उन्हाळा स्पेशल पापड रेसिपीज
आता उन्हाळा म्हंटला की त्यात आम्हां बायकांना वाळवणाचे पदार्थ करण्याची भारी हौस असते. कोणी काय रेसिपी सांगेल ते करून बघायचे आणि पुन्हा तेच सगळ्यांना सांगत सुटायचे. बरं मध्ये मध्ये असतातच आपली चिल्ली पिल्ली लुडबूड करायला, त्यांना प्रत्येक गोष्टीची आपल्यापेक्षा जास्त उत्सुकता असते. तर बघुया उन्हाळ्यात करायच्या वेगवेगळ्या पद्धतीचे वाळवणाच्या रेसिपीज.
उपवासाचे साबुदाणा आणि बटाट्याचे पापड
साहित्य- एक किलो साबुदाणा, तीन ते चार किलो बटाटे, जीरे, चवीनुसार मीठ आणि लाल मिरची पावडर.
कृती- १) सर्वप्रथम साबुदाणा रात्रभर भिजत घालावा मग सकाळी तो थोडे थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यावा.
२) नंतर त्यात अगदी थोडे पाणी घालून पाण्यात शिजवून घ्यायचा. शिजवताना चमच्याने सतत ढवळत राहायचे नाहीतर कमी पाण्यामुळे तो खाली चिटकून जातो.
३) आता त्यात उकडलेले किसून घेतलेले बटाटे घालावे आणि एकत्र करून घ्यायचे.
४) आता जीरे, मीठ, लाल मिरची हे सर्व घालून एक वाफ आणावी नंतर छान मऊ पिठ मळून घेतो तस एकत्र करुन घेणे.
५) आता प्लॅस्टिक पेपरवर दोन्ही बाजूने तेल लावून घावे जेणेकरून पापड करताना त्याला चिकटणार नाही.
६) पापड मशिनमध्ये प्लास्टिक पेपर ठेवून त्यात छोटे छोटे गोळे करून पातळ पापड दाबून घ्यावे आणि तयार पापड हे प्लास्टिकवरच वाळत घालावे. साडीवर घातले तर ते साडीला चिकटून बसतात.
७) दोन दिवस कडक उन्हात पापड वाळवून घेणे आणि ते हवाबंद डब्यात भरून ठेवणे.
८) पापड चांगले कडकडीत वाळले की लगेच गरम तेलात तळून खाऊन घेणे. तोंडात विरघळतील असे पापड अप्रतिम लागतात.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा