साद प्रेमाची- भाग ३

हळवी प्रेमकथा!
साद प्रेमाची- ३

आपल्या मातृत्वाला पान्हा फुटल्यावर रेवतीने छबीला स्वतःपासून दूर केलंच नाही. ती तिची परीच होती जणू! रेखाताई- सावित्रीताई यांनी रेवतीला खूप समजावलं आणि शेवटी फक्त छबीसाठी मनावर दगड ठेवून विराजच्या आठवणींसोबत रेवती पुन्हा लग्न बंधनात अडकली आणि सौभाग्यवती रेवती अभय प्रधान झाली.


कोर्टातून त्याची गाडी सरळ बंगल्याकडे गेली आणि रेवतीसोबतच देशमुख आणि गायकवाड कुटुंबाचादेखील प्रधान कुटुंबामध्ये गृहप्रवेश झाला. अभयच्या ऐसपैस बंगल्यामध्ये रेवतीसोबत सुभानराव, सावित्रीताई, रेखाताई यांचं अभयच्या आईने ‘आशाताईंनी’ उत्साहात स्वागत केलं.


एक-दोन दिवसांतच सर्वांचा सहजच वावर त्या घरात होऊ लागला आणि घराला खऱ्या अर्थाने छबीमुळे घरपण आलं. “छबी ऽ, परीऽ ” करताना रेवती थकत नव्हती. छबीसोबत पुन्हा रेवतीच्या चेहऱ्यावर पहिल्यासारखं हसू पाहून सगळेच समाधानी होते.‌

छबीसोबत खेळताना तिचे सगळे आजी-आजोबा ही थकत नव्हते. रेवतीच्या एका निर्णयाने देशमुख, गायकवाड आणि प्रधान तिन्ही कुटुंबांना जणू संजीवनी मिळालेली. त्या तिन्ही जीर्ण झालेल्या फांद्या एकत्र आल्यावर ताजतावान्या झालेल्या. आयुष्य जगण्याची नवीन उमेद त्या सर्वांना सापडलेली.

अभय मात्र आपलं बहरलेलं घर पाहून समाधानी होता. रेवतीच्या चेहऱ्यावर पुन्हा पहिल्यासारखं हसू पाहून तो आनंदी होता. रेवतीच्या अबोल्यामुळे तो खोलीमध्ये शक्यतो जितक्यास तितकाच थांबत होता. तिचा अबोला असला तरी हळूहळू तिचा राग ओसरत चाललंय, हे तिच्या नजरेवरून त्याला जाणवत होतं.


लग्नाला तीन-साडेतीन महिने झाले असतील. अभयने नेहमीसारखी ऑफिसहून आल्यावर शूज उतरवत दारातूनच आरोळी दिली,
“आई, भूक लागलीये ऽ.”

आशाताई लगबगीने बोलल्या,
“काय बनवू?”

..लगेचच रेखाताई सोफ्यावरून उठत गडबडीत,
“धिरडे करू का?”

.. आणि तेव्हाच स्वयंपाकघरातून सावित्रीताईंची आरोळी आली,
“गरमगरम गुळपोळी केलीये. हात पाय धुऊन ये.”


सुभानराव लगेचच अभयला मस्का मारत बोलले,
“मला पण एक सांग ना.”

अभय हसतच नकारार्थी मान हलवत बोलला,
“आबा, शुगरवाल्यांनी जरा जिभेला ताळ्यात ठेवावं.”


सुभानरावांनी गाल फुगवल्यावर अभयने
हसतच सुभानरावांना प्रेमाने कवटाळलं. तीन आयांच्या वात्सल्याने नहात, आबांच्या मायेने तृप्त होऊन अभयला घरातच स्वर्ग अवतरल्यासारखा वाटत होता.

अभय हसतच स्वयंपाकघरात डोकावत बोलला,
“आई ऽ, प्लीज आबांनाही शुगर फ्री खजूर पोळी कर ना.”

“जसे मोठे होतील तसे लहानच!” सावित्रीबाई तोंडात कुरबुरल्या आणि अभय हसतच आपल्या खोलीत जात बोलला,
“फ्रेश होऊन आलोच.”

अभय उंबऱ्यात पोहोचलाच होता की काहीच अंतरावर रेवती पाठमोरी बसून हाताने छबीला खुणावत जवळ बोलावत होती आणि त्याची चिमुरडी भिंतीला आणि पलंगाला टेकून उभी राहून तिच्याकडे बघून खिदळत होती.

सगळ्यांच्या प्रेमाने, मायेने त्याच्यासारखीच न्हावून निघत बाळसेदार असणारी छबी हसताना गोजीरी दिसत होती. ती भिंतीला धरून चालते, हे अभयला माहीत होतं पण तिच्याकडे पाहताना त्याचे श्वास थांबल्यासारखे झाले. आपली मान हलवत हाता-पायाचा हलकासा कंप स्वतःच सावरत डुलत डुलत छबीने दोन-तीन पावले उचलली आणि अभयच्या हातातून त्याची ऑफिस बॅग गळून पडली. डोळ्यांत आनंदाश्रू अवतरले. तिच्या पाऊल उचलण्याची किती दिवस वाट पाहणाऱ्या रेवतीनेही हसता हसता रडतच तिला गळ्याशी कवटाळलं.

त्याच्या लेकीने पाऊल उचलण्याचा आनंद डोळ्यांत उतरून छबीला रेवतीसह मिठीत घेत अभय अत्यानंदाने बोलला,
“माझी छबूडी ऽ.” आणि त्याने तसंच हसतच छबीच्या केसांवर ओठ टेकवले.‌

पाठीला झालेल्या त्याच्या स्पर्शाने रेवतीची नजर आपोआप त्याच्यावर गेली आणि अभय लगेच बाजूला होत डोळ्यांतील आनंदाश्रू पुसत हसत बोलला,
“सॉरी.”

त्याने पुन्हा तसच हसत विचारलं,
“कधीपासून चालायला लागली? आपली छबी लवकर मोठी झाली ना?”

रेवती त्याच्या चेहऱ्यावर असा निखळ आनंद कितीतरी वर्षांनी बघत होती. त्याने हसतच बॅग उचलून टेबलवर ठेवली आणि हातपाय धुऊन पुन्हा बाहेर गेला. बाहेरून पुन्हा सर्वांचेच हसण्याचे आवाज येऊ लागले. अभय बोलत होता आणि सगळेच हसत होते.

तिला ही जाणवत होतं, लग्न जरी तिने केलं असलं तरी तिच्या एका निर्णयाने सगळ्यांचंच आयुष्य बदललेलं. सुभानराव आणि सावित्रीताईंना त्यांचा विराज अभयमध्ये पुन्हा भेटलेला. रेखाताईंना त्यांचा लायक मुलगा अभयमध्येच सापडलेला. आशाताईंना म्हातारपणी हमवयीन साथ मिळालेली.

असं असलं तरी अभयबद्दलची तिच्या मनातील अढी कायम होती. घरच्यांना त्याने प्रेमाने जिंकलेलं त्यामुळे आपोआपच त्याच्याबद्दलचा तिरस्कार तिच्या मनातून कधीच गळून गेलेला पण ‘किंतु परंतु’ अजूनही तसेच होते उलट त्यामध्ये अजून प्रश्नचिन्ह वाढलेले.

दुसऱ्या दिवशी अभय नेहमीसारखा ऑफिसला निघून गेला. छबी बाहेर सुभानरावांसोबत घोडा घोडा खेळत होती. मनात उठलेल्या प्रश्नांमुळे रेवतीने पुन्हा संपूर्ण बंगलो नजरेखालून घातला तरीही छबीच्या आईचा कोणत्याच रूममध्ये एकही फोटो दिसला नाही.


सगळे हॉलमध्ये असताना आज तिने आशाताईंना विचारलंच,
“आई, छबीच्या आईचा एकही फोटो का नाही?”

अचानक आलेल्या तिच्या प्रश्नाने आशाताई जरा गोंधळल्या पण लगेचच सावरून घेत बोलल्या,
“अभयलाच विचार.”

“नाव काय होतं तिचं?”

“त्यालाच विचार.”

उडवा उडवीची उत्तर मिळाल्यामुळे रेवतीच्या मनातील प्रश्नचिन्ह अधिकाधिक मोठं होत गेलं आणि लगेचच सुभानराव विषय बदलत बोलले,
“छबीला भूक लागलीये वाटतं. तिला भरव जा.”

सगळ्यांच्या एकमेकांकडे फिरलेल्या नजरा रेवतीला बरोबर कळल्या. सगळेच काहीतरी लपवतायेत अशी जणू तिची खात्रीच झाली. तेव्हाच सुभानरावंचा मोबाईल वाजला. अभयचा फोन पाहून त्यांनी हसत फोन उचलला,
“बोल बेटा.”

अभय विनवणीच्या सुरात बोलला,
“आबा, माझ्या स्टडी रूममध्ये ब्लू कलरची फाईल आहे. खूप महत्त्वाची आहे. पुढच्या एका तासात मिटींग आहे. प्लीज, घेऊन याल का?”

“प्लीज काय आणतो की पण नक्की कुठली फाईल? मला कसं कळणार?” सुभानराव पेचात पडल्यासारखे बोलले आणि लगेच अभयने तोडगा काढला,
“रेवाला फोन द्या.”

लगेचच मोबाईल रेवाच्या कानाला लागला,
“हम्म.” ती फक्त हुंकारली.

पलीकडून तो अगदीच नम्र आवाजात,
“थोड्यावेळात माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे. स्टडी रूममध्ये उजव्या बाजूच्या टेबलच्या वरच्या ड्रॉवरमध्ये ब्लू लाइनिंगची फाईल आहे. प्लीज, आबांजवळ पाठवून देशील का?”

“हम्म ऽ.” पुन्हा फक्त हुंकार पण तिचा हुंकार ऐकून पलीकडे अभयने मोकळेपणाने श्वास घेतला.

लग्न झाल्यापासून रेवा पहिल्यांदाच त्याच्या स्टडी रूममध्ये पाऊल ठेवत होती. सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे होत्या. त्याचा नीटनेटकेपणा तिच्या एव्हाना लक्षात आलेला. खोलीत पसरा नाही की कपडे अस्ताव्यस्त नाहीत. सगळं जिथल्या तिथे! तिला वाटत होतं, तो तिच्यामुळे इतका शिस्तीत वागतोय पण स्टडी रूममध्ये पाहिल्यावर ती पाहतच राहिली.
एखाद्या बाईला सुद्धा लाजवेल इतका नीटनेटकेपणा होता.

त्याने सांगितल्याप्रमाणे ब्ल्यू लाईनवाली फाईल लगेच सापडली पण माघारी वळताना तिची नजर सहजच समोरच्या भिंतीवर गेली आणि समोर ‘तिचा, विराजचा आणि तिच्या परीचा’ फोटो पाहताना तिचे डोळे भरून आले आणि पुन्हा एक नवीन ‘का’ जन्माला आला.


सुभानरावांनी आतमध्ये येऊन फाईल नेली तरी तिला खबर नव्हती; कदाचित तिच्या प्रश्नांची उत्तरं इथेच कुठेतरी असतील, या विचाराने तिने हिम्मत करून त्याच्या अपरोक्ष टेबलचा ड्रॉवर उघडला. सगळ्याच ऑफिशिअल फाईल होत्या, मग दुसरा ड्रॉवर उघडला मग तिसरा. सर्वात शेवटी एका फाईलने तिचं लक्ष वेधून घेतलं. फाईल वरचं नाव वाचताना तिचा हात थरथरला आणि मन घट्ट करून तिने फाईल उघडली.

सुन्नपणे खुर्चीवर बसत ती स्वतःशीच बडबडली,
“का केलंस तू असं अभय?”

© प्रियांका सुभा कस्तुरी
१०/०७/२०२४

🎭 Series Post

View all