Login

ऋतुकाश प्यूअर लव भाग 50

Prem
ऋतुकाश प्यूअर लव भाग 50
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर 2025- जानेवारी 2026

दोघेही मावशीच्या पाया पडले. मावशीने दोघांना आशीर्वाद दिला.

“पोरी जास्त वाकू नकोस ग, माझा आशीर्वाद नेहमीच तुझ्या पाठीशी आहे. खुश रहा सदा सुखी रहा.” असं म्हणून तिने दोघांचे कौतुक केलं, दोघांची दृष्ट काढली.

“या बसा पोरांनो, हात पाय धुऊन घ्या मी जेवायला तयार करून ठेवलंय.”

“मावशी मी तुमची काही मदत करू का?”

“नाही ग पोरी मी सगळं करून ठेवलंय. तुम्ही याल तेव्हा तुम्हाला भूक लागेल म्हणून सगळं तयार करून ठेवलंय. तुम्ही हात पाय धुवा मी जेवायला देते. मावशीने दोघांसाठी पान वाढून ठेवली. छान ताट सजवून ठेवलेलं होतं.

दोघे हात पाय धुऊन फ्रेश झाले. जेवायला येऊन बसले ताटातले पदार्थ पाहून ऋतुजा तर अवाक झाली.

“बापरे मावशी तुम्ही काय काय करून ठेवलंय? इतके पदार्थ मी तर खाऊ शकणार नाही.”

“अग पोरी हे तुझ्यासाठीच केलंय, तुझं डोहाळे जेवणाचे पदार्थ समज. तुझे डोहाळे जेवण कोण पुरवत असेल? हा तर दिवसभर बाहेर राहत असेल मग तुला काही खाण्याची इच्छा झाली तर कोण करत असेल? म्हणून म्हटले इकडे आलीस ना तर आपणच करून टाकाव सगळं.”

बोलता बोलता मावशी भावुक झाली आणि ऋतुजाचे पण डोळे पाणावले. डोळ्यातले अश्रू पुसत ती बोलली.

“नाही मावशी, हा माझ्यासाठी सगळं काही करतो. मला काही लागलं तर आणूनही देतो आणि घरी आई पण आहेत ना त्या माझी खुप काळजी घेतात. मला जे खावंसं वाटलं ते बनवून देतात."

“चांगला आहे तुझा नवरा तुझ्या मागे मागे फिरतो. आमच्या वेळी नव्हतं काही असं, एकदा आमचे नवरे बाहेर गेले की रात्रीच परत यायचे आणि त्यांच्यासमोर बोलायची कोणाची हिंमत नाही व्हायची. जे भेटलं ते खायचं आणि दिवस काढायचे असंच होतं आमच्या वेळी. तुमचं आजच्या पिढीचं बरं आहे जे वाटलं ते मोबाईलवर ऑर्डर करा आणि बोलवा.”

मावशीचे बोलणे ऐकून दोघेही हसायला लागले.

“मावशी मोबाईल वरचे ऑर्डर्स तुम्हाला कसं माहित?” ऋतुजाने कुतूहलाने विचारलं.

“शहरात नातू राहतो ना माझा, तो सगळं सांगत असतो मला. आजी मी काय ते आता हे बोलावलं आहे, ते पिझ्झा बोलावलाय, काय काय सांगत असतो. नुडल्स काय ते मॅगी काय पावभाजी काय सगळं काही मोबाईल वरून बोलवत असतो तो. मला सांगतो आजी तू पण बोलवत जा. मी माझी बनवते आणि खाते. आता तुमच्या सारख नाही ना आमचं.”

दोघेही हसायला लागले आणि मावशीला दोघांच्या चेहऱ्यावरचा हसू बघून मावशीच्या चेहऱ्यावर हास्य आलं.

“किती गोड दिसताय, नेहमी असेच हसत रहा.”

दोघांनी छान जेवण केलं. बाजूला शेत होतं तिथे शेतात फिरायला गेले. हे सगळं गावाकडंचं वातावरण ऋतुजाने बघितलेलं नव्हतं त्यामुळे तिला खूप मस्त वाटलं.

क्रमशः

ऋतुजा वैरागडकर

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.


0

🎭 Series Post

View all