साद प्रेमाची- भाग २

हळवी प्रेमकथा!
साद प्रेमाची- २

त्याच्यासाठीचा तिच्या डोळ्यांतील तिरस्कार त्याने तटस्थपणे तिच्यासमोर स्वीकारला पण गाडीत बसल्यावर मात्र-

गाडीच्या सीटला टेकून डोळे बंद करून तो स्वतःशीच बडबडत होता,
‘फक्त एकदा ऐकून घे ना रेवा. तुझ्या अभयला ओळखलंच नाहीस का तू? माझा तेव्हाचा निर्णय योग्यच होता. विराजसोबत किती खूष होतीस तू. मी तुझ्या आयुष्यातून कायमचा गेलो म्हणून तरं तू पुढे जाऊ शकलीस. आज जरं मी पुन्हा तुझ्या आयुष्यात पाऊल ठेवलंय तरं फक्त तुझ्यासाठी! मी नाही पाहू शकत तुला असं.’

स्वतःच्या मनाशी हितगुज करताना त्याचा मोबाईल वाजला आणि मोबाईल स्क्रीनवर ‘राघव देशमुख’ नाव दिसताच त्या मोबाईलला बघत तो पुन्हा स्वतःशीच बडबडला,
‘इतका कसा पाषाण हृदयी तू राघव? तुझ्यासारख्या लोकांमुळे प्रेमाचं पाखरू श्वास घेण्याआधीच गुदमरून मरतं; तरीही तुम्हां लोकांना काडीचाही पश्चाताप नसतो. ‘उलट्या काळजाचे’ कदाचित तुझ्यासारख्या लोकांनाच म्हणत असतील.’


राघवचा मिस्ड कॉल पडल्यावर लगेचच ‘रेखा काकू’ नंबर वरून कॉल आला. तो काॅल उचलल्यावाचून मात्र अभय स्वतःलाही थांबवू शकला नाही. मोकळा श्वास सोडत त्याने कॉल उचलला,
“कशा आहात काकू?”

“अभय ऽ ऽ.” पलिकडून पुसटसा आवाज आणि हलकासा हुंदका ऐकू आला, तसे अभयचे डोळे ओलावले.

“कुठे होतास इतकी वर्षे? एक भेट नाही की एक फोन नाही?” रेखाताई पदराने डोळे पुसत बोलल्या.

अभय उगाचच हसत वेदनेने बोलला,
“देशमुखांच्या घरचा नोकर होण्यासाठी सुद्धा औकात लागते ना काकू? तीच कमवायला गेलेलो.”


“अभय ऽ.” रेखाताईही वेदनेने कळवळल्यासारख्या बोलल्या,
“तू अजून राघवचं बोलणं मनात ठेवून आहेस? त्याचा मेंदू पहिल्यापासूनच गुडघ्यात आहे. त्याच्या तोंडाने जवळपास सगळेच नातेवाईक तुटलेत. कमीत कमी तू तरी–
हवं तरं मी तुझी माफी मागते.”


“काकू प्लीज, आय एम सॉरी.”
आपले डोळे चिमटीत पकडून अभय दिलगिरी व्यक्त करत बोलला,
“सॉरी काकू, तुम्हाला दुखवण्याचा हेतू नव्हता, खरंच सॉरी आणि राहिला प्रश्न राघववर रागावण्याचा तरं तो दगड आहे. त्याच्यावर रागावणं म्हणजे स्वतःलाच इजा करून घेणं, हे कळलंय मला.”


रेखाताई स्वतःला सावरत बोलल्या,
“रेवा काही बोलली?”


अभय सुद्धा स्वतःला सावरत रेवतीच्या बाजूने विचार करत बोलला,
“आपण तिला तिचा वेळ द्यायला हवा काकू. तिच्या दुःखाची कल्पना कदाचित आपण करू शकत नाही त्यामुळे तिच्या कलानेच घेऊया.”

रेवतीला समजून घेणारा पुन्हा तिच्या आयुष्यात आल्याचं पाहून रेखाताई समाधानाने बोलल्या,
“घरी कधी येतोस? मी वाट पाहतीये.”

होकारही देऊ शकत नव्हता आणि नकारही देऊ शकत नव्हता त्यामुळे अभय तूर्तास फक्त हुंकारला
“हम्म ऽ, कळवतो.” आणि त्याने कॉल ठेवून दिला.

भूतकाळातून स्वतःला बाहेर काढून अभय पुन्हा रेवतीच्या विचारात गुंतला. तिला यातून कसं बाहेर काढायचं? विचार करता करता त्याने सहज तिचं फेसबुक अकाउंट उघडलं. त्यावर तिचे विराजसोबतच बरेच फोटो होते. त्या फोटोंमधूनच त्याला जाणवलं, तिने विराजला मनापासून स्वीकारलेलं. तिचं त्याच्यावर खूप प्रेम होतं. ते फोटो पाहताना तिला गमावल्याची भावना पुन्हा मनात डोकावून उगाचच डोळ्यांच्या कडांमधून चोरटं पाणी बाहेर पडलं. त्या फोटोंमध्ये तिच्या छोट्याशा परीसोबत तिचे हसतानाचे, खेळतानाचे फोटो होते. त्या प्रत्येक फोटो खाली लिहिलेलं-
‘#माय लाईफ माय लिटल एंजल’ त्या फोटोंवरून प्रेमाने बोटं फिरवून त्याने मोबाईल ठेवून दिला.

………..


जवळपास दीड महिन्याच्या अंतराने तो पुन्हा तिच्या घराबाहेर उभा होता. दाराची बेल वाजवली आणि सुभानरावांनी दरवाजा उघडला. अभयला पाहून ते ओळखीचं स्मित करत बोलले,
“किती दिवस तुझी वाट पाहत होतो. येत जा वरचेवर.”

अभय खांद्यावरच्या बाळाला सांभाळत हसत बोलला,
“येऊ हा आजोबा.“

विराजच्या आई म्हणजे सावित्रीबाई बाळाची नजर काढत बोलल्या,
“अगदी तुझ्यासारखीच दिसते हो!”

अभय उगाचच हसला आणि पुन्हा शांत होत रेवतीच्या दरवाज्याकडे बघत बोलला,
“भेटू का तिला?”

सुभानराव अभयमध्येच विराजला बघत बोलले,
“विचारतोस काय, जा भेट.”


आजही दरवाजा ढकललेलाच होता. बाळाला हातावर सांभाळून घेत त्याने हळूच दरवाजा उघडला. रेवती पलंगावर गुडघ्यात डोकं खुपसून गुडघ्याला हातांचा वेढा देऊन बसलेली. त्याने अलगद हातातील चिमुरडीला तिच्या शेजारी ठेवलं. ती झोपलेली असल्याने तिनेही आवाज केला नाही. तो शांतपणे सुरक्षित अंतर ठेवून उभा राहिला. काहीवेळाने त्या खोलीमध्ये लहान बाळाचे स्वर घुमू लागले,
“मम्म ऽ मम् मम्म ऽ आ ऽ ऽ आ ऽ.“

त्या स्वरांनी रेवतीच्या अंगावर शहरा आला आणि तिने शेजारी पाहिलं. तिच्या शेजारी तिच्या परी इतकीच लहानशी पिटुकली पायाचा अंगठा तोंडात घालून तिच्याकडे बघून खिदळत होती. तिला पाहताना परीच्या आठवणींनी रेवतीच्या काळजात कालवाकालव झाली आणि नजरेसमोर उभ्या असलेल्या अभयवर गेली.

विस्कटलेल्या भावनांना मोकाट सोडत ती त्याच्यावर रागावली,
“तू पुन्हा आलास?”

त्याच्याकडे पाहताना तिचे डोळे भरून वाहत होते. ओठ थरथरायला लागलेले. श्वासांची लय वाढल्याने उर धपापू लागलेला. बाळाला पाहून तिच्यात झालेला बदल डोळ्यांनी पाहत अभय जडावल्या आवाजात बोलला,
“माझी छबी. आईच्या मायेसाठी पारखी झालीये. कमीत कमी हिच्यासाठी तरी-”

“तिला उचल आणि निघून जा. तू नकोस मला पुन्हा आयुष्यात. तुझ्यासारख्या माणसाला माझ्या आयुष्यात जागा नाही. जसा तू तशीच तुझी लेक–”

बाळाला अपशब्द बोलताना तिची जीभ अडखळली आणि नजर बाल्कनीकडे फिरवून ती दुःखाने बोलली,
“घेऊन जा हिला. मला त्रास होतोय.”

तिच्या त्राग्याकडे दुर्लक्ष करून अभय पुन्हा तिला समजावत बोलला,
“दोन अपूर्ण व्यक्ती एकमेकांना पूर्ण करू शकतात रेवा. तुम्ही दोघीही अपूर्ण–”


त्याचं बोलणं ऐकून न घेताच रेवती त्याच्या बोलण्याचा वेगळाच अर्थ लावत त्याच्यावर बरसली,
“आपण दोघं कधीच पूर्ण होऊ शकत नाही आणि तसा विचारही करू नकोस. माझ्या आयुष्यात फक्त विराज आहेत आणि तेच राहतील, त्यामुळे मुलीला उचल आणि जा.”

तिच्या ओठांतून त्याच्याप्रती राग बाहेर पडत असला तरी राहून राहून छबीवर जाणारी तिची नजर, छबीकडे पाहताना डोळ्यांतून येणारे अश्रू अभयच्या नजरेतून सुटले नाहीत. तो काहीच न बोलता सरळ खोलीतून बाहेर गेला.


रेवती छबीचे बालमधुर स्वर ऐकूनही न ऐकल्यासारखे करत कठोर मनाने बाल्कनीकडे बघत बसली. छबी पायाचा अंगठा तोंडात घालून रेवतीकडे बघत अजूनही खुदुखुदु खिदळत होती पण काहीं मिनिटांतच छबी अचानक रडायला लागली. तिच्या रडण्याने रेवती अस्वस्थ झाली. बाल्कनीकडे बघूनच तिने अस्वस्थपणे आवाज दिला,
“रडतीये ती.. कोणीतरी घेऊन जा तिला.”


बाहेरून कोणीच आलं नाही. भूक लागल्याने छबी जोरजोरात रडू लागली, तशी रेवती जास्तच अस्वस्थ झाली. मातृत्व जागं झाल्याने तिने छबीला उचलून घेतलं आणि तिचे डोळे पुसत मुसमुसत बोलली,
“काय झालं बाळा? भूक लागलीये?”


तिचा खांद्यावरचा पदर हातात घट्ट पकडून छबी तशीच जोरात टाहो फोडू लागली आणि तिला रडताना पाहून व्याकुळतेने तिच्यातच परीला शोधत रेवतीने रडतच तिला छातीशी घट्ट कवटाळलं. छबीचं रडणं सहन न होऊन सहा महिन्यांनी तिला पुन्हा पान्हा फुटला. छाती भरून आली आणि तिने लगेचच छबीला पदराखाली घेतलं.

तिच्या मातृत्वाच्या पान्ह्याने तिचं अंग अंग मोहरलं. छबीला मायेने गोंजारत रेवतीच्या डोळ्यांतून अश्रू पाझरत होते. तिच्या पदराखालची हालचाल शांत झाल्यावर तिने छबीला मांडीवर घेतलं. तिच्या ओठांच्या कडेला लागलेल्या दुधाचे थेंब पुसताना मात्र रेवती समाधानाने हसली.

© प्रियांका सुभा कस्तुरी
१०/०७/२०२४

🎭 Series Post

View all