साद प्रेमाची -भाग १

हळवी प्रेमकथा!
साद प्रेमाची भाग -१

आओगे जब तुम, ओ ऽ साजना
अंगना फूल खिलेंगे
बरसेगा सावन
बरसेगा सावन, झूम-झूम के..


गाणं चालू असताना त्याच्या कारमधील स्क्रीनवर तिचे आणि त्याचे कॉलेजमधले फोटो एका मागोमाग एक पुढे सरकत होते. गाणं गुणगुणताना तिच्या सोबतच्या आठवणी त्याच्या मनात पुन्हा रुंजी घालू लागल्या. गाडी चालवताना बटणावर हात टाकत तो भावूकपणे तिच्या आठवणीत स्वतःच गुणगुणला,

दो दिल ऐसे मिलेंगे
आओगे जब तुम, ओ ऽ साजना
अंगना फूल खिलेंगे


तिच्या सोबतच्या आठवणी म्हणजे त्याच्या सोबतीच होत्या जणू! आजही तिची आठवण येत होती. नेहमीसारखीच किंबहुना नेहमीपेक्षा जरा जास्तच कारण तो तिलाच भेटायला निघालेला. गाडीचा वेग वाढवून त्याची चार चाकी विघ्नहर्ता सोसायटीजवळ थांबली.

इथपर्यंत तो तिला भेटण्याच्या ओढीने आलेला पण तिच्या रूमवर जाताना त्याचे पाय जडावले. लिफ्टने जाण्याऐवजी तो स्वतःच्याच विचारांत चौथ्या मजल्यावर जिन्याने गेला. दरवाजावर सोनेरी अक्षरांत पाटी होती-
‘डॉ. विराज सुभानराव गायकवाड’

‘विराज’ या नावावरून त्याची बोटे आपोआप फिरली. डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. रूमालाने डोळे कोरडे करताना दरवाजा उघडाच असल्याने आतील संवाद त्याच्या कानी आला.

“सून नाही मुलगीच आहे आमची जरं ती स्वेच्छेने लग्नाला तयार झाली तरं आनंदच होईल आम्हाला.” एक पुरुषी थकलेला आवाज ऐकू आला.

लगेचच एक ओळखीचा आणि आवाजात तोच अहं असलेला आवाज आला,
“भाऊ आहे मी तिचा. तिचं भलं तिच्यापेक्षा मला जास्त कळतं. अभय येतोय तिला भेटायला, हेच सांगायला मी आलोय. तिचा मित्र आहे. यू एस रिटर्न आणि विराजच्या आधी त्यानेच लग्नाची मागणी घातलेली तिला जरं आजही तो तयार असेल तरं—”

त्याच्या बोलण्यावरूनच बाहेर उभ्या असलेल्या अभयला अंदाज आला. आतमध्ये तिचा भाऊ राघव आहे. आजही त्याच्या आवाजात तोच भावनिक कोरडेपणा होता. त्याला त्याक्षणी राघव आणि त्याची शेवटची भेट आठवली……

सगळं सुरळीत चालू असताना अचानक काळसर्प आडवा यावा तसा राघव त्याच्या आयुष्यात आडवा आलेला. त्याच्यामुळेच अभयचं सगळं आयुष्य घड्याळाच्या उलट्या काट्यासारखं फिरलेलं. त्यांच्या शेवटच्या भेटीच्या आठवणीने काळजात लपवलेली एक दुखरी नस दबल्याने अभयच्या मुक्या वेदना डोळ्यांत उतरल्या आणि पुन्हा डोळे कोरडे करेपर्यंत तोच आवाज आला,
“अभय तू बाहेर का उभा? ये, आत ये.”


राघवच्याच आवाजाने अभय भूतकाळातून पुन्हा वर्तमाने आला. चेहऱ्यावर हलकसं स्मित ठेवून शूज बाहेरच उतरवून अभय आतमध्ये गेला. राघव त्याची ओळख करून देत समोरच्या वृद्ध व्यक्तीला बोलला,
“हा अभय. यूएस रिटर्न आहे. आपल्या रेवतीचा चांगला मित्र.”

ज्या ओठांनी सणसणीत अपमानाचे घोट पाजलेले त्याच ओठांतून आज कौतुकाचे शब्द ऐकताना अभयच्या काळजाला सलले आणि पुन्हा तोच बोलला,
“हे आबा म्हणजे रेवतीचे सासरे.”

तरूण मुलगा गेल्यावर येणाऱ्या नैराश्याने त्यांच्या झाकोळलेल्या चेहऱ्याकडे अभयला बघवलं नाही. तो उगाचच थोडसं स्मित करत मनापासून त्यांच्या पाया पडत बोलला,
“कसे आहात आबा?”

सुभानरावांना अचानक विराजची आठवण येऊन ते भावूकपणे बोलले,
“बराच म्हणायचं.”

अभयची नजर इकडे तिकडे भिरभिरत तो आतुरता लपवत बोलला,
“अं ऽ रेवती?”

राघव लगेचच अभयला खोलीपर्यंत सोबत करत आला,
“ही कोपऱ्यातीलच तिची खोली. तुझ्याशी तरी बघ मोकळेपणाने बोलतेय का. हल्ली माझ्याशी तरं बोलणंच टाकलंय तिने.”


खोलीचा दरवाजा उघडाच होता. अभय खोलीतून नजर फिरवत आतमध्ये गेला. समोरच्या भिंतीवरच रेवा, विराज आणि त्यांच्या छोटुशा परीचा नजर लागण्यासारखा फोटो होता. कसल्याशा चाहूलीने त्या फोटोवरची नजर हटून बाल्कनीकडे धावली आणि पडद्यामुळे पुसटशी दिसणारी ‘ती’ पाहून कितीतरी वर्षांनी पुन्हा त्याच्या काळजात हालचाल झाली आणि आपसूकच अभयचे डोळे ओलावले.‌ त्याने प्रेमाने तिला साद घातली,
“रेवा ऽ ऽ.”

सहा महिन्यांनी पुन्हा तीच प्रेमळ साद ऐकून तिने झटकन मागे वळून पाहिलं. मध्ये असणाऱ्या झिरझिरीत पडद्यामुळे बघताबघता तिचे डोळे भरले. तीच उंची, तोच अत्तराचा दरवळ आणि तीच प्रेमाची आर्त साद!

पलिकडे विराज असल्याचाच भास होऊन रेवती “विराज ऽ.” पुटपुटत पुढे झाली आणि समोर अनपेक्षितपणे अभयला पाहून ती जागीच खिळली.

पाच वर्षानंतर दोघेही एकमेकांसमोर होते. तिच्या हसऱ्या चेहऱ्यावर आता दुःखाची छटा घर करून होती, डोळ्याखालची वर्तुळ अपुऱ्या झोपेची साक्ष देत होती. रंगहीन साडीमध्ये तिला अशी दुःख सागरात डुबलेली पाहताना अभयच्या डोळ्यांच्या कडा पुन्हा दुःखाने पाणावल्या.

तिला अचानक काहीही न सांगता निघून गेलेला तो तसाच अचानक तिच्या समोर येऊन उभा होता.
‘का’ अशा बऱ्याच ‘का’ च उत्तर आजही तिला त्याच्याकडून हवं असलं तरी या एकाकीपणात जवळचा कोणीतरी भेटल्याचा आनंद तिच्या डोळ्यांत चमकला आणि तो शांत आवाजात बोलला,
“कशी आहेस?”

“बरी. तू?” अगदीच औपचारिकपणे ती बोलली.

दोघांमधील मोकळी हवा सुद्धा कोंडल्यासारखी त्यांचा श्वास जड करत होती. तो मोकळा श्वास सोडत उगाच हसत बोलला,
“दोन दिवसांपूर्वीच इथं शिफ्ट झालोय.”

“हम्म ऽ.”

त्याला खूप काही बोलायचं होतं, आजवर कोणाशीच उघड न केलेला त्याच्या मनाचा कप्पा तिच्या समोर उघड करायचं होता पण त्या क्षणी दोघांमध्ये वावरणाऱ्या कोंदट हवेने सगळं जिथल्या तिथे राहिलेलं.

“तुमच्या अपघाताबद्दल कळलं. सॉरी, मी येऊ शकलो नाही.”
तो काहीसा अपराधी भावनेने बोलला.

त्या अपघाताच्या आठवणीने ती भावूक झाली आणि अभय त्या फोटोकडे बघून तो दुःखाने बोलला,
“किती दिवस त्याच आठवणींमध्ये झुरत बसणार आहेस रेवा‌‌? आयुष्याला ही एक संधी दे.”


आई, सासू-सासरे, दादा सगळ्यांच्या तोंडून पुन्हा पुन्हा ऐकलेलं वाक्य अभयच्याही तोंडी ऐकून ती हक्काने त्याच्यावर रागावली आणि त्याच्याकडे रागाने पाहत जरा तिखट शब्दांत बोलली,
“त्या फक्त आठवणी नाहीत अभय, माझ्या जगण्याचा आधार आहेत. सोड, तुला नाही कळायचं.”

तिचा सूर आणि तिच्या आवाजातील तिरस्कार त्याच्यापर्यंत जसाच्या तसा पोहोचला तरीही काहीच न कळल्यासारखा तो प्रेमाने बोलला,
“प्रत्येक गोष्टीवर काळ जालीम इलाज असतो रेवा.. तुझं दुःख मी वाटू शकत नाही पण तुला असं खितपत पडलेलंही पाहू शकत नाही. हळूहळू सगळं ठीक होईल. ही योग्य वेळ नाही बोलण्याची तरीही बोलतोय, स्वतःलाच एक संधी देशील माझ्यासोबत?”


त्याचं बोलणं ऐकूनच कधीकाळी त्याच्यासोबत लग्नाची स्वप्न पाहणाऱ्या रेवाच्या अंगाचा तिळपापड झाला. भूतकाळातील सल काळजात खोलवर टोचली आणि ती दुःख, राग, तिरस्काराने जळजळीत शब्दांत बोलली,
“कोण आहेस तू? मी नाही तुला ओळखत.”


तिचा तिरस्कार स्वीकारत तो दुःखाने घोगऱ्या आवाजात बोलला,
“रेवा ऽ, आय एम सॉरी! प्लीज, फक्त एकदा ऐकून घे ना.”

ती पाठमोरी होऊन डोळ्यांतील पाण्याचा आवाजावर परिणाम न होऊ देता बोलली,
“दरवाजा उघडा आहे. गेलास तरी चालेल.”

तिने अपमान करूनही तिलाच डोळ्यांत साठवून अभय तिथून निघाला आणि बाहेर शूज पायात चढवत असताना राघव जवळचा मित्र असल्यासारखा बोलला,
“मी ऐकलंय तुझं बोलणं. तू रेवतीसोबत लग्न करायला तयार असशील तरं मी लावून देतो तुमचं लग्न. तू लक्ष देऊ नकोस तिच्याकडे. तू गेल्यावरही अशीच करत होती पण नंतर विराजसोबत संसारात रमलीच ना? तशीच थोड्या दिवसांत तुझ्यासोबत पण रमेल.”

नात्यांचा व्यवहार मांडलेल्या राघवच्या बोलण्याने अभय आपला राग आवरत शांतपणे बोलला,
“स्त्री-मन पैशाने विकत घेता येत नाही राघव, ते जिंकावं लागतं! कमीतकमी अजून तरी तिच्या भावनांशी खेळू नकोस.”

© प्रियांका सुभा कस्तुरी
१०/०७/२०२४

🎭 Series Post

View all