साद प्रेमाची- भाग ४

हळवी प्रेमकथा!
साद प्रेमाची- ४

कंपनीला मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याने अभय आज घरी येताना खूप खूष होता. पायातील शूज उतरवून तो हसतच आतमध्ये गेला. हातातील मिठाई आशाताईंना भरवत तो आनंदाने बोलला,
“आई ऽ, मिठाई खा. आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालं.”

लगेचच त्याने आनंदाच्या भरात सावित्रीताई आणि रेखाताईंना सुद्धा मिठाई भरवली आणि सुभानरावांना मिठी मारत आनंदाने बोलला,
“थँक्यू थँक्यू आबा, तुम्ही ऐनवेळी फाईल घेऊन आलात आणि आपल्या कंपनीला मोठा प्रोजेक्ट मिळाला.”

अभयचा खांदा थोपटत सुभानराव कौतुकाने बोलले, “तुझ्या प्रयत्नांना अशीच उंची मिळू दे बेटा.”

“थँक्यू आबा.” अभयने त्यांना सुद्धा मिठाई भरवली आणि तिथेच खेळणाऱ्या छबीच्या जिभेवर मिठाईचा छोटासा तुकडा ठेवत तिची पापी घेत हसत बोलला,
“छबी, बाबाला नवीन काम मिळालं. मी माझ्या आईला सांगितलं. तुही तुझ्या आईला सांगशील ना?”

छबी हात हवेत हलवत हसली आणि अभय हसतच तिला उचलून घेत बोलला,
“काही कळलं नाही तरी हसतीये.”


छबीला रेखाताईंकडे देत अभय आशाताईंना बोलला,
“आई प्लीज गरमागरम कॉफी, तोपर्यंत मी फ्रेश होऊन आलोच.”

“बनवते.”

अभय आपल्या खोलीत गेला आणि नवीन प्रोजेक्ट मिळाल्याच्या आनंदात उत्साहातच पुन्हा हॉलमध्ये आला, तोपर्यंत त्याची कॉफी सुद्धा आलेली. कॉफी देताना आशाताई उगाच हसत बोलल्या,
“अरे अभय-”

“ताई आताच आलाय तो. कॉफी तरी घेऊ द्या.” सावित्रीताईंनी आशाताईंना बोलताना मध्येच थांबवलं.

अभय हातातील कॉफीचा मग खाली ठेवत आशाताईंकडे बघून बोलला,
“काय झालं आई?”

लगेचच सुभानराव पुन्हा कॉफीचा मग त्याच्या हातात देत बोलले,
“काही नाही. तू आधी कॉफी घे.”


अभयने हॉलवरून नजर फिरवली रेवती नव्हती. ती त्यांच्या खोलीत सुद्धा नव्हती. छबी सुद्धा इथेच होती. अभय काळजीने बोलला,
“रेवा कुठंय?”

त्याच्या प्रश्नाने लगेच सगळ्यांचे चेहरे तणावग्रस्त झाले. सुभानराव होता होईल एवढं सहज बोलण्याचा प्रयत्न करत बोलले,
“ती दुपारपासून तुझ्या स्टडीरूममध्येच आहे.”

अभय जागचा उठत काळजीने बोलला,
“का? कोणी काही बोललं का तिला?”

“आम्ही कशाला काय बोलू?” आशाताई त्याला समजावत बोलल्या,
“उलट तिच दुपारी छबीच्या आईची चौकशी करत होती.”

“तू काय बोललीस?”

“मी म्हटलं अभयला विचार.”

त्याने सर्वांवरून नजर फिरवत शांतपणे विचारलं,
“दुपारपासून तिच्याशी कोणी बोललंच नाही का?”

रेखाताई उतरलेल्या चेहऱ्याने बोलल्या,
“मी गेलेले बोलायला पण-”


“मी आलोच.” अभय पुढे जायला निघाला तसा त्याचा हात पकडून रेखाताई रडवेल्या चेहऱ्याने बोलल्या,
“अभय, तू आजवर तिला खूप सांभाळून घेतलंस. माझ्यासाठी फक्त आजच्या दिवस ही सांभाळून घे. ती जरं काही बोलली तरं तूच थोडं संयमाने घे. हवं तरं तिचा राग माझ्यावर काढ पण-”

अभय रेखाताईंची काळजी ओळखून त्यांना प्रेमाने समजावत बोला,
“आई, तुम्ही नका काळजी करू. मी आलोच.”

रेखाताई डोळ्याला पदर लावत आईच्या काळजीने बोलल्या,
“आत्ता कुठे ती हसू बोलू लागलेली आणि आज पुन्हा असं. तुला माहितीये, ती रागीट असली तरी मनाने खूप चांगली आहे. तू ही इतकं सांभाळून घेतोस पण अचानक काय खूळ घालून घेतलं पोरीने डोक्यात देवालाच माहित.”

अभय पुन्हा रेखाताईंना प्रेमाने समजावत बोलला,
“आई, तुम्ही नका काळजी करू. मी तिला लगेच घेऊन येतो. बसा तुम्ही.” आणि अभय लगेचच आपल्या खोलीत गेला पण स्टडी रूमच्या बाहेर आपोआप त्याच्या पावलांचा वेग मंदावला.


त्याने दरवाजा हलकासा उघडला तरं रेवती खुर्चीवर समोरच्या फोटोकडे शून्यात बघत बसलेली. अभयने दीर्घ श्वास घेतला आणि जड पावलांनीच आतमध्ये आला.

तिचा चेहरा पाहूनच त्याला कळलेलं, ती खूप रडलीये. तो सौम्य आवाजात बोलला,
“बाहेर सगळे वाट पाहताहेत तुझी.”

फोटोवरची नजर हटवून रेवती खुर्चीवरून उठली आणि त्याच्याकडे बघून जाब विचारल्यासारखी बोलली,
“हा फोटो इथे का?”

अभयने ही एकदा त्या फोटोवर नजर टाकली आणि पुन्हा विषय टाळत बोलला,
“तू बाहेर चल. आई काळजी करतायेत.”

मनात प्रश्नांचं काहूर उठलेलं असताना तो आपल्याला टाळतोय, हे पाहून रेवती काहीशी रागाने बोलली,
“मी विचारलं तुझ्या स्टुडे रूममध्ये आमचा फोटो का?”

अभय उत्तर टाळण्यासाठी इकडे तिकडे बघू लागल्यावर रेवाने रागातच टेबलवरची फाईल उचलली आणि त्याला दाखवत दुःखाने बोलली,
“हे काय आहे? आश्रय अनाथाश्रम?”


ती फाईल पुन्हा टेबलवर सारून रेवती डोळ्यांतील पाणी पुसत तशीच वेदनेने बोलली,
“म्हणजे छबी तुझी मुलगी नाही? तू दत्तक घेतलंस तिला? का? कोणासाठी आणि कशासाठी? का केलंस तू हे सगळं?”

अभय टेबलवरची फाईल पुन्हा ड्राॅवरमध्ये ठेवत जड स्वरात बोलला,
“मी तुला त्यादिवशी हेच सांगत होतो, दोन अपूर्ण व्यक्ती एकमेकांना पूर्ण करतात.”

पुन्हा तिच्याकडे बघून तो दुःखाने बोलला,
“मी आपल्या दोघांबद्दल नव्हतो बोललो रेवा, मी तुझ्या आणि छबीबद्दल बोलत होतो. तुला तिची गरज होती आणि तिला तुझी.”

रेवती डोळ्यांतून अश्रू वाहू देत बोलली,
“तरीही प्रश्न उरतोच. तू का केलंस हे सगळं? नवरा होण्याच्या आधीच बाप का झालास?”

तो तिच्याकडे पाहून वेदनेने हसत बोलला,
“तुला खरंच उत्तर ऐकायचंय? तुझ्यासाठी. कारण तुझ्या डोळ्यांत मला अश्रू नाही सहन होत.”

त्याच्या डोळ्यांत स्वतःसाठी प्रेम पाहून रेवती स्वतःला सावरत भिंतीवरच्या फोटोकडे बघत कोरडेपणाने बोलली,
“हा फोटो का लावलायस इथे?”

अभय देखील त्या फोटोकडे बघत घोगऱ्या आवाजात बोलला,
“हा फोटो मला नेहमी जाणीव करून देतो, तुझ्या आयुष्यात मला स्थान नाही.”

त्याचे अनपेक्षित शब्द खूप लागले तिला!
ती काहीशी रागाने बोलली,
“आपण फक्त बेस्ट फ्रेंड होतो का?”


अभय तोंडाने श्वास घेत बोलला,
“नाही.”


रेवती खूप वर्षांची सल मनातून काढत रडत रागावत बोलली,
“मग अचानक माझ्या आयुष्यातून का गेलास? तुला एकदाही माझी आठवण आली नाही? एकदाही वाटलं नाही, रेवा जिवंत आहे की नाही पहावं. विराजसारखा समजूतदार जोडीदार भेटला नसता तरं काय करायचं होतं मी?”

तिच्या विरहाच्या आगीत जवळपास पाच वर्षे झुरलेला तो. त्या दिवसांच्या आठवणीने देखील पुन्हा त्याच्या डोळ्यांत अश्रूंची गर्दी झाली‌. आपले डोळे घट्ट बंद करून तो हात जोडून बोलला,
“सॉरी. तुला त्रास झाला त्यासाठी सॉरी पण-” आणि-


अभय राघवचे विषारी बोल आठवून कुठेतरी हरवल्यासारखा तो दुःखाने बोलला,
“राघव बोललेला, ‘मी तुमच्या प्रॉपर्टीकडे बघून तुझ्या मागे पुढे करतो. तुझ्या पार्लरचा खर्च सुद्धा मला झेपणार नाही. तुमच्या घरचा नोकर होण्याची माझी औकात नाही. तुमच्या नोकराला ही माझ्या आईपेक्षा जास्त पगार -” पुढे फक्त त्याचे अश्रू बोलले.

तोंडाने मोठा श्वास घेत अभय तिला प्रेमाने बोलला,
“मी वर्तमनात जगतो रेवा. तेव्हा तुझ्या आयुष्यातून जाणं हे तुझ्या भल्यासाठीच होतं. थोडा त्रास झाला आपल्याला पण विराजने तुला माझ्यापेक्षा जास्त सुखात ठेवलं. मी पुन्हा माघारी वळून पाहिलं नाही म्हणूनच तू तुझ्या नवीन आयुष्यात रुळलीस. आज मी पुन्हा माघारी फिरलो तरं फक्त तुझ्यासाठी.‌”

तो जसा होता तसाच होता. आपण मात्र त्याच्या स्वच्छ प्रतिमेवर हवे तसे हवे तेव्हा शिंतोडे उडवल्याचं दुःख रेवतीला सहन होत नव्हतं. ती तोंडावर हात ठेवून हुंदके देऊन रडत होती.
अभयचे देखील डोळे वाहत होते. आपल्या तोंडावरून हात फिरवत तो घोगऱ्या आवाजात बोलला,
“मी आजही वर्तमनातच जगतो. नवरा होण्याच्या आधी बाप झालो याचा मला आनंदच आहे. छबीमुळे मला तू मिळालीस. नवे आई बाबा मिळाले. माझ्या घराचा स्वर्ग झाला. मी खूष आहे. मी खूप खूष आहे.” आणि तो डोळ्याची कडा पुसत लगेचच स्टडीरूमच्या बाहेर निघून गेला.

© प्रियांका सुभा कस्तुरी
१०/०७/२०२४

🎭 Series Post

View all