साद प्रेमाची- (अंतिम भाग) ५

हळवी प्रेमकथा!
साद प्रेमाची- ५


तो गेल्यावरही रेवती आपला चेहरा ओंजळीत घेवून रडत होती. त्याचा काहीच दोष नसताना तिने त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करून अपमानावर अपमान केलेले. किती वाईट समजलेलं त्याला पण तो मात्र पहिल्यापासून आत्तापर्यंत तिच्यासाठीच धडपडत होता, त्यामुळे तिचं मन तिला खात होतं.

ती चेहरा ओंजळीत घेवून अपराधी भावनेने बोलली,
“अभय ऽ, आय एम सॉरी.”

..आणि डोळे पुसत मुसमुसत समोर बघत बडबडली,
“पण तू ही एकदा—”

समोर तो नव्हता. तिला तिथेच ठेवून तो निघून गेलेला पाहून ती बावरली. पहिल्यांदाच त्याच्या रागावण्याने ती बिथरली.

तो गेल्याचं जाणवताच आपले डोळे पुसत ती सुद्धा स्टडी रूमच्या बाहेर त्याला आवाज देत धावली,
‘अभय ऽ, अभय ऽ.’


काही मिनिटांपूर्वी-
ते दोघे स्टडीरूममध्ये असताना हॉलमध्ये सगळे एकमेकांना दिलासा देत काळजीत बसलेले. काही क्षणांतच अभय वेगाने आपल्या खोलीतून बाहेर निघून गेला. त्याचा रडवेला चेहरा पाहताच सावित्रीताई, रेखाताई, आशाताई, सुभानराव सगळेच काळजीने उभे राहिले.

रेखाताई अपराधीपणे बोलल्या,
“परमेश्वरा, सोन्यासारख्या नवरा असून कधी कळायचं हिला?”

आशाताईच मन घट्ट करून त्यांना समजावत बोलल्या,
“ताई, थोडं धीरानं घ्या.”

त्यांचं बोलूनही होत नाही की रेवतीही आपले डोळे पुसत रडत हॉलमधून धावतच बाहेर गेली. तिलाही रडताना पाहून रेखाताई चिंतातुर काळजीने बोलल्या,
“मुलांच भांडण झालं की काय?”


सुभानराव सोफ्यावर बसत मोकळेपणाने हसत बोलले,
“पहिल्यांदाच नवऱ्याच्या मागे गेलीये. चांगली लक्षण आहेत.”


आशाताई सुद्धा सहमती दर्शवत हसत बोलल्या,
“हो ना. नवरा बायकोमध्ये आपण कशाला बोला?”


सावित्रीताईही रेखाताईंचे डोळे पुसत थोड्याशा हसून बोलल्या,
“ताई, त्यांचं ते बघून घेतील. तुम्ही नका काळजी करू.”

छबी त्या सर्वांकडे बघून खिदळू लागली तसे सुभानराव तिला उचलून घेत हसले,
“बघा, आमच्या छबुडीला पण आईबाबाची गंमत समजली.”

रेखाताई रेवतीच्या काळजीने देवाला हात जोडून बोलल्या,
“परमेश्वरा, आतातरी तिच्या पदरात सुख टाक रे बाबा!”


रेवती रडत बंगल्याबाहेर आली पण तिला अभय कुठेच दिसला नाही.

‘कुठे गेला? मला सोडून पुन्हा कुठेतरी-?’
विचारानेही रेवतीला पुन्हा रडू आलं. तिची पावले इकडे तिकडे धावू लागली आणि समोर तो दिसला.

गाडीमध्ये बसून तिच्याकडेच बघत होता. तो नजरेत येताच तिच्या जीवात जीव आला आणि तिच्या पावलांनी वेग पकडला. ती धावतच गाडीजवळ गेली आणि मोठे श्वास घेत दरवाजा उघडून बाजूच्या सीटवर बसली.

ती शेजारी बसल्यावर पाणावलेल्या डोळ्यांनी अभयने तिच्याकडे पाहिलं. उसासे घेत रेवती सुद्धा त्याच्याकडे पाहत होती. दोघांचे सुद्धा डोळे वाहत होते.

पुनर्भेट झाल्यानंतर त्यांच्यात संवाद झालाच नव्हता, त्यामुळे याक्षणी दोघांनीही नजर चोरून दोन्ही दिशेला नजरा फिरवल्या आणि मोठा श्वास घेत स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करू लागले. त्या शांततेत गाडीमध्ये फक्त त्यांचे लांब श्वास ऐकू येत होते. ती शांती नकोशी वाटून रेवतीने समोरच्या बटणावर हात टाकला आणि गाडीमध्ये सूर घुमले,

आओगे जब तुम, ओ, साजना
अंगना फूल खिलेंगे
बरसेगा सावन
बरसेगा सावन झूम-झूम के

सोबतच तिचे आणि त्याचे कॉलेजमधील फोटो समोरच्या छोट्याशा स्क्रीनवर पुढे पुढे सरकू लागले ते पाहताना काही क्षण रेवती स्तब्ध झाली पण तो अजूनही तिथेच आहे. त्याचं वळणावर तिची वाट पाहतोय, हे पाहून तिच्या डोळ्यांतील अश्रू मात्र यावेळी आनंदाश्रूंच्या रूपात पाझरू लागले.


आजवर त्याच्याशी फटकून वागणारी रेवती त्याच्याकडे बघत मोठे श्वास घेत बोलली,
“अभय ऽ, सॉरी.”

किती वर्षांनी पुन्हा तिच्या डोळ्यांत स्वतःसाठी पाणी पाहून अभय तिचा हात हातात घेत तो घोगऱ्या आवाजात बोलला,
“तू नको सॉरी बोलू.”


ती रडवेली होत बोलली,
“खरंच सॉरी. मी खूप वाईट-साईट बोलले तुला.” आणि बोलता बोलताच ती हक्काने त्याच्यावर रागावली,
“तुला काय गरज होती राघवच्या बोलण्यात यायची? तुझ्यासोबत आयुष्य मी काढणार होते, तो नाही. एकदा माझ्याशी बोलायला हवं होतंस ना तू?”

अभय तोंडाने श्वास घेत हुंकारला,
“हम्म.”

रेवती त्याचा हात घट्ट पकडून त्याच्या डोळ्यांत पाहत बोलली,
“छबीच्या आईचं नाव रेवती आहे?”

“हम्म.” त्याची वरून खाली मान आली.

“आणि तिचं नाव व्रिहा आहे?”

पुन्हा त्याचा फक्त दाटल्या भावनांनी हुंकार आला,
“हम्म.”

डोळ्यांतील अश्रूंसकट त्याच्याकडे बघत ती तशीच दुःखाने बोलली,
“विराज आणि रेवा मिळून व्रिहा ना?”


यावेळी हुंकारताना त्याच्या डोळ्यांतील अश्रूने आपली वेस ओलांडलेली,
“हम्म.”


ती रडवेली होत बोलली,
“पण विराज आणि रेवा मिळून का? अभय आणि रेवा मिळून का नाही?”


तो दाटल्या कंठाने बोलला,
“विराजची आठवण आपल्यासोबत कायम रहावी म्हणून.”

तिला पुन्हा हुंदका आला. त्याच्या हात घट्ट पकडून ती कृतज्ञतेने त्याच्याकडे पाहत बोलली,
“तू खूप चांगला आहेस अभय पण तुला ओळखण्यात मीच कमी पडले खरं तरं मी तुझ्या लायकच-”

“श्श ऽ ऽ.” तिच्या ओठांवर बोट ठेवत तो घोगऱ्या आवाजात बोलला,
“तू माझ्यासाठी काय आहेस ते मला विचार.”


रेवतीचेही डोळे त्याच्याप्रती प्रेमाने भरून आले आणि ती त्याचे डोळे पुसत प्रेमाने बोलली,
“मला एक संधी देशील? मलाही तुझ्यासारखंच वर्तमानात जगायचंय. आपल्या घराचा स्वर्ग तुझ्या सोबतीने अनुभवायचंय. तुझी रेवा बनून तुझ्यावर हक्क गाजवायचाय.”

अभयच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. त्याची रेवा त्याला प्रेमाने साद घालत होती. पुढे होऊन तिला घट्ट मिठीत बंदिस्त करत तो दाटल्या कंठाने पुटपुटला,
“मी तुझा होतो, आहे आणि कायम राहीन फक्त मला दूर लोटू नको. खूप त्रास होतो मला.”

त्याच्या मिठीत विरघळत रेवती मुसमुसत बोलली,
“साॅरी, रिअली साॅरी. लव यू सो मच अभय.”

तिच्या केसांवर ओठ टेकवत तो ओठांत पुटपुटला,
“लव यू टू रेवा.”

सोसलेल्या विरहाच्या अश्रूंना वाहून देत दोघेही एकमेकांच्या मिठीत आपली प्रेमाची आर्त साद स्पर्शाद्वारेच व्यक्त करत होते आणि तेव्हाच गाडीमध्ये सूर घुमत होते,


दो दिल ऐसे मिलेंगे
आओगे जब तुम, हो, साजना
अंगना फूल खिलेंगे

समाप्त.

© प्रियांका सुभा कस्तुरी
१०/०७/२०२४

🎭 Series Post

View all