Login

सफरनामा

सफरनामा हा माझा आत्म परिचय आहे. प्रामाणिक पणे लिहिण्याचा एक प्रयत्न केला आहे. तरी सर्वांनी आवडून घ्या व छान आहे म्हणा.
सफरनामा
----------------------------------------
नहीं तेरा नशेमनं कसर् ए सुल्तानी के गुंम्बद पर,
तू शाहीन है बसेरा कर
पहाडों की चट्टानों पर ।
( आत्मचरित्र लिहीण्या एवढे माझे चरित्र महान नाही तसेच तेवढ म्हातारं वय ही नाही. काल परवाच जन्मले ओ मी. आता कुठे पेन सरळ धरायच शिकले मग आत्मचरित्र काय लिहावं अशा पाषाणाने. प्रयत्न केला आहे आवडतो का बघा माझा सफरनामा . )

सन १९९६ स्थळ : मुगळी , ता . अक्कलकोट, जिल्हा : सोलापूर . थंडीचे दिवस नुकतीच रमजान ईद झाली होती. (ऊर्दू नुसार ३ शव्वाल १४१६) दि : २२ फेब्रुवारी १९९६, गुरुवार. मध्यरात्र उलटून गेली आणि माझ्या आईला प्रसूती कळा सुरु झाल्या. घरातील एका अंधाऱ्या कोठरीत घेऊन गेले.एक आजी दाई होती तिला बोलावलं होत दुसरं कुणी नव्हतं घरात आजी-आजोबा , दाई म्हणून आलेली आजी. बाबा ( मेहबूब ईनामदार ) कामा निमीत्त बाहेर. प्रसूती होईपर्यंत पहाट झाली होती. त्या अंधारात प्रत्येक अंधारा विरुद्ध बंड करणे ही प्रवृत्ती घेऊन शगुफ्ता नावाच एक कन्यारत्न झाले. प्रथेनुसार जन्मलेल्या बाळाच्या कानात अझान देण्या करिता आजोबांकडे देण्यात आले तेवढ्यात मस्जिद मधे फजर ( पहाटेची नमाज ) ची अझान झाली. त्या अझान नंतर मग आजोबांनी कानात अझान दिली ज्याचं भाग्य आम्हा तीघ भाऊ बहिण मधे मला मिळालं. कारण आईची डिलेव्हरी माझ्या वेळेस तिच्या माहेरी नाही तर सासरी झाली. आजोबा खूप नेक होते त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत माझी त्यांची बॉन्डिंग चांगली होती. तसं दोन्ही आजोबा मला खूप जीव लावणारे होते.
माझ्या आई- बाबांना जरी मी एकुलती असले तरी घरात माझ्या आधी ६ मुली च होत्या मग जल्लोष वगैरे चा प्रश्नच नाही उद्भवत. पण माझ्या जन्माच्या आधी आईला एक मुलगा म्हणजेच माझा मोठा भाऊ होता म्हणून दुःख करण्या सारखं ही काही नव्हतं. अंधारात जन्मले म्हणूनच कदाचित प्रकाशाच्या शोधात कायम राहिले यासाठी बंड करणे चक्क आंदोलन करणे घरात रुसणे फुगणे हे सर्व त्या बंडा चाच भाग. आता हसायला येत आहे. खूप बालिश पणा आता आता जात आहे तो थोडं थोडं सूज्ञ व्यक्ती सारखं वागण्याचा प्रयत्न करत आहे.
आता असं वाटतं की ती जन्माची वेळ, मग मस्जिद मधून होणारी अझान जणू माझं भविष्य खूणावत होत्या. हे फक्त मलाच वाटत कारण ; माझ्या वाटण्याचा वाटाण्याच्या दाण्या एवढं ही कुणाला पर्वा नाही. काही गुण - अवगुण घरातील डिएनए फॉल्ट असला तरी त्या सर्वांची दोन्ही घरांची डिएनए मिळून माझ एक वेगळचं सॅम्पल तयार झालं अगदी माझ्या सारख एकुलत एक!
आम्ही तिघेही रात्रीच जन्मलो फक्त मी रात्रीच्या अगदी शेवट टप्प्यात जिथून सूर्य उगवायची वेळ होते. म्हणूनच कायम जिथे जाते तिथे लख्ख उजेड पाडून येते. हसत राहणे हा माझा स्वभाव, हर फिकर को धुवे मे उड़ा सवय. नसत्या गोष्टी कुरवाळत बसणे आवडत नाही. हे झालं जन्माला आल्याची महती. आलोच मग जगणे भागच आहे. म्हणून जगू लागले सर्वांसारख.
दीड - दोन वर्षाची असताना नाना- नानी कडे सोडण्यात आल. छोट्या ला घाई होती ना प्रकट व्हायची. आईने तर नवस केलं होत मुलगाच होऊ दे दुसरा म्हणून झाला देखील. यानंतर मी नानी - नाना कडे राहिले. २००२ पर्यंत. मस्त जगले नको तिथे मेमरी शार्प आपली मग ते सोनेरी क्षण तो काळ कसा विसरणार? अगदी खायीन तर तुपाशी नाही तर उपाशी असं जगत होते. नाना - नानी यांची परिस्थिती बिकट होती तरी फुलासारख जपलं त्यांनी मला. प्रत्येक लाड पुरवले. माझी मावशी म्हणजेच यास्मिन आंटी माझी आयडल खूप हुशार , मेहनती, समजदार, प्रत्येका वेळेची जाण असलेली आजही तशीच आहे. आजही खूप जीव लावते मला. यास्मिन व्यतिरिक्त एक मामा रफिक छोटासा नानीचा बाबू आता खूप मोठा झाला आहे. अजून एक मावशी सुल्ताना असे चार जण आईला मिळून माझी आई शहनाज़ थोरली लग्न , नंतर मुलं बाळं सगळंच लवकर झाल तिचं. अठराव्या वर्षी तिने मुल न होण्याच्या ऑपरेशन च्या कागदावर सही केली. आता कळालच असेल केवढी स्पीड तिची. कोवळ्या वयात लग्नाच्या बेडीत अडकलेली ती आजही बाबांच्या मागे खंबीर उभी आहे. तरी तिला अक्कल नाही हे टोमणे बोलणी माझ्या बुद्धीला पटत नाही असो.
नाना - नानी राहायला अकलूज ला होते. २००२ पर्यंत मी पण अकलूज च्या शिवापूर पेठेतच. जैन विद्या मंदिर ही माझी पहिली शाळा जिथे पहिली पर्यंत शिक्षण झाले.पण माझे बालपण हे न विसरणारे राहिले.सर्वच जर इथे लिहीत बसले तर खूप मोठं होईल म्हणून पुढे लिहिते.अकलूज हे कायमच माझ्या आवडीचे राहिले आहे आज देखील.२००२ नंतर मी मुंबई ला आई-बाबांकडे गेले.तिथे मरोल माफ खान या उर्दू शाळेत माझा प्रवेश झाला नाही. कारण मी मला उर्दू येत नव्हती.इतर दादाच्या शाळेत जात होता तिथे देखील प्रवेश बंद झाले होते म्हणून मग मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत प्रवेश घेतला.तीन वर्षे या शाळेत शिकले.तेथून आय. ई.एस. माध्यमिक शाळा पवई येथे पुढील शिक्षण घेतले. इयत्ता पाचवी नंतर खूप काही शिकले.कारण शाळा व तेथील शिक्षक देखील प्रामाणिकपणे प्रत्येक विद्यार्थ्या कडे जातीने लक्ष देत होते. शाळेत नेहमीच स्पर्धेत भाग घेत असल्याने मुळे माझं अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले. तसेच घरातील वातावरण थोडे वेगळे होते.कारण आई नेहमी म्हणायचे मुली किती शिकल्या तरी भाकरी बनवणे हे यायलाच हवे.घरातील काम यायलाच हवीत.म्हणून मग मी जेव्हा सकाळी सव्वा सात वाजता घरातून शाळेसाठी निघायचे तेव्हा शाळेत जाण्याआधी घरासमोरील अंगण झाडू मारून जायचे.जेव्हा शेजारी पाहत होते तेव्हा ते आईला ओरडायचे पण आई कोणाचेच ऐकत नव्हती. यामुळे मला काम करण्याची सवय झाली. पण लोक किंवा मित्र मैत्रीणी जे काही डब्यात देऊन बोलायचे यामुळे खूप दुखावली जायची. दरवर्षी १-२ नुसार चौथी पासून सुरु झालेले प्रमाणपत्र दहावी पर्यंत राहिले. कोंबडीच्या पायासारखे अक्षर दहावी त येता- येता बदलले. माझी आजी ( दादी) म्हणायची शिकून काय कलेक्टर व्हायचयं ? तेव्हा कलेक्टर च 'क' देखील माहित नव्हता. नंतर ठरवलं कलेक्टर होणारच, मात्र आपण ठरवून नियती च लिहिलेलं बदलत का ? शाळेतून कसलीच तक्रार कधीच नव्हती. फक्त गणितात जेमतेम पास होत होते. कधीच बेरीज वजाबाकी च अनुभव पुस्तका बाहेर आला नाही म्हणून आकडेमोड ने पार मोडून जायची. घरी प्रत्येक रुल हे कडक. आईचा मार ही खाल्ला कधी हाताने , काठीने तर कधी शब्दाने. शब्दांचा मारा असह्य व्हायचा, वाटायच मी मुलगी आहे म्हणून अस वागतात का ? बाबा मला खूप आवडतात मला त्यांच्या सारखं स्वतःची ओळख बनवायची आहे ते माझा आदर्श आहेत. असे असले तरी त्यांच्या कित्येक गोष्टी मला पटत नाही त्यांचे निर्णय पचत नाहीत. २००४-२००५ या वर्षभरात नाना - नानी यांचे निधन झाले. नानांच्या नंतर माझी जवळीक बाबांसोबत वाढली. इ.दुसरी मधे मुंबई ला आल्यानंतर दादा च्या चुकीने बाईक पडली होती. त्यात बाबांनी इतक बेकार मारलं मला की घाबरून जागीच सू केली होती. नाना - नानी च्या घरात कोणी ओरडलं नव्हतं कधीच. इथे आल्या आल्या लाथा पडल्या यामुळे खूप वाईट वाटलं तेव्हा ठरवलं परत मी चुकीत नसायच कोणत्याच. चुक नसताना विनवण्या करून देखील मार खाल्ला. दादा वर खूप राग आला. नाना - नानी खूप आठवायचे आता देखील आठवतात. चौथी - पाचवी ला येई पर्यंत नाना नानी हरवले. कुठे तरी पिक्चर मधे ऐकलं होत ते या जगातून जाणारे लोकं तारे बनतात. मग तिथून पुढे रात्र होण्याची वाट पाहायचे त्या भल्या मोठ्या आकाशा कडे पाहून ताऱ्यांमधे नाना - नानी ला शोधायचे. दिवस उलटत गेले रोज तोच ठरलेला दिनक्रम सुरू असायचा. अकरा वाजता झोपा, सहा वाजता उठा तासभरात तयार व्हायच यात अंघोळीला दादाची माझी भांडण, झाडू न मारता शाळेत गेली तर आईचे भाषण वेगळे, सात वाजता शाळे ला निघायचं मग दुपारी दोन ला घरी. येथून पुढे जेवायच, आईने धुवून ठेवलेली सगळी भांडी त्यांच्या जागी लावायचं, झोप आली तर तासभर झोपायच अन्यथा अभ्यास करायचा. संध्याकाळी मैदान गाठायच कुणाला न जुमानता सायकल चे स्टंट करायचे. सूर्यास्ता पूर्वी घरी येऊन तोंड हात पाय धुवा नमाज, कुराण वाचा आठनंतर नमाज व जेवण, अभ्यास अंथरुण घाला किंवा भांडी धूवा तिघांना काम वाटून मिळायची. यात दादा चुना लावायचा खोड काढायचा आम्हा दोघांची. हे सर्व रोजच ठरलेलं.
पाचवीत असताना एके दिवशी बाबांचे मित्र आले घरी बाबांनी खूप कौतुकाने त्यांना दादाचे सर्टीफिकीट दाखवले मी आपल उगाच फाटक तोंड घेऊन " अब्बा मेरे भी है ऐसे दो सर्टीफिकीट दिखाओ ना वो भी" म्हंटल परत एक पाप केलं म्हणून थेट नकार आला. फक्त दादाचे व छोट्या भावाच्या प्रमाणपत्राचे प्रदर्शन केले गेले. मग वाटलं माझे दोनच आहेत ना कसे बरं दाखवतील. मी एवढी मिळवणार की दाखावावी लागणार नाही ती दिसतील अस ठरवून पुन्हा दुर्लक्ष केल. पण ते क्षण आजातागायत डोळ्यासमोर आहेत त्याच प्रश्न चिन्हां सोबत की "का माझ्या सोबत असा व्यवहार करत असावेत ?" अस असल तरी बाबा प्रेम करतात माझ्यावर. पुढे सातवीत असताना बकरी ईद च्या दिवशी एक पात्री नाटकाची स्पर्धा होती. आय. ई . एस च्या महाराष्ट्र भर असलेल्या विविध शाळेतून विद्यार्थी आले होते आमच्या शाळेतर्फे माझी निवड झाली होती. घरात हो हो म्हणून नेमकं ईद आहे म्हणून कोणीच घेवून गेल नाही. त्याचं बक्षीस दुसऱ्या दिवशी शाळेत कुलकर्णी बाईंनी अख्या वर्गासमोर पानउतारा करून दिला. यानंतर आज पर्यंत मी बकरी ईद साठी कधीच सजण वगैरे करत नाही. बकरी ईद आली की बाईंनी केलेला अपमान आठवतो. त्यांची चूक नाही स्वतः मुख्यध्यापिका जेकेब मॅडम नी माझ नाव द्यायला लावलं होतं. त्यांच्या विश्वास होता कारण ; चक्क वीस विद्यार्थ्यांमधून मला निवडलं होत. याचा परिणाम शेवटच्या वर्षापर्यंत दहावी पर्यंत राहिला की मला कधीच फायनल पर्यंत सिलेक्ट केल गेल नाही. तरी शाळेत होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत भाग घेत राहिले. वाचनाची आवड होती म्हणून मिळेल ते पुस्तक वाचायचे लायब्ररी मधे बसून. यात किरण बेदी यांच आय डेअर वाचलं यातून प्रेरित झाले. दहावी ला आले तेव्हा गावी घर बांधल होत म्हणून वास्तूशांती च कारण देत समर क्लासेस सोडवून मला गावी पाठवल गेलं. किती विनत्या करून हाती काहीच नाही तिथे गावी काम एके काम. अभ्यास झालाच नाही जून मधे परत मुंबई ला आल्यावर पाहिलं तर सोबतचे ढ गोळे विद्यार्थी देखील समर क्लासेस लावून आता दुसऱ्यांदा परत अभ्यास सुरु करत होते. याचा परिणाम अर्थातच माझ्या निकालावर झाला कारण मी तेवढ लोड घेऊन अभ्यास करू शकत नव्हते. त्यात आई तिची कामं काही केल्या सरत नव्हती. बोर्डाच्या परीक्षा सुरु झाल्या सोबतच क्रिकेट वर्ल्ड कप सुद्धा; आम्ही क्रिकेट वेडे कर्माने मेले गणित राहिला ना राव ! क्रिकेट तसेच इतर गोष्टी त्याला जबाबदार होत्या. दोन वेळा परिक्षा दिली पण पास कशी होणार कारण अभ्यास फक्त ट्यूशन मधेच करत होते आज ठेवलेली पुस्तक पुन्हा झेंडे सर दुसऱ्या दिवशी सकाळच्या बॅच साठी आवाज द्यायचे तेव्हा उघडत होती. नंतर जरा डोक वापरलं आणि सरांना सांगून जास्त वेळ क्लास मधे बसू लागली अभ्यास व्हावा म्हणून पण फायदा झाला नाही. आई क्लासेस चा दीड तास होताच शेजारच्या लहान मुलांना पाठवायची आई बोलवते ये म्हणून. मग काय जायचे कारण; जरा पाच मिनीट जास्त बसले की घरी जाताच औक्षणाची तयारी झालेलीच असायची. हे सर्व जडण-घडण वगैरे नाही जाणून बुजून होत होतं इतकं नक्की. आत्याच्या मुलींना पाहून रडू यायचं. आत्या मुली अभ्यास करायच्या म्हणून रात्री उठून चहा- दूध द्यायची. इथे आमच्या घरी एक तर रुम लहान त्यात लाईटा बंद केल्या जायच्या. पाचवीत तर इंग्लिश च्या भूजबळ बाई इतक्या अभ्यास द्यायच्या की झोपेत उशी च्या जागी पुस्तक वह्या असायच्या. माझी अभ्यासाची आवड आई- बाबांना कळत नव्हती का कळून घ्यायची नव्हती त्यांनाच माहीत. दहावीत विषय राहिला यावर मावशी चा काय शिक्षकांचा विश्वास बसला नाही. तरी असू देत यामुळे लोकं कळत गेली. एक सवय नेहमी राहिली ते म्हणजे नमाज़ , कुराण तिथेच भरभरून बोलायचे. आध्यात्मिक अभ्यास बालपणा पासून होताच. यासाठी आईने फार मेहनत घेतली. नंतर माझी नमाज़ , कुराण वाचणे, रोज़ा यांना आई वैतागली असावी म्हणून ओरडायची. मी एकणारी नाहीच कधी मग हे पन अनसूना करत गेले. जेवण बनवणं दहावी त येईपर्यंत शिकले. मास्टर शेफ ची प्रचंड आवड आपण देखील जायच म्हणून कल्पकतेचा पूर्ण वापर करून जेवण बनवू लागले. हळू हळू रात्रीच जेवण बनवणं माझ्या वाटेला येऊ लागलं. बरंच झालं तेही आता कोणी बोट दाखवत नाही. २०११ ते २०१५ जेवण बनवा वाचन करा यात गेलं कलेक्टर दूरच राहिलं शिपाई म्हणून देखील लागणार नाही याची जाणीव करून द्यायला दादा होताच. २०१२ ला रडून रडून कॉम्प्यूटर चा कोर्स साठी अँडमिशन घेतलं पण त्याच्या अंतिम परिक्षा न देताच सोलापूर ला आले ; आले नाही आणण्यात आलं. या खोट्या आशेवर की कॉलेज ला अँडमिशन करू तुझ. आर्ट्स मधे शिक ; कसलं काय इथे दादा शिकत होता आले आणि त्याचा डबा बनवून देऊ लागले. दुपारी फ्रि असायचे मग दादाच्या कॉम्प्यूटर मधे इस्लामी प्रवचन ऐकू लागले. पेन्सिल स्केच करू लागले मदत म्हणून बाबांच्या कामाचे ऑडिट झालेले न झालेले नाव डि पी आर मधून वेगळे करायची खूप समाधान वाटायच. याच काळात एक व्यक्ती आवडू लागली त्याला बरीच कारणं परिस्थिती जबाबदार आहेत असो. अजून एक कारण म्हणजे आईची कोणी तरी दुरून लागलेली आत्या घरी आली व बाबांचे कान भरून गेली. म्हंटली "तुझ्या मुलीचे लफडे आहेत" बाबा संतापले माझ्यावर ती गेल्यावर सकाळपासून कॉलेज ॲडमिशन साठी वनवन फिरलेली एकही घास न जेवलेली तेवढ पोटभर बोलणी खाल्ली. तेव्हा बाबा म्हंटले होते " तुझ्या सारखी मुलगी असण्यापेक्षा नसलेली बरी, तुझं नाही माझ डोकं दुखायला पाहिजे" .नंतर आजी समोर बोलताना ऐकलं ही ठिणगी त्या राणी साहेब पाडून पसार झाल्या. माझ लफडं सोड कोणी आवडत देखील नव्हतं. मग ठरवून करायला गेले. ते पण काय सक्सेस नाही झालं. आयुष्याची पाच वर्षे नुसती घरात काढली. तेव्हा बाबा हॉटेल वगैरे ला घेऊन जायचे तिथे खाल्लेलं घरी ट्राय करून बाबांच भरभरून कौतुक घ्यायची मी आई पण कौतुक करायची. आई बाबांनी कमी केल नाही फक्त शिकायचं होत ते तेवढ राहून गेलं. होय पण या काळात ' सुन्नी दावत ए इस्लामी' एस डी आय या संस्थेशी खूप जवळीक झाली होती. या संस्थेचा माझ्या जीवनात फार मोलाचा वाटा राहिला आहे. माझ्या निरर्थक जीवनाला हजरत शाकीर नुरी यांच्या मार्गदर्शनाने एक मार्ग दिला. त्यांच्या आशिर्वादाने नेहमीच वाढत गेले.
२०१५ मधे शेजारच्या गावातून दुधनी येथून स्थळ आले. मुलगा सरकारी नोकरी असलेला बाबांना पसंत पडला तेथेही माझा नकारच. नंतर वयाच अंतर कळालं मग तर थेट नक्को ! पण बाबांनी तिथेच फिक्स केलं. २०१६ मधे लग्न झालं. एक छान समजदार साथी मिळाला मग मुझे और क्या चाहिये ? कधी कधी फ्यूज उडतो ठिक आहे तेवढं तर चालणारच. नेहमी साथ देतातच ते कधीतरी सटकतय मधेच. दोघांना कुणाचीही दृष्ट लागू नये.
शिकण्याची इच्छा व्यक्त करताच होकार दिला नवर्‍याने तेव्हा पासून अजून देखील शिकतच आहे. मधे गॅप झाला पुन्हा. नवऱ्याला घरातल्यांच ऐकाव लागलं दोन्ही कडचं तरी शिक्षणाची आवड पाहून त्यांचा होकार नेहमीच आहे. दहावी क्लिअर केलं या काळात पहिलं अपत्य गेलं तेव्हा तर नको नको ती बोलणी पचवली. पण बाळं माझ्या चुकीने नाही गेलं दुर्लक्षा मुळे गेलं. ५-६ दिवस जुलाब होत असताना देखील मला दवाखान्यात नेलं नाही. ९ जून २०१७ ला आठवा महिना होता बाळ पोटातच गेलं. याचे पडसाद मोईन च्या जन्मापर्यंत TORCH च्या रुपात राहिले. नंतर फार त्रास झाला या गोष्टीचा, बाळ नसल्याचा. माझ विश्व या कथेत ती व्यथा या आधी मांडली आहे.
२०१८ संपूर्ण आजारपण त्यात बारावी २०१९ ला परिक्षेच्या वेळेत घरात दिराचं लग्न व दोन दिवसांनी बोर्डाची परीक्षा माझी चांगलीच तारांबळ उडाली. निकाल आला फर्स्ट क्लास मधे पास झाले. सर्वात आधी बाबांना रिझल्ट पाठवला. नवऱ्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. तेव्हा दुसऱ्यांदा पोटूशी होते आणि घरात कोणालाच कळवलं नव्हतं. याला काही कारणं होती तसेच दोघांची सहमती. पण तरी आईची बाबाची आठवण येऊन रडू यायचं. सातवा महिना सुरू झाला आणि डेंग्यू डिटेक्ट झालं सर्वच गेलं हातातून असं वाटत असताना अल्लाह वर असलेल्या विश्वासाने सर्व ठिक झालं. तेव्हा जवळ कुणीच नव्हतं. आई - बाबा होणारी वहिनी लहान भाऊ भेटायला आले तेव्हा त्यांना कळू नये सातवा महिना आहे म्हणून अंथरुणातून उठलेचं नाही. ते गेल्यावर नमाज मधे खूप रडले अपराध केल्या सारखं वाटत होत. तरी सावरलं स्वतःला. २०१७-२०१९ खूप कठीण काळं काढला. हातावर सिरींज लावून घरातील काम ही केली. त्यात मुल नव्हत म्हणून लोकांची टोमणी. सर्व काही आलच.
आता देखील ऐकाव लागतचं आहे दुसरं झालं नाही म्हणून. बोलणाऱ्याच काय जातय सोडा. प्रेग्नंट असताना पासून ते शेवटच्या क्षणापर्यंत काय कसरत झाली एकट्या जीवाची शब्दात व्यक्त करता येत नाहीये. आता देखील काही झालं तरी कुणीच नसतं यांना मुलं हवीत जाऊ द्या सोडा.
२०२० लॉकडाऊन सुरु झालं. मी आई- बाबांकडे गावी च होते डिलीव्हरी करून आल्यानंतर. विधात्याची करणी कोणी न पाहिली. नऊ महिने आई- बाबांना आठवून तसच खोटं नाटं राग धरून माहेरच्या घराची पायरी न ओलांडलेली मी लॉकडाऊन मुळे ९ महिने गावीच राहीले. गावच्या घराच काही वास्तूदोष निघाला ज्याचा त्रास मला माझ्या बाळाला होण्याचा धोका होता म्हणून गेले तर नव्हतेच व सांगितलं ही नाही असो. मोईन च्या येण्याने सर्वांचे राग - रुसवे दूर झाले. २०२० ऑगस्ट मधे सोलापूर मधे आले वास्तव्यास बदली झाली.
एका इंस्टीट्यूट मधे कपिंग थेरपिस्ट साठी प्रवेश घेतला जवळ पैसे नव्हते तसेच काही वाद झाल्याने बारावी पासूनच नवऱ्या कडून पैसे शिक्षणाला घेणे बंद केलं होतं स्वतःच. शकील अत्तार या माझ्या सिनीयर सरांनी फि भरली, जी मी नंतर ट्रेनिंग दरम्यान परत केली. शिपायाची नोकरी न मिळवू शकणारी थेरपिस्ट झाले होते. २०१९ मधेच ईरा वर लिखाण सुरु केला फोटोग्राफी मधे तिसरा क्रमांक पटकावला.२०२० मधे ड्रिम इंडिया या कंपनीची जिल्हा प्रतिनीधी झाले. सुन्नी दावत ए इस्लामी या संस्थेत आध्यात्मिक, सामाजिक जे कार्य होतात स्त्रियांमध्ये याचा पदाभार मिळाला. आज २७ व्या वर्षी पर्यंत स्वतःची ओळख निर्माण झाली. अजून बाबांसारखी मोठी व्यक्ती नाही झाले. त्यांची बरोबरी करू ही शकत नाही माझ्या सारखे धोंडे. प्रयत्न नक्कीच करू शकते. क्योंकी मेहनत करने वालों को अल्लाह कामयाबी जरूर देता है।
सध्या नॅचरोपॅथी डॉक्टर वैद्य बनत आहे. सर्वांनी शुभेच्छा द्या एक चांगली डॉक्टर व्हावी मी.
चला जमा गोळा करते बोअर व्हाल तुम्ही लोकं. जे लिहलं आहे प्रामाणिक पणे लिहलं आहे. पुस्तक नव्हंत हे म्हणून भरपूर स्कीप केलं. पळवल्या सारखं वाटलं असेल तर सवारी !
ला - क - शे द्या आठवणीने.