Login

ऋतुकाश प्यूअर लव❤️ भाग 30

प्रेम म्हणजे त्याग पण असंत
ऋतुकाश प्यूअर लव भाग 30
दिर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026

सकाळ झाली तरी प्रकाश रूम मधून बाहेर आलेला नव्हता म्हणून त्याची आई त्याला आवाज द्यायला गेली.

"प्रकाश उठ, आज कामावर जायचं नाहीये का? प्रकाश उठ."

त्याच्या आईने त्याला गदगद हलवल्यानंतर तो उठला पण अजून त्याची नशा उतरलेली नव्हती.

"तू पुन्हा दारू पिऊन आलास? का दारू पिऊन येतोस असा? आणि रात्री कधी आलास? मी रात्रीपर्यंत जागी होते तोपर्यंत तू घरी आलेला नव्हतास."

"आई माझं डोकं जड होतंय मला निंबू पाणी दे ना प्लीज."

"लिंबू पाणी देते मी पण आधी सांग."

"आई कटकट लावत जाऊ नकोस माझ्या मागे." प्रकाश चिडला आणि तिथून येऊन बाहेर सोफ्यावर बसला.

ती शांतपणे किचनमध्ये निघून गेली, त्याच्यासाठी लिंबू पाणी घेऊन आली.
त्याच्या हातात ग्लास दिला.

"कामावर जाणार नाहीस का आज?"

"मी कुठेही जाणार नाही आणि काम बिम सगळं सोडून टाकणार आहे, कुठेही जाणार नाही."

"हो.. मग खायचं काय? माझ्याने आता बाहेरचे काम होत नाही, तूही असा घरी बसलास तर खायचं काय?"

"आधी काय खात होतीस, तेच खा." तो रागात बोलून गेला. पण तिच्या मनाला लागलं.

काही क्षणातच त्याच्या लक्षात आलं, तो तिच्याजवळ गेला.

"आई खरंच सॉरी मला तसं म्हणायचं नव्हतं, मला खरंच माफ कर. मी तुला ऋतुजा बद्दल सगळं सांगितलं होतं ना."

"हो बोलला होतास तू मला."
"काल मी चुकून तिच्या घरी गेलो होतो आणि त्यानंतर..." तो गप्प झाला.

"जाऊदे... आई आपण कुठेतरी दूर निघून जाऊया. आई मला ना कधी कधी असं वाटतं की जावं ऋतुजाकडे आणि तिला इकडे घेऊन यावं. माझ्या मनातून ती जात नाहीये, माझं तिच्यावरचं प्रेम कमी झालेलं नाहीये, आई मला ती हवी आहे माझ्या आयुष्यात, मला ती हवी आहे ग, मला माझं प्रेम हवं आहे."
त्याने तिच्या कुशीत डोकं ठेवलं आणि रडायला लागला.

"पण बाळा तिचं लग्न झालंय ना आता, हे समझ की ती तुझ्या नशिबात नव्हती. ती लग्न करून तिच्या सासरी गेली, तिचा नवरा तिच्यावर खूप प्रेम करतो, त्यांचं सुखी आयुष्य सुरू झालंय ते तसेच राहू दे आणि प्रेम म्हणजे काय असतं रे नुसत्या गोष्टी मिळवणे, ती व्यक्ती मिळवणे... नाही प्रेम तसं नसतं, प्रेम म्हणजे त्याग असतं. तिच्या आयुष्यात ढवळाढवळ करून तुला तिला दुःखी करायचं की तिला आनंदी बघून त्यातच तुला समाधान मानायचे आहे ,तू ठरव..."
ती त्याच्या डोक्यावरुन हात फिरवू लागली.

क्रमश:

ऋतुजा वैरागडकर
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

0

🎭 Series Post

View all