प्रिय वेडू,
तुझ्या वेड्या भावाचा सप्रेम नमस्कार वि. वि.
कशी आहेस? काय गं असं कोणी रागावतं का? मी चुकलो माहिती आहे गं, पण काय करू तुला तर माहिती आहे ना, मला राग आला की माझा ताबा सुटतो. मग मी काय बोलतो ते माझं मलाच कळतं नाही. मनापासून माफी मागतो तुझी माफ कर गं, राणी. हे बघ कान पकडतो, तू समोर ये तुला साष्टांग दडंवतपण घालतो. पण असं अबोल नको राहूस, यार. नाही सहन होतं तुझा हा अबोला.
तू इकडे ये नाही तर मी येतो तिकडे तुझ्या सासरी. चांगले कान धरून धारेवर धर, मला शिव्या घालं पण असे रुसू नकोस, बाबा.
त्या दिवशी तू किती आनंदात होतीस. मला नेहमीप्रमाणे सांगत होतीस पण मी मात्र ऑफिसच्या कामाचा राग तुझ्यावर काढलो. तुझ्यावर ओरडलो तेव्हा कसा झाला होता तुझा चेहरा? आठवून आता मलाच कसंतरी वाटतं. साॅरी बच्च्या! खरंच चुकलं माझं. फोन केला तर स्वीच ऑफ करून ठेवलास. मग मेसेज करूनही फायदा नाही म्हणून मग हा पत्राचा घाट घातला मी आणि भावजीच्या फोनवर फोन केला तरी म्हणतेस त्यांना की मला नाही बोलायचं असे सांगा त्याला. भावजींना म्हटलं तर ते म्हणतात की तुम्ही बहिणभाऊ बघून घ्या मला नका मध्ये आणूत मग काय करू सांग. तुझ्याशिवाय मला कोणीच समजून घेत नाही. पुन्हा कधीच असं ऑफिसमधील कामाचा राग तुझ्यावरच काय कोणावरही नाही काढणार, आय प्राॅमिस दॅट.
आईबाबा पण चिडलेत माझ्यावर. प्लीज माफ कर ना. या पत्रासोबत तुझी आवडती मँगो बर्फी पण पाठवतोय. अजून काय असेल तर सांग ते देतो पण माफ गं वेडू.
आशा करतो तू मला माफ करशील. तू जोपर्यंत माफ करत नाही तोपर्यंत माझ्या जीवाला चैन पडणार नाही गं. स्वतःचाच राग येतोय मला तुझ्यावर ओरडलो म्हणून. पण ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्यावरच आपण रागावतो ना गं. पण खरंच पुन्हा कधीच नाही रागावणार.
चल थांबतो आता, पुन्हा एकदा माफी मागतो तुझी लाडके वेडू माझी.
कळावे,
तुझाच वेडा भाऊ
तुझाच वेडा भाऊ
=======
©️ जयश्री शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा