा माझ्याकडे सतत मोगऱ्याचा हट्ट करायला लागली होती. तिला कुणीतरी सांगितले होते की, मोगऱ्याचा गजरा दिल्याने खरे प्रेम व्यक्त होते. म्हणून मी तिच्यासाठी ती सांगेल तेव्हा मोगऱ्याचा गजरा घेऊन जायला लागलो. खरे तर, तिचे केस फक्त मानेपर्यंतच होते. लहान केस असल्याने तो गजरा तिच्या काहीच कामाचा नव्हता. पण तिच्यावरच्या आंधळ्या प्रेमापोटी मी तिच्या सर्व मागण्या पूर्ण करत असे. त्या दिवशी असेच झाले. मी एका महागड्या हॉटेलमध्ये आमच्या दोघांसाठी एक रात्र राहायची व्यवस्था केली. तिला खुश करण्यासाठी मी भरपूर गजरे घेऊन गेलो होतो. तिच्या केसात गजरा माळता येत नाही म्हणून मी काही गजरे तिच्या आणि माझ्या मनगटावर बांधले. इथेच मी घोडचूक केली. त्या दिवशी माझा मानसन्मान, प्रतिष्ठा धुळीस मिळाली. माझ्या सायलीला सुध्दा मी कायमचा गमावून बसलो."

" म्हणजे ? असे काय झाले त्या दिवशी ?"

" गजरा केसात माळला तर हृदयातले प्रेम प्रतीत होते. पण हातात बांधला तर मनातली वासना दृष्टीस पडते. त्या रात्री मी नको त्या अवस्थेत तिच्या बाहुपाशात असताना अचानक तिथे पोलिसांची धाड पडली. तिथे गैर पद्धतीने देह व्यापार होत असल्याची खबर कुणीतरी पोलिसांना दिली होती. खोलीच्या दारात अचानक पोलिस उभे आल्याने आम्ही दोघं घाबरून गेलो. मी ते गजरे हातात बांधल्याने माझा अवतार वासनेने बरबटलेल्या पुरूषासारखा दिसत होता. पोलिसांना असे वाटले की मी तिला फसवून तिथे आणले आहे. त्यांनी तिला दमदाटी करून खरे काय ते विचारले. तिने त्यांना हवी तशी जबानी दिली तर, ती ह्या प्रकरणातून सुखरूप सुटेल अशी हमीही दिली. तिने बदनामीला घाबरून माझ्यावरच सर्व आरोप केले. मी कंपनीत बढोत्तरी देण्याच्या आमिषाने तिला तिथे बोलवल्याचे तिने पोलिसांना खोटेनाटे सांगितले. मला वाईट रीतीने फसवून ती त्यातून सुटून गेली. पोलिसांनी मला ताब्यात घेतले. माझ्या कंपनीने त्यांचा आणि माझा काहीच संबंध नसल्याचे सांगून हात वर केले. एकंदरीत सर्वच पुरावे माझ्या विरोधात होते. ह्या प्रकरणातून माझी निर्दोष सुटका व्हावी म्हणून मी जीवाचे रान करत होतो. पण सारे व्यर्थ. समाजात माझी खूप बदनामी झाली. मला मरण प्रिय वाटायला लागले होते. ह्या सगळ्यात सायली मात्र माझ्या पाठीशी भक्कम उभी राहिली. तिने माझ्या काही हितचिंतकांच्या मदतीने ह्या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन माझे निर्दोषत्व सिद्ध केले. त्या दरम्यान सायलीला बऱ्याच नरकयातना भोगाव्या लागल्या. पण तिच्या अथक प्रयत्नांनी माझी सुटका झाली. ज्या दिवशी मी तुरुंगातून बाहेर आलो. त्याच दिवशी तिने आत्महत्या करून घेतली. कारण ह्या प्रकरणाच्या तळाशी जाताना तिला माझ्याबद्दल सर्व सत्य कळले होते. मी केलेली प्रतारणा तिला सहन झाली नाही. कदाचित तिच्या हिस्स्यातले प्रेम, तिचा माझ्यावर असलेला हक्क मी दुसऱ्याच व्यक्तीला देऊन बसलो होतो. तिची माझ्या आयुष्यातली जागा मी परक्या मुलीला दिल्याने तिला तो धक्का सहन झाला नसावा. ती कायमची निघुन गेली पण मला जन्मभरासाठी सजा देऊन गेली. ती गेल्यानंतर हा सोनचाफा कधी बहरलाच नाही. माझ्या सायलीचा प्राण आहे यात. हा पूर्वीसारखा फुलावा, हसावा म्हणून मी रोज ह्याच्याशी सुखदुःखाच्या गोष्टी करतो. जिवंतपणी तिच्याशी धड एक शब्दही बोललो नाही. आता यालाच सायली समजून दिवसरात्र याच्या सानिध्यात वेळ घालवतो. कदाचित सोनचाफा पाहून हा पुन्हा जिवंत होईल. बहरायला लागेल म्हणून रोज तिचा आवडता सोनचाफा तिला बहाल करतो. माझ्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत मी हा सोनचाफा फुलायची वाट बघेल. जितक्या यातना मी सायलीला दिल्या तितक्याच यातना मला ह्या सोनचाफ्याला पाहून होतात." इतके बोलून मिहिर ओक्साबोक्शी रडायला लागला.

जयदीपच्या डोळ्यात महापूर दाटून आला होता.

घरी जाता जाता जयदीपने ठरवून टाकले होते की त्याच्या अंगणातील सोनचाफा कधीच वाळणार नाही याची तो पुरेपूर खबरदारी घेईल.

समाप्त.

🎭 Series Post

View all