Login

ऋतुकाश प्युअर लव भाग 21

प्रेमाची परिभाषा
ऋतुकाश प्युअर लव भाग 21
दीर्घकथा लेखन स्पर्धा 2025- जानेवारी 2026

आकाश आणि ऋतुजा दोघेही ऑफिसमधून निघाले,
"आज कॉफी प्यायला जायचं?"

"ओके."
दोघेही कॅफे मध्ये गेले, छान गप्पा मारत एकमेकांसोबत वेळ घालवला आणि घरी परत आले.
रात्री जेवणानंतर ऋतुजा आकाश जवळ जाऊन बसली.
आणि तिने बोलायला सुरुवात केली,

"प्रकाश आणि मी बालमित्र होतो. लहानपणापासून एकत्र वाढलेलो, एकत्र खेळलेलो. प्रकाशचे बाबा तुलसीराम आमच्याकडे सुरुवातीपासूनच वॉचमन म्हणून कामाला होते. आई सुमती घरकाम करायच्या. प्रकाश त्यांचा एकुलता एक मुलगा होता.
घराच्या बाजूच्या कॉटेजमध्ये ते रहायचे. सुमती काकूसोबत खेळायला यायचा. शाळेची फिज देण्यासाठी तुलसीराम काकांकडे पैसे नव्हते. कारण पगारातील अर्धे पैसे त्यांना गावाकडे पाठवायला लागायचे त्यामुळे प्रकाशला शाळेत घातलेलं नव्हतं.

तो दिवसभर खेळत असायचा.
एक दिवस बाबांनी त्यांना विचारलं,

"तुलसीराम प्रकाशला शाळेत का घातलं नाही?"
त्यावर ते म्हणाले.
"साहेब गावी आई बाबांना पैसे पाठवतो, आईची तब्येत बरी नसते, तिला ईलाजाला म्हणून गावाला पैसे पाठवतो. एवढ्या पगारात नाही भागत साहेब."

"अरे पण सरकारी शाळेत टाकायचं ना?"

"नाही साहेब, ते इथून खूप लांब आहे. येण्या- जाण्याचा प्रश्न येतो."

तुलसीराम काकांच्या गोष्टी ऐकून बाबांना वाईट वाटलं त्यांनी ठरवलं प्रकाशला शाळेत घालायचं, बाबांनी माझ्याच शाळेत माझ्याच वर्गात त्याची अ‍ॅडमिशन करून घेतली. शाळेत जाणार म्हणून प्रकाश खूप आनंदात होता. आम्ही दोघेही सोबत शाळेत जायचो.

माझी आई मला डब्याला छान छान पदार्थ द्यायची पण प्रकाश रोज भाजी पोळी आणायचा. त्याला माझा डबा बघून खायची ईच्छा व्हायची पण कधी बोलायचा नाही म्हणून मग कधीतरी माझा डबा मी त्याला द्यायचे आणि त्याचा डबा मी खायचे. शाळेच्या अभ्यासासोबत आम्ही खूप खेळ खेळायचो. प्रकाश अभ्यासात हुशार होता. पाहिल्याचं वर्षी त्याचा पहिला नंबर आला. शाळेतल्या टीचरने खूप कौतुक केलं आणि त्याचा कॉन्फिडन्स वाढला.
हळू हळू आम्ही मोठे होत गेलो,  प्रकाश दहा वर्षांचा असताना त्याचे वडील गेले. त्याची आई आणि तो एकटे पडले. घरचा कर्ता पुरुष गेला म्हणून आईने जीवाला लावून घेतलं, त्याही आजारी रहायला लागल्या. आता सगळी जबाबदारी प्रकाशवर आली.
तो न डगमगता खंबीरपणे उभा राहिला.
दिवसभर शाळा करून संध्याकाळी काम करू लागला. जे काही थोडेफार पैसे मिळायचे त्यातू आईची औषध करायचा. शिक्षणाचा खर्च बाबा करायचे पण त्याचंही त्याच्या मनावर दडपण असायचं.

क्रमशः

ऋतुजा वैरागडकर

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.


0

🎭 Series Post

View all