Login

त्याग. भाग 1

About Sacrifice

"आई का रडते आहेस? तू अशी रडणार असशील तर ...मी लग्न करत नाही आणि तुला सोडूनही जात नाही."

रेवा आईला म्हणाली.

"अगं हे आनंदाचे अश्रू आहेत गं..लग्न झाल्यावर तू हे घर सोडून सासरी जाशील,तुझी आठवण नेहमी येत राहील.यामुळे वाईट वाटणारचं! पण आवडत्या व्यक्तीबरोबर तुझे लग्न होणार आहे. तुझ्या मनासारखे सर्व होत आहे. तुझ्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मलाही आनंद होत आहे.या मनातील भावना अश्रूरूपात डोळ्यातून वाहत आहेत."

सुनीताताई रेवाला म्हणाल्या.

आपले बोलणे रेवाने ऐकले की नाही?हे पाहण्यासाठी सुनीताताईंनी आपल्या मांडीवर डोके ठेवून झोपलेल्या रेवाकडे पाहिले, ती डोळे मिटून गाढ झोपलेली होती.
दिवसभराची धावपळ आणि आईच्या मांडीवर डोके ठेवून झोपलेल्या रेवाला, आई मायेने थोपटत असताना आईचे बोलणे ऐकता ऐकता केव्हा झोप लागली? हे तिला कळालेही नाही. झोपेत देखील रेवाचा चेहरा हसरा व आनंदी दिसत होता. रेवाचा असा हसरा व आनंदी चेहरा पाहून सुनीताताईंना खूप बरे वाटले आणि 'देवा,माझ्या रेवाला नेहमी असंच आनंदात व सुखात ठेव.' अशी देवाला त्यांनी मनापासून प्रार्थना केली.
आपल्याला जसा त्रास झाला तसा आपल्या रेवाला होऊ नये. या विचाराने सुनीताताईंना रेवाची खूप काळजी वाटायची.पण रेवाला तिच्या मनासारखा, तिच्यावर खूप प्रेम करणारा जोडीदार भेटला होता. त्यामुळे सुनीताताईंची काळजी कमी झाली होती.आता दु:ख व काळजी यांची जागा आनंद व समाधान यांनी घेतली होती. रेवा तर खूप खूश होती आणि सुनीताताई तर जास्तच खूश होत्या. त्यांच्या आयुष्यात आता सुख व आनंद होता; पण मानवी स्वभावानुसार,व्यक्ती कितीही सुखात असली तरी ती व्यक्ती जुने दिवस, जुन्या आठवणी,आयुष्यातील वाईट प्रसंग,दु:खाचे क्षण विसरत नाही.प्रसंगानुसार ते आठवत राहतात. सुनीताताईंचेही असेच होते.आता त्या सुखात होत्या पण भूतकाळातील गोष्टी आठवल्यास त्यांना वाईट वाटायचे.
रेवाचा आनंदी चेहरा पाहून त्यांना आपला भूतकाळ आठवू लागला...


आपणही लग्न जमले तेव्हा किती खूश होतो! आईवडिलांनी श्रीमंत, घरंदाज कुटुंब पाहून लग्न ठरवले होते.श्रीमंती पाहून नाही पण मुलगा आवडला म्हणून मीही होकार दिला होता.
मला एवढं चांगल स्थळ मिळाल म्हणून जवळच्या काही नातेवाईक व मित्रमंडळी यांना आनंद झाला होता तर काही जणांच्या वागण्यात मत्सर,नाराजी वगैरेचे सूर जाणवत होते.आम्हांला त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळही नव्हता.आम्ही सर्व लग्नाच्या तयारीत होतो....